हॉर्मोने, वनस्पतींतील : असंख्य कोशिकांचे एकत्रीकरण होऊन त्यांपासून एक सजीव घटक बनतो, त्यावेळी तो किण किंवा अर्बुदासारखी (गाठीसारखी) फक्त कोशिका-राशी नसून त्याच्या सर्व कोशिकांत महत्त्वपूर्ण संघटना असते. त्यामुळे हिरव्या वनस्पतींत ⇨प्रकाशसंश्लेषणा खेरीज मौलिक अन्नपदार्थ निर्मिती, वृद्धिस्थानांवर नियंत्रण, भिन्न ऊतके (समान रचना व कार्य असणारे कोशिकासमूह) बनणे व दोन्ही टोके (ध्रुवत्व) स्थापन करणे इ. गोष्टी साध्य होतात. सर्व साध्या व जटिल वनस्पतींची वाढ आणि त्यांची विशिष्ट शरीराकृती यांच्या विकासात योग्य ते मार्गदर्शन व नियंत्रण ज्या रासायनिक संदेश- वाहकांतर्फे होते, त्यांचा ह्या संघटनेत अंतर्भाव होतो ही अत्यंत अल्प प्रमाणात तयार होणारी वनस्पतींच्या काही विशिष्ट भागात तयार होऊन आवश्यक त्या ठिकाणी वाहून नेली जाणारी व काही निश्चित परिणाम दर्शविणारी कार्बनी संयुगे असून त्यांना हॉर्मोने म्हणतात. वनस्पतीत तयार होणाऱ्या या हॉर्मोनांखेरीज या प्रकारची इतर रासायनिक संयुगेही आज माहीत झाली असून त्यांचा अल्प प्रमाणात वनस्पतीवर वापर केला असता त्यांचे नैसर्गिक हॉर्मोनांप्रमाणेच परिणाम दिसून येतात. काही हॉर्मोनांच्या रासायनिक संरचना पुढे दिल्या आहेत.
इतिहास : काही रासायनिक संयुगांच्या संचाराने वनस्पतीच्या एका भागाचा दुसऱ्या भागावर नेहमी प्रभाव पडतो याची कल्पना १८८० च्या सुमारास ⇨यूलिउस फोन झाक्स या शास्त्रज्ञास आली. कलमाला मुळे फुटणे व वनस्पतीला फुले येणे अशा क्रियांत त्याच्या दुसऱ्या भागांपासून काही उद्दीपन मिळत असावे, असेही त्यांनी प्रतिपादन केले. मूळ व खोड यांना प्रकाशानुवर्तन व भूम्यानुवर्तन (गुरुत्वाकर्षण परिणाम) या प्रतिक्रियांमध्ये आलेले बाक हे त्यांच्या टोकात तयार झालेले पदार्थ वाढ होत असलेल्या त्यांच्या खालच्या भागात गेल्याने तयार होत असावे, असा निष्कर्ष १८८० मध्ये चार्ल्स डार्विन यांनी काढला [→ वनस्पतींचे चलनवलन]. प्राण्यांमधील हॉर्मोनांचा शोध ग्रीक शास्त्रज्ञांनी १९०५ मध्ये लावला व पुढे असे पदार्थ वनस्पतींतही सापडतात असे दिसून आले. हॉर्मोनांविषयी आपले ज्ञान अद्यापही पूर्ण नसले तरी पी. बॉयसेन-येन्सेन, ⇨ फ्रिट्स वारमोल्ट वेंट, ⇨ फ्रिडरिक ऑगस्ट फर्दिनांद ख्रिस्तिअन वेंट, ⇨ केनेथ व्हिव्हिअन थिमान,जे. व्हान ओव्हरबेक, एफ्. स्कूग वगैरे शास्त्रज्ञांनी विसाव्या शतकात केलेल्या अनुसंधानामुळे हॉर्मोनांविषयीच्या ज्ञानात खूपच भर पडली आहे.
