हॅलिफॅक्स-१ :इंग्लंडच्या वेस्ट यॉर्कशर परगण्यातील कॉल्डरडेल महानगराचे उपनगर, एक ऐतिहासिक शहर अन्नधान्य, लोकर आणि कापडाची बाजारपेठ. हे मँचेस्टरच्या ईशान्येस ३३ किमी.वर हेबल नदीकाठी वसले आहे. हॅलिफॅक्स हे साउथ पेनाइन्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ओसाड प्रदेशाच्या नैर्ऋत्य कोपऱ्यात आहे. लोकसंख्या ८८,१३४ (२०११).

 

बाराव्या शतकापासून हॅलिफॅक्स धार्मिक केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. अँग्लो-सॅक्सन काळात विकफिल्ड परगण्याचा एक भाग म्हणून एडवर्ड राजाने या शहराची स्थापना केली. त्यानंतर नॉर्मनांनी या प्रदेशाचा ताबा घेतला. वारेने आणि सूरी या विभागाचा जमीनदार विल्यम याने यॉर्कशर चर्चसह हॅलिफॅक्स हा विभाग ससेक्स येथील ख्रिस्ती धर्मोपदेशकांच्या मठास भेट म्हणून दिला. या मठातील सेंट जॉन हा धर्मोपदेशक विणकरांना प्रेरणा देणारा होता. याच्या प्रेरणेने येथे कापड उद्योगाची सुरुवात झाली. या उद्योगासंदर्भातील पहिला पुरावा १२७५ मध्ये मिळतो. पंधराव्या शतकापासून इंग्लंडमधील लोकरी वस्त्रोद्योगाचे केंद्र म्हणून हॅलिफॅक्सप्रसिद्ध असून कापड, सतरंज्या, यंत्रसामुग्री आणि बीर यांची निर्मिती व व्यापार हे उद्योग येथे मोठ्या प्रमाणात चालतात. जॉन मॅकिन्टॉस वत्याच्या पत्नीने १८९० मध्ये येथे टॉफीचे दुकान सुरू केले होते. या दुकानातील चॉकोलेट उत्पादने अल्पावधीत जगभर लोकप्रिय झाली. या व्यवसायास नेस्ले कंपनीने १९८८ मध्ये आपल्या ताब्यात घेतले असून त्यामुळे सध्या हॅलिफॅक्स नेस्ले कंपनीच्या चॉकोलेट व टॉफीसाठी प्रसिद्ध झाले आहे.

 

हॅलिफॅक्स येथे १८४८ मध्ये नगरपालिकेची आणि १९७४ मध्ये महानगरपालिकेची स्थापना झाली. हे शहर लोहमार्ग व रस्ते यांनी देशातील इतर महानगरांशी जोडलेले आहे. येथे उच्च गुणवत्तापूर्ण प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध आहेत. त्याकरिता येथील द क्रॉसली हेल्थ स्कूल आणि नॉर्थ हॅलिफॅक्स या शाळा प्रसिद्ध आहेत. कॅल्डरडेल महाविद्यालयाद्वारे येथे उच्चशिक्षणाच्या सुविधा उपलब्ध आहेत.

 

येथील १७९९ मध्ये सुरू झालेले लोकरी कापडाच्या गठ्ठ्यांच्या व्यापारासाठी प्रसिद्ध असलेले ‘क्लॉथ हॉल’ (पीस हॉल) यास ऐतिहासिक व औद्योगिक महत्त्व आहे. येथील सतरंज्या विणण्याचा कारखाना हा जगातील सर्वांत मोठा कारखाना होता. त्याचे आता औद्योगिक केंद्रात रूपांतर झाले आहे. हॅलिफॅक्स टाउन हॉल, बरो मार्केट, द वाइन हाउस टॉवर, द चिल्ड्रेन्स म्यूझीयम, व्हिक्टोरिया थिएटर इ. येथील प्रेक्षणीय स्थळे आहेत.

कुंभारगावकर, य. रा.