केसांचे टोप : कृत्रिम केसांचे शिराच्छादन किंवा टोप. हे सामान्यतः मानवी केसांपासून बनवितात. क्वचित ते लोकरीपासून किंवा उंटाच्या केसांपासूनही बनवितात. सध्या नायलॉनचाही वापर होऊ लागला आहे. सौंदर्यप्रसाधनासाठी, रंगभूमीवरील वेशभूषेसाठी, टक्कलासारखे दोष लपविण्यासाठी व सामाजिक रूढी म्हणून केसांच्या टोपांचा वापर करण्याची चाल बरीच जुनी आहे. 

प्राचीन ईजिप्तमध्ये राजेरजवाडे व अधिकारी मानाचे प्रतीक म्हणून केसांचे टोप वापरीत. त्यांतील काही टोप तर रत्नजडित असत. ममींनासुद्धा अशा टोपांनी सुशोभित करीत. आशिया मायनरमध्ये प्रचलित असलेली ही पद्धती पर्शियामार्गे ग्रीसमध्ये आली, असे झेनोफन व ॲरिस्टॉटल यांच्या लिखणातून स्पष्ट होते. ग्रीक रंगभूमीवरील पात्रे विनोदात्मक वा शोकात्मक भूमिका वठविताना निरनिराळ्या प्रकारचे टोप व मुखवटे वापरीत. हीच प्रथा रोमन रंगभूमीवरही चालू होती. कृत्रिम केसांच्या वापरांची क्रीट लोकांनाही माहिती असल्याचे नॉससच्या भित्तिचित्रांतील काही मानवाकृतींवरून दिसून येते.

केसांच्या टोपांचे सहा नमुने

रोमन साम्राज्याच्या प्रारंभी केसांच्या टोपांचा वापर होऊ लागला. कार्थेजियन लोकांनाही ह्यांची माहिती होती. रोमनमधील फॅशनवेड्या स्त्रिया विविध प्रकारच्या टोपांचा वापर करीत. विशेषतः युद्धात पकडलेल्या स्त्रियांच्या केसांचे टोप करून ते वापरणे त्यांना विशेष आवडत असे. टोपांसाठी सोनेरी रंगाचे केस जर्मनीहून आणले जात, असेही उल्लेख आढळतात. त्या काळात खेडूत, खेळाडू व भिक्षुवर्ग कातडी किंवा लोकरीचे टोप वापरीत असत.

ख्रिस्ती धर्माच्या प्रारंभकाळात केसांचे टोप वापरण्यास चर्चची मान्यता नव्हती. परंतु लोकांच्या आवडीपुढे हे बंधन आपोआपच सैल झाले. इंग्लंडच्या पहिल्या एलिझाबेथ राणीजवळ (१५३३– १६०३) तर सु. ८० टोप होते. फ्रान्सच्या तेराव्या लुईने १६२४ मध्ये लांब केसांचा टोप स्वतःचे टक्कल लपविण्यासाठी वापरला व नंतर फॅशन म्हणून फान्समध्ये ही पद्धती रूढ झाली. दुसऱ्या चार्ल्सच्या कारकीर्दीपासून (१६६०–८५) इंग्लंडमध्ये ह्या चालीस जनमान्यता मिळू लागली, तर ॲन राणीच्या कारकीर्दीत (१७०२ –१४) ही प्रथा लोकप्रिय झाली. कुरळ्या केसांचे, मागे वेण्या असलेले, रंगीबेरंगी केसांचे असे विविध प्रकारचे व आकारांचे टोप तयार होऊ लागले. टोपांवर सुवासिक पावडरही मारण्याची पद्धत ह्या काळात प्रचलित होती. ह्याच वेळी अमेरीकन वसाहतींतही टोपांना मागणी येऊ लागली.

पॅरिसच्या लूव्ह्‌र संग्रहालयातील व्यक्तिशिल्पांवरील टोप बदलत्या फॅशनप्रमाणे बदलण्याची प्रथा होती. चर्चमधील बिशपवर्गात केसांचे टोप वापरण्याची प्रथा बऱ्याच काळपर्यंत चालू होती. पुढे फ्रान्स व अमेरिकन राज्यक्रांत्यांनंतर अनेक चालीरीतींबरोबर ही प्रथाही बंद पडली, हल्ली यूरोपीय देशांत असे टोप वापरण्याचा वैद्यकीय सल्ला टक्कल पडलेल्या व्यक्तींना दिला जातो. ब्रिटनमध्ये न्यायाधीश व बॅरिस्टर, शासकीय नियम म्हणून अजूनही असे टोप वापरतात. भारतातही ब्रिटिश अमदानीत न्यायाधीश असे टोप वापरीत असत.

हल्ली दूरचित्रवाणी, चित्रपट आणि रंगभूमी या क्षेत्रांत संबंधित व्यक्ती केसांचे टोप वापरतात. त्यामुळे केसांच्या टोपांच्या निर्मितीत आधुनिक तंत्राचाही वापर केला जात आहे.

दिवाकर, प्र. वि.