हळद :(हिं. हलदी गु. हळदा त. मांजाळ ते. पसापू म. मांजळ क. अरिशिना सं. हरिद्रा, जयंती, मांगल्या, वर्णदात्री इं. टर्मेरिक, इंडियन सॅफ्रन लॅ. कुर्कुमा लाँगा गण-सिटॅमिनी, कुल-झिंजिबरेसी ). बाजारात मिळणारी ‘हळद पूड’ किंवा ‘हळकुंड’ ज्यापासून काढतात ती ओषधी मूळची इंडोमलाया व चीनमधील असून उष्ण प्रदेशांत सर्वत्र लागवडीत आहे. भारतामध्ये हळदीची लागवड मुख्यत्वेकरून आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू , ओडिशा, बिहार, महाराष्ट्र, आसाम व केरळ या राज्यांत होते. तसेच पश्चिम बंगाल, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश व राजस्थान या राज्यांतही थोड्याफार प्रमाणात हळदीचे पीक घेतले जाते.
हळदीचे मूलक्षोड जाड व मांसल पाने मोठी (सु. १ मी.) व लांबट भाल्यासारखी, मध्यशीर व लांब देठ जाड आणि पर्णतल आवरकफुलोरे (कणिशे) शाखायुक्त कक्षास्थ, १०–१५ ? ५ सेंमी., छदे हिरवट लाल, छदके अनेक संवर्त व पुष्पमुकुट नळीसारखे [→ सिटॅमिनी] फुले फिकट पिवळी आणि फळ छदांनी वेढलेले असते. मशागतीखाली असलेल्या या वनस्पतीच्या प्रकारांमध्ये फळे सामान्यतः येत नाहीत.
हळद हे महत्त्वाच्या मसाला व औषधी पिकांपैकी प्रमुख पीक आहे. तिचे सुकविलेले मूलक्षोड (हळकुंडे) दळून ‘हळद पूड’ बनवितात.ती पिवळी, सुवासिक, स्तंभक, शक्तिवर्धक व रक्तशुद्धीकर असते. ती जखमेवर व अवयव मुरगळल्यावर लावतात. ताजा रस कृमिघ्न असून त्वचा विकारावर लावतात पूर्वी ती छपाई व कापड रंगविण्यास वापरीत. ओल्या हळदीच्या तुकड्यांचे लोणचे करतात. मसाल्यात हळद भरपूर प्रमाणात वापरतात. हिंदूंच्या धार्मिक विधीत हळद महत्त्वाची आहे. टेरामायसिनाच्या उत्पादनात हळद वापरतात.
भारतामध्ये हळदीच्या मुख्यतः दोन जातींची लागवड करतात. त्यांपैकी एका जातीची हळकुंडे कठीण व भडक पिवळ्या रंगाची असून तिचा रंगासाठी उपयोग करतात. ती ‘लोखंडी हळद’ म्हणून महाराष्ट्रात ओळखलीजाते. दुसऱ्या जातीची हळकुंडे जरा मोठी, कमी कठीण व सौम्यपिवळ्या रंगाची असतात. त्यांचा उपयोग मुख्यतः मसाल्याचा पदार्थम्हणून होतो. तिसरी जाती रानहळद (कु. ॲरोमॅटिका) असून भारतातती जंगली अवस्थेत वाढताना आढळते. तिची पश्चिम बंगाल व दक्षिण–मध्य केरळमध्ये लागवडही करतात. तिची हळकुंडे फिकट पिवळी, तर गाभ्यात नारिंगी तांबूस रंगाची असतात. त्यांना कापरासारखा वास असून त्यांचा औषधी म्हणून उपयोग करतात. मार लागलेल्या आणि लचकलेल्या अवयवांना तिचा लेप लावतात. चौथी जाती आंबेहळद (कु. आमडा) असून तिच्या हळकुंडांना आंब्याच्या कैरीसारखा वास असतो. पश्चिम बंगाल, तमिळनाडू व कोकण या ठिकाणी जंगलीअवस्थेत ती आढळते. तिची लागवड साधारणतः मे-जूनमध्ये करतात, तर ऑक्टोबर – जानेवारीमध्ये पीक काढतात. दर हेक्टरला साधारण १०,०००–१२,००० किग्रॅ. ओली हळद मिळते. पाचवी जाती पूर्व भारतीय हळद (कु. अंगुस्तीफोलिया) असून तिची हळकुंडे बारीक व पांढरट रंगाची असतात. याशिवाय दक्षिण भारतात ‘मद्रासी मांजाळ’ जातीची हळकुंडे रंगाच्या पक्केपणासाठी प्रसिद्ध आहेत. ह्या जातीचा रंग इतर जातींच्या मानाने अधिक पक्का असतो. मलबारी हळकुंडे आकाराने गोलाकार व सर्वांत मोठी म्हणून प्रसिद्ध आहेत. ओडिशामध्ये ‘गौतम’ जातीचे उत्पन्न भरपूर येते. कर्नाटकमध्ये ‘मुंदगा’, ‘बालगा’ व’ येलछगा’ या जाती प्रसिद्ध आहेत. यांपैकी ‘येलछगा’ जातीची हळकुंडे लहान व उत्पन्नाला कमी असल्याने तिची लागवड घटत आहे. महाराष्ट्रातकृष्णा, राजापुरी, वयगाव या स्थानिक जातींची लागवड करतात. डोंगराळ भागातील हळदीचा दर्जा सपाट प्रदेशातील हळदीपेक्षा चांगला असतो.
