अलंकार : सामान्यतः सौंदर्यवर्धनासाठी अंगावर धारण केलेली मंडनवस्तू म्हणजे अलंकार. सौंदर्यवर्धनाची प्रवृत्ती मानवामध्ये उपजतच असते. धातूंचा शोध लागण्यापूर्वी मानव आपले शरीर रंगवून, गोंदवून सजवीत असे व शंख, शिंपले, कवड्या, पाने, फुले, फळे, वेलींचे देठ, नाना प्रकारच्या बिया, दगड, माती, मणी, दात, नखे, अस्थी, केस इ. वस्तू मूळ रूपात किंवा अलंकाररूपात वापरीत असे. अशा प्राथमिक अलंकारांत नैसर्गिक वस्तू, पशुपक्षी व इतर प्राणी यांच्या आकारांची प्रतिकृती असे ती आजच्याही कित्येक अलंकारांत दिसते. साधारणतः शरीरशोभनाबरोबरच धार्मिक विधी, देवदेवतांचा अनुग्रह, जादूटोणा यांसाठी, तसेच ग्रहपीडा, दृष्टबाधा, भूतपिशाच यांच्या निवारणासाठी मंगळसूत्र,

अंगठी, ताईत, तोडगा, कवच यांसारखे अलंकार वापरण्याची प्रथा आहे. भुताखेतांपासून संरक्षण व्हावे म्हणून आदिम मानव, शरीराच्या नाक, कान, डोळे, गळा, हातापायांची बोटे अशांसारख्या ज्या ज्या अवयवांना त्याच्या समजुतीनुसार भुताखेतांच्या संपर्काची भीती असे, त्या त्या अवयवांसाठी अलंकार वापरीत असे. साहजिकच हिंस्र पशूंचे दात, नखे व हाडे इत्यादींपासून बनविलेले अलंकार धैर्य व कर्तृत्व यांचे निदर्शक मानले जात. काही अलंकार प्रथम गरजेपोटी निर्माण झाले, पण गरज संपल्यावरही त्यांचा अलंकार म्हणून वापर चालूच राहिला. उदा., धनुष्याची दोरी ताणताना व सोडताना डाव्या हाताला अपाय होऊ नये म्हणून प्रथम धातूचा किंवा कातडी पट्टा हाताला गुंडाळीत. पुढे तोच ‘हस्तावाप’ अलंकार म्हणून रूढ झाला.

 

मानवाचे वाढते जीवनस्वास्थ्य व प्रगती यांच्या अनुषंगाने अलंकार-निर्मितीच्या तांत्रिक कौशल्यात भर पडत गेली. धातूंपासून अलंकार करण्यासाठी वस्तूंना भोके पाडणे, धातू वितळविणे, त्यांचा पत्रा ठोकणे, तार काढणे अशांसारख्या प्रक्रियांचा वापर केल्याने, अलंकारांना टिकाऊ स्वरूप आले. तंत्रतः अलंकारांचे ओवलेले, ओतीव, ठोकीव, तारकामाचे, ताशीव, कोरीव, उठावाचे, जडावाचे अम्‍ल-उत्कीर्णन असलेले, मिनेकारी असलेले व मुलामा दिलेले असे विविध प्रकार पडतात.

 

भरतमुनींच्या नाट्यशास्त्रात ‘आवेध्य’ म्हणजे किरीट, कुंडल इ., ‘बंधनीय’ म्हणजे फुले, गजरे इ., ‘क्षेप्य’ म्हणजे नूपुर, वलय इ. आणि ‘आरोप्य’ म्हणजे मोती, मणी इ. आभूषणे वर्णिली आहेत.

 

अविचलता, मोहक रंग व अभिप्रेत आकार घेण्याचे सौकर्य यांमुळे सोन्याला अलंकारनिर्मितीमध्ये प्राधान्य मिळाले. सोन्याप्रमाणेच रुपे, कथील, जस्त, तांबे इ. धातूंचाही अलंकारांसाठी वापर होऊ लागला. त्यामुळे अलंकारांना ऐहिक मूल्यही लाभले त्यांचा संग्रह वैभव, समृद्धी, दर्जा, प्रतिष्ठा, स्वास्थ्य व सुरक्षितता यांचे प्रतीक ठरला. अलंकारांची आवड स्त्रीपुरुषांमध्ये पूर्वापार असली, तरी हल्ली प्रामुख्याने स्त्रियाच अधिक अलंकार वापरतात. देशकालपरत्वे स्त्रिया, पुरुष व बालके यांच्या अलंकाररूपांत भिन्नता दिसते. बदलत्या अभिरुचीनुसार अलंकारांचे स्वरूपही बदलते. अलंकार व वेषभूषा यांचे साहचर्य सर्वत्र दिसून येते.

