हस्तिनापूर :एक प्राचीन ऐतिहासिक व पुरातत्त्वीय स्थळ. प्राचीन संस्कृत, प्राकृत, हिंदी आदी वाङ्मयांत याचा गजपूर, गयनगर, गयपूर, हस्थिपूर, हस्तिग्राम, नागपूर, हत्यिपूर, हस्तिनागपूर, गजाहन, गजसाहनय वगैरे नावांनी उल्लेख आढळतो. ते मीरत जिल्ह्यात (उत्तर प्रदेश) मीरतच्या ईशान्येस सु. ३५ किमी.वर गंगेच्या उजव्या काठावर वसलेले होते. महाभारत काळात हे एक प्रमुख राजनैतिक व सांस्कृतिक केंद्र होते. गंगेच्या काठावरील हे शहर कुरू जनपद, कुरुरट्ट किंवा कुरुराष्ट्र या प्रदेशांचे राजधानीचे स्थळ होते. गंगेच्या जुन्या प्रवाहाजवळ हस्तिनापूरची टेकाडे आहेत. १९५०–५२ मध्ये केलेल्या उत्खननांत इ. स. पू. दुसऱ्या सहस्र-कापासून ते मोगलपूर्व कालापर्यंतचे अवशेष मिळाले असून इ. स. पू. १००० च्या आधी येथे पहिली वस्ती झाली असावी. या वस्तीचे लोक पिवळसर रंगाची खापरे वापरीत. त्यानंतरची वस्ती इ. स. पू. सु. ८०० या कालातील असून येथील लोक राखी रंगाचे उत्कृष्ट वाडगे व थाळ्या वापरीत असत. यांवर काळ्या रंगात नक्षी असे. मातीच्या मूर्ती, खेळणी व मणी बनविले जात. इ. स. पू. ८०० च्या सुमारास त्यांना लोखंडाची माहिती झाली असावी. या वस्तीचा नाश पुरामुळे झाला असावा, असा पुरावा स्तरातून उपलब्ध झाला आहे. जनमेजयाचा नातू निचक्षू याच्या काळात गंगेच्या महापुरामुळे राजधानी हस्तिनापुराहून कौशाम्बीला नेण्यात आली होती, असा उल्लेख पुराणात आहे. तिसरी वस्ती इ. स. पू. ६०० – इ. स. पू. २५० या कालात झाली. याचा पुरावा आहत (पंचमार्कंड्) नाणी,मौर्यकालीन खापरे, तांब्याची व लोखंडाची हत्यारे यांवरून मिळाला. इ. स. पू. २५० च्या सुमारास हस्तिनापूर भस्मसात झाल्याचा पुरावा मिळतो. यानंतर काही वर्षांनी फिरून नवीन वस्ती झाली. विस्तृत व अनेक विटांच्या वास्तू , शुंगशैलीच्या मातीच्या मूर्ती आणि मथुरा अधिपतींची नाणी या कालात प्रचलित होती. कुषाण कालातही येथे खूप वस्ती होती. यानंतर शेवटची वस्ती इ. स. सातव्या-आठव्या शतकांत झाली. त्यानंतर दिल्ली सलतनतच्या काळात हस्तिनापुरात काही मशिदी व मकबरे बांधण्यात आले. त्यांचे भग्नावशेष अवशिष्ट आहेत. भारत-पाक फाळणीनंतर पाकिस्तानातून जे निर्वासित भारतात आले, त्यांपैकी काहींचे पुनर्वसन हस्तिनापुरात करण्यात आले. येथे काही जैन मंदिरे असून एक महादेव मंदिर आहे. गंगेवर द्रौपदी, कर्ण वगैरे घाट बांधले आहेत. सांप्रत ते एक तीर्थस्थान बनले असून कार्तिक महिन्यात येथे जैनांची मोठी यात्रा भरते. कार्तिक पौर्णिमेला येथे स्नानासाठी भाविक गर्दी करतात.
देव, शां. भा.
“