ॲलन लॉइड हॉजकिनहॉजकिन, ॲलन लॉइड :  (५ फेब्रुवारी १९१४–२० डिसेंबर १९९८). ब्रिटिश शरीरक्रियावैज्ञानिक व जीवभौतिकीविद. व्यक्तिगततंत्रिका तंतूमधून ( मज्जातंतूमधून) आवेग जाण्यास कारणीभूत असणाऱ्या रासायनिक प्रक्रियांचा शोध लावल्याबद्दल त्यांना १९६३ सालचे शरीरक्रियाविज्ञान किंवा वैद्यक या विषयाचे नोबेल पारितोषिक सर जॉन (कॅर्‍यू) एक्लिस आणि अँड्रू फील्डिंग हक्सली यांच्यासमवेत विभागून देण्यात आले. या तिघांच्यासं शोधनामुळे तंत्रिका सं वे द ना (मज्जातंतूद्वारे होणारी संवेदना) एका कोशिकेतून (पेशीतून) दुसऱ्या कोशिकेत कशी प्रविष्ट होते, हे लक्षात आले.

 

हॉजकिन यांचा जन्म इंग्लंडमधील बॅनबरी (ऑक्सफर्डशर) येथे झाला. त्यांचे उच्च शिक्षण केंब्रिज विद्यापीठातील ट्रिनिटी कॉलेजमध्ये झाले.त्यांनी १९३९–४५ या काळात ब्रिटिश हवाई विभागात रडार– विषयक संशोधन केले. नंतर ते केंब्रिज विद्यापीठात दाखल झाले. तेथे त्यांनी हक्सली यांच्याबरोबर एकेकट्या तंत्रिका तंतूच्या विद्युतीय व रासायनिक वर्तनाच्या मापनाचे काम केले (१९४५–५२). नंतर त्यांनी लोलिगो फोर्बेसी या स्क्विडच्या अतिशय मोठ्या तंत्रिका तंतूं-मध्ये सूक्ष्म इलेक्ट्रोड घालून संशोधन केले. आवेगाचे संवहन होतानातंत्रिका तंतूचे विद्युत् वर्चस् तो स्वस्थ असताना असलेल्या विद्युत् वर्चसापेक्षा जास्त होते, असे त्यांना दाखविता आले. हे स्वीकारल्या गेलेल्या उपपत्तीच्या विरोधी (विपरीत) होते. कारण स्वीकृत उपपत्तीमध्ये आवेगाचे संवहन होताना तंत्रिकापटलाचा भंग होतो, असे गृहीत धरले होते.

 

तंत्रिका तंतूची क्रियाशीलता पुढील वस्तुस्थितीवर अवलंबून असते,हे हॉजकिन यांना माहित होते : तंत्रिका तंतूच्या आत पोटॅशियमआयनांची (विद्युत् भारित अणूंची) जास्त संहती टिकवून ठेवली जाते, तर सभोवतालच्या विद्रावात सोडियम आयनांची संहती जास्त असलेली आढळते. त्यांच्या प्रयोगांची फले (निष्कर्ष) १९४७ मध्ये प्राप्त झाली. त्यांवरून पुढील गोष्ट लक्षात आली : स्वस्थ स्थितीत असताना तंत्रिका पटल केवळ पोटॅशियमाला तंत्रिका तंतूमध्ये जाऊ देते परंतु जेव्हा तंत्रिका तंतू उत्तेजित झालेला असतो, तेव्हा सोडियमाला ते घुसू देते.

 

हॉजकिन हे १९५२–६९ दरम्यान रॉयल सोसायटीत संशोधक प्राध्यापक व १९७० पासून केंब्रिज विद्यापीठात जीवभौतिकीचे प्राध्यापक होते. १९७१ पासून युनिव्हर्सिटी ऑफ लेस्टरचे ते कुलगुरू होते. त्यांना ‘ सर’ या किताबाने सन्मानित करण्यात आले (१९७२). त्यांचे कंडक्शन ऑफ द नर्व्हस इम्पल्स हे पुस्तक १९६४ मध्ये प्रसिद्ध झाले.

 

हॉजकिन यांचे केंब्रिज (इंग्लंड) येथे निधन झाले.

 

ठाकूर, अ. ना.