हॅनोव्हर : जर्मनीतील लोअर सॅक्सनी राज्याची राजधानी व प्रमुख औद्योगिक व व्यापारी केंद्र. लोकसंख्या ५,०९,४८५ (२०१३ अंदाज). हे बर्लिनच्या पश्चिमेस सु. २३३ किमी.वर लाइन नदी व मिटललँड (मिडलँड) कालव्याच्या किनाऱ्यावर वसलेले आहे. हे महामार्ग, लोहमार्ग व हवाईमार्गाने बर्लिनशी जोडलेले असून महामार्ग व लोहमार्गाचे प्रस्थानक आहे. हॅनोव्हरचा पहिला उल्लेख इ. स. ११०० मधील ऐतिहासिक दस्तऐवजांमध्ये आढळतो. १२४१ मध्ये यास शहराचा दर्जा मिळाला व १३६९ मध्ये हे ब्रंझविकच्या अखत्यारित आले. १३८६ मध्ये हे हॅन्सिॲटिक संघामध्ये समाविष्ट झाले. प्रशियाचा १८६६ हा एका वर्षाचा आधिपत्याचा काळ वगळता ही १८१५–१९४६ पर्यंत हॅनोव्हर साम्राज्याची राजधानी होती. १९४६ पासून जर्मनीतील लोअर सॅक्सनी राज्याची राजधानी येथे आहे. दुसऱ्या महायुद्धात (१९३९–४५) बाँब हल्ल्यामुळे शहराची हानी झाली होती. तद्नंतर शहराची पुनर्बांधणी करण्यात आली आहे.

न्यू टाउन हॉल, हॅनोव्हर.

युद्धोत्तरकाळात हे एक आर्थिक, व्यापारी व औद्योगिक केंद्र म्हणून प्रसिद्धीस आलेले आहे. येथे वाहने, रसायने, रबर, सिमेंट, अस्फाल्ट, बीअर, लोह व पोलाद, अन्नपदार्थ, अवजड व हलकी यंत्रसामग्री, विद्युत्- साहित्य, कापड इ. निर्मितिउद्योग चालतात. याच्या आसमंतात पोटॅशव लिग्नाइटचे साठे आहेत. येथे जर्मनीतील प्रमुख औद्योगिक उत्पादनांचा वार्षिक हॅनोव्हर महोत्सव भरतो, याचा परिणाम येथील औद्योगिक विकासावर झालेला आहे.

हॅनोव्हर हे औद्योगिक शहर म्हणून विकसित झाले असले, तरी येथेबागबगीचे, सार्वजनिक उद्याने यांचे जतन करण्यात आलेले आहे.त्यामुळे यास ‘द गार्डन सिटी’ असे संबोधण्यात येते. येथील ग्रेट गार्डन (सतरावे शतक), हेर्मान लॉन्स पार्क, स्टॅड्टपार्क, प्राणिविषयक उद्यान, कृत्रिम सरोवर इ. स्थळे प्रसिद्ध आहेत.

दुसऱ्या महायुद्धात शहरातील जुन्या वास्तूंची हानी झाली होती.यामध्ये पुनर्बांधणी न केलेल्या लीप्नीट्स हाउस (१६५२), राजवाडा (१७५२) या वास्तू आहेत. तसेच पुनर्बांधणी केलेल्या वास्तुंमध्येयेथील जुने नगरभवन (१४३५–८०), ऑपेरा हाउस (१८४२–५२), मार्केट चर्च (१३४९–५९), क्रॉस चर्च (१३३३) या प्रमुख वास्तूआहेत. येथील ओल्ड लाइन राजवाड्याभोवती शासकीय कार्यालयासाठी नवीन इमारती बांधण्यात आलेल्या आहेत. सेंट गिल्स चर्च (१३४७) हे युद्धात शहीद झालेल्यांचे स्मारक समजण्यात येते. येथील लोअर सॅक्सनी स्टेट म्यूझीयम, द केस्टर म्यूझीयम, व्हिल्हेल्म बुश म्यूझीयम इ. प्रसिद्ध आहेत.

गाडे, ना. स.