भारत हा हळद उत्पादन करणारा जगातील सर्वांत मोठा देश आहे. जगाच्या एकूण उत्पादनाच्या सु. ८०% उत्पादन एकट्या भारतात होते. २०११-१२ मध्ये सु. १३,९८,८६२ टन उत्पादन २,५१,८२४ हे. क्षेत्रातून झाले. त्यात सर्वाधिक वाटा आंध्र प्रदेश या राज्याचा होतासु. ६१% उत्पादन तेथे घेतले गेले. महाराष्ट्रामध्ये या पिकाखालीसु. ८,२०० हे. क्षेत्र असून प्रामुख्याने हे पीक सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, नांदेड व परभणी या जिल्ह्यांत घेतले जाते. भारतातील उत्पादनापैकी ८०–९०% हळद याच देशात वापरली जाते, तर १०–१५% हळद निर्यात केली जाते.
हवामान : हळदीच्या पिकाच्या वाढीसाठी उष्ण व दमट हवामानपोषक असते. हिवाळी हंगामात पालेवाढ मंदावते, परंतु गड्ड्यांची वाढ जोमाने होते. साधारणतः ६०–७५ सेंमी. पाऊस असणाऱ्या भागात ती उत्तम येते. तिला २०°–३५° से. उष्णतामान चांगले मानवते. गड्ड्यांची लागवण व त्यांचे रुजणे बऱ्याच अंशी हवामानावर अवलंबून असते.तिची लागवड सस.पासून १,२०० मी. उंचीपर्यंतच्या प्रदेशात करतायेते. भारतात पश्चिम किनारपट्टीतील अधिक पावसाच्या प्रदेशात हळदीचे जिरायत (कोरडवाहू) पीक घेतले जाते, परंतु मुख्यतः ते बागायतीपीक आहे.
जमीन : हळदीला चांगला निचरा होणारी मध्यम काळी, भरपूरसेंद्रिय पदार्थयुक्त सकस बागायती किंवा पोयट्याची जमीन लागते.गाळाच्या जमिनीतही या पिकाची चांगली वाढ होते. अगदी भारी, चिकण, क्षारीय अगर दगडगोट्यांची जमीन निरुपयोगी असते. अशा जमिनीतती चांगली पोसत नाही.
पूर्वमशागत, लागवड व खते : महाराष्ट्रात बहुतांशी हळदीचे स्वतंत्र पीक लावतात परंतु पाटाच्या कडेने मिरच्या, एरंडी वगैरेलावतात. गुजरातमध्ये हळदीसोबत आले व गोराडू ही मिश्रपिकेघेतात तर दक्षिणेकडील राज्यांत आले, सुरण, वांगी, गाजर वइतर भाजीपाल्यांची मिश्रपिके घेतात. हळदीला सावलीने अपाय होतनाही. उलट ते सावटप्रिय पीक असल्याने त्याच्यापेक्षा उंच वाढणारीपिकेही मिश्रपीक म्हणून लावता येतात. श्रीलंकेमध्ये फरसबीचे मिश्रपीक घेतात. या पिकाची ऊस, भात, भाजीपाला व मिरची या पिकांबरोबरफेरपालट करतात.
जमीन दोनदा १८–२२ सेंमी. खोल नांगरतात. दोन नांगरटीमध्ये हेक्टरला ३५–४० टन चांगले मुरलेले शेणखत अगर कंपोस्ट खत आणि ६० किग्रॅ. स्फुरद व ६० किग्रॅ. पोटॅश मातीत मिसळतात. कंदमाशी किडीच्या नियंत्रणासाठी ७५ किग्रॅ. फोलीडोल पावडर मातीत मिसळून घेतात. २–४ वेळा कुळवून माती भुसभुशीत झाली म्हणजे ७५ सेंमी. अंतरावर सऱ्या काढून सऱ्यां अगर रुंद वरंब्यावर लागवण करतात.रुंद वरंबे जमिनीपासून २२–३० सेंमी. उंच, माथ्यावर ९०–१०५ सेंमी.रुंद व जमिनीच्या उताराप्रमाणे ४–६ मी. लांब असतात.
हळदीची लागवण एप्रिलच्या मध्यापासून ते जुलैच्या आरंभापर्यंतगड्डे लावून करतात. महाराष्ट्रात एप्रिलअखेर लागवण केल्यास अधिक उत्पन्न मिळते, असे आढळून आले आहे. मागील पिकाच्या खणून काढलेल्या गड्ड्यांतून चांगले पोसलेले व फुगलेले दोन-तीन डोळेअसलेले मोठे गड्डे (४०–५० ग्रॅ. वजनाचे) निवडून बाजूला काढतात.हे गड्डे जानेवारी ते मार्चपर्यंत काढतात. लागवण एप्रिल ते जूनमध्येव्हावयाची असते, म्हणून बेण्यासाठी निवडलेले गड्डे त्यावेळेपर्यंत जतनकरून ठेवावे लागतात. त्यासाठी अशा गड्ड्यांची थंड जागी रासकरतात व हळदीच्या पानांनी रास लिंपून टाकतात. ही रास लागवणीच्या वेळेपर्यंत उघडत नाहीत. या अवधीत राशीतल्या गड्ड्यांना डोळ्यांतूनअंकुर फुटलेले असतात, त्यामुळे लागवणीसाठी खात्रीशीर बेणे मिळते.
