हातकुऱ्हाड संस्कृति : (हॅन्ड एक्स कल्चर ). प्राचीनतम अश्मयुगाचे प्रातिनिधिक हत्यार व त्याचा वापर करणारा समाज. अश्मयुगीन हातकुर्हाडी यूरोपमधील अनेक देशांत तसेच उत्तर आशिया खंडात सापडल्या आहेत. आफ्रिका व भारतातही त्या मिळालेल्या आहेत. यूरोपातत्या फ्लिंट नावाच्या उत्कृष्ट पोताच्या दगडाच्या बनविलेल्या आढळतात तर भारतात हरतर्हेच्या दगडांच्या आढळतात. त्यांचे प्रदेशपरत्वे भिन्न आकार असून त्या बहुधा बदामासारख्या आकाराच्या अंडाकृती किंवा हृदयाकृती आहेत. काही आकाराने खूप मोठ्या आढळल्या. एका बाजूला टोक, दुसरी बाजू अर्धवर्तुळ व नागमोडी धारदार कडा हे यांचे वैशिष्ट्यहोय. त्यांपैकी काही द्विपार्श्व असून त्यांना दांडा नसे व त्या कातड्याच्या खोबणीत अडकविलेल्या असत.
हातकुर्हाडींचा सर्रास वापर ॲश्युलियन व मॉस्टेरियन संस्कृतींतील मानव करताना आढळतो. सुरुवातीच्या कुर्हाडी होमो इरेक्टस आणि होमो निअँडरथल मानवांनी बनविलेल्या होत्या. अश्मयुगीन मानव त्यांचा बहुद्देशीय हत्यार म्हणूनच वापर करीत असे. होमो सॅपियन मानवाने कमी वजनाच्या हातकुर्हाडी बनविल्या. हातकुर्हाडीचा उपयोग अश्मयुगीन मानव प्रामुख्याने नजीकची वस्तू तोडण्याकरिता अथवा खोदण्याकरिता करीत असावा.
पहा : अश्मयुग.
देव, शां. भा.
“