प्रायोगिक हॉर्मोनांचे वनस्पतीवरील परिणाम प्रथमतः ⇨ओट या वनस्पतीच्या आदिपर्णवेष्टावर दाखविण्यात आले. कोणत्याही गवताचे बी रुजल्यावर जमिनीवर येणारा हा पहिला अवयव होय [→ अंकुरण]. हा नळीसारखा असून आतील कोवळ्या पानांभोवती त्याचे संरक्षक आवरण असते बी रुजल्यापासून ३-४ दिवस तो वाढत असतो त्याचे टोक कापले तर वाढ ताबडतोब खुंटते कापलेले टोक पुन्हा ठेवले तर पुन्हा वाढ चालू राहते. यावरून असे अनुमान काढले गेले की, त्याची वाढ त्याच्या टोकापासून मिळालेल्या काही उद्दीपनापासून (प्रेरणेपासून) होत असावी. आदिपर्णवेष्टाची कापलेली टोके आगर-आगर जेलीवर ठेवली व काही वेळाने त्या जेलीचा चौरस तुकडा टोक कापलेल्या आदिपर्णवेष्टावर ठेवला तर त्याची वाढ जणूकाही त्याचे कापलेले टोकच पुन्हा त्यावर ठेवल्या-प्रमाणे चालू राहते यावरून कापलेल्या टोकामधून जेलीमध्ये वाढीस आवश्यक असलेले काही पदार्थ जात असावेत, असा निष्कर्ष काढण्यात आला. आदिपर्णवेष्टाप्रमाणे खोड, पानाचे व फुलाचे देठ वगैरेंमध्येही असेच परिणाम दिसून आले आहेत.
उपस्थिती व प्रकार : हॉर्मोनांचे अस्तित्व सर्व वनस्पतींत आढळले आहे त्यांच्या कोशिकांत ते निरनिराळ्या रासायनिक अवस्थेत दिसून येतात, परंतु त्यांपैकी मुक्त हॉर्मोनांचाच फैलाव व परिणाम दिसून येतो व इतर अवस्थेतील हॉर्मोने निष्क्रिय असतात. वनस्पतींच्या वाढीस कारणीभूत असणारी व फुले निर्माण करणारी अशी मुख्यतः दोन प्रकारची हॉर्मोने आढळतात. याखेरीज कोशिकांची लांबी वाढविणारी ‘जिबरेलिने’, कोशिकाविभाजन घडविणारी ‘कायनिने’ व वाढ थांबविणारी ‘निरोधके’ यांचाही वनस्पतींतील हॉर्मोनांत समावेश केला जातो. प्ररोहातील कोशिकांची लांबी वाढविण्यास चालना देणाऱ्या हॉर्मोनास इंग्रजीत ऑक्सिन म्हणतात (उदा., इंडॉल ॲसिटिक अम्ले) . तथापि, सर्व प्रकारच्या वृद्धीचे नियंत्रण करणाऱ्या अनेक हॉर्मोनांना तीच संज्ञा वापरतात.
वनस्पतींमध्ये सर्वसाधारणतः इंडॉल-३-ॲसिटिक अम्ल (C8H6N CH2 COOH) हे हॉर्मोन (हेटेरोऑक्सिन) सर्वत्र आढळते. १९३५ मध्ये थिमान यांनी हे हॉर्मोन पावावर आलेल्या बुरशीपासून वेगळे काढले व त्यानंतर मका, ओट, घेवडा, टोमॅटो, अननस इ. उच्च वनस्पतींतही हे आढळले. उच्च वनस्पतींत केवळ हेच हॉर्मोन त्यांच्या वाढीस कारणीभूत आहे, असा समज १९५० पर्यंत होता परंतु नंतर याखेरीज इंडॉल ॲसिटोनायट्राइल (C8H6N CH2 CN), एथिल इंडॉल ॲसिटेट (C8H6N CH2 COOCH CH3), इंडॉल पायरूव्हिक अम्ल (C8H6N CH2 CO COOH) इ. इतर हॉर्मोनेही वनस्पतींच्या वाढीस कारणीभूत असल्याचे आढळले. ह्या सर्वांच्या रासायनिक रचनेवरून त्यांचे इंडॉल ॲसिटिक अम्लामध्ये सहज रूपांतर होऊ शकते, असे आढळले व कदाचित वनस्पतींची वाढ होण्याअगोदर तसे रूपांतर होतही असावे. इंडॉल ॲसिटिक अम्ल हे हॉर्मोन ट्रिप्टोफेनापासून ट्रिप्टामीन किंवा इंडॉल पायरूव्हिक अम्ल अशा मध्यस्थ पदार्थापासून इंडॉल ॲसिटाल्डिहाइड तयार करून त्यावर पुढे ⇨एंझाइमाच्या क्रियेने बनत असावे.