रासायनिक बीजप्रक्रियेमध्ये कीड नियंत्रणासाठी फोसेलॉन ३५%ई. सी. २ मिलि. प्रतिलिटर पाणी अथवा मोनोक्रोटोफॉस ३६% १.५ मिलि. प्रतिलिटर पाणी अथवा क्विनॉलफॉस १.५ मिलि. प्रतिलिटर पाणी आणि बुरशीसाठी मँकोझेब ०.३% किंवा बावीस्टीन ०.१% विद्रावामध्ये बियाणे बुडवून काढतात. ट्रायकोडर्माव्हिरिडी व स्यूडोमोनस या परोपजीवी बुरशींची बियाण्यांवर जैविक बीजप्रक्रिया करतात.
सरीवरंब्याच्या दोन्ही बाजूंना २५–३० सेंमी. अंतरावर ६–८ सेंमी. खोल खड्डा करून त्यात अंकुर वरचे बाजूला करून बेणे लावतात. रुंद वरंब्यावर देखील अशीच लागवण करतात. सरीवरंब्याच्या पद्धतीपेक्षा रुंद वरंबा पद्धतीत हळदीची लागवण केल्यास सु. ३०% अधिक उत्पन्न मिळते, असे प्रयोगाने सिद्ध झाले आहे. एक हेक्टर लागवणीसाठी १,८००–२,२०० किग्रॅ. बेणे लागते. बेणे लावून झाले की पाणी देतात. पाऊससुरू होण्यापूर्वी बेणे उगवून त्याची वाढ झालेली असावी. पावसाने पिकास हानी पोहोचू नये म्हणून सर्वसाधारणपणे महाराष्ट्रात लागवण मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत करतात. उगवण १५–२१ दिवसांत पूर्ण होते, पावसाळी हंगामात पिकाची जोमाने वाढ होते व नंतर गड्डेही चांगले पोसतात. लागवण झाल्यानंतर त्यावर साधारण १२–१५ टन प्रतिहेक्टर हिरव्या पानांचे आच्छादन करतात. ४५–५० दिवसांनंतर पुन्हा तशाच प्रकारे आच्छादन करतात. त्यामुळे हळदीची उगवण व वाढ जोमाने होते.
भरखताच्या जोडीला प्रतिहेक्टर ९०–१२० किग्रॅ. नत्र वरखतम्हणून दोन हप्त्यांत सारखे विभागून देतात. पहिला हप्ता बेण्याचीउगवण पूर्ण झाल्यावर आणि दुसरा हप्ता त्यानंतर एका महिन्यानेदेतात. वरखत हळदीच्या गड्ड्याभोवती सारखे पसरून मातीत चांगले मिसळतात. दुसऱ्या हप्त्यानंतर (२–२.५ महिन्यांनी) पाण्याचे पाटखोलगट खणून त्यातील मातीने पिकाला भर देतात. फेरस सल्फेट ३० किग्रॅ., झिंक सल्फेट १५ किग्रॅ. व बोरॅक्स ५ किग्रॅ. प्रतिहेक्टरी देतात.नत्र व स्फुरद उपलब्धता वाढविण्यासाठी ॲझोस्पिरिलम आणि फॉस्फोबॅक्टेरियम १० किग्रॅ. प्रतिहेक्टरी देतात.
पाणी : हळद बागायती पीक असल्याने तिला वेळेवर पाणी देणेफार महत्त्वाचे असते. लागवण झाल्याबरोबर पाणी दिले नाही तरजमिनीतील ओलीच्या कमतरतेमुळे हवेतील व जमिनीतील प्रखर उष्णतेने गड्डे नासण्याची शक्यता असते. पहिल्या (आंबवणी) पाण्यानंतर चार दिवसांनी पुन्हा पाणी (चिंबवणी) देतात. नंतर पीक वाढत असताना जरूरीप्रमाणे १०–१२ दिवसांनी पिकास पाणी देतात. पाणी देताना ते जमिनीवर फार वेळ टिकून राहणार नाही याची काळजी घेतात. पावसाचे पाणी पिकात साठून राहिले तर पिकाचे नुकसान होते, म्हणून आवश्यकतेनुसार पिकातील पावसाचे पाणी बाहेर काढून टाकतात.
आंतरमशागत : जरूरीप्रमाणे २–५ खुरपण्या करतात. तीन महिन्यांनी सरीतील माती उकरून गड्ड्यांना भर लावतात.
काढणी : हळदीचे पीक ८-९ महिन्यांचे असते. पीक तयार झाले म्हणजे पाने पिवळी पडू लागतात. जानेवारी ते मार्चपर्यंत पिकाची काढणी करतात. बेण्यासाठी याच वेळी गड्डे निवडून वेगळे ठेवतात. राहिलेल्या गड्ड्यांची ओली हळद म्हणून तशीच विक्री करतात किंवा शिजवूनत्यांची हळकुंडे बनवून विकतात. ओली हळद विक्रीसाठी हवी असल्यास गड्डे काळजीपूर्वक कुदळीने खणून काढतात व स्वच्छ धुवून बाजारात पाठवितात. अशा वेळी हळद नऊ महिन्यांपूर्वी काढली तरी चालतेपरंतु हळद जर हळकुंडे म्हणून विकायची असेल, तर पीक पूर्ण पक्वहोऊ देतात. काढणीच्या वेळी पाने कापून काढून शेत स्वच्छ करतात.नंतर गड्डे इजा न होऊ देता कुदळीने खणून काढतात.
