हॅगफिश : या आदिम पृष्ठवंशी प्राण्याचा समावेश अग्नॅथा वर्गाच्या सायक्लोस्टोमॅटा (गोलमुखी) गणात होतो. या प्राण्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे तोंड गोल असते व त्यांना जबडे नसतात. त्यांची मिक्झिनिडीव इप्टाट्रिटिडी अशी दोन कुले आहेत. मिक्झिनिडी कुलातील मासे सर्व समुद्रांत (महासागरांत) आढळतात, तर इप्टाट्रिटिडी कुलातील मासे उत्तर अटलांटिकमधील असून त्यांचा आढळ सर्वत्र आहे. ते ‘स्लाइम ईल’ या नावानेही ओळखले जातात. अनेक बाबतींत त्यांचे पेट्रोमायझाँटिडी कुलाशी साम्य आहे [→ लँप्री]. हॅगफिशच्या सु. ७० जाती असून त्या खोल समुद्रांत आढळतात.

 

हॅगफिशचा आकार ईल माशासारखा दंडगोलाकार असून त्याच्या अंगावर खवले नसतात. त्याची त्वचा श्लेष्मल (बुळबुळीत) द्रव्यानेआच्छादिलेली असून मुस्कटाच्या टोकाला जाड स्पृशांची जोडी असते. जातिपरत्वे त्याच्या शरीराची लांबी ४०–१०० सेंमी.पर्यंत असते. त्याला एक पुच्छपक्ष (शेपटीभोवतालचा पर) असतो. तसेच जंभ (जबडे )वा अस्थी (हाडे) नसतात. एकच नासाद्वार (नाकपुडी) मुस्कटाच्या टोकाला असून घशापर्यंत जाते व त्याची श्वसनाच्या कामी मदत होते.त्याचा कंकाल (सांगाडा) उपास्थियुक्त (कूर्चामय) असतो व तोंड फटीसारखे असते. चूषक छिद्रांमध्ये शृंगयुक्त दात असतात. त्याचे डोळे अल्प विकसित असून त्वचेमध्ये बुडलेले असतात, त्यामुळे ते बाहेरून दिसत नाहीत. डोळ्यांत भिंग व कनीनिका नसते. त्याला क्लोमांच्या( कल्ल्यांच्या) ५–१५ जोड्या असतात व त्या श्वसनाचे कार्य करतात. क्लोमाचे बाहेरील बाजूला उघडणारे प्रत्येक स्वतंत्र छिद्र (इप्टाट्रिटिडी कुलातील प्राण्यांत) असते किंवा एका समाईक छिद्राने ते बाहेर (मिक्झिनिडी कुलातील प्राण्यांत) उघडते. नर व मादीची जननेंद्रिये एकाच प्राण्यात असतात परंतु एकावेळी एकच पक्व होते.

 

सर्व जाती वरवर पाहता दिसायला सारख्या असल्या तरी क्लोमांच्या जोड्या व क्लोम-छिद्रांची स्थिती यांवरून हॅगफिशची तीन प्रजातींत विभागणी करतात. मिक्झाइन ह्या प्रजातीत समाईक क्लोम-छिद्र प्रत्येक बाजूवर असते ती अटलांटिक व पॅसिफिक महासागरांत आढळते. पॅरामिक्झाइन ह्या प्रजातीत जवळजवळ असलेली १६ क्लोम-छिद्रे प्रत्येक बाजूवर असतात ती जपानमध्ये आढळते. डेलोस्टोमा ह्या प्रजातीत दूरदूर असलेली ५–१४ क्लोम-छिद्रे प्रत्येक बाजूवर असतात ती पॅसिफिक महासागरात आढळते.

हॅगफिश (मिक्झाइन ग्लुटिनोझा ) : (अ) बाह्य रचना : (१) स्पृशांनी वेढलेले मुख, (२) बाह्य क्लोम छिद्रे, (३) श्लेष्मा धानीवरील रंध्रे, (४) पुच्छपक्ष (आ) अंतर्गत रचना : (१) मुख, (२) स्पृशा, (३) नासाद्वार, (४) गंधवाही धानी (५) मेंदू, (६) मेरुरज्जू , (७) पृष्ठरज्जू , (८) ग्रसनी, (९) क्लोमधानीची अंतर्गत छिद्रे, (१०) जीभ, (११) जिभेवरील दात (इ) शीर्ष : (१) मुख, (२) जिभेवरील दात.

हॅगफिशची मिक्झाइन ग्लुटिनोझा ही जाती समुद्राच्या थंड पाण्यात चिखलयुक्त तळावर किंवा तळाजवळ सु. १,३०० मी. खोलीवर आढळते. ती बिळात राहते व तिचे डोक्याखेरीज इतर शरीर चिखलात गाडलेले असते. सागरी अपृष्ठवंशी प्राणी (उदा., पॉलिकीट कृमी) व मृत किंवा विकलांग मासे यांवर ती आपली उपजीविका करते. ती भक्ष्याच्या शरीरात काणशीसारख्या जिभेने भोक पाडते व आतील मांसल भाग खाते. ती दृष्टिहीन (आंधळी) असल्यामुळे आपले भक्ष्य वासावरून शोधते.

 

हॅगफिशला प्रत्यक्ष व्यापारी महत्त्व नाही परंतु त्याचा उपयोग जीव-वैज्ञानिक व वैद्यकीय संशोधनात होतो. मूलतः ते संमार्जक असल्यामुळे गळ, जाळी, सापळे इत्यादींमध्ये मच्छिमारांनी पकडलेले मासे खाऊनत्यांचे फारच नुकसान करतात. खंडशः रचना असलेल्या शरीराच्या प्रत्येक बाजूवर खालील भागात असलेल्या श्लेष्म ग्रंथींतून मोठ्या प्रमाणात श्लेष्मा (बुळबुळीत पदार्थ) बाहेर टाकला जातो. त्यामुळे त्याला ‘स्लाइम ईल’ हे नाव दिले गेले आहे. भक्षकाची चाहूल लागल्यावरही संकटसमयी तोया ग्रंथीतून श्लेष्मा बाहेर टाकतो.

 

हॅगफिशची मादी समुद्राच्या तळावर एकेकटी किंवा गटागटाने अंडी घालते. प्रत्येक अंडे शृंगी कवचयुक्त असून ते सु. २ सेंमी. लांब असते.अंडी मिळेल त्या आधाराला चिकटतात. अंड्यातून बाहेर पडलेले पिलू प्रौढासारखे दिसते. विकासात डिंभावस्था (भ्रूणानंतरची स्वतंत्रपणे अन्न मिळवून जगणारी व प्रौढाशी साम्य नसणारी पूर्वावस्था) नसते.

 

पहा : मत्स्य वर्ग लँप्री सायक्लोस्टोम.

जमदाडे, ज. वि. मगर, सुरेखा अ.

 

हॅगफिश (मिक्झाइन ग्लुटिनोझा)