हार्डवेअर :  घरे बांधण्याचे काम, बागायती, शेतकी, रस्तेबांधणी, सुतारकाम व यांत्रिक काम अशा अनेक ठिकाणी लागणाऱ्या लोखंडी किंवा इतर धातूंच्या साहित्यासाठी बाजारात हार्डवेअर हासामान्य शब्द वापरतात. संसारोपयोगी अतिशय विविध प्रकारच्या वबहुधा घरगुती वापराच्या लोखंडी वस्तू , सामान, सामग्री इत्यादींनाहार्डवेअर म्हणतात.

 

घरातील दारे, खिडक्या वगैरे भागांना लागणारे खिळे, स्क्रू, बिजागऱ्या, कड्या, कोयंडे, मुठी, सुरसे, ओढ-पट्ट्या, आकडे, अटकावाचे बोल्ट, साखळ्या, स्प्रिंगा, जाळ्या, कुलपे, नट, बोल्ट, रिव्हेट, वॉशर, कानशी वगैरे वस्तू कटलरी साहित्य स्वयंपाकघरात लागणारे स्टोव्ह, शेगड्या, चिमटे, सांडशी, सांडस, सांडणी, तवा, उलतणे, झारा, पळ्या, सोऱ्या, खलबत्ता, विळी, किसणी, गाळणे, चाळणी, नसराळे, हातपंप, चाकू, कातऱ्या, सुऱ्या, केसांचे व तारेचे ब्रश, पोगर व मणी, केसांच्या केरसुण्या बागकामाच्या कातऱ्या, खुरपे, कोयते, कुर्‍हाडी, पहार, कुदळ, फावडे, घमेली, बादली, पाणी देण्याच्या झाऱ्या, नळाच्या तोट्या शेतीकामात लागणारी लहान हत्यारे, नांगर, काटेरी तारा सुतारकामात लागणारी छिद्रण यंत्र, सामता, गिरमीट इ. छिद्रक यंत्रे, रंधे, पटाशी, वाकस, मोगरा, करवती, पेचकस, हातोडे, छिन्न्या, खिळे उपटण्याचे चिमटे व हातोड्या, पकडी, धार लावण्याचे दगड, घर्षक द्रव्ये, घासकागद यांत्रिक कामात लागणारी हात हत्यारे, धातू कापण्याच्या व यांत्रिक करवती, नट आवळण्याचे पाने, कथिलाच्छादित पत्रे, आटे पाडण्याचे साहित्य, शेगडा, यंत्राची दुरुस्ती करण्यास लागणारे साहित्य अशा सर्व वस्तूंचा हार्डवेअरमध्ये समावेश करतात. धुलाई यंत्रे व सामग्री, रस्ते-बांधणीची व अभियंत्यांची हत्यारेही यात येतात. सवाणा, नखे कापण्याचे साधन, टाचण्या, पिना, सुया, टोचा, दाभण इ. साधनेही यात येतात.

 

लोखंड हा एक सर्वांत मजबूत धातू असून किमतीनेही इतरांपेक्षा स्वस्त असतो. त्याची घडवण करण्याचे कामही सोपे असते. त्यामुळे अजूनही हार्डवेअरपैकी बहुतेक माल लोखंड किंवा पोलादापासून तयार करतात. यांशिवाय तांबे, पितळ, कासे, ॲल्युमिनियम व मिश्रधातू तसेच लाकूड, प्लॅस्टिक व संमिश्र द्रव्ये यांचा काही वस्तूंसाठी उपयोग करतात.