हळद शिजवणी : पारंपरिक पद्धत : हळकुंडे (पक्की हळद) बनविण्याकरिता ठेवलेले गड्डे धुवून स्वच्छ करतात. त्यांची काहिलीत कोनाकृती रास करून तिच्या काठाच्या खाली ३-४ सेंमी. उंचीपर्यंतपाणी घालतात. नंतर राशीवर व पाण्यावर हळदीच्या पानांचा थर देतात. त्यावर फाटकी पोती वगैरे टाकून शेणामातीने चांगले लिंपून घेतात.नंतर काहिल चुलाणावर ठेवून चुलाण मंदाग्नीवर पेटवितात. जाळ सुरू केल्यानंतर सु. दोन-अडीच तासांनी गड्डे चांगले शिजलेत किंवा नाहीते पाहण्यासाठी लिंपणास भोके पाडून त्यातून काही गड्डे काढून त्यांतकाड्या खुपसून किंवा बोटाने दाबून पाहतात. जर काडी गड्ड्यातून सहज आरपार गेली किंवा बोटांनी गड्डे सहज चिरडले गेल्यास अथवा शिजलेल्या हळकुंडास मधोमध हळूवारपणे मोडल्यास बारीक तार दिसल्यास अशा वेळी ते चांगले शिजले असे समजून जाळ कमी करतात. जाळ निवल्यावर लिंपण काळजीपूर्वक काढतात. राशीमधील हळदीवर लिंपणाची शेणमाती पडू देत नाहीत. नंतर हे शिजविलेले गड्डे काहिलीमधून काढून खळ्यावर वाळवितात. वाळविताना त्यांच्यावर धूळ पडून ते खराब होणार नाहीत अशी काळजी घेतात. दवाने खराब होऊ नयेत म्हणून खळ्यावर पसरलेली हळकुंडे रात्री गोळा करून झाकून ठेवतात. सुमारे आठ दिवसांत हळकुंडे चांगली वाळतात. नंतर आकर्षक रंग यावा म्हणून ही हळकुंडेचोळण्याच्या यंत्रात घालून चोळून घेतात. यामुळे हळकुंडांवरील काळपट साल निघून जाते व तिला पिवळा धमक रंग येतो. याप्रमाणे तयारकेलेली हळकुंडे विकतात. मशागतीनुसार प्रतिहेक्टरी २५–३० हजार किग्रॅ. ओली हळद मिळते. तिच्या १७–२५% हळकुंडे (पक्की हळद) तयार होतात.
हळद कंद जमिनीतून काढल्यानंतर मोडणी करून मातृकंद,बगलगड्डे आणि हळकुंडे वेगळी करून हळद शिजवितात. पारंपरिकपद्धतीने काहिलीत हळद शिजविल्यामुळे हळद व पाणी याचा संपर्कयेत असल्याने हळदीमधील कुर्कुमिनाचे प्रमाण पाण्यामध्ये उतरते आणि त्यामुळे हळदीची प्रत व दर्जा खालवतो. काहिलीमध्ये शीग लावल्या-मुळे वरची हळद अर्धकच्ची राहते. हळकुंडास चिकटलेला मातीचा थर तळाशी साचून त्या थरातील हळद जास्त शिजते, तसेच ती करपण्याची शक्यता असते. म्हणून हळद शिजवणीचे सुधारित तंत्र वापरतात.
सच्छिद्र ड्रमची सुधारित पद्धत : या पद्धतीमध्ये हळद पाण्याच्या वाफेवर शिजविली जाते. त्यामुळे सर्व हळद एकसारखी शिजते, वेळ व खर्च कमी लागतो आणि हळकुंडाची प्रत सुधारते. त्यामुळे हळदीला दर जास्त मिळतो. या पद्धतीमध्ये मोठ्या काहिलीमध्ये ४-५ सच्छिद्रड्रम ठेवले जातात, काहिलीमध्ये पाणी ओतून ते गरम करतात. यामुळे ड्रममधील हळदीला लागलेली माती निघून जाऊन स्वच्छ व वाफेवर शिजलेली हळद मिळते.
ट्रॅक्टर ट्रॉलीवरील कुकर : यामध्ये २,००० लि. क्षमतेची पाण्याची टाकी बसविलेली असते व लोखंडी पाईपच्या साहाय्याने उष्णता दिली जाते. त्याची वाफ तयार झाल्यावर पाईपच्या साहाय्याने ती हळद ठेवलेल्या कुकरमध्ये सोडली जाते. यामध्ये इंधनाची बचत होते व वाफेवरशिजलेली हळद सुकण्यास सात दिवसांचा कालावधी कमी होतो.
हळद शिजविण्याचे महत्त्व : (१) पिवळेपणास कारणीभूत असलेले कुर्कुमीन सर्व हळकुंडांमध्ये एकसारखे पसरते. (२) सालीमध्ये असलेली लहान छिद्रे उघडी होऊन साल मऊ होते, त्यामुळे हळद लवकरसुकते. (३) हळदीची पुनरुत्पादन शक्ती नष्ट होते. (४) हळदीलायेत असलेला उग्र वास कमी होतो.
