हाँडुरस : (रिपब्लिक ऑफ हाँडुरस ). मध्य अमेरिकेतील एक स्वतंत्र देश. क्षेत्रफळ १,१२,४९२ चौ. किमी. लोकसंख्या ८४,४८,४६५ (२०१३). याचा अक्षवृत्तीय विस्तार १३° उ. ते १६° उ. व रेखावृत्तीय विस्तार ८३° १०′ प. ते ८९° २०′ प. यांदरम्यान आहे. याच्या पूर्वेस व आग्नेयीस निकाराग्वा, पश्चिमेस व वायव्येस ग्वातेमाला आणि एल् साल्वादोर हे देश व उत्तरेस कॅरिबियन समुद्र आणि नैर्ऋत्येस पॅसिफिक महासागरातील फॉन्सेकाचे आखात आहे. याचे दक्षिणोत्तर कमाल अंतर ३८६ किमी. व पूर्व-पश्चिम अंतर ६५२ किमी. आहे. हाँडुरसला ६१५ किमी. लांबीचा कॅरिबियन समुद्रकिनारा व ७७ किमी. लांबीचा पॅसिफिक महासागराचा किनारा लाभला आहे. कॅरिबियन समुद्रातील बे व स्वॉन बेटे पॅसिफिक महासागरातील तीग्रे, इस्ला साकाते ग्रांदे, ग्वेग्वेन्सी ही बेटे हाँडुरसमध्ये समाविष्ट आहेत. तेगूसिगॅल्पा [लोकसंख्या ११,२६,५३४ (२०११)] ही देशाची राजधानी आहे.
भूवर्णन : हाँडुरसचा सु. ७५% पेक्षा जास्त भूप्रदेश डोंगराळ आहे. समुद्रकिनारी व नद्यांच्या खोऱ्यांत काही प्रमाणात कमी उंचीचे भाग आहेत. द सेंट्रल अमेरिकन कॉर्डिलेरा व व्होल्कॅनिक हायलँड्स हे येथील प्रमुख भूविशेष आहेत. येथील पर्वत सामान्यतः पूर्व-पश्चिम दिशेने पसरलेले असून हे पश्चिमेकडे उंच व पूर्वेकडे उंचीने कमी होत गेले आहेत. हाँडुरसच्या नैर्ऋत्य भागात ज्वालामुखीजन्य खडक आढळतात. उत्तरेकडील पर्वत अतिप्राचीन असून येथील खडक ग्रॅनाइटी व स्फटिकी आहेत. हाँडुरसमध्ये जागृत ज्वालामुखी नाहीत.
हाँडुरसचे भौगोलिक दृष्ट्या चार विभाग केले जातात :
(१) कॅरिबियन समुद्राचा पूर्वेकडील किनारी मैदानी प्रदेश : याचा उत्तरेकडील भाग मस्कीटो (मिस्कीटॉस) किनारा म्हणून ओळखला जातो. देशाच्या एकूण भूक्षेत्राच्या सु. २०% क्षेत्र या प्रदेशाने व्यापले आहे. या किनारी भागात अनेक खारकच्छ आहेत. येथील पर्वतीय भागात घनदाट जंगले आहेत. या विभागात लोकसंख्या विरळ आहे.
(२) कॅरिबियन समुद्राचा उत्तरेकडील किनारी मैदानी प्रदेश : या प्रदेशाने देशाच्या एकूण भूक्षेत्राच्या सु. १२·५% क्षेत्र व्यापले आहे. या प्रदेशात सुपीक व गाळाची मैदाने आहेत. देशातील सु. २५% लोकसंख्या या विभागात आहे. ऊलूआ-चामलकॉन नदी खोरे व टेला बंदरा-नजीकचा मैदानी प्रदेश केळी उत्पादनात अग्रेसर असून मका, लिंबूवर्गीय फळे, भात ही पिके येथे घेतली जातात. या प्रदेशातील सान पेद्रो सूलाहे शहर औद्योगिक केंद्र म्हणून आणि टेला व प्वेर्तो कॉर्तेझ ही बंदरेप्रसिद्ध आहेत.
(३) मध्यवर्ती पर्वतीय उंचसखल प्रदेश (सेंट्रल हायलँड्स) : या प्रदेशाने देशाच्या एकूण भूक्षेत्राच्या सु. ६७% क्षेत्र व्यापले असून या प्रदेशात लोकसंख्या जास्त आहे. येथील पर्वताची उंची पश्चिमेकडे २,८०० मी. पेक्षा जास्त आहे. सेरो दे सेलाक्वे पर्वतातील लास मीनास (उंची २,८४९ मी.) हे देशातील सर्वोच्च शिखर आहे. येथे ओक, पाइन वृक्षांची जंगले आहेत. या प्रदेशातील दऱ्यांमध्ये जमीन सुपीक आहे.
