साडी : खास भारतीय स्त्रियांचा पारंपरिक, वैशिष्ट्यपूर्ण वस्त्रप्रकार. वस्तुतः साडी म्हणजे स्त्रियांनी कमरेभोवती गुंडाळून नेसण्याचे विशिष्ट लांबी रुंदीचे आयताकृती कापड होय. साडीची लांबी साधारणपणे ५ ते ९ वार (सु. पाच, साडेपाच वा आठ मी.) व रुंदी (उंची ) जवळजवळ ११२–११७ सेंमी. असते. स्त्रियांनी साडी वा तत्सदृश वस्त्र वापरण्याची प्रथा भारतात खूप प्राचीन काळापासून चालत आली आहे. शिशुनाग व नंद वंशांच्या काळी (इ. स. पू. ६४२–३२०) संस्कृतीचा विकास होऊ लागल्यावर स्त्रियांनी साडी परिधान करण्याच्या वेगवेगळ्या पद्घती व शैली सौंदर्यदृष्टीला अनुसरून निर्माण झाल्या. उदा., हस्तशौंडिक, मत्स्यवालक, चतुष्कर्गक, तालवृन्तक इत्यादी. इ. स. पू. दुसऱ्या शतकात स्त्रिया टाचेपर्यंत साडी, कमरेला गोंडेदार मेखला किंवा कमरपट्टा व अंगाखांद्यावर दुप्पटा घेत असत. सांची येथील शिल्पावरून स्त्रिया त्याकाळी सकच्छ (कासोट्यासह) लुगडी नेसत व कधी साडीचाच पदर कमरे भोवती गुंडाळून घेत, असे दिसते. गुप्तकाळात (इ. स. तिसरे–पाचवे शतक) स्त्रिया साडी, चादर, वैकक्ष (उपरणे) यांचा वापर करीत. त्यांच्या साड्यांवर फुलांचे व चिमण्यांचे भरतकाम केलेले असे. ऋतुमानानुसार वस्त्रे नेसण्याची प्रथा होती. त्यानुसार स्त्रिया वसंत ऋतूत केशरी साडी व तांबड्या रंगाचे स्तनपट्ट वापरीत. गुजरातमधील सध्याच्या प्रचलित पटोला ⇨पाटोळा  ह्या रेशमी रंगीबेरंगी साडीचे आद्यरूप ‘विचित्र पटोलक’ या नावाने ओळखले जाई. दक्षिण भारतातील स्त्रिया लाल रंगाचे रेशमी साडीसदृश वस्त्र नेसत. प्राचीन तमिळ साहित्यातील वेशभूषा-निर्देशांवरून तत्कालीन तमिळ स्त्रिया घोट्यापर्यंत पोहोचेल अशा तऱ्हेने साड्या नेसत. गांधारकालीन स्त्रिया घोट्यापर्यंत पोहोचणाऱ्या साड्या नेसून त्यांवर मेखला घालत व पुढच्या बाजूला खाली लोंबणारा एक पटका खोचत. दहाव्या शतकात मगध, ओदिशा, बंगाल इ. पूर्वेकडील प्रदेशांतील स्त्रिया लुगडे नेसत व त्याच्या एका पदराने वक्षस्थळ झाकून तोच पदर डोक्यावरून घेत. ह्याच काळात साडीबरोबर उत्तरीय वस्त्र म्हणून कंचुकी (चोळी) वापरण्याची पद्घतही सुरू झाली. अठराव्या शतकात मथुरेच्या पूर्वेकडील प्रदेशात स्त्रिया सहावारी साडी नेसत व तिचा पदर डोक्यावरून घेत. आणखी एका प्रकारात स्त्रिया घागरा नेसून त्यावर एक लहानशी साडी नेसत आणि डाव्या खांद्यावरून व डोक्यावरून पदर घेऊन तो उजव्या खांद्यावर आणत. त्या चोळीही घालत. पेशवाईतील स्त्रिया प्रसंगानुरूप लुगडी, साड्या, चिरड्या, पातळे, पितांबर, शालू, ⇨पैठणी   इ. प्रकारची वस्त्रे नेसत व अंगात चोळी घालत. महाराष्ट्रीयन स्त्रियांची नऊवारी साडी नेसण्याची पारंपरिक सकच्छ पद्घती अतिशय वैशिष्ट्यपूर्ण व रूबाबदार असून, त्यात कलात्मक रीत्या सर्वांग झाकले जाऊन देहसौष्ठव उठून दिसते. त्यात शालीनता व भारदस्तपणा असून, ती शरीर हालचालीस सुटसुटीत व योग्य पद्घती आहे [⟶ पोशाख व वेशभूषा खंड १०, पृ. १२३-१२४]. एकोणिसाव्या शतकात हिंदू स्त्रियांच्या नित्याच्या वापरात असलेल्या साड्यांमध्ये लाल वा हिरव्या रंगाचे रुंद काठ असलेली धारवाडी, माहेश्वरी, इरकली व नागपुरी लुगडी विशेष लोकप्रिय होती. त्या लुगड्यांच्या आतल्या अंगास वेगवेगळे गडद रंग, लहानमोठा रास्ता, लहानमोठा चौकडा किंवा उभा धागा एका रंगाचा व आडवा धागा वेगळ्या रंगाचा अशा प्रकारे दुरंगी (अंजिरी  वगैरे) पोत असे. त्यांना लाल किंवा हिरवा ‘टोपपदर’ (एकाच रंगाचा पदर) किंवा ‘गंडेरी’ (पट्ट्यापट्टयांचा पदर) असे. लग्नमुंजीसारख्या विशेषप्रसंगी शालू, पैठणी, काळी चंद्रकळा (पहा : विश्वकोश : खंड  ४, चित्रपत्र ३६) अशी ठेवणीतली भरजरी काठपदराची रेशमी पातळे नेसून त्यावर जरीच्या खणाची चोळी व वरती भरजरी ⇨शेला  पांघरीत. विसाव्या शतकात इचलकरंजी, कोईतूर, नागपूर, अहमदनगर, इंदूर वगैरे पेठांची वैशिष्ट्यपूर्ण प्रकारची ८० नंबरी, १०० नंबरी सुताची, लुगड्याहून तलम अशी यंत्रमागाची पातळे प्रचारात येऊ लागली. त्यांचे काठपदर रेशमी किंवा जरीच्या नक्षीचे असून लुगड्याहून ते लहान असत. हळुहळू निरनिराळ्या डिझाइनची छापील पातळे स्त्रियांच्या अंगावर झळकू लागली. साडीवर चोळीऐवजी ब्लाऊज घालण्याची फॅशन रूढ झाली. पुढे नऊवारी ऐवजी तरुण मुली व स्त्रिया पाच-सहावारी साड्या परकरावर नेसू लागल्या. ह्या पाच-सहावारी साड्या गोल पद्घतीने नेसल्या जातात. साडीचा पदर डाव्या खांद्यावरून पाठीमागे टाकला जातो. नाभीच्या जरा खाली साडी नेसण्याची फॅशनही रूढ आहे. गुजराती स्त्रिया परकरावर वा घागऱ्यावर पाच-सहावारी साडी गोल पद्घतीने नेसतात मात्र पदर महाराष्ट्रीयन स्त्रियांच्या उलट उजव्या खांद्यावरून घेऊन तो डावीकडे पाठीमागे नेऊन कमरेला खोचलेला असतो. त्यामुळे पदराचे डिझाइन समोरील भागावर दिसते. घरातून बाहेर पडताना डोक्यावरून पदर घेण्याची पद्घतही महाराष्ट्र-गुजरातमधील काही स्त्रियांमध्ये आढळते. आंध्रमधील स्त्रिया आठवारी लुगडे दोन-तीन प्रकारांनी नेसतात. तमिळ स्त्रियांचे लुगडे सात ते दहावार लांबीचे असते. कर्नाटक राज्यातील हुबळी, धारवाड, विजापूर या भागांत गडद रंगांतील सुती साड्या तयार होतात. इरकली साडी हा त्या भागात तयार होणारा विशेष प्रकार. आंध्र प्रदेशातील नारायणपेठ येथेही इरकली  धर्तीच्या तलम साड्या तयार होतात. तसेच तमिळनाडूतील कांजीवरम् रेशमी साड्या प्रसिद्घ आहेत. डाळिंबी लाल, मोराच्या मानेसारखा झळझळीत निळा, पोपटी हिरवा इ. आकर्षक रंगछटांमुळे ह्या साड्या महिलांमध्ये विशेष प्रिय आहेत. त्यातही आडव्या रेषांचा ‘रास्ता’ रचनाबंध जास्त प्रसिद्घ आहे. 

