हा-लेव्ही, ज्यूडा : (सु.१०७५ – जुलै ११४१). स्पॅनिश हिब्रूकवी आणि धर्मचिंतक. पूर्ण नाव यहुदा बेन शेम्युएल हा-लेव्ही.तोलेदो, कॅस्टील येथे जन्मला. ज्यू धर्माचे तसेच ग्रीक आणि अरबी तत्त्वज्ञानाचे अध्ययन त्याने केले होते. काव्यकला आणि वैद्यक ह्यांचाही अभ्यास त्याने केला होता. वैद्यकीय व्यवसायात तो सुखी नव्हता. त्याला काव्यलेखन प्रिय होते किंबहुना त्याच्या प्रतिभेचा खरा आविष्कारत्याच्या कवितेतूनच होत होता. आपल्या हिब्रू कवितेसाठी त्याने अरबी कवितेची संरचना उपयोगात आणली. प्रभावी प्रतीके आणि उपमा ह्यांनी त्याची कविता सधन झालेली आहे. त्याचप्रमाणे बायबल मधील शब्दप्रयोग आणि संदर्भ ह्यांनी तिचा आशय विणलेला आहे. त्याच्या कवितेचे तीनवर्ग पाडता येतील : लौकिक, धार्मिक आणि राष्ट्रीय.

 

त्याच्या आयुष्याच्या पूर्वार्धात तो मित्र, प्रेम, निसर्ग आणि मद्य यांत रमत असे. ही भाववृत्ती त्याच्या आरंभीच्या लौकिक कवितेत प्रकट झालेली आहे तथापि मुस्लिमांकडून स्पेन पुन्हा जिंकून घेण्यासाठी ख्रिस्ती धर्मीयांनी केलेला संघर्ष आणि त्याबरोबरच त्या काळात स्पेनमधील ज्यू धर्मीयांचा झालेला अनन्वित छळ पाहिल्यामुळे त्याचे मन अत्यंत विषण्ण झाले. धर्म-युद्धांमध्ये ज्यूही उद्ध्वस्त झाले होते. ह्याचा त्याच्या जगाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनावर आणि कवितेवरही परिणाम झाला.

 

एकीकडे ही उद्ध्वस्तता आणि दुसरीकडे ज्यू धर्मीय बुद्धिमंतांचे ग्रीक बुद्धिवाद आणि तत्त्वज्ञान ह्यांच्या आहारी जाणे, ह्या अंतर्गत संकटामुळे ज्यू धर्मश्रद्धेला आव्हान मिळाले होते. ती श्रद्धा दुबळी होत चालली होती. त्याच्या धार्मिक कवितेत त्याची ही व्यथा उत्कटपणे आविष्कृत झालेली आहे. ह्या व्यथेबरोबरच ईश्वराचे प्रेम प्राप्त करून घेण्याची त्याची खोल इच्छाही दिसून येते.

 

ज्यू समाजाची शोकात्मिका त्याच्या राष्ट्रीय कवितांतून अभिव्यक्तझाली आहे. झायनचे (जेरूसलेम शहराचा पूर्व भाग) पूर्ववैभव आणि त्याच्या नाशामुळे खोलवर जाणारी वेदना त्या कवितेतून प्रकटते तथापिते पूर्ववैभव परत मिळेल, अशी आशाही तो व्यक्त करतो. त्याच्या अनेक धार्मिक, राष्ट्रीय कविता ज्यूंच्या प्रार्थनेत समाविष्ट आहेत.

 

ग्रीक तत्त्वज्ञान आणि बुद्धिवाद ह्यांचा प्रतिवाद करण्यासाठी त्याने किताब अल् खजारी हा ग्रंथ अरबी भाषेत लिहिला. ज्यूडा इब्न तिब्बॉन ह्याने ह्या ग्रंथाचा हिब्रू भाषेत अनुवाद केला आहे. ज्यू धर्माचा तोएक अभिजात ग्रंथ मानला जातो. हा ग्रंथ संवादरूप असून आठव्या शतकाच्या सुरुवातीला खजारांच्या प्रतिमापूजक (Heathen) राजानेज्यू धर्म कसा स्वीकारला, हे सांगितले आहे. हे धर्मांतर करण्यापूर्वीत्या राजाने एक राब्बी (ज्यू विद्वान), एक ख्रिस्ती ईश्वरविद्यावेत्ता, एक मुस्लिम विद्वान आणि ॲरिस्टॉटलच्या पंथाचा एक तत्त्वज्ञ ह्यांना आपापल्या धर्माच्या गुणवत्तेविषयी बोलायला सांगितले होते.

 

हा-लेव्हीची अशी धारणा होती, की ज्यू धर्माला ईश्वराच्या सर्वश्रेष्ठतेसाठी कोणत्याही बुद्धिवादी पुराव्यांची आवश्यकता नाही. इतिहासात इझ्राएलींच्या माध्यमातून त्याने स्वतःला व्यक्त केलेले आहे. इझ्राएल हे सर्व राष्ट्रांचे हृदय आहे. हृदयातून शरीराच्या अन्य भागांत रक्ताचा पुरवठा होतो, त्याचप्रमाणे इझ्राएलकडून जगाला नैतिक आणि आध्यात्मिक ताकद मिळते.

 

ईजिप्तमध्ये तो मरण पावला तथापि आख्यायिका अशी, की तो गुडघे टेकून ईश्वराची प्रार्थना करीत असताना एका अरब घोडेस्वाराने त्याला आपल्या घोड्याच्या टाचांखाली चिरडून मारले.

कुलकर्णी, अ. र.