हॉय, आबे रने झ्यूस्त : (२८ फेब्रुवारी १७४३ – १ जून १८२२). फ्रेंच खनिजवैज्ञानिक. ते स्फटिकविज्ञान या विज्ञान शाखेचे एक संस्थापक होत.
हॉय यांचा जन्म फ्रान्समध्ये सेंत-झ्यूस्त-एन शौसी या गावी झाला. त्यांनी धर्मशास्त्राचा अभ्यास केला आणि ते आबे (मठाधिकारी) झाले. त्यांनी कॉलेज कार्डिनल लेमनॉई (१७७०–८४) आणि एकोल दमाइन्स (१७९५–१८०२) या ठिकाणी प्राध्यापक म्हणून काम केले.ते १८०२ मध्ये पॅरिसमधील म्यूझीयम ऑफ नॅचरल हिस्टरी या ठिकाणी खनिजविज्ञानाचे प्राध्यापक झाले आणि १८०९ मध्ये सॉरबॉन येथे त्यासारख्या पदावर रुजू झाले.
कॅल्साइटाचा स्फटिक अपघाताने फुटल्यामुळे स्फटिकविज्ञानात हॉय यांना रस निर्माण झाला. या स्फटिकाच्या तुकड्यांचे निरीक्षण करताना त्यांना आढळले की, हे स्फटिक सरळ प्रतलांमध्ये भंग पावतात व यासपाट प्रतलांमध्ये एक स्थिर कोन असलेला दिसतो. त्यांनी कॅल्साइटाच्या स्फटिकांचे अनेक तुकडे फोडून पाहिले. तेव्हा या तुकड्यांचा मूळआकार कोणताही असला, तरी तुकडे संगतवार समांतर षट्फलकीय आकाराचे असल्याचे त्यांना दिसून आले. नंतर केलेल्या प्रयोगांवरूनत्यांनी स्फटिक संरचनेविषयीचा एक ठाम सिद्धांत शोधून काढला. या सिद्धांताचा मूलभूत पाया स्फटिक पृष्ठांतील कोनांमधील स्थिरतेविषयीच्या नियमांवर आधारलेला होता. यामुळे स्फटिकांचे ⇨ पाटन आकार हे त्यांच्या आद्य आकारांशी भूमितीय रीतीने निगडित असतात. नंतर त्यांनीआपल्या या सिद्धांताचा उपयोग खनिजांचे वर्गीकरण करताना करूनघेतला. ते स्फटिकांतील उत्तापविद्युत् व ⇨ दाबविद्युत् यांच्याविषयीच्या अध्ययनासाठीही प्रसिद्ध आहेत.
हॉय यांनी Traité de minéralogie(१८०१ इं. शी. ‘ट्रिटाइज ऑन मिनरॉलॉजी) आणि Traité de physique (१८०३ इं. शी.’ ट्रिटाइज ऑन फिजिक्स ङ्ख) हे ग्रंथ लिहिले. यांपैकी दुसरा ग्रंथ त्यांनी नेपोलियन यांच्या विनंतीवरून लिहिला होता. Tableau comparatif ( इं. शी. ‘कंपॅरेटिव्ह टेबल्स’) हे त्यांचे खनिजवैज्ञानिक वर्गीकरणावरील प्रसिद्ध पुस्तक होय.
हॉय यांचे पॅरिस येथे निधन झाले.
ठाकूर, अ. ना.
“