शिरोभूषणे व शिरोवेष्टने : सामान्यत: संरक्षण, सुशोभन, तसेच व्यवसायविशिष्ट संसूचन यांसारख्या अनेकविध उद्दिष्टांनी, स्त्री-पुरुषांनी डोक्यावर परिधान केलेली आवरणे वा अलंकार. प्राचीन काळापासून शिरोभूषणे व वेष्टने हा स्त्री-पुरुषांच्या वेषभूषेचा एक महत्त्वाचा व वैशिष्ट्यपूर्ण घटक समजला जातो. विशिष्ट विधी, सण वा उत्सवप्रसंगी विशेषत्वाने शिरोभूषणे वापारण्याची प्रथा प्राचीन काळापासून रूढ आहे. विशिष्ट प्रदेशातील हवामान, उपलब्ध साधनसामग्री, धर्म व रूढी, रीतिरिवाज व वेषभूषेतील वेधक पद्धती (फॅशन) यांनुसार शिरोवेष्टने व भूषणे यांच्या असंख्य शैली व आकार-प्रकार वेगवेगळ्या कालखंडात व जगभरातील वेगवेगळ्या प्रदेशांत निर्माण झाल्याचे दिसून येते. जवळजवळ सर्वच प्रकारची साधन-सामग्री (उदा., लोकर, कापड, धातू, गवत, प्राण्यांची शिंगे, काच, रत्ने, पिसे, फुले, फिती, संश्लेषित पदार्थ इ.) निरनिराळ्या शिरोवेष्टनांच्या निर्मितीत व सजावटीत वापरली गेल्याचे आढळून येते. संरक्षक व सुशोभित शिरोवेष्टनांत वेगवेगळ्या आकार-प्रकारांच्या हॅट, टोप्या, पगड्या, पागोटी, फेटे, डोक्याला बांधावयाचे रुमाल, फिती, पट्टे व अन्य शीर्षाच्छादने, ⇨ शिरस्त्राणे इत्यादींचा समावेश होतो. कृत्रिम ⇨ केसांचे टोप, बुरखे आदींचा वापरही डोक्याच्या संरक्षणार्थ व सुशोभनार्थ केला जातो.

सर्वांत आद्य शिरोभूषणांचा प्रकार म्हणजे ⇨ केशभूषेच्या विविध शैली, असे म्हणता येईल. आदिम लोक केसांना मातीचा लेप लावून आपला पराक्रम व गुणवैशिष्ट्ये दाखविण्याकरिता त्यांत विजयचिन्हे व पदके लावत. पिसांचे गुच्छ वा मुकुट केसांत खोवण्याची प्रथा वन्य लोकांत होती. जाळीने वा झिरझिरीत वस्त्राने केस झाकणे, तसेच हिरे, मोती, पिना, पिसे, रंगीबेरंगी फिती, कृत्रिम वा नैसर्गिक फुले यांनी केसांची सजावट करणे, हे प्राचीन काळातील शिरोभूषणांचे प्रकार होत. रोमन व मध्ययुगीन स्त्रिया आकर्षक केशरचना करून त्यावरून पातळसे कापड वा घुंघट घालत. स्त्रियांनी घुंघट घालण्याची प्रथा युरोपमध्ये चौदाव्या शतकापर्यंत रूढ होती. मुस्लीम स्त्रियांमध्ये विनयशीलतेचा सूचक असा बुरखा डोक्यावरून पांघरण्याची प्रथा आहे.