स्थानांतरण : हॉर्मोन एकदा तयार झाले की, त्याचे ताबडतोब जरूर त्या ठिकाणी वहन होते हे वहन वनस्पतीच्या टोकाकडून तळभागाकडे एका ठराविक मार्गेच होते [→ मृदूतक]. हॉर्मोन असलेला जेलीचा तुकडा टोक कापलेल्या आदिपर्णवेष्टावर मधोमध न ठेवता एका बाजूस ठेवला तर त्या बाजूची तेवढीच वाढ जास्त होऊन त्याला बाक येतो. यावरून हे वहन सरळ रेषेत होते, असेही दिसून येते. हॉर्मोनांचे वहन प्रत्यक्ष कोशिकेतून कसे होत असावे, यावर काही सिद्धांत मांडले गेले असून ते फारसे समाधानकारक नसल्याने हे गूढ अद्याप उकलले नाही असे म्हणणे प्राप्त आहे. सामान्यत: हॉर्मोनांचे वहन वरून खाली होत असले तरी जमिनीत किंवा वनस्पतींच्या खालच्या भागात पुरेशा प्रमाणात हॉर्मोने पुरविली असता बाष्पोच्छ्वास प्रवाहाबरोबर ती वर खेचली जातात आणि खोड व पाने यांच्या ऊतकांमध्ये गेल्याबरोबर त्यांचे पुन्हा खाली वहन सुरू होते. तसेच मुळांमध्ये हॉर्मोनांचे वहन अनियमित असून त्याची दिशा निश्चित नसते.
वनस्पतींच्या सर्व भागांमध्ये हॉर्मोने उपस्थित असली तरी खोडांची टोके, वाढती पाने, फुले व फळे यांमध्ये ती निर्माण होत असल्याने व तेथे त्यांचा
संचय होत असल्याने त्यांचे प्रमाण जास्त असते. मुळांमध्येही त्यांचे अस्तित्व कमी-जास्त असून तेथे ती बहुशः प्ररोहातून आलेली असतात.
हॉर्मोनांचे कार्य : वनस्पतींच्या भिन्न भागांत उत्पन्न झालेली हॉर्मोने ठराविक मार्गे इतरत्र नेली जाऊन त्यांचे वृद्धी व नियंत्रणाचे कार्य चालू राहते. खोडाच्या टोकापासून खाली आलेली हॉर्मोने त्या वनस्पतीच्या टोकाजवळच्या बाजूच्या कळ्यांत (मुकुलांत) सुप्तावस्थेत राहतात. जसजसे खाली जावे तसा त्याचा प्रभाव कमी होऊन बाजूच्या शाखा फुटतात. या प्रकारे क्षोडाग्रातून स्रवणारी हॉर्मोने वनस्पतीच्या बाजूस फुटणाऱ्या शाखांची वाढ व शाखेचा मूळ खोडाशी असलेला कोन यावर नियंत्रण ठेवतात. हॉर्मोनांचा वनस्पतींच्या निरनिराळ्या भागांवरील परिणामांचा अभ्यास करताना सुरुवातीला असे आढळले की, हॉर्मोने खोड, कळ्या व पाने यांची वाढ करून मुळांची वाढ रोखतात परंतु नंतर भिन्न प्रमाणात ती भिन्न परिणाम करतात असे प्रत्ययास आले. ज्या विशिष्ट प्रमाणात असताना ती खोडाची वाढ करतात, त्या प्रमाणात ती कळ्या व मुळे यांची वाढ रोखतात. कारण त्यांना त्यांच्या वाढीसाठी हॉर्मोनांचे प्रमाण तुलनात्मक दृष्ट्या कमी असणे आवश्यक असते. हॉर्मोनांच्या ह्या विशिष्ट गुणामुळे ती एकाच वेळी एकाच परिमाणात उपस्थित असूनही वनस्पतींच्या काही भागांची वाढ करतात, काहींची वाढ नियंत्रित करतात, तर काहींची पूर्णपणे थांबवितात.