गोगटे, बा. चिं. पाटील, ह. चिं.
रोग : हळदीवर पानांवरील ठिपके, पानांवरील करपा व गड्ड्यांचीकूज हे रोग आढळतात.
पानांवरील ठिपके : कोलेट्रोट्रिकम कॅप्सिकी या कवकामुळे हा रोग होतो. पानांवर मुख्य शिरेच्या बाजूने लांबोळे लालसर-करडे १-२ सेंमी. व्यासाचे ठिपके पडतात. ठिपके मोठे होत एकमेकांत मिसळून मोठेचट्टे पडतात व पाने वाळून जातात.
उपाय : निरोगी बेणे लागवणीसाठी वापरतात. रोग दिसू लागताच डायथेन झेड-८७ किंवा डायथेन एम-८५ (२-३ ग्रॅ. १ लि. पाण्यात मिसळून) फवारणी करतात. पानाच्या वाढीनुसार प्रतिहेक्टरी ५००–७०० लि. द्रावण आवश्यक असते.
पानांवरील करपा : टॅफ्रिना मॅक्युलॅन्स या कवकामुळे हा रोग होतो. यामुळे पानांवर लंबगोल तपकिरी ठिपके पडतात. ते एकमेकात मिसळून मोठे चट्टे तयार होतात व त्यामुळे पाने वाळून उत्पन्नात घट येते.
उपाय : पानांवरील ठिपक्यांसाठी जो उपाय योजतात तोच उपायकेला जातो.
गड्डा कुजणे किंवा मूळकूज : पिथियम ग्रॅमिनिकोला या कवकामुळेहा रोग होतो. या रोगामुळे मुळांची वाढ चांगली होत नाही, काहीमुळ्या व गड्डे कुजतात, पाने प्रथम कडेने वाळत जातात व पुढे संपूर्णपान वाळते. गड्डे मऊ व पाणी सुटल्यासारखे होतात. पाण्याचा निचरान झाल्यास रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. उत्पन्नात घट येते.
उपाय : रोगमुक्त बियाणे वापरतात. पाण्याचा निचरा चांगलाहोणाऱ्या जमिनीत लागवड करतात. बावीस्टीन ५०० ग्रॅ./हे. किंवा३% झायनेब फवारतात.
कीड : खोडकीड, हिरवी अळी व कंदमाशी (गड्ड्यावरील माशी )या हळदीवरील मुख्य किडी होत.
खोडकीड : (डायकोक्रॉसिस पंक्टिफेरॅलिस जी.). ही कीड एरंडाची बोंड अळी म्हणूनही ओळखली जाते. वाढणाऱ्या खोडाला अळी भोकपाडते व मधला भाग कुरतडून खाते, त्यामुळे रोप वाळते व मरून जाते.
उपाय : कीड लागलेली झाडे उपटून आतल्या अळीचा नाश करतात. कीडनाशकाची फवारणी करतात. ०.०७५% क्विनॉलफॉस किंवा ०.१% मॅलॅथिऑन यांची २१ दिवसांच्या अंतराने फवारणी करतात.
हिरवी अळी : (उडास्पेस जोलिअस सी. ). फुलपाखराची ही हिरवी अळी पाने कुरतडून खाते.
उपाय : अळ्या वेचून नष्ट करतात.
कंदमाशी : (मायमेग्राला सीरुलीफ्रॉन्स). हळदीच्या पिकावरीलसर्वांत मोठा धोका म्हणून ही माशी ओळखली जाते. ही माशीडासाच्या आकाराची व काळ्या रंगाची असते. तिची अंडी अत्यंतलहान आकाराची, पांढऱ्या रंगाची, लांबट व दोन्ही बाजूंना निमुळती असतात. अळीचा रंग पिवळसर पांढरट असतो. वाढणाऱ्या खोडास बुंध्याजवळ भोक पाडून या किडीच्या अळ्या आत शिरतात. गड्ड्यावरया किडीचा प्रादुर्भाव असतो. यामुळे खोड मरते व गड्डे कुजतात.
उपाय : अळीची लागण झालेल्या (किडलेल्या) गड्ड्याचा लागवडीकरिता वापर करीत नाहीत. लागवडीपूर्वी बियाण्यास एगॅलाल किंवा पारायुक्त औषध (१ लि. पाण्यात ४ ग्रॅ.) व पाण्यात मिसळणारीबीएचसी ५०% पावडर (१ लि. पाण्यात ४ ग्रॅ.) याचे द्रावण तयारकरून लागवड करण्यापूर्वी १० मिनिटे लावतात. मर झालेली रोपे गड्ड्यांसहित काढून घेतात. कंदमाशीचा प्रादुर्भाव दिसताच १०% फोरेट प्रतिहेक्टर २० किग्रॅ. किंवा १०% बीएचसी पावडर प्रतिहेक्टर७० किग्रॅ. रोपाच्या मुळाशी टाकतात.
रुईकर, स. के.
हळदीमधील अन्नघटक : (१०० ग्रॅममध्ये). प्रथिने ६.३ ग्रॅ., स्निग्ध पदार्थ ५.१ ग्रॅ., कार्बोहायड्रेटे ६९.४ ग्रॅ., कॅल्शियम १५० मिग्रॅ., फॉस्फरस २८२ मिग्रॅ., लोह १८.६ मिग्रॅ., जीवनसत्त्वे अ ५० आं. ए., व ब२ २.३ आं. ए., ऊर्जा ३४९ कॅलरी.
