दाढीचे विविध नमुने (१) सिंधुसंस्कृतिकालीन, इ. स. पू. ३०००-१५०० (२) ग्रीक, इ. स. पू. ४०० (३) ॲसिरियन, इ. स. पू. ८०० (४) चिनी, इ. स. ११४०-१२१० (५) बुंदी-राजपुती झुपकेदार मिशा, राजस्थान (६) मराठेकालीन (छत्रपती संभाजी राजे) (७) शीख (८) पश्चिमी ‘मटन चॉप्स’, १० वे शतक (९) मुसलमानी (१०) इंडोनेशियन (११) राजपुती (१२) पारशी.

दाढी : पुरुषांनी आपल्या चेहऱ्यावर दोन्ही गाल व हनुवटी यांवर विशिष्ट प्रकारे राखलेले केस म्हणजे दाढी व ओठावर वाढवितात त्या मिशा. विशिष्ट प्रकारची दाढी राखण्याची प्रथा प्राचीन काळापासून सर्वत्र आढळते. अशा प्रथा धार्मिक आदेश किंवा संकेत आणि समाजातील प्रतिष्ठेच्या कल्पना अथवा इतर प्रथा यांच्याशी निगडित असल्याचे दिसून येते. पौरुषाचे ठळक लक्षण म्हणूनही दाढी राखतात वा मिरवतात.

प्राचीन ईजिप्शियन समाजात पुरुषवर्ग दाढी राखत नसे. तथापि प्राचीन ज्यू समाजात मात्र लांबलचक दाढी राखण्याची पद्धत होती. मुहमंद पैगंबराच्या आदेशानुसार मुस्लिम लोक दाढी राखत परंतु ज्यू लोकांपेक्षा वेगळेपण दाखविण्यासाठी ती योग्य प्रकारे कापत असत. तत्त्वज्ञानी पुरुषाचे वा वीरपुरुषाचे लक्षण म्हणून प्राचीन ग्रीक लोकांत दाढीला प्रतिष्ठा होती. अलेक्झांडरने मात्र सैनिकांनी दाढी राखू नये, असा आदेश काढला होता. इ. स. पू. तिसऱ्या शतकानंतर रोमन लोकांत दाढी राखण्याची प्रथा बंद झाली. फार्च्युना बार्बेटा या देवतेला रोमन तरुण आपली पहिली दाढी कापून वाहत. अंत्यविधीचा एक भाग म्हणून प्राचीन ईजिप्शियन आणि रोमन लोक दाढी वाढवीत. उलट ग्रीक लोक ती कापत. रोमन समाजातील प्रथेचा परिणाम रोमन कॅथलिक पुरोहित वर्गावरही झाला, त्यामुळे हा वर्ग दाढी राखत नसे सोळाव्या आणि सतराव्या शतकांत मात्र रोमन कॅथलिक धर्मगुरूंत दाढी राखण्याची प्रथा सुरू झाली पण पुन्हा ती बंद पडली. तथापि ईस्टर्न ऑर्थोडॉक्स चर्चशी निगडित असलेले धर्मगुरू दाढी राखत. इंग्लंडमध्ये चौदाव्या शतकानंतर राजकुलातील लोकांत आणि समाजातही दाढी ठेवण्याची प्रथा लोकप्रिय होती. रशियात पीटर द ग्रेट याने १७०५ मध्ये दाढी राखणाऱ्यांवर करच बसविला होता. एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी दाढी राखण्याची पद्धत पुन्हा लोकप्रिय ठरली. दाढी हे क्रांतिकारक किंवा बंडखोर लोकांचे लक्षण समजले जाई. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यास यूरोपात दाढी राखणाऱ्यांना प्रतिष्ठा प्राप्त झाली. लेखक, कलावंत, विद्वान लोक इत्यादींत दाढी राखणे विशेष लोकप्रिय होते. दाढी राखणारा अमेरिकेचा पहिला अध्यक्ष म्हणजे अब्राहम लिंकन. विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून यूरोप–अमेरिकेत दाढीची फॅशन मागे पडली. दाढी राखलेले क्रांतिकारक बोल्शेव्हिक व अराजकतावादी हे व्यंगचित्रांतून सातत्याने चित्रित करण्यात आले. दुसऱ्या महायुद्धानंतर पश्चिमी देशांत लेखक, कलावंत आणि विशेषत: ‘बीटनिक’ इत्यादिकांत दाढी राखण्याची प्रथा पुन्हा लोकप्रिय ठरली.