वनस्पतींच्या भिन्न भागांच्या वाढीवर नियंत्रण करण्याव्यतिरिक्त हॉर्मोने ऊतके व इंद्रिये यांच्या घडणालाही कारणीभूत असतात. पाण्याचे वहन
करणाऱ्या प्रकाष्ठ ऊतकांची वाढ काही मर्यादेपर्यंत हॉर्मोनांच्या प्रमाणावर कमी-जास्त होत असते. बाजूच्या कळ्यांची क्षोडाग्रातून स्रवलेल्या हार्मोनांनी नियंत्रित केलेली वाढ, बाजूच्या शाखांचा मूळ खोडाशी असलेला ठराविक कोन, खोडाला खाच पाडली असता त्या ठिकाणाहून निघणारी मुळे, अपाच्छेदन थर निर्माण झाल्यामुळे पाने, फुले व फळे यांचे गळून पडणे [→ अपाच्छेदन व पानझड ब, कलम केले असता त्याला फुटणारी मुळे, प्रकाशानुवर्तन व भूम्यानुवर्तनामुळे आलेले बाक या सर्व प्रतिक्रियांमधून हॉर्मोनांचे दृश्य स्वरूप नजरेस येते.
विनाश : वनस्पतींत हॉर्मोनांच्या उत्पादनाबरोबरच त्यांच्या विनाशा-च्याही योजना असतात. प्रकाश, आयनीकारक (विद्युत् भारित अणू, रेणू वा अणुगट निर्माण करणारे) प्रारण व काही ऑक्सिडीकारक एंझाइमे (उदा., पेरॉक्सिडेज) यांमुळे हॉर्मोनांचा विनाश होतो. अंधारात वाढणाऱ्या वनस्पती जास्त उंच वाढण्याचे कारण अंशतः प्रकाशाचा अभाव होय. कारण त्या परिस्थितीत कमी ऑक्सिजनाचे ऑक्सिडीकरण होते. तसेच इंडॉल ॲसिटिक अम्लाचे ग्लायकोसाइडामध्ये रूपांतर होऊन किंवा पेप्टाइडांची (विशेषतः इंडॉल ॲसिटील ॲस्पार्टेट) निर्मिती होऊन हॉर्मोनांचा नाश होतो.
प्रक्रिया : वनस्पतींतील हे सर्व परिणाम हॉर्मोने कशी घडवून आणतात, हे विशेषेकरून २,४-डायक्लोरोफिनॉक्सी ॲसिटिक अम्ल (C6H3CL2 OCH2 COOH) व त्या प्रकारची क्लोरिनीकृत अम्ले, नॅप्थॅलीन ॲसिटिक अम्ल (C10H7CH2 COOH), नॅप्थॉक्सी ॲसिटिक अम्ल (C10H7OCH2 COOH), २,३,६-ट्रायक्लोरो-बेंझॉइक अम्ल (C6H2CL3 COOH) या संयुगाचा भिन्न वनस्पतींवर वापर करून पाहण्यात आले आहे. तसेच जीवरसायनशास्त्रज्ञ त्यावर बरेच अनुसंधान करीत असून त्यांनी त्याविषयी काही सिद्धांतही मांडले आहेत परंतु नवीन शोधांमुळे हे सिद्धांत निराधार होत आहेत. हॉर्मोनांमुळे वनस्पतींची वाढ करणे किंवा ती नियंत्रित करणे या प्रक्रिया कशा होतात, यांविषयी स्पष्टपणे फारसे कळलेले नसले तरी त्यांचा परिणाम कोशिकावरणावर होत असावा, याविषयी एक मत आहे. हॉर्मोनांमुळे कोशिकावरण सैल व लवचिक होते. तसेच ते ताणले जाऊन कोशिकावृद्धी होते याबरोबरच वाढलेल्या कोशिकेवर अधिक कोशिकावरण पदार्थ साचतात व त्यांची जाडी कायम राहते. ही कोशिकांची वाढ हॉर्मोनांनी चयक्रियेचा वेग वाढविल्यामुळे होत असते.
