हायड्रा : (१) मुख, (२) संस्पर्शक, (३) जठरवाहिनी गुहा, (४) जठरचर्म, (५) मध्यश्लेषस्तर, (६) तंत्रिका जाल, (७) बाह्यत्वचा, (८) मुकुल.हायड्रा:हा बहुकोशिक अपृष्ठवंशी प्राणी सीलेंटेरेटा (निडॅरिया) संघातील हायड्रोझोआ वर्गातील असून साध्या पॉलिपाच्या स्वरूपाचा असतो. हायड्रा प्रजातीमध्ये सु. २५ जाती असून त्यांमध्ये रंग, संस्पर्श-काची लांबी, जनन ग्रंथीचे स्थान व आकार यांमध्ये विविधता असते. जगामध्ये सर्वत्र गोड्या पाण्यात हा आढळतो. याचे शरीर पातळ, अर्धपार्य, नळकांडीसारखे, १०–३० मिमी. लांब व पांढऱ्या, करड्या तपकिरी किंवा हिरव्या रंगाचे असते. देहभित्ती दोन स्तरांनी बनलेली असून दोन्ही स्तर मध्यश्लेषस्तर या पातळ संयोजी ऊतकाने वेगळे होतात.

 

 हायड्राच्या शरीराचे एक टोक मोकळे व दुसरे आधारबिंबाने पाण- वनस्पतींना किंवा एखाद्या पदार्थाला चिकटलेले असते. मोकळ्या टोकाशी एका शंकूवर मुख असून त्याच्याभोवती ८–१० प्रसरणशील व पोकळ संस्पर्शकांचे वलय असते. मुख आंत्रात उघडते. संस्पर्शके व देहभित्ती यांवर दंशकोशिका असतात. पाण्यातील लहान अपृष्ठवंशी कवचधारी प्राणी हे याचे भक्ष्य आहे. दंशकोशिकांनी भक्ष्य अर्धमेले करून किंवा मारून संस्पर्शकांच्या साहाय्याने ते मुखातून आंत्रात जाते आणि तेथे त्याचे पाचन होते. या प्राण्यात आंतरकोशिकीय व कोशिकाबाह्य पाचन आढळून येते. विष्ठा मुखातून बाहेर पडते. विशिष्ट उत्सर्जक किंवा श्वसनेंद्रिये नसतात.

 

 हायड्रामध्ये लैंगिक व अलैंगिक असे दोन्ही प्रकारचे प्रजनन आढळते. अलैंगिक जनन मुकुलनाने (शरीरावर अंकुरासारखे बारीक उंचवटे येऊन त्यांपासून नवीन प्राणी तयार होण्याच्या क्रियेने) आणि कधीकधी अनुदैर्घ्य (लांबीच्या दिशेतील) किंवा अनुप्रस्थ विखंडनाने होते. विखंडित दोन्ही भाग अपूर्ण असतात. प्रत्येक विखंडित भाग उरलेला भाग उत्पन्न करून पूर्ण हायड्रा तयार होणे, यालाच ‘पुनरुद्भवनाची शक्ती’ असे म्हणतात. लैंगिक जनन अंडाणू व शुक्राणूंच्या निर्मितीने होते. बहुधा, हायड्रा एकलिंगी असतात. मात्र, काही हायड्रा उभयलिंगी असतात, परंतु त्यांच्यात स्वनिषेचन आढळत नाही. निषेचित अंडे मादीच्या शरीराला चिकटलेले असतानाच त्याचा विकास सुरू होतो. काही काळाने त्याच्याभोवती काटेरी आवरण तयार होऊन ते गळून पाण्यात पडते किंवा एखाद्या आधाराला चिकटते. काही आठवड्यांनी त्यातून लहान हायड्रा बाहेर पडतो.

 

 पहा : दंशकोशिका सीलेंटेरेटा हायड्रोझोआ. 

जोशी, मीनाक्षी र.