 

घरे बांधण्याचा उद्योग भारतामध्ये व इतर काही देशांतही फार पुरातन काळापासून चालू आहे. लोखंडाचा शोध लागण्यापूर्वी लाकडाचे दरवाजे बनविण्यासाठी लागणारे साहित्य तांबे किंवा कासे यांपासून बनवीत असत. लोखंडाचा शोध लागून ते माफक किमतीत मिळू लागल्यापासून बहुतेक सर्व हार्डवेअर लोखंडापासून बनविण्यात येऊ लागले. भारतामध्ये लोखंड विपुल प्रमाणात मिळते व त्याचे घडीव काम करणारे लोहार बहुतेक सर्व राज्यांत स्थायिक झालेले आहेत. भारतामध्ये अजून काही भटक्या जमाती गावोगाव फिरून तेथील लोहारकाम संपवून दुसऱ्या गावी जातात व एका वर्षाने पुन्हा येतात. अशा पद्धतीने हे लोक लहान गावाला लागणारे लोखंडी साहित्य पुरवितात. मोठ्या व लहान शहरांत आता घरबांधणी उद्योगाला फार महत्त्व आले आहे आणि घरासाठी लागणाऱ्या लोखंडी साहित्याला सतत फार मोठी मागणी असते. त्यामुळे मोठमोठ्या दुकानांमध्ये हे साहित्य विक्रीला असते.

 

लोखंडी साहित्य तयार करण्याचा मोठा उद्योग प्रथम इंग्लंडमध्ये सुरू झाला. १८५० सालाच्या सुमारास अनेक प्रकारची यांत्रिक हत्यारे मिळू लागल्याने व यांत्रिक शक्तीही उपलब्ध होऊ लागल्यामुळे इंग्लंडमध्ये लोखंडी साहित्य तयार करण्याचे मोठे कारखाने सुरू झाले. त्यांचे उत्पादन महोत्पादन पद्धतीने होत असल्याने तेथे तयार केलेला माल इतर देशांत हाताने तयार केलेल्या मालापेक्षा पुष्कळ सुबक व स्वस्त होता. त्यामुळे भारत व इतर अनेक देशांत इंग्लंडमध्ये तयार होणारा माल मोठ्या प्रमाणात विकला जाऊ लागला. अमेरिकेमध्येही वसाहतीच्या सुरुवातीच्या दिवसांत इंग्लंड किंवा यूरोपातील जर्मनी व फ्रान्समध्ये तयार केलेला माल वापरीत असत परंतु १८५० सालानंतर तेथील तंत्रज्ञांनी सर्व प्रकारचा माल अमेरिकेतच तयार करून त्याची गुणवत्ता इंग्लंडच्या माला-प्रमाणेच चांगली ठेवली. त्यामुळे तेथे परदेशातून माल आयात करण्याची गरज संपली. बकिंगहॅम, लँकेशर, शेफील्ड, मँचेस्टर, लंडन, ब्रिस्टॉल व चिमेस्टर ही ग्रेट ब्रिटनमधील तर पिट्सबर्ग, हार्टफर्ड, न्यू ब्रिटन, वॉटरबरी, स्प्रिंगफील्ड ही अमेरिकेतील ठिकाणे हार्डवेअरसाठी प्रसिद्ध आहेत. १९२० सालानंतर जपाननेही लोखंडी माल तयार करण्याच्या उद्योगात पुष्कळ प्रगती केली. तेथील कारागिरांनी लहानलहान उद्योग सुरू केले आणि कोणती तरी एक किंवा दोनच वस्तू शक्य तितक्या लवकर तयार करून शक्य तितक्या कमी किमतीत विकण्याची पद्धत सुरू केली. अशा स्वस्त मिळणाऱ्या वस्तू एकत्र करून त्या परदेशात नेऊन विकण्या-साठी काही मोठ्या कंपन्या सुरू झाल्या. त्यांनी आपला माल भारतामध्येही मोठ्या प्रमाणावर व बऱ्याच कमी किमतीत विकण्यास सुरुवात केली. त्यामुळे भारतातील बाजारपेठेत पुष्कळ वर्षे चांगल्या प्रतीचा माल इंग्लंडहून येत असे व दुय्यम दर्जाचा माल जपानहून येत असे.

