हार्डिंग, लॉर्ड चार्ल्स : (२० जून १८५८–२ ऑगस्ट १९४४). ब्रिटिशांकित हिंदुस्थानचा गव्हर्नर जनरल व राजनीतिज्ञ. त्याचा जन्म सधन सरदार घराण्यात लंडन येथे झाला. गव्हर्नर जनरल लॉर्ड हेन्री हार्डिंग (कार. १८४४–४८) याचा तो नातू. त्याचे शिक्षण हॅरो व ट्रिनिटी कॉलेज, केंब्रिज येथे झाले. लॉर्ड हेन्री ॲलिंग्टन याची मुलगी विनिफ्रेड स्टुअर्ट हिच्याशी त्याचे लग्न झाले (१८९०). तत्पूर्वी त्याची नियुक्ती परराष्ट्र खात्यात झाली (१८८०). पुढे त्याला रशियात राजदूत म्हणून पाठविले गेले (१९०४). त्यानंतर परराष्ट्र खात्यात उपसचिवपदावर त्याची नियुक्ती झाली (१९०६). तेथील त्याच्या कार्यक्षम सेवेचा विचार करून त्यास सरदारकी बहाल करण्यात आली. नंतर त्याची हिंदुस्थानात व्हाइसरॉय म्हणून नियुक्ती झाली (१९१०).
लॉर्ड चार्ल्सच्या कारकिर्दीत (१९१०–१६) बऱ्याच महत्त्वाच्याघटना घडल्या. लॉर्ड कर्झनने केलेली बंगालची फाळणी रद्द केल्याचे पंचम जॉर्जने हिंदुस्थानच्या भेटीत जाहीर केले (१९११). त्याचप्रमाणे हिंदुस्थान सरकारची राजधानी कलकत्त्याहून दिल्लीला आणल्याचीही घोषणा त्याने केली. बंगाल प्रांताला इलाख्याचा दर्जा देण्यात आला. राज्यव्यवस्थेसाठी बंगाल येथे प्रांतिक गव्हर्नर बिहार, ओरिसा व छोटा नागपूर यांचा एक प्रांत करण्यात येऊन तेथे लेफ्टनंट गव्हर्नर इन काउन्सिल व आसाम येथे चीफ कमिशनर इ. पदे निर्माण करण्यात आली. पंचम जॉर्ज व महाराणी यांच्या भेटीची आठवण म्हणून प्राथमिक शिक्षणासाठी पन्नास लाख रुपये देणगी जाहीर करण्यात आली.
ब्रिटिश शासनाविरुद्धच्या असंतोषाला पायबंद घालण्यासाठी वरील सर्व सुधारणा करण्यात आल्या तथापि राष्ट्रीय जागृती व काँग्रेसच्या धोरणावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. क्रांतिकारकांची चळवळ जनतेला राष्ट्रीय जागृतीचे धक्के देत होती. १९१२ मध्ये लॉर्ड चार्ल्सवर बाँब टाकण्यात आला. या प्रकरणानंतर मुद्रणस्वातंत्र्यावर पुन्हा मर्यादा घालण्यात आल्या. १९१३ मध्ये काँग्रेसने प्रेस ॲक्ट रद्द करण्याची मागणी केली. पहिले जागतिक युद्ध सुरू झाल्यावर मुस्लिम लीगने जाहीर केले की,’ स्वराज्य हे हिंदुस्थानचे ध्येय आहे आणि ते हिंदू व मुस्लिम यांच्या सलोख्यावर अवलंबून आहे,’ १९१४ मध्ये लो. टिळकांची मंडाले येथून सुटका झाली. त्यांनी देशभर दौरे काढून होमरूल चळवळीला चालना दिली. ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे …’, हा मंत्र त्यांनी लोकांना दिला. जहाल पक्षाचे राजकारण जोरात असतानाच १९१६ मध्ये लॉर्ड चार्ल्सपरत गेला. तत्पूर्वी पहिल्या महायुद्धात त्याने हिंदुस्थानातील शिपायांच्या पलटणी ग्रेट ब्रिटनमध्ये पाठवून मोठे कार्य केले. त्याची पुन्हा परराष्ट्र खात्यात उपसचिवपदी नियुक्ती झाली. महायुद्धानंतर त्याची फ्रान्समध्ये ब्रिटिश राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली (१९२०–२२). तेथून निवृत्त झाल्यानंतर त्याने आपले उर्वरित जीवन लेखन-वाचनात व्यतीतकेले आणि हिंदुस्थानातील आपल्या कारकिर्दीविषयीच्या आठवणी माय इंडियन यिअर्स , १९१० –१९१६ या ग्रंथाद्वारे मांडल्या. तो ग्रंथ त्याच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला (१९४८).
वृद्धापकाळाने त्याचे पेनहर्स्ट, केन्ट येथे निधन झाले.
देवधर, य. ना.
“