हिंगोली शहर : महाराष्ट्रातील एक शहर आणि याच नावाच्या जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय. अजिंठा डोंगररांगापैकी हिंगोलीटेकड्या या स्थानिक नावाने ओळखल्या जाणाऱ्या डोंगररांगातून वाहणाऱ्या कयाधू नदीकाठी हे शहर वसले आहे. लोकसंख्या ८५,१०३ (२०११). मराठवाड्यातील एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र म्हणूनही हिंगोलीला महत्त्व असून पूर्णा-अकोला-खांडवा या लोहमार्गावरील हे एक महत्त्वाचे स्थानक आहे.
हिंगोली हे प्राचीन, ऐतिहासिक व धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचे नगर आहे. महाभारतकाळात या शहराचे नाव एकचक्रनगरी होते. गावात मध्यभागी महाभारत कालीन श्री जलेश्वर महादेवाचे मंदिर आहे. याच ठिकाणी भीम व बकासुराचे युद्ध झाले असे मानतात. येथे बाराशीव हनुमान हे प्रसिद्ध तीर्थस्थान आहे.
स्वातंत्र्यपूर्वकाळात मराठ्यांची दोन मोठी युद्धे येथे झाली आहेत. स्वातंत्र्यपूर्वकाळात हे शहर निजामाच्या आधिपत्याखाली होते. विदर्भाच्या सीमेलगत असल्यामुळे येथे निजामाचा महत्त्वाचा लष्करी तळ होता. त्या काळात सैन्यदलाला व पशूंना वैद्यकीय सेवा हिंगोलीतूनच पुरविल्या जात.
लष्करी वसाहतीमुळे येथे भारतातील विविध राज्यांतील लोक स्थायिक झाले आहेत. येथील लोकांची मुख्य भाषा मराठी आहे मात्र दख्खनी, उर्दू, हिंदी, मारवाडी इ. भाषाही येथे बोलल्या जातात. येथे दसरा महोत्सव भव्य साजरा केला जातो. त्याला सु. दीडशेपेक्षाही अधिक वर्षांची परंपरा लाभली आहे. येथे उन्हाळ्यात हवामान उष्ण व कोरडे असते. एप्रिल ते जून महिन्यांत कमाल तापमान ४०⁰से., तर हिवाळ्यात डिसेंबर ते मार्च महिन्यांत किमान तापमान २२⁰से. असते. हिवाळ्यातील कमाल तापमान ३३⁰से. व किमान तापमान ७⁰से. असते. येथे कृषी उत्पन्न बाजार समिती असून विक्रीसाठी गहू, हरभरा, तूर, सोयाबीन, भुईमूग, कापूस इ. पिके येतात.
शहर व आजूबाजूच्या परिसरात लहानमोठे उद्योग विकसित झाले आहेत. लोकरीपासून घोंगड्या विणण्याचा उद्योग तसेच कातडी कमावणे व त्यापासून वस्तू तयार करण्याचा व्यवसाय हिंगोली येथे चालतो. कातडी वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण केंद्र येथे आहे. यांशिवाय कापसाची सरकी काढणे व गाठी बांधणे कारखाने आणि सिंचनासाठी लागणाऱ्याळांचा कारखाना येथे आहे. खटकाळी मारुती, शक्तिब्रह्माश्रम, गोपाळलाल मंदिर, जलेश्वर मंदिर, दत्त मंदिर, बालाजी मंदिर, खाकी बाबा मठ व फलटण मशीद ही या शहरातील काही प्रसिद्ध ठिकाणे आहेत.
पवार, मनीषा शशिकांत
“