हळदू : (भेरिया, बिलू हिं. भिर्रा क. हुरागळू , त. पुरुष इं. ईस्ट इंडियन सॅटिन वुड, सिलोन सॅटिन वुड लॅ. क्लोरोझायलॉन स्वायटेनिया कुल-रूटेसी ). हा मध्यम आकाराचा १८–२५ मी. उंच पानझडी वृक्ष मूळचा मध्य व दक्षिण भारत (सातपुडा व द्वीपकल्पीय प्रदेशातीलरुक्ष जंगले) आणि श्रीलंका येथील आहे. आफ्रिकेत त्याची नायजेरियाव मादागास्कर येथे लागवड केली जाते. सरासरी ७५०–१,५०० मिमी. वार्षिक पर्जन्यमानात त्याची चांगली वाढ होते.
हळदू वनस्पतीचे खोड सरळ व व्यास ४५–९० सेंमी. फांद्या दंडगोलाकृती व ४.५ मी. लांब साल मऊ, फिकट करडी, भेगाळलेली कोवळ्या भागावर बारीक करडी लव असते. पाने संयुक्त व पिसासारखी (१५–२३ सेंमी.) लांब दले १०–२० जोड्या वृंत ३ सेंमी. लांब, वृंतक लहान पर्णके आयताकृती (१.५–३ × ०.५–१.५ सेंमी.), एकाआड एक, तळाशी असममित, तिरपी व पारदर्शक ठिपके असलेली असतात. पुष्पबंध अग्रस्थ किंवा कक्षस्थ प्रसूचिकार परिमंजरी १५ सेंमी. लांब, लहान व लवदार फुले लहान, द्विलिंगी, पांढरी, नियमित व ५ खंडीय असून मार्च-एप्रिलमध्ये येतात. पुष्पवृंत ५ मिमी. लांब संवर्त त्रिखंडी व ३ मिमी. लांब प्रदले सुटी, दीर्घवृत्ताकृती व ३.५ मिमी. लांब, पांढरी, बारीक लव दोन्ही बाजूंना केसरदले १०, सुटी, २ मिमी. लांब व बिंबखंडामध्ये आलेली किंजपुट ऊर्ध्वस्थ, त्रिखंडी, अंडाभ, थोडा लवदार, बिंबात रुतल्यासारखा किंजल लहान, किंजल्क डोक्याच्या आकाराचा व लहान फळ (बोंड) आयताकृती (२.५–३ × १.५ सेंमी.), त्रिखंडीय, दीर्घवृत्ताभ, गर्द पिंगट, गुळगुळीत व तडकणारे असते. त्यात सु. १२ बिया असून त्या उदी, १ सेंमी. लांब व सपक्ष (१.५ सेंमी.) असतात. इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ रूटेसी कुलात वर्णन केल्याप्रमाणे असतात. शोभे-करिता हे वृक्ष उद्यानांमध्ये लावतात. बियांपासून याची लागवड करतात.
हळदू वनस्पतीचे लाकूड सोनेरी पिवळसर, चमकदार, फार कठीण, टिकाऊ, मजबूत, जड, गुळगुळीत, सुगंधी व सुंदर असते. त्याचाउपयोग इमारती, पूल बांधणी, फर्निचर, सजावटी सामान, कपाटे, शेतीची अवजारे, तेलघाणे, ब्रशांच्या पाठी, नावा, हत्यारांचे दांडे, बंदुकीचे दस्ते, खेळणी, कोरीव व कातीव काम इत्यादींमध्ये होतो. तसेच ते जळणा-साठीही उपयुक्त आहे. लाकडापासून बाष्पनशील तेल मिळते. बियांमध्ये १६% तेल असते. खोडाच्या सालीमध्ये कुमारीन व क्विनोलीन ही अल्कलॉइडे असतात.
हळदू वनस्पतीच्या सालीचा काढा स्तंभक असून तो ताप, छातीतदुखणे व दमा यांवर तसेच जखमेवर व सांधेदुखीवर उपयुक्त आहे.पाने संधिवात, जखमा व सर्पदंशावर लावतात. पाने व मुळाचा काढाडोकेदुखीवर उपयुक्त आहे. तिच्यापासून बाभळीसारखा डिंकही मिळतो,परंतु त्याचा विशेष उपयोग केलेला आढळत नाही. ही वनस्पती दाहकआहे त्यात क्लोरोझायलोनीन व क्लोरोझायलीन ही अल्कलॉइडे असतात. श्रीलंकेमध्ये मुळाच्या सालीचे चूर्ण दुधात घालून वंध्यत्वाच्या उपचाराकरिता पिण्यास देतात.
वैद्य, प्र. भ. मगर सुरेखा अ.
“