हार्ट, फ्रान्सिस ब्रेट :  (२५ ऑगस्ट १८३६–५ मे १९०२). अमेरिकन साहित्यिक. अमेरिकेच्या न्यूयॉर्क राज्यातील ॲल्बनी येथे जन्मला. त्याचे वडील हेन्री हार्ट हे शिक्षक होते. १८४५ मध्येत्यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर त्याच्या आईने पुनर्विवाह केल्या-मुळे ब्रेट तिच्यासह कॅलिफोर्नियाला गेला (१८५४). ब्रेटचे शिक्षण नियमितपणे झालेले नव्हते तथापि त्याला वाचनाची आवड होती. कॅलिफोर्नियात त्याने खाणकामगार, शिक्षक, पत्रकार अशी विविध प्रकारची कामे केली. १८६० मध्ये तो अमेरिकन इंडियन आणि मेक्सिकन ह्यांच्या बाजूने असल्यामुळे लोकनिंदेस पात्र ठरला होता. अमेरिकन इंडियनांची कत्तल झाल्यानंतर त्या घटनेचा त्याने नॉर्दर्न कॅलिफोर्नियन ह्या साप्ताहिकाच्या संपादकपदावरून निषेध केला. त्यानंतर तो कॅलिफोर्निया- मधील सॅन फ्रॅन्सिस्को येथे स्थायिक झाला. तेथे पत्रकार, मुद्रक, कारकून अशी अनेक प्रकारची कामे त्याने केली. ही कामे करीत असतानाच त्याला आपली वाचनाची आवड पुरवून घेता आली. तसेच लेखनाचा अनुभवही मिळाला. शासकीय सेवेतही तो होता. १८६२ मध्ये ॲना ग्रिसवल्ड ह्या युवतीबरोबर त्याचा विवाह झाला. गोल्डन ईराकॅलिफोर्नियन ह्या नियतकालिकांतून त्याचे आरंभीचे लेखन प्रसिद्ध होत असे.

 

१८६७ मध्ये द लॉस्ट गॅलिऑन हा त्याच्या कवितांचा संग्रह प्रसिद्ध झाला. त्यानंतर कंडेन्स्ड नॉव्हेल्स अँड अदर पेपर्स हा विडंबनात्मक लेखसंग्रह प्रकाशित झाला (१८६७). अमेरिकन कादंबरीकार जेम्स फेनिमोर कूपर, इंग्रज कादंबरीकार चार्ल्स डिकिन्झ, फ्रेंच कादंबरीकार व्हिक्टर ह्यूगो ह्यांच्या लेखनाचे अत्यंत मार्मिक विडंबन त्याने केले आहे. अमेरिकन लेखक वॉशिंग्टन अर्व्हिंग ह्याच्या अल् हम्ब्रा (१८३२) मधील स्पॅनिश आख्यायिकांशी जवळचे नाते सांगणाऱ्या स्पॅनिश आख्यायिकांची मालिकाही त्याने लिहिली. त्यानंतर १८६८ मध्ये त्याला ओव्हरलँड मंथ्‌ली ह्या मासिकाच्या संपादकपदी नियुक्त केले गेले. ह्या मासिकातून ‘द लक ऑफ रोअरिंग कँप’ (१८६८) ही त्याची कथा व ‘प्लेन लँग्वेज फ्रॉम ट्रथफुल जेम्स’ (१८७०, ‘द हीदन चायनी’ ह्या नावानेही प्रसिद्ध) हे त्याचे विडंबनकाव्य प्रसिद्ध झाले. द लक ऑफ रोअरिंग कँप अँड अदर स्केचिस हा त्याचा कथासंग्रह १८७० मध्ये प्रसिद्ध झाला आणि तो विलक्षण गाजला. ह्या त्याच्या लेखनामुळे त्याला आंतरराष्ट्रीय कीर्ती प्राप्त झाली. १८७१ मध्ये त्याने द अटलांटिक मंथ्‌ली ह्या मासिकाबरोबर वर्षभर बारा कथा लिहिण्यासाठी दहा हजार डॉलर्सचा करार केला. त्या काळी एका लेखकासाठी देण्यात आलेली ही उच्चांकी रक्कम होती. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर अमेरिकेत त्या काळी निर्जन असलेल्या पश्चिम भागात सोन्याच्या खाणींचा शोध लागल्यामुळे तेथे वसाहतवाल्यांच्या झुंडींच्या झुंडी उतरत होत्या. ह्या प्रदेशातील मानवी स्वभावाचे सुष्ट-दुष्ट नमुने त्याने उठावदारपणे रंगविले. असे वास्तव रेखाटणारा ब्रेट हा सर्वोत्कृष्ट लेखक मानला गेला. खाणकामगार, वेश्या, नाचगाणे करून उपजीविका करणाऱ्या मुली, जुगारी, खलपुरुष ह्यांच्या अविस्मरणीय व्यक्तिरेखा त्याने आपल्या कादंबऱ्यांतून प्रथमच रेखाटल्या. नंतरच्या अमेरिकन साहित्यिकांनी त्याच्या लेखनाचे अनुकरणही केले. त्याचे अन्य उल्लेखनीय लेखन असे : कथासंग्रह मिसेस स्कॅग्ज हजबंड्स (१८७३), टेल्स ऑफ द अर्गोनॉट्स (१८७५), कर्नल स्टारबॉटल्स क्लायंट अँड सम अदर पीपल (१८९२) कादंबऱ्या गॅब्रिएल कॉनरॉय (१८७६), जेफ ब्रिग्ज लव्ह स्टोरी (१८८०). नाट्यकृती टू मेन ऑफ सँडी बार (१८७६) व मार्क ट्वेन ह्याच्या सहकार्याने आह् सिन (१८७७).

 

१८७८ मध्ये क्रेफेल्ड, र्‍हेनिश प्रशिया येथे आणि पुढे ग्लासगो येथे (१८८०–८५) त्याने अमेरिकेचा वाणिज्यदूत म्हणून काम केले. उर्वरित जीवन त्याने लंडन येथे व्यतीत केले.

 

लंडन येथे तो निधन पावला.

पोळ, मनीषा