हाय्‌बेर्ग, युहान लूद्‌व्ही : (१४ डिसेंबर १७९१–२५ ऑगस्ट १८६०). डॅनिश नाटककार, कवी आणि समीक्षक. जन्म कोपनहेगन येथे. त्याचे वडीलही नाटककार होते. सरकारवर टीकेचे हल्ले चढविल्यामुळे त्यांना डेन्मार्क-मधून हद्दपार केले गेले. त्यानंतर थोड्याच अ व धी त हाय्बेर्गच्या आईवडिलांचा घटस्फोट झाला. हाय्बेर्ग त्याच्या आई सह – जी स्वतः एक लेखिका होती – कोपनहेगन-मध्येच राहिला. १८०९ मध्ये त्याने कोपनहेगन विद्यापीठात प्रवेश घेतला. पुढे तीन वर्षांनंतर त्याने स्वीडनचा प्रवास केला. १८१७ मध्ये आपल्या पीएच्.डी.साठी त्याने जी तयारी केली, तिचा एक भाग म्हणून त्यानेस्पॅनिश नाटककार काल्देरॉन ह्याच्यावर एक दीर्घ लेख लिहिला. त्याच्या आरंभीच्या नाटकांवर काल्देरॉनचा प्रभावही आहे. आपल्या वडिलांना भेटण्यासाठी पॅरिसला गेला असताना त्याचा फ्रेंचमधील’ व्हॉड्व्हिल’ ह्या संगीतनृत्यप्रधान सुखात्मिकेशी परिचय झाला. हा वैशिष्ट्यपूर्ण नाट्यप्रकार डॅनिश रंगभूमीवर आणून डॅनिश नाटकाला त्यानेनवचैतन्य देण्याचा प्रयत्न केला. १८२१ पर्यंत तो पॅरिसला होता. त्याच सुमारास जर्मनीतील कील विद्यापीठात डॅनिश भाषेचे अध्यापन करण्यासाठी प्राध्यापक म्हणून त्याची नियुक्ती झाली. जर्मनीतील हँबर्ग येथे अनेकदा ‘व्हॉड्व्हिल’ चाही परिचय करून घेतला. कील येथे असताना हेगेल च्या तत्त्वज्ञानाचा त्याच्यावर प्रभाव पडला. हा प्रभाव त्याच्या साहित्यसमीक्षेतूनही प्रत्ययास येतो.

 

डेन्मार्कमध्ये परतल्यानंतर हाय्बेर्गने कोपनहेगन येथील रॉयल थिएटरसाठी ‘किंग सालोमन अँड जॉन द हॅटमेकर’ (१८२५, इं. शी.) हे व्हॉड्व्हिल सादर केले. १८२७ मध्ये ‘कोपनहेगन फ्लाइंग पोस्ट’ (इं. शी.) हे नियतकालिक त्याने काढले. पुढल्याच वर्षी युहान लूइस पॅटजिस ह्या अभिनेत्रीशी त्याने विवाह केला. हाय्बेर्गच्या बऱ्याच नाट्यकृती तिच्यासाठी लिहिल्या गेल्या आहेत. त्या दोघांनी ‘रॉयल थिएटर’ वर दोन दशके आपला प्रभाव कायम ठेवला. ‘एल्फिनूहिल’ (१८२८, इं. शी.) हे त्याचे व्हॉड्व्हिल अतिशय गाजले. परिणामतः ‘रॉयल थिएटर’ चा अधिकृत नाटककार म्हणून त्याची नियुक्ती झाली. त्यानंतरची त्याची वर्षे सर्जनशीलतेच्या बहराची गेली. त्याचे अत्यंत गाजलेले पद्यनाटक ‘एसोल आफ्टर डेथ’ (१८४१, इं. शी.) हे होय. त्याने कविताही लिहिल्या.

 

‘रॉयल थिएटर’ चा संचालक म्हणून त्याची १८४७ मध्ये नियुक्ती झाली. १८५६ पर्यंत तो त्या पदावर होता. त्यानंतरची त्याची वर्षे त्याने निवृत्तपणे घालवली.

 

तो बाँडरूप येथे निधन पावला.

 

कुलकर्णी, अ. र.