हळद प्रक्रिया : हळद पावडर : चूर्णन यंत्रामध्ये हळकुंडे टाकून भुकटी तयार होते. त्यानंतर ती ३०० मेश चाळणीतून चाळून घेतात. भुकटीत १२% पेक्षा जास्त ओलावा असल्यास ती लवकर खराब होतेव कीड लागते. हळद भुकटी ३०० एमएसटी सेलोफेन अथवाग्लासीनच्या पिशवीत भरतात. ही पिशवी २५० गेज एलडीपीई पिशवीमध्ये बंद करतात. साध्या पिशवीत बंद केल्यास त्यातील सु. ६०% सुगंधी तेल उडून जाते.
ओलिओरेझीन : हळदीच्या पावडरपासून विद्रावक निष्कर्षण पद्धतीने ओलिओरेझीन वेगळे काढतात. यात मुख्य रंगघटक कुर्कुमीन असतो.या घटकाच्या प्रमाणावर त्याची गुणवत्ता अवलंबून असते. विविध प्रकारची लोणची, विविध पेये व आइसक्रीम यांमध्ये ओलिओरेझीन वापरतात.
हळदीचे लोणचे : ओल्या हळदीच्या गड्ड्यापासून (मूलक्षोडापासून) उच्च प्रतीचे लोणचे तयार करता येते. यासाठी ६–८ महिन्यांच्या हळद गड्ड्यांचा वापर करतात.
हळदीचे संप्लवनशील तेल : हे तेल पिवळ्या रंगाचे असून तेे वेगळे काढण्यासाठी पाण्याच्या ऊर्ध्वपातन पद्धतीचा वापर करतात.
हळदीच्या पानांचे तेल : हळदीच्या पानांपासून सुगंधी तेल काढण्या-साठी पाने ६-७ महिन्यांची असताना कापून वापरतात. त्या तेलाचावापर सौंदर्यप्रसाधनांत केला जातो. मात्र, पाने कापल्यामुळे हळदीचेउत्पादन घटते.
हळदीचे सुधारित प्रकार : भारतात काही संशोधन संस्थांनी व विद्यापीठांनी हळदीचे सुधारित प्रकार प्रसारित केलेले असून त्यांचीवैशिष्ट्ये पुढील पृष्ठावरील तक्त्यात दिलेली आहेत.
तक्त्यामधील हळदीचे सुधारित प्रकार प्रसारित केलेल्या संस्थांचीव विद्यापीठांची नावे पुढीलप्रमाणे आहेत : (१) क्रमांक १, २, ३, ४,
हळदीच्या सुधारित प्रकारांची वैशिष्ट्ये |
|||||||
अ.क्र. |
सुधारित प्रकार |
ओलीहळद (टन/ हे.) |
पिकाचा कालावधी (दिवस) |
वाळलेली हळद (%) |
कुर्कुमीन
(%) |
ओलिओ-रेझीन (%) |
उपयुक्ततेल
(%) |
१. |
सुवर्णा |
१७.४ |
२०० |
२०.० |
४.३ |
१३.५ |
७.० |
२. |
सगुणा |
२९.३ |
१९० |
१२.० |
७.३ |
१३.५ |
६.० |
३. |
सुदर्शन |
२८.८ |
१९० |
१२.० |
५.३ |
१५.० |
७.० |
४. |
प्रभा |
३७.५ |
१९५ |
१९.५ |
६.५ |
१५.० |
६.५ |
५. |
प्रतिभा |
३९.१ |
१८८ |
१८.५ |
६.२ |
१६.२ |
६.२ |
६. |
को १ |
३०.० |
२८५ |
१९.५ |
३.२ |
६.७ |
३.२ |
७. |
कृष्णा |
९.२ |
२४० |
१६.४ |
२.८ |
३.८ |
२.० |
८. |
सुगंधा |
१५.० |
२१० |
२३.३ |
३.१ |
११.० |
२.७ |
९. |
बीएस- आर १ |
३०.७ |
२८५ |
२०.५ |
४.२ |
४.० |
३.७ |
१०. |
रोमा |
२०.७ |
२५० |
३१.० |
९.३ |
१३.२ |
४.२ |
११. |
सुरोमा |
२०.० |
२५५ |
२६.० |
९.३ |
१३.१ |
५.४ |
१२. |
राजेंद्र सोनिया |
४२.० |
२२५ |
१८.० |
८.४ |
–– |
५.० |
१३. |
रंगा |
२९.० |
२५० |
२४.८ |
६.३ |
१३.५ |
४.४ |
१४. |
रश्मी |
३१.३ |
२४० |
२३.० |
६.४ |
१३.४ |
४.४ |
१५. |
अलेप्पी (सुप्रिम) |
३५.४ |
२१० |
१९.३ |
६.० |
१६.० |
४.० |
१६. |
केदार |
३४.५ |
२१० |
१८.९ |
५.५ |
१३.६ |
३.० |
५, १५ व १६ हे प्रकार – इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पायसेस रिसर्च, कोझिकोडे (केरळ ) (२) क्रमांक ६ व ९ हे प्रकार – मसाला पिके व उद्यानविद्या विभाग, तमिळनाडू कृषि विद्यापीठ, कोईमतूर (३) क्रमांक ७ प्रकार – हळद संशोधन केंद्र, कसबे डिग्रज (सांगली, महाराष्ट्र ) (४) क्रमांक ८ प्रकार – मसाला पिके संशोधन केंद्र, जगुदन, गुजरात कृषि विद्यापीठ (५) क्रमांक १०, ११, १३ व १४ हे प्रकार – ओडिशा कृषिव तंत्रज्ञान विद्यापीठ, पोट्टगिरी आणि (६) क्रमांक १२ प्रकार –उद्यानविद्या विभाग, तिरहुत कृषि महाविद्यालय, राजेंद्र कृषि विद्यापीठ, ढोली (बिहार).