(४) पॅसिफिक महासागराचा किनारी मैदानी प्रदेश : या मैदानी प्रदेशात फॉन्सेका आखाताचा किनारी भाग व लगतच्या पर्वतीय उताराचा समावेश होतो. या प्रदेशाने देशाच्या एकूण भूक्षेत्राच्या सु. ०.५% क्षेत्र व्यापले आहे. या प्रदेशातील चोलूतेका नदीखोऱ्यात जमीन सुपीक व गाळाची आहे. सान लॉरेन्झो व आमापाला ही या प्रदेशातील प्रमुखबंदरे आहेत.
हाँडुरसमध्ये अनेक नद्या आहेत. देशाच्या उत्तरेकडील भागात चामलकॉन, ऊलूआ, आग्वान, सीको, पोउलीआ, सिक्रे, पाटूका, कोको या सामान्यपणे उत्तर वाहिनी व दक्षिण भागात लेमा, सूमपूल, ग्वास्कारान, नाकोऊमे, चोलूतेका इ. प्रमुख नद्या आहेत. देशाच्या पश्चिम भागात योहोआ सरोवर व पूर्व भागात कॅरटास्का खारकच्छ आहे.
हवामान : देशाचे उष्ण कटिबंधीय स्थान, कॅरिबियन समुद्र व पॅसिफिक महासागराचे सान्निध्य यांमुळे हवामान किनारी भागात उष्णव दमट असून मध्यवर्ती पर्वतीय भागात उंचीनुसार त्यात बदल होतो. मैदानी प्रदेशात वार्षिक तापमान २६° ते २८° से. दरम्यान, तर पर्वतीय भागात व खोऱ्यां तापमान १९° से. ते २३° से. दरम्यान असते. उत्तर किनारी प्रदेशातील हवामानावर ऑक्टोबर ते एप्रिल दरम्यान उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा परिणाम होतो. राजधानी तेगूसिगॅल्पा येथे सामान्यतः उन्हाळ्यात तापमान ३२° से., तर हिवाळ्यात १०° से.पर्यंत असते.
हाँडुरसच्या दक्षिण भागात व मध्यवर्ती पर्वतीय प्रदेशात साधारणपणेमे ते डिसेंबरपर्यंत, उत्तर भागात फेब्रुवारीपर्यंत तर ईशान्य भागात वर्षभर पाऊस पडतो. देशाच्या उत्तर आणि पूर्वेकडील किनारी मैदानी प्रदेशात व लगतच्या डोंगराळ प्रदेशात १८०–२८० सेंमी., पॅसिफिक किनारी प्रदेशात व लगतच्या डोंगर उतारांवर १५०–२०० सेंमी. तर मध्यवर्ती डोंगराळ प्रदेशात १००–१८० सेंमी. वार्षिक सरासरी पर्जन्यमान असते.
हाँडुरसला अनेकदा हरिकेन वादळांस व त्यामुळे होणाऱ्या नुकसानीस सामोरे जावे लागते. ऑक्टोबर १९९८ च्या मिच हरिकेन वादळात येथील सु. ७,००० नागरिक मरण पावले व सु. १·७ अब्ज अमेरिकी डॉलरची हानी झाली होती. या वादळात देशातील सु. ५०% पिकांचे नुकसान झाले होते तसेच या वादळात देशातील प्रमुख रस्ते व पुलांची हानी होऊन देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि पायाभूत सुविधांवर अनिष्ट परिणाम झाला होता.
वनस्पती व प्राणी : हाँडुरसच्या पूर्व किनारी भागात पाणथळ व कच्छ वनस्पती आणि पाम वृक्षांची जंगले आहेत. यालगतच्या मैदानी भागात पाइन वृक्ष व सॅव्हाना गवत आढळते. कॅरिबियन किनाऱ्यालगतच्याडोंगरउतारांवर व उत्तरेकडील जास्त पावसाच्या डोंगरउतारांवर उष्ण कटिबंधीय वर्षावने आहेत. यांमध्ये मॅहॉगनी, सीडार, रोझवुड, सिंकोना, बालसम, रबर इ. वनस्पती मुबलक आहेत. पॅसिफिक किनारी मैदानी प्रदेशात व लगतच्या डोंगरउतारांवर कमी पावसाच्या भागात पानझडी वृक्ष, विरळ अरण्ये व सॅव्हाना गवत आढळते.
येथील जंगलांत जॅगुआर, हरिण, टॅपिर, प्यूमा, पेकारी, ऑसेलॉट इ. प्राणी आढळतात. येथे बदके, कबूतरे, महोका यांसारखे पक्षी आणि रंगीबेरंगी फुलपाखरे विपुल आहेत. समुद्रात अनेक प्रकारचे मासे, कालव, कोळंबी इ. सापडतात.