 

सु. चार हजार वर्षांपूर्वीचे प्राचीन अलंकार ईजिप्तमध्ये दुसरा सेन्युसर्ट याच्या पिरॅमिडमध्ये सापडले आहेत. तेथे सोन्याच्या किंवा चांदीच्या तारेचे अलंकार व पोवळे, गोमेद, पिरोजा वगैरे खड्यांचे जडावकाम विशेषत्वाने करीत. ईजिप्तमध्ये अलंकारांना धार्मिक महत्त्व असे. खाल्डियन लोक मुकुट,⇨कर्णभूषणे, अंगठ्या वगैरे अलंकार करण्यात प्रवीण होते. मेसोपोटेमियातील सुमेर, असिरियन वगैरे प्राचीन संस्कृतींतील अलंकार कलात्मक असून, त्यांवर जडावकाम व नक्षीकाम केलेले असे. प्राचीन क्रीट व मायसिनियन संस्कृतिकाळातील अलंकारांत उठावरेखन व

कोफ्तगारीतील तंत्रकौशल्य आढळते. ग्रीक, इट्‌रुस्कन व रोमन संस्कृतींतील अलंकारांत साम्य आढळते. ग्रीक अलंकारांत कर्णभूषणे, ⇨ कंठभूषणे, ⇨ कटिभूषणे, केशभूषणे, आकडे, अंगठ्या असे अनेक प्रकार असत. त्यांची नाजुकता व सौंदर्य अप्रतिम होते. त्यांत भौमितिक व नैसर्गिक आकारांचा वापर असे. इट्‌रुस्कन लोक उत्तम सोनार होते. सोन्याच्या तारेचे व रवे पाडलेले सुबक अलंकार करण्यात ते प्रवीण होते. रोमन अलंकार ग्रीक अलंकारांसारखेच, पण कमी सबुक व अनेक मौल्यवान रत्‍ने बसविलेली असत. बायझंटिन काळातील समृद्धी व भपका विविध आकारांची कर्णभूषणे, शिरपेच, कंकणे या त्यांच्या अलंकारांतही दिसून येतो. अँग्‍लो-सॅक्सन लोकांत सोन्याचे नक्षीकाम व तक्षण केलेली वक्षोभूषणे, अंगठ्या व पदके प्रचलित होती. या लोकांनी बायझंटिन लोकांपासून मिनेकारीची कला अवगत केली. मध्य युगात पुष्कळसे मौल्यवान अलंकार प्रार्थनामंदिरांसाठी केलेले असत.

 

प्राचीन काळात चीनमध्ये जडावकाम केलेले सोन्याचे अलंकार वापरीत. ताँग (६१८-९०६) व सूंग (९६०-१२७९) वंशांच्या काळात अलंकारांवर बोधचिन्हे असत. चौदाव्या शतकात अलंकारांवरील मुलाम्याचे काम रूढ होते. चिनी अलंकारांत चांदीचे नाजूक काम केलेले आढळते. केसांच्या आकड्यांवर तसेच बांगड्यांवर ‘ड्रॅगन’ किंवा अमरपक्षी यांचे आकार असत. तारकाम हे चिनी अलंकारांचे वैशिष्ट्य.

 

सोळाव्या शतकात इटलीतील अलंकार करण्याची कला तंत्रदृष्ट्या प्रगत होती. तेथे मोठ्या मोत्यांचे अलंकार जास्त वापरले जात. सतराव्या शतकात पैलू पाडलेले हिरे व माणके लहान कोंदणात बसविण्याची पद्धत रूढ होती. त्याचप्रमाणे नक्षीकाम, जडावकाम, मुलाम्याचे काम तसेच धातूंवर पशुपक्ष्यांच्या व मानवांच्या आकृती कोरण्याचे काम विविध प्रकारच्या अलंकारांत आढळते. १८९५ च्या सुमारास रने लालोक याने अलंकाराच्या घडणीत सोनारकाम, मुलाम्याचे काम, जडावकाम, नक्षीकाम इ. गोष्टी एकत्र करून अलंकारनिर्मितीची नवीनच पद्धत सुरू केली. त्यानुसार अलंकारांत मौल्यवान रत्‍ने पार्श्वभागी जडवून, पोवळी, गोमेद इ. साध्या जातीचे खडे प्रमुख जागी बसविण्याची प्रथा सुरू झाली. त्याने फ्रान्समध्ये चालू केलेली ही पद्धत इंग्‍लंड, जर्मनी, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड इ. ठिकाणीही प्रचलित झाली.

 कोलंबसपूर्व अमेरिकेत सर्व प्रकारच्या धातूंचे अलंकार प्रचलित होते. तेथील स्थानिक लोक सोन्यावरील तक्षणाप्रमाणेच हरितमण्यावरही तक्षण करीत असत. ते ओतीव सोन्याचे दागिनेही करीत.