याशिवाय तमिळनाडूमधील सेलम हा स्थानिक वाण असून त्याचे पीक उंच, पालेदार व हळद गड्डे मोठ्या आकाराचे असतात. तसेच ते इरोड या स्थानिक वाणापेक्षा अधिक उत्पादनक्षम आहे. या पिकाचा कालावधी २५५ दिवसांचा असून त्यापासून ओली हळद ३५ टन/हे., वाळलेली हळद २०% आणि कुर्कुमीन ६% मिळते.
जाधव, मंगेश पां.
हळदीचे महत्त्व : हळद या ओषधी वनस्पतीला भारताची सुवर्ण वनस्पती मानतात. भारतात इ. स. पू. सु. ३००० वर्षांपासून ही वनस्पती लागवडीत आहे. हळद ही भारतीयांच्या जीवनातील अविभाज्य अंगअसून ती अन्न, सौंदर्यप्रसाधने, पारंपरिक कर्मकांडे व विधी, औषधे, रंगया सर्व बाबींकरिता महत्त्वपूर्ण मानली जाते. भारतातील आधुनिक स्वयंपाक पद्धतीत हळद मुबलकपणे वापरली जाते. ती जवळपास प्रत्येक शाकाहारी वा मांसाहारी पदार्थांत मुख्य घटक म्हणून वापरतात. आयुर्वेदातही हळदीचे अनन्यसाधारण महत्त्व सांगितले आहे. पाश्चिमात्य जगाला मध्ययुगापर्यंत हळद ज्ञात नव्हती. तेराव्या शतकात अरबी व्यापाऱ्यांनी यूरोपमध्ये हळदीची ओळख करून दिली. तेव्हा हळद ‘भारतीय केसर’ (इंडियन सॅफ्रन) म्हणून ओळखली जात होती. भारतीय हळद गुणवत्तेसाठी जगात सर्वोत्तम मानली जाते.
हळदीचा एकूणच भारतीय जीवनातील पारंपरिक वापर व महत्त्वलक्षात घेता हळद या वनस्पतीच्या एकस्वावर भारतीयांचा हक्क सर्वाधिक होता ही गोष्ट डॉ. रघुनाथ माशेलकरांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर सिद्ध करून हळदीचे एकस्व भारताकडेच राहील यासाठी लढा दिला व तो जिंकला.
आरोग्य दृष्ट्या महत्त्व : हळदीचा औषधी म्हणून वापर मुख्यतः त्वचा, यकृत व फुप्फुस यांच्या इलाजासाठी होतो. अपस्मार, रक्तस्रावाचे विकार, त्वचाविकार, रक्त तसेच अंतःशरीर व त्वचा शुद्धीकरणासाठीही तिचाउपयोग होतो.
हळदीच्या विविध क्रियांमध्ये आरोग्य पुनःस्थापक, वेदनाशामक,सूक्ष्मजंतू प्रतिरोधक, प्रतिशोथकारक, अर्बुदरोधक, अधिहर्षतारोधी( ॲलर्जीरोधी), प्रतिऑक्सिडीकारक, पूतिरोधक, आकडीरोधक,पाचक, स्तंभक, हृद्विकाररोधक, वायुनाशी, मूत्रल आणि उद्दीपक यांचा समावेश होतो.
चिकित्साविज्ञानातील उपयोग : पांडुरोग, कर्करोग, मधुमेह, अपचन, अन्नविषबाधा, पित्ताश्मरी, जंतुसंसर्ग, कमकुवत रक्ताभिसरण, जखम इत्यादींमध्ये हळदीचा उपयोग करतात.
इतर उपयोग : हळद स्त्रियांच्या जनन तंत्राचे नियमन करण्यासाठीमदत करते तसेच स्तनातील दूध आणि मूत्रमार्ग शुद्ध ठेवते. पुरुषांमध्ये वीर्य शुद्धी आणि त्याच्या निर्मितीसाठी मदत करते. तसेच ती सामान्यपणे ताप, अतिसार, मूत्रमार्गातील विकार, विषबाधा, खोकला आणि दुग्ध- स्रावासंबंधी समस्या कमी करण्यास मदत करते. बाह्य व्रणांवर उपचारासाठी ती वापरतात. कफ कमी करण्यासाठी तिचा वापर होतो.
आयुर्वेदात मोठ्या प्रमाणावर यकृत शुद्धीकरण व ॲलर्जी प्रतिकार-क्षमता वाढविणे यांकरिता हळद वापरली जाते. त्वचेच्या कर्करोगावरकिंवा त्याच्या पूर्वावस्थेसाठी तिचा वापर होतो. तसेच ती कावीळ व तोंड येणे यांवर उपयोगी आहे.