जंगलतोडीमुळे होणारी जमिनीची धूप कीटकनाशकांच्या अती वापरामुळे पर्यावरणाला होणारा धोका यांवर उपाय म्हणून १९८०–९० मध्ये संरक्षित राष्ट्रीय उद्याने व वने निर्माण करण्यात आली आहेत त्यांपैकी येथील ला तीग्रा नॅशनल पार्क (१९८०), मौंट बॉनिटो राष्ट्रीय उद्यान (१९८७), क्वेरो इ सलादो (१९८७), मौंट आसूल दे कोपान नॅशनल पार्क (१९८७), इसोपो पॉईंट (१९९२) ही उद्याने प्रमुख आहेत.
इतिहास : स्पॅनिशांच्या येथील आगमनापूर्वी हाँडुरसमध्ये अमेरिकन- -इंडियनांचे वास्तव्य होते. येथे काही भागात माया संस्कृती विकसित झाली होती. येथील लोक विज्ञान व अन्य शिक्षण क्षेत्रांत पुढारलेले होते मात्र स्पॅनिशांच्या आगमनावेळी माया संस्कृतीचा ऱ्हास झालेला होता. क्रिस्तोफर कोलंबस १५०२ मध्ये हाँडुरसच्या किनाऱ्यावर आला होता. त्यानेच याचे हाँडुरस असे नामकरण केले आहे. नंतरच्या काळात स्पॅनिशांनी येथे वसाहत स्थापन केली. १५३८ मध्ये येथील स्थानिक लेन्का जमातीचा प्रमुख लेंपिरा याने स्पॅनिशांविरुद्ध उठाव केला मात्र त्याचा स्पॅनिशांच्या प्रतिनिधींनी विश्वासघाताने खून केला. तद्नंतर स्पॅनिशांनी स्थानिकांचा उठाव मोडून काढला. येथील अनेक स्थानिक इंडियन युद्धात मारले गेले, काही साथीच्या रोगाने दगावले आणि अन्य स्थानिकांना गुलाम करण्यात आले. त्यामुळे त्यांची येथील लोकसंख्या कमी झाली होती.
हाँडुरसमध्ये स्पॅनिशांनी सोने व चांदीचे खाणकाम सुरू केले होते. यासाठी स्पॅनिशांनी आफ्रिकन लोकांना गुलाम म्हणून येथे आणून स्थानिक इंडियनांबरोबर येथील खाणकामात गुंतवले तथापि खाणउद्योग पुरेसा फायदेशीर नव्हता. त्यामुळे वसाहतवाद्यांचा ओढा तुलनेने कमी होता. स्पॅनिशांनी हाँडुरसमधील सोन्याच्या खाण क्षेत्रातील ग्रॅसीअस शहरी १५४४ मध्ये मध्य अमेरिकेची राजधानी वसविली. तद्नंतर त्यांनी १५४८ मध्ये ग्वातेमाला साम्राज्याची राजधानी सँटिआगो येथे नेली व हाँडुरस एक प्रांत म्हणून यामध्ये समाविष्ट केला होता. हाँडुरसमधील तेगूसिगॅल्पास १५७० मध्ये चांदीमुळे महत्त्व प्राप्त झाले होते. कॅरिबियन समुद्रकिनारी होणारे चाच्यांचे हल्ले, मध्य अमेरिका किनारी प्रदेशावर वर्चस्व प्रस्थापित करण्याचे ब्रिटिशांचे मनसुबे यांमुळे हाँडुरसमधील स्पॅनिश वसाहतीच्या विकासात अडथळे येत होते. ब्रिटिशांनी कॅरिबियन समुद्राच्या मस्कीतीया किनारी भागात वर्चस्व प्रस्थापित केले होते मात्र अठराव्या शतकात स्पॅनिश बूर्बाँ राजाने कॅरिबियन समुद्रकिनारी वर्चस्वासाठी प्रयत्न केले व किनारी भागात हाँडुरस आखातानजीक ओमोआ येथे १७७९ मध्ये किल्ला बांधला.