प्रकाशावधिप्रभाव : काही वनस्पतींना फुले येण्यास ठराविक तासांच्या दिवसांची (म्हणजे प्रकाशाची) आवश्यकता असते. कमी तासांचे परंतु जास्त तास प्रकाश असणारे दिवस असलेल्या काळात त्या त्या प्रकारच्या वनस्पती फुलतात. प्रकाशाचा कालावधी जास्त असलेले दिवस आवश्यक असलेल्या वनस्पतीला कमी प्रकाशावधीच्या दिवसांत किंवा कमी प्रकाशावधीचे दिवस आवश्यक असलेल्या वनस्पतीला जास्त प्रकाशावधीच्या दिवसांत फुलविण्यास अनुक्रमे कृत्रिम प्रकाश व अंधःकार देऊन फुले आणता येतात परंतु हॉर्मोनांच्या साहाय्याने हे शक्य झाले आहे. आवश्यक तितके तास प्रकाश मिळाला असता फुले येण्यास वनस्पतींना मिळणारे उद्दीपन त्यांच्या पानांतून मिळते तेथून तिचे फुले येणाऱ्या टोकाकडे वहन होऊन कलिका फुटू लागतात. याला कारणीभूत असणारी हॉर्मोने वनस्पतींपासून वेगळी काढण्यात अजून यश आलेले नाही. फुले येण्यास कमी व जास्त तासांचा प्रकाश आवश्यक असलेल्या दोन वनस्पतींचे एकमेकींवर नीट कलम केले असता ज्यावर फुले आहेत अशा फांदीतून किंवा भागातून ज्यावर फुले नाहीत अशा वनस्पतीत हॉर्मोने जाऊन त्यांना अवेळीही फुले येतात, असे आढळले आहे. वनस्पतींच्या वृद्धीकरिता लागणारी हॉर्मोने व फुलविण्यास जरूर ती हॉर्मोने ही भिन्न असून त्यातील मुख्य फरक असा की, वृद्धी-हॉर्मोनेवरून खाली जाऊ शकतात, तर पुष्पचेतक-हॉर्मोने कोठूनही जरूर त्या ठिकाणी जातात. [→ वृद्धि, वनस्पतींची].
उपयोग : कृषिशास्त्रात हॉर्मोनांचे अनेक उपयोग आहेत. तणनाशक म्हणून हॉर्मोने सौम्य प्रमाणात शिंपडल्यास रुंद पानांच्या विशिष्ट तणांचा नाश होतो. या त्यांच्या विशिष्ट गुणामुळे भात, गहू, ज्वारी, बाजरी, ऊस वगैरे तृणधान्यांच्या शेतातील तसेच हिरवळीवरच्या रुंद पानांची तणे मारण्यास हॉर्मोनांचा उपयोग होतो. तणांवर हॉर्मोनांचे सिंचन केल्यामुळे त्यांच्या श्वसनक्रियेचा वेग वाढून अन्नसाठा संपतो, पानांपासून वाहणाऱ्या अन्नाला मध्येच अडथळा होतो, परिकाष्ठ-कोशिकेजवळच्या भागात मृदूतकाची अतिरिक्त वाढ झाल्याने त्या तुटतात व नवीन कळ्या येत नाहीत. या सर्वांचा परिणाम तणाच्या नाशात होतो. तणनाशके म्हणून २,४-डायक्लोरोफिनॉक्सी ॲसिटिक अम्ल (२, ४-D) व २, ४, ५-ट्रायक्लोरोफिनॉक्सी ॲसिटिक अम्ल, ट्रायक्लोरीनेटेड बेंझॉइक अम्ल यांचा विशेष उपयोग करतात.
खोडांच्या छाट कलमास मुळे फुटण्यासाठी हॉर्मोनांचा उपयोग करतात. छाट कलमावर जिवंत कळ्या व कोवळी पाने असतील तर त्यांना लवकर मुळे फुटतात, असे व्हॅन डर लेक यांना १९२५ मध्ये दिसून आले. कलमावर असलेली कळी व कोवळी पाने यातून निघणारी हॉर्मोने त्याच्या तळाशी जाऊन मुळे फुटण्यास चेतना देतात, असे लक्षात आले आहे. उद्यानशास्त्रात छाट कलमांची खालची टोके हॉर्मोनांच्या विद्रावात बुडवून नंतर त्यांना मातीत लावून मुळे फुटविण्याचे यशस्वी प्रयोग सध्या सर्रास चालू आहेत. याचबरोबर हेही लक्षात ठेवणे जरूर आहे की, केवळ हॉर्मोने लावूनच मुळे फुटत नाहीत तर इतर सर्व वातावरण अनुकूल असतानाच त्यांचा परिणाम दिसून येतो व विशेषतः कलम काढलेल्या झाडांचे योग्य वयही मुळे फुटण्यास तितकेच परिणामकारक ठरते. इंडॉल ब्युटिरिक अम्ल व नॅप्थॅलीन ॲसिटिक अम्ल ही हॉर्मोने यांसाठी वापरतात.