 

भारत स्वतंत्र झाल्यावर स्वदेशी धंद्यांना सर्व तर्‍हेचे सरकारी साहाय्य मिळू लागल्याने सर्व मोठ्या शहरांत स्थानिक गरज भागविण्यासाठीअनेक लोकांनी लोखंडी सामान तयार करण्याचे लहान कारखाने सुरूकेले. अशा कारखान्यांना लागणारे नवे कारागीर पुरविण्यासाठी व त्या कारागिरांना प्रगत देशांतील तंत्रज्ञानाचा फायदा मिळवून देण्यासाठी सरकारने (१) ओखला (नवी दिल्ली), (२) हावरा (कोलकाता) आणि (३) राजकोट (सौराष्ट्र) येथे आधुनिक पद्धतीने तांत्रिक शिक्षण देण्याची केंद्रे सुरू केली. ओखला येथील केंद्रासाठी फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनीचे, हावरा येथील केंद्रासाठी जपानचे तर राजकोट येथील केंद्रासाठी अमेरिकेचे तांत्रिक साहाय्य मिळाले. हैदराबाद येथे एक स्वतंत्र संस्था स्थापनकरण्यात आली. अशा लहान धंद्यांना कच्चा माल व सवलतीच्या दराने यंत्रसामग्री पुरविण्यासाठी आणि त्यांनी तयार केलेला माल बाजारात नेऊन विकण्याची सोय करण्यासाठी सरकारने १९५४ मध्ये लघुद्योग मंडळ स्थापन केले. अशा प्रकारे सरकारी मदत मिळू लागल्याने भारतामध्ये लागणारा बहुतेक लोखंडी माल आता येथेच तयार होतो.

 

लोखंडी माल ओलसर हवेने लवकर गंजून खराब होतो म्हणूनचांगल्या प्रतीच्या मालावर निकेलाचा मुलामा चढवितात. स्वस्त जातीच्या मालावर जस्ताचा मुलामा देतात किंवा ऊष्मीय पद्धतीने सुक्या डांबराचा लेप देतात. चांगल्या जातीच्या मालासाठी पितळ किंवा अगंज पोलादाचाही उपयोग करतात व त्यावर क्रोमियमाचा मुलामा चढवितात. मुठीसारख्या काही वस्तू बनविण्यासाठी प्लॅस्टिकचा किंवा ॲल्युमिनियमाचा उपयोग करता येतो. उत्तम प्रकारच्या काळ्या कातऱ्या, चाकू, सुऱ्या व विळ्या अशा धारदार वस्तू बनविण्यासाठी मुशीत तयार केलेले उत्तम प्रकारचे उच्च कार्बन पोलाद वापरावे लागते. पांढऱ्या चकचकीत कातऱ्या बनविण्यासाठी अगंज पोलादाचा उपयोगही मोठ्या प्रमाणात करतात. मुंबई, कोलकाता व दिल्ली अशा मोठ्या शहरांत सर्व प्रकारचा माल तयार करतात. त्याशिवाय फरीदाबाद येथे घडवण पद्धतीने तयार केलेल्या सर्व प्रकारच्या पोलादी पान्यांचा उद्योग फार मोठ्या प्रमाणात चालतो. त्यापैकी बराच माल परदेशात खपतो. अलीगढ येथे कुलपे बनविण्याचा आणि मीरत येथे कातऱ्या बनविण्याचा मोठा उद्योग आहे.