हाँडुरसने स्पेनपासून स्वतंत्र झाल्याची घोषणा १५ सप्टेंबर १८२१ रोजी केली. तद्नंतर आगुस्तीन ईतूर्बीदे याच्या मध्य अमेरिकेतील मेक्सिकन साम्राज्यात १८२२-२३ पर्यंत हाँडुरस सामील होता. ईतूर्बीदेच्या पाडावानंतर हाँडुरस मध्य अमेरिकेच्या संघराज्यात १८२४–३८ पर्यंत समाविष्ट होता. १८३० मध्ये हाँडुरसचा फ्रॅन्सिस्को मोरॅझॅन या संघराज्याचा राष्ट्राध्यक्ष होता. या वेळी संघराज्यातील जुनी भांडणे, अलगतेची भावना व परस्परविरोधी राजकीय मते यांमुळे हे संघराज्य विस्कळीत झाले होते. दरम्यान ५ नोव्हेंबर १८३८ रोजी हाँडुरसने या संघराज्यातून बाहेर पडून स्वतंत्र झाल्याची घोषणा केली. १ जानेवारी १८४१ रोजी फ्रॅन्सिस्को फेरेरा हा हाँडुरसचा पहिला संविधानिक राष्ट्राध्यक्ष झाला. १८७६ मध्ये मार्को ऑरीलिओ सोतो (कार. १८७६–८३) हा हाँडुरसचा राष्ट्राध्यक्ष म्हणून सत्तेवर आला. याच्या कारकीर्दीत हाँडुरसची राजधानी तेगूसिगॅल्पा येथे करण्यात आली. याच्या कार्यकाळात हाँडुरसमध्ये आर्थिक सुधारणांस सुरुवात झाली. तसेच कृषी व उद्योगांमध्ये परकीय गुंतवणूक वाढली. १८९० मध्ये अमेरिकेतील फळकंपन्यांनी येथील उत्तर कॅरिबियन किनारी प्रदेशात केळीची लागवड केली. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात हाँडुरसच्या अर्थव्यवस्थेत केळी उत्पादनाचा वाटा महत्त्वाचा होता. केळी उत्पादनात अमेरिकन फळकंपन्या अग्रेसर असल्याने साहजिकच त्यांचा येथील राजकारणावर प्रभाव होता. या कंपन्यांनी स्थानिक नियोजनात पुढाकार घेऊन येथे बंदरे, लोहमार्ग, शाळा व रुग्णालये बांधली.
हाँडुरसमध्ये १८५५–१९३२ या कालावधीत ६७ सत्ताधीश होऊन गेले. यावेळी हाँडुरसने १९१८ मध्ये जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले मात्र पहिल्या महायुद्धात सक्रिय सहभाग घेतला नाही. हाँडुरसची सत्ता १९३२–५६ पर्यंत नॅशनल पार्टीच्या हातात होती. १९४१ मध्ये जर्मनी, जपान व इटलीविरुद्ध हाँडुरसने पुकारलेल्या युद्धामुळे येथील अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम झाला. नॅशनल पार्टीचे राष्ट्राध्यक्ष आनदिनो (कार. १९३२–४९) व गॅल्व्हेज (कार. १९४९–५४) यांच्या कार्यकाळात हाँडुरसमध्ये राजकीय स्थैर्य होते. १९५६, १९६३, १९७२ आणि १९७८ मध्ये लष्कराने बंड करून सत्ता हस्तगत केली होती. १९६९ मध्ये एल्-साल्वादोर बेटावर सॉकर युद्ध झाले. या युद्धाचे परिणाम देशात आर्थिक व लोकसंख्येचे प्रश्न निर्माण होण्यात झाले. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या दबावामुळे १९८१ मध्ये येथे निवडणुका होऊन रोबेर्तो सुआझो कॉर्दोव्हा यांची राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली. १९८१ पासून दर चार वर्षांनी विधानमंडळ व राष्ट्राध्यक्ष पदाकरिता निवडणूक घेतली जाते.
लिबरल पक्षाचा नेता होसे मॅन्युएल झेल्या रॉसेल्स याची राष्ट्राध्यक्षपदी निवड होऊन (२००५) त्याने २७ जानेवारी २००६ मध्ये कार्यभार हाती घेतला. त्याने संविधानात दुरुस्ती करण्याचे प्रस्तावित केले होते. सदरची संविधानातील दुरुस्ती राष्ट्राध्यक्ष पदाचा कार्यकाळ वाढविण्यासाठी आहे, अशी जनतेची धारणा होऊन जनतेतून राष्ट्राध्यक्षांवर टीका झाली. लष्कराने रॉसेल्सला २००९ मध्ये पदच्युत केले त्यामुळे तो कोस्टारीकात गेला. त्यानंतर रोबेर्तो मिचेलेट्टी राष्ट्राध्यक्ष झाला. नोव्हेंबर २००९ मध्ये नॅशनल पार्टीचे प्रोफिरिओ लोबो सोसा यांची राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली व ते२७ जानेवारी २०१० पासून राष्ट्राध्यक्ष आहेत. हाँडुरस यूनोचा १९४५ पासून सदस्य आहे.
