हाफीज अलीखाँ : (? १८८८–? १९७२). प्रख्यात भारतीय सरोदवादक. त्यांचा जन्म ग्वाल्हेर येथे एका संगीतज्ज्ञ घराण्यात झाला. त्यांचे वडील नन्नेखाँ हे ग्वाल्हेर दरबारचे संगीतकार होते. सरोद यावाद्याची निर्मिती व ते वाद्य लोकप्रिय करण्याचे श्रेय या घराण्याकडे जाते. नन्नेखाँ यांचे पणजोबा गुलाम बंदेगीखाँ बंगश हे तत्कालीन नावाजलेले रबाबवादक होते. त्यांनी आपले नातू गुलाम अलीखाँ यांना रबाब-वादनाची तालीम दिली. गुलाम अलीखाँ यांनी रबाबचे सरोद या वाद्यात रूपांतर केले. हुसेन अली, मुराद अली व नन्नेखाँ ही त्यांचीमुले विख्यात सरोदवादक होती.
हाफीज यांनी सरोदवादनाचे धडे बालपणीच वडील नन्नेखाँ यांच्याकडे घेतले. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांनी सरोदचा विशेष अभ्यास घरीच केला. ‘आफताब-ए-सरोद’ ही उपाधी त्यांना देण्यात आली. वृंदावनचे प्रसिद्ध धृपदिए गणेशीलाल चौबे ह्यांच्याकडून हाफीज यांनी धृपद व ⇨ होरी शिकून घेतल्या तर रामपूरचे नबाब उस्ताद वजीरखाँ यांच्याकडूनधृपद, होरी व सूरसिंगारची तालीम प्राप्त केली. ग्वाल्हेर संस्थानचे महाराज श्रीमंत माधवराव शिंदे (कार. १८८६–१९२५) यांनी हाफीज अलीखाँ यांच्या सरोदवादनाने प्रभावित होऊन त्यांची नेमणूक आपल्या दरबारी संगीतकारांत केली. त्यांच्यानंतर गादीवर विराजमान झालेले संस्थानिक जिवाजीराव महाराज (कार. १९३६–६१) यांनीही हाफीज यांची संगीतसेवा चालू ठेवली. तसेच वेळोवेळी त्यांना सन्मानित केले. हाफीज काही काळ नवी दिल्ली येथील भारतीय कला केंद्रात वाद्यसंगीताचे प्राध्यापक होते. हिंदुस्थानी वाद्यसंगीतातील विशेष कार्याबद्दल त्यांना संगीत नाटक अकादेमी पुरस्कार (१९५३) देण्यात आला. तसेच त्यांची संगीत अकादेमीवर अधिछात्र म्हणून निवड करण्यात आली (१९५४). भारत सरकारने त्यांना पद्मभूषण देऊन त्यांचा गौरव केला (१९६०).
कोलकाता येथे प्रख्यात संगीतकार रायचंद बोराल ह्यांच्याकडे झालेल्या संगीत महोत्सवामध्ये हाफीज अलीखाँ यांनी सलग तीन तास सरोदवादन करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून सोडले होते. ‘कुठल्याही रागाचा विस्तार करताना, नियमांचे बंधन तोडून योग्य कारणाशिवाय द्रुत तानांचा वापरकरणे संगीतास हानीकारक आहे. बरेचसे गायक ताना घेताना त्या रागाशी मिळत्याजुळत्या असलेल्या रागांच्या ताना घेतात. तसे करू नये’, असे त्यांचे उदयोन्मुख कलाकारांना सांगणे होते. रागाची शुद्धता व अस्सलपणा मोडलेला त्यांना सहन होत नसे. त्यांच्या सरोदवादनात एकप्रकारचा घरंदाजपणा होता व श्रोते त्यांचे वादन ऐकायला आतुर असत. वृद्धाप-काळीही त्यांच्या वादनातील जादू संपली नव्हती पण त्यात किंचित शिथिलता आली होती.
हाफीज यांचे पुत्र मुबारक अलीखाँ, रहमत अलीखाँ व विख्यात सरोदवादक अमजद अलीखाँ आणि नातू अमान व अयान यांनी सरोदवादनाचा त्यांचा वारसा पुढे चालविला आहे. अमजद अलीखाँ यांनी स्थापन केलेल्या ‘उस्ताद हाफीज अलीखाँ मेमोरियल सोसायटी’ तर्फे संगीतक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलाकारास दरवर्षी त्यांच्या नावे ‘हाफीज अलीखाँ पुरस्कार’ देण्यात येतो.
त्यांचे नवी दिल्ली येथे निधन झाले.
मिठारी, सरोजकुमार