बहुतेक रुग्णांसाठी हळद लाभदायक असून ती विषारी नसते. अनेकप्राणी व मनुष्यांमध्ये ती विविध प्रकारचा जैविक परिणाम दाखविते. हळद व कुर्कुमिनामध्ये प्रतिशोथकारक आणि प्रतिऑक्सिडीकारक क्षमताअसते. प्राप्त पुराव्यावरून असे लक्षात आले आहे की, हळद अर्बुदांची निर्मिती, वाढ व कर्कप्रक्षेप कमी करते. त्यामुळे कर्करोगरोधक घटक म्हणून तिच्यात मोठ्या प्रमाणावर क्षमता आहे. मात्र, इतर प्रतिऑक्सिडी-कारकाप्रमाणे केमोथेरपी करताना हळदीचा वापर टाळणे आवश्यक आहेकी नाही याबाबत अधिक माहिती उपलब्ध नाही.
भारतीय कर्मकांडातील महत्त्व : भारतात हळकुंडे शुद्धता, समृद्धी व सुफलतेचे प्रतीक म्हणून समजले जातात. देवदेवतांच्या अभिषेकासाठी हळदयुक्त पाणी वापरतात. पूजा व मंगल संस्कारांत कुंकवासोबत हळदवापरतात. लग्नसमारंभात लग्नाआधी वधु-वरांना हळद लावतात. सौभाग्य-वृद्धीसाठी लग्न झालेल्या स्त्रिया एकमेकींना हळद-कुंकू लावतात. तमिळ विवाहात हळदीने माखलेली साडी वधू धारण करते.
वाघ, नितिन भरत
रानहळद : (सं. वनारिष्टा इं. वाइल्ड टर्मेरिक लॅ. कुर्कुमाॲरोमॅटिका). भारतीय द्वीपकल्पातील पूर्व व पश्चिमेकडील घाटांत आणि दमट, सावट युक्त गर्तांतील बऱ्याच क्षेत्रावर रानहळद उगविलेली आढळते. ती जंगलात सावलीमध्ये वाढते, क्वचितच तिची लागवड करतात. दक्षिण भारतात ती ‘कस्तुरी हळद’ म्हणून ओळखली जाते. मूलक्षोड हस्ताकृती व मोठे, आत पिवळे आणि सगंध पाने मोठी, रुंद, आकर्षक व दीर्घ वर्तुळाकार असून फुलांच्या पाठीमागून आल्यासारखी भासतात फुलोरा मूलक्षोडाच्या तळापासून एप्रिल-मेमध्ये येतो फुले सुगंधी, एप्रिल-मेमध्ये येतात संवर्त व पुष्पमुकुट त्रिखंडी, पाकळ्या गुलाबी-पांढऱ्या, वंध्यकेसर (ओष्ठ्य) पिवळा असतो.
रानहळद शक्तिवर्धक, सुगंधी, स्तंभक असून पाण्यात उगाळूनसुजेवर लावतात. खरचटणे व मुरगळणे यांवर ती कडू भोपळा, चौंडल आणि कडू इंद्रायण यांचेसह लावतात. तिच्यापासून अबीर बनवितात.सौंदर्यप्रसाधनांतही तिचा वापर करतात.
जमदाडे, ज. वि.
आंबेहळद : (हिं. आमहलदी, कापूरहलदी गु. आंब हलदरा बं. आमडा सं. आम्रगंधा, कर्पूरहरिद्रा क. आंबहळदी इं. मँगो-जिंजर लॅ. कुर्कुमा आमडा). ही ओषधी वनस्पती भारतात व मलायात आढळते तिची लागवडही करतात. तिची पाने लांब देठाची, काहीशी भाल्यासारखी व मोठी असून शरद ऋतूत त्यांच्या झुबक्यातून लांब कणिशासारखाफुलोरा येतो फुलांची छदे हिरवट पांढरी व फुले मोठी, पांढरी किंवाफिकट पिवळी असतात. तिच्या मूलक्षोडावर अनेक लांबट गोलसर ग्रंथिक्षोडे असतात. ग्रंथिक्षोडाचा गाभा फिकट पिवळा असून त्याला ताजेपणी कैरीसारखा वास येतो. यात बाष्पनशील तेल असते.
आंबेहळद सूज आल्यास तसेच चर्मरोगावर व शरीराचा भाग मुरगळ-ल्यास अगर चिमटल्यास त्यावर लेप म्हणून लावतात. ग्रंथिक्षोडे कडू-गोड, शीतकर, दीपक, वायुसारी, सारक व ज्वरनाशक असून दमा, खोकला आणि उचकी यांवर उपयुक्त असतात. सौंदर्यप्रसाधनांतही तिचा वापर करतात.
पहा : सिटॅमिनी.
हेर्लेकर, न. द.
संदर्भ : 1. Aiyer A. K. Yegna-Narayan, Field Crops of India, Bangalore, 1954.
2. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials Vol. II, New Delhi, 1950.
3. Spices Board India, Ministry of Commerce and Industry, Government of India, Turmeric, Cochin, 2009.
४. अरकेरी, एच्. आर्. (इं.) पाटील, ह. चिं. (म.) पिकांच्या उत्पादनाची तत्त्वे आणि प्रघात, मुंबई, १९६०.
५. कृषि विभाग, महाराष्ट्र शासन, हळद लागवड व प्रक्रिया तंत्रज्ञान (पुस्तिका), वाई, (जि. सातारा)
“