राज्यव्यवस्था : देशाचा राज्यकारभार १९८२ च्या संविधानाप्रमाणे चालतो. राष्ट्राध्यक्ष हा देशाचा प्रमुख असून त्याची निवड चार वर्षांच्या एकाच मुदतीसाठी सार्वत्रिक प्रौढ मतदानाने करण्यात येते. देशातील १८ वर्षे वयाच्या पुढील सर्वांना मतदानाचा अधिकार आहे. १९५४ पासून महिलांना मतदानाचा हक्क प्राप्त झाला आहे. देशातील विधानमंडळ एक सदनी असून यास नॅशनल काँग्रेस संबोधण्यात येते. याचे १२८ सदस्य असून त्यांची निवड सार्वत्रिक प्रौढ मतदानाने चार वर्षांसाठी करण्यात येते. लिबरल पार्टी ऑफ हाँडुरस, नॅशनल पार्टी, क्रिस्तिआन डेमॉक्रॅटिक पार्टी, डेमॉक्रॅटिक युनिफिकेशन पार्टी, इनोव्हेशन अँड युनिटी पार्टी इ. येथील प्रमुख राजकीय पक्ष आहेत. देशाचे प्रशासकीय सोयीसाठी १८ विभाग करण्यात आलेले आहेत.
येथील न्यायव्यवस्था रोमन व स्पॅनिश दिवाणी कायद्यावर आधारित आहे. न्यायव्यवस्थेत सर्वोच्च न्यायालय, अपिल न्यायालय, कनिष्ठ न्यायालये आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती राष्ट्राध्यक्ष करतात.
देशात सैनिकी सेवा ऐच्छिक असून सक्तीची लष्कर भरती १९९५ पासून बंद करण्यात आली आहे. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या सैन्याचे संयुक्त कृतिदल येथे १९८३ पासून आहे.
आर्थिक स्थिती : हाँडुरस हा आर्थिक दृष्ट्या मागासलेला देश आहे. येथे उद्योगधंदे व पायाभूत सुविधा कमी आहेत. आर्थिक दृष्ट्या हाँडुरसमध्य अमेरिकेतील वेगाने प्रगती करणाऱ्या देशांपैकी एक असला, तरी येथे मोठ्या प्रमाणात आर्थिक विषमता आढळते. देशातील सु. ६६% लोक दारिद्य्रात जीवन व्यतीत करीत होते (२०११).
देशाने विसाव्या शतकाच्या मध्यापासून अर्थव्यवस्थेत सुधारणा करण्याच्या दृष्टीने विशेष आर्थिक धोरण अवलंबिले आहे. १९५४ मध्ये केळी बागांतील मजुरांनी संप केला होता. तसेच कामगार संघटनांच्या चळवळीमुळे १९५५ मध्ये येथे मजूर कायदा अस्तित्वात आला. या कायद्यामुळे कामगारांच्या कामकाजात व राहणीमानात सुधारणा झाली.
देशाच्या नैसर्गिक साधनसंपत्तीत, किनारी भागातील व नद्यांच्या खोऱ्यातील लागवड योग्य जमीन, पाइन वने तसेच चांदी, जस्त, शिसे, लोह खनिज यांच्या साठ्यांचा अंतर्भाव होतो. येथील अर्थव्यवस्था पर्वतीय भागात शेती, पशुपालन, खाणकाम यांवर अवलंबून आहे तर मैदानी प्रदेशात प्रामुख्याने केळी उत्पादन व प्रक्रिया उद्योगावर आधारित आहे. १९९८ मध्ये हरिकेन वादळामुळे शेती व वाहतूक क्षेत्रांची मोठ्या प्रमाणात हानी झाली होती. जागतिक बँकेच्या अंदाजाप्रमाणे हाँडुरसचे एकूण राष्ट्रीय उत्पन्न १४,३०२ द. ल. अमेरिकी डॉलर होते (२०१०).
शेती : शेती हा हाँडुरसच्या अर्थव्यवस्थेचा पाया आहे. देशांतर्गतवस्तू उत्पादनात शेतीचा (वन, शिकार, मासेमारी यांसह) हिस्सा१४% होता (२०१३). अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमधील चिक्वीता व डोल या महामंडळांकडे (पूर्वीच्या फळ कंपन्या) लागवडयोग्य जमिनीचे क्षेत्र तुलनेने जास्त आहे. या महामंडळांकडून मोठ्या प्रमाणात केळीची लागवड करण्यात येते. यापासून देशास भरीव महसूल प्राप्त होतो. केळी, कॉफी, तंबाखू व ऊस ही येथील प्रमुख नगदी पिके आहेत. देशाच्याएकूण निर्यातीत कॉफीचा २७.१% व केळांचा १२.६% हिस्सा होता (२०१०). मका हे यथील प्रमुख पीक असून, याशिवाय येथे भात, लिंबूवर्गीय फळे, टोमॅटो इत्यादींची लागवड करण्यात येते. येथे पशु-पालनासही महत्त्व असून येथून गोमांस निर्यात करण्यात येते.
देशात ४.६५ द. ल. हे. क्षेत्रात जंगल असून याचे प्रमाण एकूण भूक्षेत्राच्या ४१.५% होते. (२००५). वन उत्पादनाचा राष्ट्रीय उत्पादनात मोठा हिस्सा आहे. जंगलापासून ९,०५८ हजार घ. मी. लाकूड उत्पादन झाले होते (२०१०) मात्र स्थलांतरित शेती करण्याच्या पद्धती व इंधनासाठी वृक्षतोड यांमुळे वन उत्पादनावर परिणाम होत आहे.