विवाहप्रसंगी नववधूला दिल्या जाणाऱ्या साड्यांना विशेष महत्त्व असून त्या बहुधा मौल्यवान, भरजरी, भपकेबाज व आकर्षक रंगसंगतीच्या असतात. बनारसी शालू नववधूला महावस्त्र म्हणून देण्याचीही प्रथा आहे. बनारसी शालूप्रमाणेच भरजरी पैठणीलाही ऐतिहासिक मान असून हे महावस्त्र ऐश्वर्याचे व वैभवाचे प्रतीक मानले जाते. वधूची एकतरी साडी हिरव्या रंगाची असावी, असाही प्रघात आहे. काही जातींत वधू लग्नप्रसंगी मामाने दिलेली नवीन जरीची व पिवळ्या रंगाची साडी (अष्टपुत्री-पटवस्त्र) गोल पद्घतीने नेसते. काही जातींत वधूची साडी पांढरी असून काठपदर पिवळ्या रंगाचे असतात. साडी वा काठपदर हळद लावून पिवळे करण्याची प्रथाही पूर्वी होती. बंगाली वधूच्या साडीवर दुर्गेचे नाव लिहिलेले असते. अलीकडे कृत्रिम धाग्याच्या उत्तम प्रतीच्या साडीवर जीग, सोनेरी वा रूपेरी टिकल्या, कलाबूत वगैरे वापरून काठपदर व अंग (पोत) यांमध्ये नक्षीकाम केलेली जरीसाडी लग्नविधीत वा वरातीप्रसंगी नववधू वापरतात. 