 विसाव्या शतकात जपानी लोकांनी कृत्रिम मोत्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर सुरू केल्यामुळे मोत्याचे अलंकार जास्त रूढ झाले. या शतकात अवजड अलंकारांऐवजी कमी वजनाचे व सुटसुटीत अलंकार वापरणे लोकप्रिय झाले. अस्सल अलंकारांबरोबरच नकली अलंकार वापरण्याकडे कल वाढला. नकली अलंकार मौल्यवान अलंकारांइतकेच सुबक व आकर्षक असतात व खऱ्या अलंकारांतील रचनाकौशल्यही त्यांत आढळते. अलंकारनिर्मितीचे आता अनेक कारखाने निघाल्याने प्रचंड प्रमाणावर दागिन्यांची निर्मिती होत आहे. लंडन, पॅरिस, न्यूयॉर्क ही आधुनिक अलंकारनिर्मितीची केंद्रे आहेत. तरीही अजून विशिष्ट प्रकारचे मौल्यवान अलंकार हातानेच घडवितात. प्लॅटिनम या मौल्यवान धातूचा अलंकारनिर्मितीत उपयोग करण्यात येऊ लागला आहे.

 

भारतात वैदिक, रामायण व महाभारत-काळांत सुवर्णाचे व रत्‍नाचे अलंकार वापरीत असत. वेदोत्तर काळातील देवदेवता व स्त्रीपुरुष यांच्या अलंकारांचे अनेक वाङ्मयीन उल्लेख आढळतात. मोहें-जो-दडो व हडप्पा येथील उत्खननांत सोने, रुपे, तांबे, मणी व हाडे यांपासून केलेले स्त्रीपुरुषांचे अनेक अलंकार सापडले आहेत. लेण्यांतील मूर्तींच्या अलंकारांतही विविध नमुने आहेत. बौद्धकाळात मोत्यांचे अलंकार जास्त प्रमाणात वापरीत असत. कुशाण-काळातील तक्षशिला येथील अलंकार बरेच प्रगत दिसतात. विजयानगर राज्यातील स्त्रीपुरुष अनेक तऱ्हेचे मौल्यवान व कलाकुसरीचे अलंकार वापरीत. मोगल-काळात अलंकार करण्याच्या पद्धतीत सुधारणा झाली. मोगल बादशहांना रत्‍नांच्या अलंकारांचा विशेष षोक होता.

 

भारतातील प्रत्येक प्रांतात परंपरागत व रूढ अलंकार वापरण्याची पद्धत आहे. उत्तरेच्या डोंगराळ भागातील अलंकारांवर मध्य आशिया व तिबेट येथील अलंकारांची छाप दिसते. हिमाचल प्रदेशात पिरोजा व पोवळे बसविलेले चांदीचे अलंकार प्रचलित आहेत. नबाबांच्या काळातील लखनौ मिनेकारीसाठी प्रसिद्ध होते. उत्तर भारतातील अलंकारांवर मुसलमानी संस्कृतीचा परिणाम दिसून येतो. तेथील अलंकारांत तक्षण जास्त आढळते. कटक येथे पानाफुलांच्या नमुन्याचे, चांदीच्या तारेचे अलंकार आढळतात. आसामातील सोन्याचांदीचे अलंकार नाजूक असतात. ओरिसातील अलंकार वजनदार असतात. राजस्थानातील मुलाम्याचे काम केलेले अलंकार प्रसिद्ध आहेत. जयपूर येथे मुलाम्याचे काम करण्याची पद्धत सोळाव्या शतकात मानसिंगाच्या कारकीर्दीत सुरू झाली. संबळपूर येथे तांब्याचे अलंकार प्रचलित आहेत. केरळात सोन्याच्या अलंकारांचे विविध प्रकार आढळतात. तमिळनाडूमध्ये खऱ्याखोट्या हिऱ्‍यांचे अलंकार वापरतात.

 

महाराष्ट्रात विविध प्रकारचे सोन्याचांदीचे अलंकार वापरतात. महाराष्ट्रातील स्त्रिया गुलाबाचे फूल, बिंदू, बिजवरा, मूद, बुगड्या, बाळ्या, नथ, मोरणी, मंगळसूत्र, सरी, वज्रटीक, चंद्रहार, मोहनमाळ, लफ्फा, पाटल्या, गोठ, तोडे, वाक्या, जोडवी, मासोळ्या इ. अलंकार वापरतात. आधुनिक दागिन्यांवर पाश्चिमात्य अलंकारांची छाप दिसते. मुबंई, पुणे, कोल्हापूर, शाहपूर व सांगली या ठिकाणचे सोन्यामोत्यांचे व जडावाचे अलंकार प्रसिद्ध आहेत. 

 

संदर्भ : 1. Benda, Klement Neubert, K. and J. Trans. Urwin, I. Ornament and Jewellery,Prague, 1967.

          2. Bhushan, Jamila Brij, Indian Jewellery, Ornaments and Decorative Designs,Bombay, 1964.

          3. Hughes, Graham, Modern Jewellery, London, 1963. 4. Meyer, F. S.Handbook of Ornament, New York, 1957.

 

गोखले, कमल