किनारी भागात प्रामुख्याने कॅरिबियन समुद्रकिनारी मासेमारी करण्यात येते. यामध्ये कोळंबी व लॉब्स्टर हे महत्त्वाचे मत्स्योत्पादन आहे.२००९ मध्ये ४०.२ हजार मे. टन मासे पकडण्यात आले होते. निर्यातीत लॉब्स्टरचा हिस्सा जास्त असून मत्स्यनिर्यात प्रामुख्याने अ. सं. सं.कडे करण्यात येते.
उद्योगधंदे : येथील उद्योगधंद्यांत लघुउद्योगांस महत्त्वाचे स्थान आहे. येथे अन्नप्रक्रिया, कापड, रसायने, लाकूड, साखर, सिमेंट, सिगारेटी, फर्निचर, कागद इ. निर्मिती उद्योग चालतात. तेगूसिगॅल्पा, सान पेद्रो सूला ही औद्योगिक केंद्रे आहेत. उद्योगक्षेत्राचा (खाणकाम, वस्तुनिर्मिती, बांधकाम यांसह) आंतर्देशीय वस्तू निर्मितीत अंदाजे २५.१% हिस्सा होता. एकूण कष्टकरी जनतेच्या २०.२% लोक यांमध्ये गुंतले होते (२०१०). येथे सोने, चांदी, जस्त, शिसे, अँटिमनी, तांबे, लोह इ. खनिजे आढळतात. एल् मोचीतो येथील सोने व चांदी खाणउद्योग विशेष महत्त्वपूर्ण आहेत. शिसेव जस्त यांची देशातून निर्यात होते. खनिज तेलसाठे देशात नसल्याने खनिज तेलाची आयात करण्यात येते. देशात जलविद्युत् निर्मितीसाठी ऊलूआ नदीवर सांता बार्बरा प्रांतात दोन धरणे बांधण्याचे प्रस्तावित आहे.
वित्त : हाँडुरसचे लेमपिरा हे चलन असून १०० सेंटाव्हास म्हणजे१ लेमपिरा होतो. ३० डिसेंबर २०११ रोजी १ स्टर्लिंग पौंड = २९.२१४ लेमपिरा, १ अमेरिकन डॉलर = १८.८९५ लेमपिरा व १ यूरो = २४.४४८ लेमपिरा याप्रमाणे विनिमय दर होता.
सेंट्रल बँक ऑफ हाँडुरस ही देशातील प्रमुख बँक असून या बँकेमार्फत चलन वितरित होते. देशात १९९९ मध्ये ४० खाजगी बँका होत्या. यांमध्ये चार परदेशी बँकांचा समावेश होता. द सेंट्रल अमेरिकन बँक फॉर इकॉनॉमिक इंटेग्रेशनचे मुख्यालय तेगूसिगॅल्पा येथे आहे. शेअरबाजार तेगूसिगॅल्पा व सान पेद्रो सूला येथे आहे.
व्यापार : हाँडुरस आंतरराष्ट्रीय व्यापारी संघटनेचा १९९५ पासून सदस्य आहे. हाँडुरसची आयात निर्यातीपेक्षा जास्त आहे. आयातीमध्ये भाजीपाला, फळे, खनिज तेल, रसायने, अन्नपदार्थ, विद्युत् साहित्य, वाहने, यंत्रसामग्री इत्यादींचा समावेश असतो. निर्यातीत कॉफी, केळी, साखर, सोने, शिसे, जस्त, सिगारेटी, लाकूड, मासे इत्यादींचा समावेश असतो. आयात व निर्यात प्रामुख्याने अमेरिकेची संयुक्त संस्थाने, एल् साल्वादोर, मेक्सिको, ग्वातेमाला, फ्रान्स, कॅनडा, जपान, स्पेन इ. देशांशी होते. हाँडुरसने २०१० मध्ये ७,१३३.५ द. ल. अमेरिकी डॉलरची आयात व २,६६४.८ द. ल. अमेरिकी डॉलरची निर्यात केली होती.
वाहतूक व संदेशवहन : पॅन अमेरिकन हायवेने हाँडुरस, निकाराग्वा, ग्वातेमाला, एल् साल्वादोर या देशांशी जोडला आहे. देशात १४,०४४ किमी. लांबीचे रस्ते होते व त्यांपैकी २,९७७.३ किमी. लांबीचे रस्तेपक्के होते (२०११). सान लॉरेन्झो, सान पेद्रो सूला, प्वेर्तो कॉर्तेझ हीशहरे व तेगूसिगॅल्पा राजधानीशी जोडणारा महामार्ग महत्त्वाचा आहे.