पाने, फुले व विशेषतः फळे यांची अकाली गळती थांबविण्यासाठी २,४,५-ट्रायक्लोरोफिनॉक्सी ॲसिटिक अम्ल या हॉर्मोनाचा उपयोग करतात. फळे गळण्याआधी काही आठवडे त्या फळांवर या हॉर्मोनाच्या सौम्य विद्रावाचे सिंचन केल्यास फळांची अकाली गळती थांबते. शिवाय सफरचंदासारख्या फळांना अधिक सुंदर रंग प्राप्त होतो.
वनस्पतींना फुलविण्यास नॅप्थॅलीन ॲसिटिक अम्ल या हॉर्मोनाचा उपयोग करतात. या हॉर्मोनाच्या सिंचनाने अननसाच्या झाडांवर एकाच वेळी फुले येऊन फळेही एकदम येतात त्यामुळे काढणी सोपी जाते.
फलन [→ प्रजोत्पादन] व फळांची वाढ या प्रकियांमध्येही हॉर्मोने उपयुक्त ठरली आहेत. फुलांतील किंजल्कावर परागकणांऐवजी हॉर्मोने शिंपडली असता फळांच्या वाढीस चेतना मिळते व या फळात बिया नसतात. एस्. यासुदा ह्या जपानी शास्त्रज्ञाने १९०२ मध्ये काकडीच्या फुलांवर त्याचे परागकण पडू न देता त्यांचा अर्क शिंपडला, त्यामुळे त्याला बीजहीन फळे मिळाली यावरून फळांची वाढ होण्यास आवश्यक ती हॉर्मोने परागकणांच्या अर्कातून किंजपुटापर्यंत जाऊन पोहोचल्याने फल-धारणेस प्रेरणा मिळाली, असे अनुमान काढले गेले. एफ्. जे. गुस्टाफ्सन यांनी १९३६ व १९४२ मध्ये इंडॉल ॲसिटिक अम्ल, इंडॉल प्रॉपिऑनिक अम्ल, इंडॉल ब्युटिरिक अम्ल व फिनिल ॲसिटिक अम्ल यांचे किंजल्क, किंजल किंवा किंजपुट यावर सिंचन करून बीजहीन फळे मिळविली. तेव्हापासून अंजीर, टोमॅटो, द्राक्ष, लिंबू, संत्री, मोसंबी, कलिंगड, केळी वगैरे भिन्न फळांच्या बीजहीन जाती उपलब्ध झाल्या आहेत.
इतर वृद्धी नियंत्रक : वर वर्णन केलेल्या हॉर्मोनांखेरीज वनस्पतींत इतर काही तत्सम पदार्थ वृद्धीवर विलक्षण परिणाम घडवून आणतात. यांमध्ये एथिलीन, जिबरेलिने, कायनिने, कौमारीन व स्कोपोलेटीन, सायटोकायनिने, ऑक्सिजन, ॲबसिसिक अम्ले इत्यादींचा समावेश होतो. यांपैकी काहींच्या कार्याची माहिती मराठी विश्वकोशातील ‘वृद्धिनियंत्रक, वनस्पतींतील’ या नोंदीत दिली आहे.