प्राचीन काळात शिरोवेष्टने मुख्यतः प्रतिकूल हवामानापासून संरक्षणाच्या उद्देशाने वापरण्यास सुरुवात झाली असावी. संरक्षणाचा हा प्रधान हेतू पुढेही काळाच्या ओघात टिकून राहिला. उदा., कडक हिवाळ्यातील थंडीपासून संरक्षण व्हावे, म्हणून उबदार लोकरीची, डोक्याला घट्ट बसणारी हॅट रशियन शेतकरी वापरतात. उत्तर युरोपमधील लॅप जमातीचे लोक थंड हवामानापासून संरक्षण व्हावे, म्हणून डोक्याभोवती घट्ट बसणाऱ्या  लोकरीच्या कानटोप्या वापरतात. दक्षिण अमेरिकेतील गुराखी आपल्या जमातीच्या पारंपरिक रिवाजानुसार ‘गोशो’ ही फेल्ट हॅट वापरतात, तर उत्तर अमेरिकेतील गुराखी मात्र कडक उन्हाळ्यापासून संरक्षण व्हावे, म्हणून रुंद, पसरट कडांची हॅट वापरतात. मेक्सिकन लोक ‘सोंब्रेरो’ नावाच्या अशाच प्रकारच्या हॅट कडक उन्हाळ्यात संरक्षणार्थ वापरतात. त्या नमदा वा गवत यांपासून बनविलेल्या असतात. पावसाळ्यात संरक्षणार्थ पावसाळी टोप्या वापरण्याची पद्धत तर सररास रूढ आहे. डोक्याचे संरक्षक साधन म्हणून शिरोवेष्टनांचा वापर काही विशिष्ट पेशांत, व्यवसायांत व क्रीडाप्रकारांत अनिवार्यपणे केला जातो. उदा., खाण-कामगार, बांधकाम-मजूर, अग्निशामक दलातील कर्मचारी, लष्करातील सैनिक वगैरे व्यक्ती डोक्याला इजा होऊ नये, म्हणून धातूची वा प्लॅस्टिकची शिरस्त्राणे वापरतात. कित्येकदा विशिष्ट शिरोवेष्टने ही ती वापरणाऱ्या व्यक्तीची सामाजिक प्रतिष्ठा, दर्जा, आर्थिक स्थिती, व्यवसाय, वंश, धर्म, राजकीय विचारसरणी, वैवाहिक स्थिती यांची निदर्शक असतात. विशेषत: औद्योगिकीकरणपूर्व समाजात हे दिसून येते. उदा., जगभर सर्वच राजे वा राज्यकर्ते हे साधारणपणे मुकुट परिधान करीत. योद्धे शिरस्त्राण वापरीत, धर्मगुरू हे ‘माइटर’ (बिशपाचा उंच मुकुट) वा टिआरा (पोपचा उभट मुकुट) वापरत. शेफची हॅट व परिचारिकेची (नर्सची) कॅप ही त्यांच्या विशिष्ट व्यवसायाची निदर्शक आहेत. युरोपमधील महाविद्यालयीन व विद्यापीठीय विद्यार्थी हे सामान्यतः ‘मॉर्टरबोर्ड’ (कडक व चपटी, झालरयुक्त हॅट) वापरतात. सर्कशीतील विदूषक रंगीबेरंगी, शंक्वाकार, गमतीदार टोप्या वापरतात. ‘अमीश’ या धार्मिक पंथात वापरल्या जाणाऱ्या टोप्यांची उंची व त्यांच्या कडांची रुंदी यांवरून त्या वापरणारा विवाहित की अविवाहित ते कळते.