लोहमार्ग प्रामुख्याने देशाच्या उत्तर भागात असून रेल्वेमार्फत फळांची, विशेषतः केळीची वाहतूक करण्यात येते. एकूण लोहमार्गांपैकी ३४९ किमी. लोहमार्ग अरुंदमापी होते (२०१०).
देशात कॅरिबियन समुद्र किनाऱ्यावरील प्वेर्तो कॉर्तेझ हे प्रमुख वमोठे बंदर आहे. याशिवाय टेला, ला सेबा, प्वेर्तो कास्तिला, रॉॲतान, आमापाला, सान लॉरेन्झो ही अन्य प्रमुख बंदरे आहेत.
हाँडुरसमध्ये तेगूसिगॅल्पा, ला सेबा, सान पेद्रो सूला, रॉॲतान येथेआंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत.
एल् हेराल्दो, ला ट्रिब्यून, ला प्रेन्सा, ताइम्पो ही देशातील प्रमुख दैनिके आहेत. येथे आकाशवाणी व दूरचित्रवाणीची सुविधा आहे.
लोक व समाजजीवन : इ. स. पू. पहिल्या शतकाच्या आधीपासून येथे लोकांची वस्ती असल्याचे पुरावशेष मिळतात. हाँडुरसच्या काही भागात माया संस्कृती विकसित झाली होती. हे कोपान येथील अवशेषांवरून दिसून येते. हाँडुरसमध्ये सु. ९०% लोक मेस्टिझो मिश्रवंशीय (स्पॅनिश व इंडियनांच्या संकराने झालेले) आणि वेस्ट इंडीजमधील कृष्णवर्णीय गॅरिफुना हे सु. २% आहेत. तसेच तोलूपॅन, मास्किटो, लेन्का, चॉर्दी, तेवाह्कस, पेच या स्थानिक इंडियनांची संख्या ७% आहे. यांशिवाय १% यूरोपियन लोक येथे आहेत. देशात सर्वांना धर्मस्वातंत्र्य आहे. येथे रोमन कॅथलिक पंथीय सु. ९७% आहेत. यांशिवाय प्रॉटेस्टंट पंथीय व परंपरागत माया संस्कृतीचे पूजक लोक येथे आहेत.
हाँडुरसच्या लोकसंख्येची घनता दर चौ. किमी.स ७१.५ होती (२०१०). तसेच २००१–१० या दशकात लोकसंख्या वाढीचा सरासरी दर अंदाजे २% होता. २००९ मध्ये हजारी जननदर अंदाजे २७ वमृत्युदर ५ होता. येथील लोकांचे सरासरी आयुर्मान ६९ होते. यामध्ये पुरुषांचे ६७ व स्त्रियांचे ७३ आयुर्मान होते (२००९). ५ वर्षांखालील बालमृत्युचे प्रमाण दर हजारी ३० होते (२००९).
येथील सु. ७५% लोक ग्रामीण भागात व २५% लोक शहरी भागात राहतात. येथे शेतकऱ्यांना कॅम्पेसीनो म्हणतात. ते परंपरागत पद्धतीने शेती करतात. यांचे राहणीमान साधे आहे. येथील लोक कुटुंबवत्सलआहेत. ते नातेसंबंधाचा आदर करतात. एकमेकांना अडचणीत मदत करतात. येथील लोकांचा आहार भात व मका यांवर आधारित असतो. यांशिवाय मासे, मांस व चीजचा आहारात समावेश असतो. तसेच देशाच्या विविध भागांत तेथील स्थानिक परिस्थितीनुसार आहार असतो. मॉन्डोन्गो व तॅपॅदो हे येथील आवडते खाद्यपदार्थ आहेत. कॉफी, दूध, फळांचारस व ऑर्कबॅता तसेच विशिष्ट प्रसंगी मद्य, बिअर व अननसापासून बनविलेली चिची ही पेये आवडीने घेतली जातात.
भाषा व साहित्य : स्पॅनिश ही येथील प्रमुख भाषा आहे. तसेच येथे इंग्रजी व स्थानिक इंडियनांच्या विविध समूहांच्या वेगवेगळ्याबोलीभाषा बोलल्या जातात. येथील लेखकांत मार्कोस रेयेस, लिदिया हँडल, रामॉन आमाया-आमादॉर, हवान रामॉन मोलीना, लुसिला गेमेरोदे मेदीना, फ्रोइलान तुर्सिओस, राफाल हेलिओदोरो बाल्ये इ. विशेषप्रसिद्ध आहेत.
शिक्षण : येथील शिक्षणपद्धती यूरोपीय शिक्षणपद्धतीवर आधारित आहे. येथे ६–१५ वर्षे वयोगटातील सर्वांना प्राथमिक शिक्षण सक्तीचेव मोफत आहे. शाळेतील विद्यार्थिगळतीचे प्रमाण जास्त आहे.