 

इंग्लंडमध्ये लोखंडी माल बनविण्याचा मोठा उद्योग सुरू झाल्यावर प्रत्येक कारखानदार प्रत्येक वस्तूला इतरांपेक्षा निराळा आकार देऊ लागला. त्यामुळे प्रत्येक वस्तूसाठी असंख्य प्रकारचे आकार मिळू लागले. एकाच वस्तूसाठी जरूरी नसताना अनेक प्रकारचे आकार वापरणे हे उत्पादनाच्या दृष्टीने नुकसानीचे होते. त्यामुळे इंग्लंडमध्ये सर्व कारखान-दारांनी प्रमाणभूत पद्धती वापरण्यास सुरुवात केली व प्रत्येक वस्तूसाठी शक्य तितका साधा व एकच प्रमाणभूत (मानक) आकार वापरावा असे ठरले. हे काम सुधारण्यासाठी ब्रिटिश एंजिनिअरिंग स्टँडर्ड्स ॲसोसिएशन ही संस्था स्थापण्यात आली. भारतामध्येही अशाच प्रकारची भारतीय मानक संस्था १९६२ मध्ये स्थापन झाली.


 

उत्पादन : भारतामध्ये (१) भटक्या जमाती, (२) लहान गावात स्थायिक झालेले लोहार, (३) औद्योगिक वसाहतीमधील लहान कारखानदार व (४) मोठ्या शहरातील बहु-उत्पादन पद्धती वापरणारे मोठे कारखानदार असे लोखंडी माल तयार करणाऱ्या लोकांचे विविध वर्ग आहेत. भटक्या जमातींना कायमचे घर नसते. ते लोक आपल्या बैलगाडीत सर्व सामान ठेवून एका गावाहून दुसऱ्या गावाला जातात व गावाबाहेरील मैदानात तात्पुरती झोपडी किंवा तंबू लावून काही दिवस राहतात. त्यांना कोठेही भाडे द्यावे लागत नाही. खेडेगावात जुन्या लोखंडाचे तुकडे स्वस्त मिळतात. भट्टीसाठी लागणारे इंधनही अल्प किमतीत मिळते. कुटुंबातील माणसे अंगमेहनतीचे काम करतात. त्यामुळे त्यांनी तयार केलेल्या मालाला बराच कमी खर्च येतो.

 

लहान गावात स्थायिक झालेले लोहार आपापले घर बांधून तेथेच माल तयार करण्याची भट्टी बसवितात. त्यांच्या घरातील माणसे कामात मदत करतात परंतु त्यांना लागणारे सर्व इंधन स्थानिक बाजारात विकत घ्यावे लागते. हे लोक भटक्या जमातीप्रमाणे जुन्या सामानाच्या बाजारात मिळणारे लोखंडाचे तुकडेच वापरतात, त्यामुळे त्यांनी तयार केलेला माल लहान कारखान्यात तयार केलेल्या मालापेक्षा स्वस्त पडतो.

 

लहान कारखानदारांना इमारतीचे भाडे, मजुरी व वीज यांसाठी बराच खर्च येतो आणि जुन्या बाजारातील लोखंडी तुकड्यांचा उपयोग करता येत नाही. त्यांना लागणारा सर्व कच्चा माल नवा कोराच विकत घ्यावा लागतो. त्यांच्या मालाला सतत चांगली मागणी असली, तर त्यांचा धंदा फायद्याचा होऊ शकतो परंतु विशेष मागणी नसलेला माल तयार केला, तर त्याची विक्री करण्यासाठी मध्यस्थ दलालाची मदत घ्यावी लागते व अशा व्यवहारात काही वेळा नुकसान होण्याचा संभव असतो.

 

बहु-उत्पादन पद्धतीने काम करणाऱ्या मोठ्या कारखान्यांत सर्वकामे यांत्रिक शक्तीने होत असल्याने ते फार जलद करता येते. त्यामुळे उत्पादनाचा खर्च लहान कारखानदारांपेक्षा कमी असतो परंतु कारखान्याच्या आकारमानाप्रमाणे त्याचा वरकड खर्च वाढत जातो. मालाला मोठी मागणी असून मालाचे उत्पादन सतत कायम ठेवता आले, तर बहु-उत्पादन पद्धती फायद्याची होते.

 

पहा : 1. Sundaram, C.R. Small Industries Divisions, New Delhi, 1972.

         2. Panickar, P.N.S. Handbook of Small Industries, Madras, 1965.

 

ओक, वा. रा.