हान, ओटो : (८ मार्च १८७९–२८ जुलै १९६८). जर्मन रसायनशास्त्रज्ञ. न्यूट्रॉनांच्या भडिमारामुळे युरेनियमाच्या अणुकेंद्राचे भंजन होते, असा शोध त्यांनी जर्मन भौतिकीय रसायनशास्त्रज्ञ ? फ्रिट्झस्ट्रासमान यांच्यासमवेत लावला (१९३८). या शोधाबद्दल हान यांना १९४४ सालचे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक देण्यात आले. त्यांच्या या शोधामुळे अप्रत्यक्ष रीत्या अणुबाँब व अणुऊर्जानिर्मितीसाठी मदत झाली. त्यांना अणुकेंद्रीय रसायनशास्त्राचा जनक मानले जाते.

 

हान यांचा जन्म फ्रँकफुर्ट येथे झाला. त्यांनी मारबुर्ग विद्यापीठातून रसायनशास्त्रातील पीएच्.डी. पदवी संपादन केली (१९०१). त्यांना नवीन किरणोत्सर्गी मूलद्रव्यांवर संशोधन करण्याची फार उत्सुकता होती, त्यासाठी ते लंडनला गेले. तेथे सर विल्यम रॅम्झी यांच्याबरोबर युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये संशोधन करीत असताना, त्यांनी रेडिओथोरियम मूलद्रव्याचा शोध लावला (१९०४). त्यांनी माँट्रिऑल येथील मॅक्गिल विद्यापीठात अर्नेस्ट रदरफर्ड यांना रेडिओथोरियम (द्रव्यमानांक २२८ असलेला थोरियमाचा समस्थानिक) व रेडिओ ॲक्टिनियम (द्रव्यमानांक २२७ असलेला थोरियमाचा समस्थानिक) यांच्या आल्फा प्रारणांचा अभ्यास करण्यासाठी मदत केली. त्यानंतर १९०७ मध्ये त्यांनी मेसोथोरियमाचा शोध लावला. त्याचवर्षी त्यांनी ऑस्ट्रियन भौतिकीविज्ञ? लिझे माइटनर यांच्या सहकार्याने संशोधनास सुरुवात केली. त्या दोघांनी मिळून जवळ-जवळ ३० वर्षे एकत्र काम करून रेडिओरसायनशास्त्रावर अनेक प्रबंध तयार केले.

 

हान व माइटनर यांचे न्यूट्रॉनांवरील कार्य १९३२ मध्ये बर्लिन येथील ‘कैसर व्हिल्हेल्म इन्स्टिट्यूट फॉर केमिस्ट्री’, (आताचे माक्स प्लांक इन्स्टिट्यूट, मेंझ) या संस्थेमध्ये सुरू झाले. तेथे त्यांनी प्रोटॅक्टिनियम या किरणोत्सर्गी मूलद्रव्याचा शोध लावला. त्यातून त्यांनी प्रोटॅक्टिनियम (२३१) हा समस्थानिक (अणुक्रमांक तोच पण द्रव्यमानांक भिन्न असलेले त्याच मूलद्रव्याचा प्रकार) पहिल्यांदा वेगळा केला. त्यानंतर जवळजवळ सर्व नैसर्गिक किरणोत्सर्गी मूलद्रव्यांचे शोध लागले. त्यानंतर त्यांनी पुढील १२ वर्षे रासायनिक समस्या सोडविण्यासाठी किरणोत्सर्गी पद्धतींचा उपयोग करण्यासंबंधी संशोधन केले.

 

हान यांना १९३४ मध्ये इटालियन भौतिकीविज्ञ ? एन्रीको फेर्मी यांच्या कामात जिज्ञासा निर्माण झाली. युरेनिमासारख्या जड नैसर्गिक मूलद्रव्यावर न्यूूट्रॉनांचा मारा केला असता, अनेक किरणोत्सर्गी उत्पाद ( पदार्थ) तयार होतात असे फेर्मी यांनी शोधून काढले व त्यात तयार झालेली कृत्रिम मूलद्रव्ये युरेनियमासारखीच असतात असे अनुमान काढले. हान, माइटनर व स्ट्रासमान यांनी युरेनियमाच्या न्यूट्रॉन प्रवर्तित क्रिया-शीलतेबाबत प्रयोग करण्यास सुरुवात केली (१९३४–३८). स्ट्रासमान व हान यांनी मंद गती न्यूट्रॉनांच्या भडिमारामुळे युरेनियामाच्या (२३५) अणुकेंद्राचे भंजन होऊन, त्याचे दोन हलक्या मूलद्रव्यांत रूपांतर होते असा निष्कर्ष काढला. त्यांपैकी एक किरणोत्सर्गी हलके मूलद्रव्य बेरियम तयार झाल्याचे शोधून काढले. तसेच त्यांनी युरेनियमोत्तर मूलद्रव्ये शोधण्यासाठीसुद्धा संशोधन केले. हान, स्ट्रासमान व माइटनर यांना या संशोधनकार्याबद्दल अमेरिकेच्या ॲटॉमिक एनर्जी कमिशन या संस्थेचा एन्रीको फेर्मी पारितोषिकाचा बहुमान मिळाला (१९६६).

 

हान हे माक्स प्लांक इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष होते (१९४८–६०).तेथूनच ते १९६६ मध्ये सेवानिवृत्त झाले.

 

हान यांचे गटिंगेन (जर्मनी) येथे निधन झाले.

जमदाडे, ज. वि. मगर, सुरेखा अ.