गालांवरील केसांचा झुपका म्हणजे कल्ले किंवा गुलमिशा याही लोकप्रिय असल्याचे दिसून येते. इंग्लंडमध्ये व्हिक्टोरियन काळात विशेषतः १८४० ते १८७० च्या दरम्यान झुपकेदार कल्ले ‘मटन चॉप्स’ किंवा ‘पिकॅडिली वीपर्स’ म्हणून ओळखले जात. कल्ल्यांना इंग्रजीत असलेले ‘बर्नसाइड्‌स’ किंवा ‘साइडबर्न्‌स’ हे शब्द अमेरिकन यादवी युद्धातील जनरल अँब्रोझ बर्नसाइड याच्या नावावरून रूढ झाले आहे. हनुवटीवरील त्रिकोणी टोकदार दाढी तिसऱ्या नेपोलियनच्या आदरार्थ ‘इंपीरियल’ या नावाने ओळखली जाई. ऑस्ट्रियाचा सम्राट फ्रांट्‌स जोझेफ याच्या आदरार्थ मिशांमध्ये मिसळून जाणारे झुबकेदार कल्ले त्याच्याच नावाने ओळखले जातात. पुढे पुढे सामान्य नोकरवर्गापुरतीच कल्ले राखण्याची पद्धत मर्यादित झाली. विसाव्या शतकाच्या पहिल्या दोन दशकांपर्यंत पश्चिमी समाजात छोट्या मिशा राखणे लोकप्रिय होते.


भारतात दाढीची रूढी धर्माज्ञा म्हणून दिसत नसली, तरी मिशा राखण्याची चाल मात्र परंपरागत आहे. प्राचीन भारतीय ऋषिमुनी दाढीमिशा व जटा राखत असल्याचे दिसते. तसेच सिंधुसंस्कृतिकालीन पुरुषवर्गात मिशा राखण्याची प्रथा नसली, तरी विशिष्ट प्रकारे कापलेली दाढी ते राखीत. प्राचीन आर्यलोक दाढी ठेवीत नसल्याचे अनुमान केले जाते. त्या पुढील काळातील शिल्पे व चित्रे यांतूनही दाढी असलेले चेहरे अभावानेच दिसतात. बौद्ध व जैन धर्मीयांत मात्र दाढी राखण्याची प्रथा नव्हती व आजही नाही.

इतिहासकाळात भारतीयांनी दाढीमिशा राखल्याची उदाहरणे सापडतात. कदाचित सैनिकी प्रभावामुळेही दाढीचे अस्तित्व बळकट झाले असावे. मुसलमान लढवय्यांप्रमाणेच जाट, राजपूत व शीख या भारतीय लढाऊ ज्ञातींतही दाढी राखण्यात येऊ लागली. शीख लोक धर्माज्ञा म्हणूनच दाढी राखीत आणि आजही राखतात. ती ते एका कापडाने वा जाळीने बांधून ठेवतात. मराठ्यांत दाढी राखण्याची प्रथा सामान्यतः आढळत नसली, तरी स्वतः छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी राजे यांनी दाढी-मिशा राखल्या होत्या.

मोगल काळात तर दाढीचे प्रस्थ मोगल बादशहापासून सरदारदरकदारांपर्यंत बरेच वाढले होते परंतु अकबर बादशहा हा एकच दाढी न राखलेला बादशहा होता. त्याच्या पुढील काळात पुन्हा दाढी राखण्याच्या प्रथेने जोर धरला. एक तर धर्माज्ञा म्हणून आणि दुसरे म्हणजे मुसलमान शिखांहून वेगळे दिसावे म्हणून मुसलमानांनी चार बोटांपेक्षा अधिक लांबीची दाढी वाढवू नये, असा हुकूम औरंगजेबाने काढला होता. तत्कालीन उच्चभ्रू मुसलमान मिशी नसलेला वरचा ओठ, पण खाली गोलसर आकार दिलेली दाढी राखण्यात अभिमान बाळगीत असत. काही लोक मात्र दाढीची टोके गालाकडे वळवीत, तर काही ती गळ्यावर रुळत ठेवीत.

एकोणिसाव्या शतकाच्या मध्यातही भारतात दाढी राखण्याची प्रथा होती. सुलेमान शाह बादशहाच्या उत्तेजनामुळे अयोध्या आणि दिल्ली येथील दरबारी लोक आपल्या लांब दाढ्या वळवून घेत किंवा दाढीविरहित मिशांना पीळ भरण्यात भूषण मानीत. इंग्रजांच्या आगमनानंतर मात्र प्रारंभी सामान्यतः दाढी-मिशा न राखण्याकडे भारतीयांचा कल होता, तथापि या बाबतीत सतत लोकाभिरूची बदलत राहिल्याचे दिसते.

जाधव, रा. ग. जोशी, चंद्रहास