शेतातील भाताच्या काही रोपांवर एका बुरशीपासून होणारा रोग पडल्याने रोपे बरीच उंच वाढून मरतात, असे होरी या जपानी शास्त्रज्ञांना आढळले. त्या बुरशीपासून निघणाऱ्या काही हॉर्मोनांमुळे ती उंच वाढत असावीत, अशा संशयावरून त्यापासून पाण्यात काढलेल्या अर्काचे निरोगी रोपावर शिंपण केले असता त्यांचीही तशीच वाढ होत असल्याचे आढळले. रसायनशास्त्रज्ञांनी हे सत्त्व शुद्ध स्वरूपात काढून त्याला जिबरेलिक अम्ल (C19H22O6) हे नाव दिले. १९३९ पासून आतापर्यंत जिबरेलिनांचे भिन्न २४ प्रकार काढण्यात आले असून केवळ बुरशी-पासूनच नव्हे तर शैवले व उच्च वनस्पतींपासूनही ते मिळविले आहे. जिबरेलिनांच्या भिन्न प्रकारांपैकी तुलनात्मक दृष्ट्या ए-७ हा प्रकार जास्त कार्यक्षम आहे. त्याचा विद्राव रोपांवर शिंपडल्यास दोन पेऱ्यांतील अंतर वाढून व पेऱ्यांची संख्या वाढून त्याची उंची झपाट्याने वाढते. ही वाढ कोशिकांची संख्या वाढून न होता त्यांचे आकारमान तिपटीने किंवा चौपटीने वाढल्याने होते. वनस्पतींना फुलविण्यास, फळांची अकाली गळती थांबविण्यास, बीजांची प्रसुप्तावस्था कमी करण्यास, बटाट्यावरील सर्व डोळ्यांना एकाच वेळी फूट आणण्यास व बीजहीन फळे मिळविण्यास या हॉर्मोनांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होत आहे. कोशिका-विभाजनासाठी आवश्यक असलेले पदार्थ सायटोकायनिने मुख्यत्वेकरून वाढती फळे, अंकुरणारा नारळ व कोशिका-विभाजन जोरात चालू असणारे ऊतक इत्यादींत आढळले आहेत. प्यूरिने (C5H4N5) व संबंधित ॲडेनिने (C3H4N5) ही कृत्रिम हॉर्मोने विभाजन प्रक्रियेत मदत करतात. यांशिवाय कोशिकांची वाढ करण्यास, कलमांवर मुळे व कळ्या उत्पन्न करण्यास आणि कृत्रिम बीजांकुरणास यांचा उपयोग होतो.
सर्वसाधारणपणे वनस्पतींची वाढ करणे किंवा ती काही मर्यादेत नियंत्रित करणे असे कार्य हॉर्मोने करीत असली तरी वाढ खुंटविणारी निरोधकेही त्याबरोबर आपले कार्य करीत असतात. वर उल्लेखिलेल्या कौमारीन (C9H6O2) व स्कोपोलेटीन यांसारखी लॅक्टोने, क्लोरोजेनिक अम्ल व नारिंजेनीन यांसारखी फिनॉले, सॅलिसिलिक अम्लासारखी सगंध अम्ले आणि मॅलेइक हायड्राझाइड हे सर्व पदार्थ कृत्रिम निरोधकांपैकी असून त्यांचा वनस्पतींवर होणारा परिणाम अभ्यासला जात आहे. वनस्पतींच्या भिन्न भागातील प्रसुप्तावस्था यामुळेच असावी असे आढळले आहे. हॉर्मोनांद्वारे वनस्पतींच्या भिन्न भागांची वाढ व घडण यांबाबतचे एकमेकांवरील नियंत्रण वरील विवेचनावरून कळून येईल हे नियंत्रण बहुकोशिक सजीवांच्या उन्नतीसाठी फायद्याचे आहे.
पहा : जीवनसत्त्वे प्रसुप्तावस्था वनस्पतिविज्ञान वनस्पतींची अभिवृद्धी वृद्धिनियंत्रक, वनस्पतींतील वृद्धि, वनस्पतींची हॉर्मोने.
संदर्भ : 1. Hoad, G. V. and others, Eds., Hormone Action in Plant Development, 1987.
2. Kutsky, R. J. Handbook of Vitamins, Minerals and Hormones, 1981.
3. Norman, A. W. Litwack, G. Hormones, 1997.
4. Weaver, R. J. Plant Growth Substances in Agriculture, 1972.
5. Went, F. W. and others, Experimental Control of Plant Growth, 1957.
भार्गव, सुजाता सप्रे, अ. ब.
“