हॉवर्थ (हॉर्थ), सर वॉल्टर नॉर्मन : (१९ मार्च १८८३–१९ मार्च १९५०). ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ. कार्बोहायड्रेटे व क जीवनसत्त्व (ॲस्कॉर्बिक अम्ल) यांच्या रासायनिक संरचना निश्चित केल्याबद्दल त्यांना १९३७ सालचे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक स्वीस रसायनशास्त्रज्ञपॉल कारर यांच्यासमवेत विभागून मिळाले. कारर यांनी कॅरोटिनॉइडे, फ्लॅव्होने आणि अ व ब२ जीवनसत्त्वे यांविषयी संशोधन केले होते. 

 

हॉवर्थ यांचा जन्म चॉर्ली (लँकाशर, इंग्लंड) येथे झाला. त्यांनीमँचेस्टर विद्यापीठातून पदवी (१९०६), गटिंगेन विद्यापीठातून पीएच्.डी. (१९१०) आणि मँचेस्टर विद्यापीठातून डी.एस्सी. (१९११) यापदव्या संपादन केल्या. त्यांनी सेंट अँड्र्यूज विद्यापीठात रसायनशास्त्राचे अध्यापन केले (१९१२–२०). ते डरम विद्यापीठात प्राध्यापक (१९२०–२५) व बर्मिंगहॅम विद्यापीठात रसायनशास्त्र विभागाचे संचालक (१९२५–४८) होते. 

 

हॉवर्थ यांनी १९१२ मध्ये सेंट अँड्र्यूज विद्यापीठात इंग्रज रसायन-शास्त्रज्ञ सर जेम्स अर्व्हन व टॉमस पर्डी यांच्यासोबत कार्बोहायड्रेटांसंबंधी – शर्करा, स्टार्च व सेल्युलोज यांसंबंधी – संशोधन केले. साध्या शर्करेमध्ये कार्बन अणूंची मांडणी सरळ रेषेमध्ये नसून वलयासारखीअसते, असे त्यांनी शोधून काढले. या शर्करेच्या वलयासारख्या मांडण्या ‘हॉवर्थ रचना’ म्हणून ओळखल्या जातात. 

 

हॉवर्थ यांनी १९२८ पर्यंत माल्टोज, सेलोबायोज, लॅक्टोज, जेन्शिओबायोज, मेलिबायोज, जेन्शिआनोज, रॅफिनोज इ. साध्या शर्करांच्या संरचना निश्चित केल्या. स्टार्चचा मूलभूत घटक माल्टोज आणि सेल्युलोजचा मूलभूत घटक सेलोबायोज यांच्यात मूलभूत फरक म्हणजे दोन ग्लुकोज रेणूंमधील भिन्न तर्‍हा हा असतो, असे त्यांनी दाखवून दिले. 

 

हॉवर्थ यांनी बर्मिंगहॅम विद्यापीठात क जीवनसत्त्वासंबंधी अध्ययन केले. या जीवनसत्त्वाची संरचना ही साध्या शर्करेच्या संरचनेसारखी असते, असे त्यांच्या निदर्शनास आले. १९३४ मध्ये ते ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञसर एडमंड हीर्स्ट यांच्यासोबत प्रथमच क जीवनसत्त्व प्रयोगशाळेत तयारकरण्यामध्ये यशस्वी झाले. कृत्रिम रीत्या तयार करण्यात आलेले हे पहिले जीवनसत्त्व होते. त्यांच्या या संशोधनामुळे कार्बनी रसायनशास्त्राच्या ज्ञानामध्ये मौलिक वाढ झाली, तसेच क जीवनसत्त्व (हॉवर्थ त्याला ॲस्कॉर्बिक अम्ल म्हणत) वैद्यकीय हेतूसाठी (औषधी उपयोगासाठी) स्वस्तात तयार करणे शक्य झाले. त्यांनी स्टार्च, सेल्युलोज, ग्लायकोजेन, इन्युलीन व झायलॅन या रेणूंचे मूलभूत स्वरूप स्पष्ट केले. त्यांनी शर्करेच्या (साखरेचे) मिथिलीकरण करण्यासाठी नवीन पद्धती विकसित केली. तिचा उपयोग शर्करेच्या रेणूची संरचना ठरविण्यासाठी होतो. 

 

हॉवर्थ यांनी अनेक शोधनिबंध लिहिले. त्यांचा द कॉन्स्टिट्यूशन ऑफ शुगर्स (१९२९) हा ग्रंथ प्रमाणित मानला जातो. ते केमिकल सोसायटीचे अध्यक्ष (१९४४–४६) रॉयल सोसायटीचे फेलो (१९२८) आणि उपाध्यक्ष (१९४७-४८) होते. त्यांना सर (नाईट) या किताबाने सन्मानित करण्यात आले (१९४७). ते नऊ परदेशी संस्थांचे सभासद होते. त्यांना केमिकल सोसायटीचे लाँगस्टाफ पदक (१९३३), रॉयल सोसायटीचे डेव्ही पदक (१९३४) आणि रॉयल पदक (१९४२) मिळाले. 

 

हॉवर्थ यांचे बर्मिंगहॅम येथे निधन झाले. 

मगर, सुरेखा अ.