हॅसेल, ऑड :(१७ मे १८९७ – ११ मे १९८१). नॉर्वेजियन भौतिकीय रसायनशास्त्रज्ञ. संयुगांच्या त्रिमितीय संरचनांसंबंधी महत्त्वपूर्ण संशोधन केल्याबद्दल हॅसेल यांना ब्रिटिश कार्बनी रसायनशास्त्रज्ञ ? डेरेक हॅरोल्ड रिचर्ड बार्टन यांच्यासमवेत १९६९ सालचे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक विभागून मिळाले. हॅसेल यांनी आकार विश्लेषणासंबंधीची( रेणूंच्या त्रिमितीय भूमितीय संरचनांसंबंधीची) पद्धती निर्माण करून क्रांती घडवून आणली.
हॅसेल यांचा जन्म क्रिस्तियाना (आताचे ऑस्लो) येथे झाला. त्यांनी ऑस्लो विद्यापीठात रसायनशास्त्र या प्रमुख विषयाबरोबर गणित वभौतिकी विषयांचे अध्ययन केले आणि १९२० मध्ये पदवी मिळविली. त्यांनी डालेम येथील कैसर व्हिल्हेल्म इन्स्टिट्यूटमध्ये क्ष-किरणस्फटिकविज्ञानात संशोधन करून बर्लिन विद्यापीठाची पीएच्.डी. पदवी संपादन केली (१९२४). त्यानंतर त्यांनी ऑस्लो विद्यापीठात रसायनशास्त्र आणि भौतिकीय रसायनशास्त्र या विद्याशाखेत ‘डोझंटङ्ख म्हणून काम केले (१९२५–३४). याच विद्यापीठात ते भौतिकीय रसायनशास्त्राचे प्राध्यापक व संचालक होते (१९३४–६४). त्यांनी १९३० मध्ये सायक्लोहेक्झेन( सहा कार्बन अणू असलेला हायड्रोकार्बन रेणू) आणि त्यांचे अनुजात यांच्या संरचनांसंबंधी संशोधन करण्यास सुरुवात केली. त्यांनी सायक्लो-हेक्झेनाच्या दोन संरचना रूपांचे अस्तित्व तसेच मोठ्या अणूंचे गट अवकाशातील वलयाला कोणत्या स्थितीत जोडले जातात हे दाखविले. या पद्धतीस आकार विश्लेषण असे संबोधून त्यासंबंधीचे मूलभूत तत्त्व त्यांनी मांडले. १९५० च्या दशकाच्या मध्यास हॅसेल यांनी कार्बनी हॅलोजन संयुगांच्या संरचनांसंबंधी संशोधन करण्यास सुरुवात केली.
हॅसेल यांनी Kristallachemie (१९३४ इं. भा. क्रिस्टलकेमिस्ट्री) हे पुस्तक लिहिले. त्यांनी रेणूंच्या संरचनांसंबंधी सु. २५० संशोधनपर लेख लिहिले आणि ते यूरोपियन व अमेरिकन नियतकालिकां-मध्ये प्रकाशित केले. ते अनेक शैक्षणिक संस्थांचे व यूरोपीय ॲकॅडेमीचे सन्माननीय सदस्य होते. त्यांना मिळालेली काही पदके व बहुमान पुढीलप्रमाणे : ग्युनर्स पदक (१९६४), गुलबॅर-व्हॉग पदक (१९६४), गुणश्री प्राध्यापक (१९६४) व ऑलेव्हचा ‘सरङ्ख हा किताब.
हॅसेल यांचे ऑस्लो येथे निधन झाले.
फाळके, धै. शं.
“