हॉल, ग्रॅनव्हिल स्टॅन्ली : (१ फेब्रुवारी १८४४–२४ एप्रिल १९२४). अमेरिकन मानसशास्त्रज्ञ. अमेरिकेतील ॲराफील्ड, मॅसॅचूसेट्स येथे जन्म. मुळात धर्मोपदेशक हो ण्या चे शिक्षण घेण्यासाठी त्याने न्यूयॉर्क शहरातील युनियन थिऑलॉजिकल सेमिनरीमध्ये प्रवेश घेतला होता तथापि वर्षभराने तत्त्वज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी तो जर्मनीला गेला (१८६८). तेथे तीन वर्षे राहिल्यानंतर ओहायओ येथील अँटिओक कॉलेजात तो अध्यापन करू लागला. ⇨ व्हिल्हेल्म व्हुंट ह्याच्या फिजिऑलॉजिकल सायकॉलॉजी (१८७३-७४) ह्या ग्रंथाच्या वाचनाने प्रभावित होऊन मानसशास्त्र ह्या विषयाचा व्यासंग करणे, हे त्याने आपले जीवितकार्य मानले. १८७६ मध्ये त्याने अँटिओक कॉलेजातील आपली नोकरी सोडली आणि मानसशास्त्राच्या अभ्यासासाठी तो जर्मनीला गेला. तेथे व्हुंट याच्याशी त्याचा प्रत्यक्ष परिचय झाला. मानसशास्त्रीय संशोधनासाठी प्रश्नावलीचे मोल किती आहे, हे त्याला तेथे कळले. पुढे त्याने आणि त्याच्या विद्यार्थ्यांनी १९० हून अधिक प्रश्नावल्या तयार केल्या. ह्या प्रश्नावलींमुळे बालमानसशास्त्रात अनेकांना स्वारस्य निर्माण झाले. अमेरिकेत परत आल्यानंतर त्याने हार्व्हर्ड विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पीएच्.डी. मिळवली. ह्या विषयात अमेरिकेत दिली गेलेली ही पहिली पीएच्.डी. होय.
हॉलच्या नेतृत्वाखाली (१८८३–८८) जॉन हॉपकिन्झ युनिव्हर्सिटी आणि नंतर क्लार्क युनिव्हर्सिटी अशा दोन विद्यापीठांतून मानसशास्त्राचा अभ्यास उत्तम प्रकारे होऊ लागला. हॉलने मानसशास्त्रासाठी तीन नियतकालिके सुरू केली. पहिले, अमेरिकन जर्नल ऑफ सायकॉलॉजी (१८८७). प्रायोगिक मानसशास्त्राला वाहिलेले अमेरिकेतील हे पहिले आणि जगातील दुसरे नियतकालिक होय. पेडॅगॉगिकल सेमिनरी (१८९१) हे दुसरे नियतकालिक (पुढे ते जर्नल ऑफ जेनेटिक सायकॉलॉजी म्हणून प्रसिद्ध झाले) आणि तिसरे, जर्नल ऑफ ॲप्लाइड सायकॉलॉजी (१९१७) होय. हॉलने ‘अमेरिकन सायकॉलॉजिकल असोसिएशन’ ही संघटना उभी केली. ह्या संघटनेचा तो दोनदा अध्यक्ष होता (१८९२ १९२४).
हॉलने क्लार्क युनिव्हर्सिटीत काही उत्तम व्याख्यात्यांची व्याख्याने घडवून आणली (१९०९). त्यांत ⇨ सिग्मंड फ्रॉइड ह्याचाही सहभाग होता. ह्या सहभागामुळे फ्रॉइडला पहिल्यांदा अकादमिक मान्यता मिळाली. ह्या प्रसंगानंतर फ्रॉइडच्या विचारांचा यूरोपीय विचारांवर फार मोठा मानस-शास्त्रीय प्रभाव पडला.
१८८० च्या दशकाच्या आरंभी हॉलने मानसशास्त्रीय विचार शिक्षणात लागू करण्यास आरंभ केला. पुढे बालकांच्या अभ्यासासाठीच्या चळवळीचे नेतृत्व त्याच्याकडे आले. यथावकाश अत्यंत प्रभावी असा राष्ट्रीय शिक्षण तज्ज्ञ म्हणून त्याची ख्याती झाली. रूसो, पेस्टालोत्सी, फ्रीड्रिख, फ्रबेल यांच्यासारख्या विचारवंतांच्या प्रभावातून शिक्षणात नैसर्गिक अभिगम (ॲप्रोच) असावा, असे त्याला वाटू लागले. त्यावेळी अमेरिकेतील शिक्षणात पाठांतर पद्धती प्रचलित होती.
बालपण ते किशोरवय आणि वृद्धत्व अशा आयुष्याच्या विकास- प्रक्रियांवर हॉलने काम केले आणि त्यातून ॲडलेसन्स (२ खंड, १९०४) आणि सिनेसन्स (१९२२) ह्या त्याच्या दोन पुस्तकांची निर्मिती झाली. हॉलने आपल्या मानसशास्त्रीय अभिगमाला विकास मानसशास्त्र (जेनेटिक सायकॉलॉजी) असे नाव दिले. मानसशास्त्राला त्याचे हे सैद्धान्तिक योगदान होय पण ते अल्पजीवी ठरले. हॉलच्या या अभिगमात ⇨ लामार्क– प्रणीत संपादित गुणलक्षणांचे अनुहरण (इनहेरिटन्स), चार्ल्स डार्विनचा ⇨क्रमविकासवाद आणि हेगेलची पुनरावर्तनाची (रिकॅपिच्युलेशन) संकल्पना ह्या तिन्हींचा संयोग साधला आहे. हॉलचे असे मत होते की, प्रत्येक व्यक्तीचा मानसशास्त्रीय विकास हे तिच्या वंशाच्या मानस-शास्त्रीय विकासाचे पुनरावर्तन असते. त्याचा असा विश्वास होता की, लहान मुलांचा आणि आदिम वंशाचा अभ्यास ह्यांतून मनाचा विकास त्याच्या क्रमविकासातून कसा झाला, हे उघड होईल.
हॉलच्या महत्त्वाच्या अन्य ग्रंथांत फाउंडर्स ऑफ मॉडर्न सायकॉलॉजी (१९१२), जीझस द ख्राइस्ट इन लाइट ऑफ सायकॉलॉजी (२ खंड, १९१७), मोराल : द स्यूप्रिम स्टँडर्ड ऑफ लाइफ अँड काँडक्ट यांचा अंतर्भाव होतो.
वूर्सेस्टर, मॅसॅचूसेट्स येथे तो निधन पावला.
कुलकर्णी, अ. र.
“