उपयुक्तता, सौंदर्यदृष्टी व वापरातील सुलभता यांनुसार काळाच्या ओघात साड्यांचे नवनवे विविध प्रकार व आधुनिक फॅशन निर्माण होत गेल्या आहेत. ज्या वस्त्रापासून साडी बनवली जाते ते वस्त्रप्रकार, साड्यांची उत्पादन केंद्रे, साड्यांचे नानाविध रंग व रंगछटा, काठपदर व पोत, साड्यांवरील आकृतिबंध व नक्षीकाम, साडी-सुशोभनाच्या अनेकविध पद्घती व तंत्रे ह्यांवरून निर्माण झालेले साड्यांचे अक्षरशः असंख्य नमुने व प्रकार सध्या बाजारात वस्त्रप्रावरणांच्या दुकानांतून उपलब्ध असतात व ते स्त्रियांना हरघडी आकृष्ट करीत असतात. सुती, सुती रेशमी, गर्भरेशमी, कृत्रिम रेशमी, नायलॉन, रेयॉन, शिफॉन, जॉर्जेट, ऑर्गंडी, ठाण, टसर, सॅटिन, टेरिकॉट, टेरिवायल, चिकन,वुली इ.असंख्य वस्त्रप्रकारांतील साड्या प्रचारात आहेत. त्यांतही पुन्हा जरीच्या, कटवर्कच्या, भरतकामादी कलाकुसरीने बनविलेल्या साड्याही वापरात आहेत.सोनसळी, कळसपानी, रुद्रकाठी, गोमीकाठी, नारळीकाठी, असावरीकाठी ही साड्यांना कलाकुसरीवरून दिली जाणारी काही नावे होत. चित्रपटतारकांच्या साड्याही फॅशन म्हणून काही काळ लोकप्रिय ठरतात (उदा., शोले साडी, पिंजरा साडी इ.).वाराणसीचे ⇨ किनखाब  (पहा : विश्वकोश : खंड ३, चित्रपत्र ४०), महाराष्ट्राची पैठणी (पहा : विश्वकोश : खंड १०, चित्रपत्र ३३), बंगाली ⇨ बालुचार (पहा : विश्वकोश : खंड ११, चित्रपत्र ५०), टांडाची (उत्तरप्रदेश) जामदानी [⟶ जामदानी कलाकाम], मध्य प्रदेशाची चंदेरी, गुजरात-राजस्थानची पाटोळा (पहा : विश्वकोश : खंड ९, चित्रपत्र ४८), ओरिसाची इक्कत, दक्षिणेकडील कोरनाद हे भारतातील काही उत्कृष्ट साडीप्रकार होत. खडीकाम केलेली महाराष्ट्राची चंद्रकळा, बांधणी व रंगणी तंत्राच्या साहाय्याने तयार करण्यात येणारी गुजरात-राजस्थानची बांधणी, सौराष्ट्राचा घरचोला, बिहारची सुंगडी, मध्यप्रदेशची चुनरी, दक्षिणेकडील ⇨कलमकारी, मलमलीवरील लखनवी चिकनकारी, ⇨बाटिककाम, ⇨फुलकरी, ⇨खडीकाम  इ. विविध सजावटी-तंत्रांनी सुशोभित व अलंकृत केलेल्या साड्याही स्त्रियांमध्ये विशेष प्रिय आहेत. भारतीय स्त्रियांचा हा अत्यंत आवडता वस्त्रप्रकार एक फॅशन म्हणून हळुहळू पौर्वात्य व पाश्चात्त्य देशांतील स्त्रियांमध्येही प्रसृत होऊ लागला आहे. (चित्रपत्रे).

पहा : पोशाख व वेशभूषा.  

इनामदार, श्री. दे.

येवला पैठणी : जरीपदरावरील नक्षीकाम.सुती पैठणी, मुंबई.रेशमी साडीचा नमुना, हैदराबाद, ११ वे शतक.चौकटी व काठपदरावर नक्षीकाम असलेली सुती साडी, ओदिशा.सुती साडीचा रेशमी काठपदर : कांचीपुरम्, तमिळनाडू.नीलांबरी जामदानी सुती साडीचा नमुना : वाराणसी, उ. प्रदेश.'दुहेरी ईकात' रेशीम विणकाम पद्धतीचा नमुना : पाटण, गुजरात.

दुटांगी प्रकारमहाराष्ट्रीयन नऊवारी साडीसर्वसाधारण

गुजराती

(गोल साडी प्रकार :)दुरंगी प्रकारकूर्गीकोळी प्रकारशकुंतला प्रकारबंगाली