हस्तभूषणे :स्त्री-पुरुषांनी हातात घालावयाचे अलंकार. अंगठी, कंकण, बांगड्या, कडे यांसारख्या हस्तभूषणांचा वापर सामान्यतः सार्वत्रिक आढळतो. महाराष्ट्रातील स्त्रिया कडे, कंकण, गजरा, गोखरू, गोठ, पाटल्या, जवे, तोडे, बांगड्या, हातवे, बिलवर, हातफूल, कंगणे, वाळा ही हस्तभूषणे वापरताना आढळतात. पुरुषांच्या हस्तभूषणांत सलकडे, गजरा, तोडा, पोहोची, हातसर, अंगठ्या, मुद्रा, पवित्रक, नागमूद इत्यादींचा पूर्वी सर्रास वापर होई. हातामध्ये, विशेषतः मनगटात, धारण करावयाच्या अलंकारांना आवापक, परिहार्य, कटक व वलय अशी चार नावे प्राचीन साहित्यात आढळतात. वलय म्हणजे सोन्याची सलकडी किंवा स्त्रियांनी घालावयाचे गोठ होत. वलयात फलकवलय नावाचा एक प्रकार असून त्यात चपट्या आकाराची रत्ने जडविलेली असत. अमरावतीच्या (आंध्र प्रदेश) स्तूपाच्या शिल्पात हा नमुना पाहावयास मिळतो. कालिदासाच्या मेघदूत काव्यात हातातल्या स्वर्गवलय या आभूषणाचा उल्लेख आलाआहे. गोठ आणि कडे सामान्यतः धातूचे अखंड किंवा मध्यभागीतोडलेले असते. त्याच्या तोडलेल्या टोकावर आकर्षक नक्षीकाम असते किंवा तोंडाशी सिंह, मोर, व्याघ्र यांच्या मुखाची नक्षी असते. कडे सामान्यतः पुरुष वापरतात. त्यावरही नक्षीकाम असते. वलयाच्या खालीच ‘करभूषण’ नावाचे कंकण घालीत असत. संस्कृत साहित्यात कंकणाचा वारंवार उल्लेख आला आहे. ‘कंकणं करभूषणम्’ असे अमरकोशा तम्हटले आहे. लग्नात वधू-वर एकमेकांच्या हातात बांधतात, ते कंकण सुताचे असते म्हणूनच मेदिनीकोशा त कंकण शब्दाचे करभूषण, मंडन व सूत्र असे तीन अर्थ दिलेले आहेत. चूड व अर्धचूड हेसुद्धा कंकणाचे प्रकार होत. चूड म्हणजे सोन्याच्या तारेचे स्थूल कंकण व अर्धचूड म्हणजे तसलेच बारीक कंकण होय. चूड यालाच मराठीत चुडा म्हणतात. महाराष्ट्रात लग्नापूर्वी हिरव्या बांगड्यांचा चुडा भरण्याची प्रथा अद्यापि रूढ आहे. आजही पश्चिम बंगालमध्ये स्त्रिया शंखाचे चुडे वापरताना दिसतात. शिवाय पश्चिम बंगालमध्ये बाहुतीनामक सलकड्यांचा एक प्रकार रूढ आहे. हस्तभूषणांतील महत्त्वाचा प्रकार म्हणजे अंगठी होय. अंगुरीय, अंगुलीय, अंगुलीयक व उर्मिका इ. नावे अंगठीसाठी वापरली जात. अंगुलिमुद्रा हेही एक नाव अंगठीसाठी वापरल्याचे आढळते. मुद्राराक्षस या संस्कृत नाटकात अंगुलिमुद्रेचा उल्लेख आलेला आहे. वाङ्निश्चयाच्या वेळी अंगठीचा अगत्याने वापर केला जातो. सामान्यतः सोने, चांदी, रूपे, प्लॅटिनम, तांबे, ब्राँझ या धातूंपासून अंगठी बनवितात. अंगठीच्या पृष्ठभागावर वापरणा-ऱ्याचे नाव, पदवी, बोधपर वचने किंवा प्रेमदर्शक शब्द कोरण्याची प्रथा पुरातन काळापासून रूढ आहे. रोमन राज्यकर्ते हिरकणीच्या अंगठ्याशत्रूंचा वध करण्यासाठी वा आत्महत्या करण्यासाठी वापरत. पीडा-निवारणार्थ नवग्रहांची विशिष्ट अंगठी वापरण्याची रूढी आहे. भारतीय भित्तिचित्रे आणि शिल्पांमध्ये अंगठी हे हस्तभूषण विविध आकार व प्रकारांत पाहावयास मिळते.

 

हस्तभूषणांमधील आणखी एक महत्त्वाचा सौभाग्यालंकार म्हणजे बांगडी होय. ऐतिहासिक दृष्ट्या बांगडी हा अलंकार प्राचीन आहे.काचेची, शंखाची, सोन्याची किंवा पितळेची बांगडी हा भारतात सर्वत्र वापरला जाणारा स्त्रियांचा अलंकार आहे. काही ठिकाणी हस्तिदंती व काशाच्या बांगड्याही वापरतात [→ बांगडी]. हाथफूल हा एक हस्तभूषणाचा प्रकार आहे. मुस्लिम धर्मीयांत विवाहाच्या वेळी हे भूषण परिधान करण्याची विशेष प्रथा आढळते. कालौघात हस्तभूषणांचे अनेक प्रकार कालबाह्य झालेले आहेत. धनुष्याची दोरी ताणताना व सोडताना डाव्या हाताला अपाय होऊ नये म्हणून धातूचा किंवा कातडी पट्टाहाताला गुंडाळीत. पुढे तोच अलंकार हस्तवाप म्हणून रूढ झाला होतापण आता हा अलंकार फारसा वापरात नाही. अलिकडे ‘ब्रेसलेट’ हे हस्तभूषण तरुण-तरुणींमध्ये विशेष प्रचलित आहे.

 

पहा : अलंकार बांगडी बाहुभूषणे सौभाग्यालंकार.

भटकर, जगतानंद