हाँडुरसमध्ये सात विद्यापीठे असून त्यांतील नॅशनल ॲटॉनॉमस युनिव्हर्सिटी ऑफ हाँडुरस, तेगूसिगॅल्पा (१८४७) हे महत्त्वाचे विद्यापीठ आहे. येथे प्रौढ साक्षरता दर ८३.६% होता. यामध्ये पुरुषांचे साक्षरता प्रमाण ८३.७% व स्त्रियांचे साक्षरता प्रमाण ८३.५% होते (२००७).
आरोग्य : हाँडुरसमध्ये वैयक्तिक सेवा अल्प प्रमाणात उपलब्ध आहेत. तेगूसिगॅल्पा येथे डॉक्टर, परिचारिका, दवाखाने जास्त प्रमाणातआहेत. क्षय, हिवताप, विषमज्वर, मलेरिया, डेंग्यू इ. आजार देशात जास्त होतात. येथे लोकसंख्येतील सु. १.८% लोक एड्सग्रस्त होते (२००३). देशात २८ सार्वजनिक रुग्णालये होती (२०१०).
कला व क्रीडा : कोपान येथे माया संस्कृतीतील वास्तुकला, चित्रकला व शिल्पकला यांचे उत्कृष्ट नमुने सापडले आहेत. येथील उंच चबुतऱ्यावर बांधलेले मंदिर, त्यातील सभामंडप वास्तुकलेची प्रगत अवस्था दर्शवितात. त्यातील चुनेगच्चीतील मूर्तिकाम उठावदार असून छप्पर आणि द्वारशाखांसाठी कमानीचा वापर केलेला दिसतो. हाँडुरसमधील शिल्पकलेत गॉथिक व बरोक शैली पहावयास मिळते. कोलंबसाच्या आगमनापूर्वीचा व त्यानंतरचा स्पॅनिश वसाहतीचा वारसा येथील शिल्पांत पहावयास मिळतो.
सामाजिक विषय येथील चित्रकलेत पहावयास मिळतात. आर्तूरो लोपेद रॉदेन्झो याने नॅशनल स्कूल ऑफ आर्ट्स अँड क्रॉफ्ट्स अँड पेंटेडम्युरल या संस्थेची स्थापना केली.
कार्लोस गाराई, होसे आंतान्यो व्हलास्क्वेझ, क्रूद बेर्मूदेस यांची येथील चित्रकारांत गणना होते. तेगूसिगॅल्पा येथे रिपब्लिकन हिस्ट्री म्यूझीयमआहे (१९९३). तसेच कोमायाग्वा येथील आर्किऑलॉजिकल म्यूझीयम प्रसिद्ध आहे.
हाँडुरसमध्ये संगीत व नृत्य हे कलाप्रकार सण व उत्सवातील अविभाज्य घटक मानण्यात येतात. मरिम्बा व कॅराम्बा ही येथील विशिष्ट वाद्येआहेत. येथील सिक्वे व मॅस्कॅरो ही नृत्ये प्रसिद्ध असून तेगूसिगॅल्पा येथे नॅशनल स्कूल ऑफ म्युझिक आहे. हाँडुरसमध्ये अनेक यात्रा व उत्सवसाजरे करण्यात येतात. द फिएस्टा दे सान इसिद्रो हा आठवडाभराचाउत्सव दरवर्षी मे महिन्यात साजरा करण्यात येतो. फुटबॉल हा येथील सर्वांत लोकप्रिय खेळ आहे.
महत्त्वाची स्थळे : युनेस्कोच्या जागतिक वारसा नोंदीत समाविष्ट असलेले येथील प्राचीन कोपान हे माया संस्कृतीचे स्थळ व रिओ प्लॅटॅनो बायोस्फिअर रिझर्व्ह (१९८२) हे वर्षावन, सान पेद्रो सूला नजीकच्या त्रुहीयो उपसागरातील नौकानयन व मासेमारी, कॅरिबियन समुद्रकिनारी असलेल्या पुळणी इ. पर्यटकांची विशेष आकर्षणे आहेत. कोस्टारीका, एल् साल्वादोर, कॅनडा, ग्वातेमाला, इटली, मेक्सिको, निकाराग्वा, पनामा, स्पेन, अमेरिकेची संयुक्त संस्थाने इ. देशांतील पर्यटक दरवर्षी येथे येतात.
तेगूसिगॅल्पा हे देशाच्या राजधानीचे शहर असून ते औद्योगिक, व्यापारीव सांस्कृतिक केंद्र आहे. सान पेद्रो सूला हे प्रमुख औद्योगिक केंद्र आहे. याशिवाय देशात एल् प्रोग्रेसो, कोलोमा, ला सेबा, डानिल, चोलूतेका, कामायाग्वा, हुतीकॅल्पा, व्हिलॅनुएव्हा, प्वेर्तो कॉर्तेझ, काताकामास ही अन्य प्रमुख व मोठी शहरे आहेत.
गाडे, ना. स.
“