538"

बाळलेणी: बाळाचे अलंकार. बाळलेण्यांमध्ये प्रायः मनगट्या, बिंदल्या, कडी, अंगठी, मोडवाकी, हसळी, गोफ, साखळी, वाघनखे, बदाम, पैंजण, वाळे, चाळ, करगोटा, डूल, सुंकली, बिंदी, पिंपळपान व काजळतीट इत्यादींचा समावेश होतो. पुष्कळदा रंगीबेरंगी झबले, टोपडे, कुंची व लाळेरे यांचाही अंतर्भाव बाळलेण्यांत करण्याची प्रथा आढळून येते. [⟶ अलंकार].

सामान्यतः बारशाच्या दिवशी बाळाचे कान टोचून कानात सुंकल्या घालण्याची प्रथा आहे. या सुंकल्यांत सोन्याच्या तारेत मोती अडकविलेले असतात. याच वेळी पायात तांब्याचे वा पंचधातूचे वाळे आणि हातात सोन्याचा मणी असलेल्या काळ्या पोतीच्या मनगट्या घालण्यात येतात. पिळाच्या वाळ्याचा वापर सार्वत्रिक असल्याचे दिसते. तांबे, चांदी वा पंचधातूच्या चार तारांना एकत्रित पीळ घालून घोट्याच्या आकाराचा वाळा तयार करण्यात येतो. त्याला तीन ठिकाणी घागऱ्या व तोंडाशी दोन बाजूंना मोगरे केलेले असतात.

मूल थोडे मोठे होऊन रांगू लागले की, त्याच्या पायात रुप्याच्या साखळ्या, घागऱ्या बसविलेले चाळ, पैंजण कमरेत सोन्या-रुप्याचा करगोटा वा बदाम असलेली तीन पदरी साखळी कानात सोन्याचे खडे बसवलेले डूल हातात सुवर्णाच्या बिंदल्या वा कडी व बोटात अंगठ्या घालण्यात येतात. बोटांतील या अंगठ्या पडू नयेत म्हणून त्या बिंदल्या ज्या साखळ्यांनी जोडलेल्या असतात त्यांना चुटक्या म्हणतात. पुष्कळदा बाळाच्या भाळावर टोपड्याला गुंफून सुवर्णाची बिंदी वा पिंपळपानही लावण्यात येते. गळ्यात घालण्यात येणारा सुवर्ण गोफ, हसळी वा साखळी नेहमी न वापरता त्याऐवजी साध्या काळ्या दोऱ्याच्या गोफात सुवर्णाचा बदाम, देवदेवतांच्या प्रतिमा असलेले ताईत-पेट्या वा मंतरलेले ताईत किंवा वाघनखे घालण्याची प्रथा आहे. विशेषप्रसंगी दंडावर मोडवाकीही घालतात.

या सर्वच दागिन्यांवर कलाकुसर केलेली असली, तरी ती फार गुंतागुंतीची नसते. अनेकदा पेट्या, ताईत यांसारख्या बाळलेण्यांवर वेगवेगळ्या प्रतिमा उठविलेल्या असतात. साधेपणा, हलकेपणा, नाजुकपणा व ढोबळ आकार ही बाळलेण्यांची सर्वसाधारण वैशिष्ट्ये होत.

जोशी, चंद्रहास