सौंदर्यदृष्टीने शिरोभूषणांची निर्मिती व वापर करण्याची प्रवृत्ती साधारणतः चौदाव्या शतकापासून वाढीस लागली. त्यातून शिरोवेष्टनांचे व भूषणांचे नानाविध प्रकार व शैली विकसित झाल्या. व्यक्तीच्या चेहऱ्याला व व्यक्तिमत्वाला उठाव देऊन आकर्षकतेत भर घालणाऱ्या शिरेभूषणांना वेषभूषेत खास स्थान प्राप्त झाले. परकीय शिरोभूषणांचे अनुकरण वा उसनवारी करण्याची प्रवृत्तीही वाढीस लागली. उदा., चौदाव्या-पंधराव्या शतकांत पश्चिम युरोपमधील स्त्रिया पागोटेवजा हॅट वापरत असत. पौर्वात्य देशांतील पुरुषांची ही शिरोवेष्टन-शैली आत्मसात करून त्यांनी तशा प्रकारच्या हॅट प्रचारात आणल्या. पंधराव्या शतकातील युरोपीय स्त्रिया ‘हेनिन’ नामक उंच कोनाकृती हॅट वापरत असत. त्यांची उंची १ ते १·२ मी. असून त्यांना तरंगते, लांबलचक, जाळीदार आच्छादन असे. अठराव्या शतकात स्त्री-पुरुषांमध्ये ‘गेन्झबरो हॅट’ खूपच लोकप्रिय होती. तिला रुंद कडा असून ती रंगीबेरंगी पिसे व फिती लावून सजविलेली असे. विसाव्या शतकात अधिक प्रमाणात शिरोवेष्टनाच्या विविध व अभिनव शैली प्रचारात आल्या. १९२० च्या दशकात स्त्रिया ‘क्लोश’ नामक घंटाकृती, नमत्या कडांच्या हॅट वापरत असत. १९३० च्या दशकात ही टूम मागे पडून ‘हर्लेक्विन’ (रुंद व ऊर्ध्ववक्र कडांच्या) हॅट वापरण्याची प्रथा लोकप्रिय झाली. १९४० व १९५० या दशकांत नानाविध शैलींची व आकार-प्रकारांची शिरोवेष्टने स्त्री-पुरुषांत प्रचलित होती. १९६० च्या दशकापासून मात्र शिरोवेष्टनांच्या लोकप्रियतेला काहीशी ओहोटी लागलेली दिसून येते.

पौर्वात्य इराणी व अन्य मुस्लीम समाजांत पुरुष डोक्यावर फैज टोपी, किंवा भारतीय पद्धतीचा फेटा वापरत व तो कित्येकदा फैज टोपी भोवतीही गुंडाळत. फैज टोपी शंकूच्या आकाराची व उंच असे. इराणमध्ये १९२७ च्या सुमारास ‘टार्बूश’ नावाची लाल हॅट वापरात होती. तिची जागा नंतर ‘पहलवी’ हॅटने घेतली. ती १९३५ मध्ये मागे पडून तिच्या ऐवजी ‘फेडोरा’ ही देशोदेशी वापरात असलेली मऊ फेल्ट हॅट प्रचारात आली. अरब लोक सुती टोपी घालून मग डोक्याभोवती विशिष्ट प्रकारचे कापड गुंडाळत व त्याचे पदर दोन्ही खांद्यांवर रुळतील असे राखून कपाळाच्या वरच्या बाजूने काळ्या लोकरी पट्टीने हे शिरोवस्त्र बांधत. वालुकामय प्रदेशातील तीव्र उन्हाच्या झळा व वाळूची वादळे यांपासून शिरोभागाचे रक्षण करण्यासाठी ही पद्धती उपयुक्त होती.

चिनी पुरुष पंखासारख्या कडांची काळी हॅट वापरत. शेतकरी स्त्री-पुरुष खुल्या जागी काम करताना गवती हॅट वापरत. चिनी पुरुषाच्या हॅटवरची अलंकृत बटणे, ही त्याच्या सामाजिक दर्जाची निदर्शक मानली जात. जपानी पुरुष इ. स. आठव्या ते बाराव्या शतकांत कडक कडांची व काळ्या फिती लावलेली रेशमी हॅट वापरत.


 भारतात प्राचीन काळापासून अनेकविध प्रकारची शिरोभूषणे व शिरोवेष्टने वापरात असल्याचे दिसून येते. राजमुकुटसदृश टोपी, गोल किनारयुक्त टोपी, अर्धखंडित झालरयुक्त टोपी, वरील बाजूकडे निमुळती टोपी अशा अनेक प्रकारच्या टोप्या पुरुषांमध्ये प्राचीन काळी वापरात होत्या. काहीवेळा स्त्रिया जाळीदार टोप्या, तर मुले जरीच्या वा रेशमी बंदाच्या टोप्या वापरत असत. पुरुषांमध्ये अंडाकार हंगेरियन काळी टोपी ब्रिटिशांच्या प्रभावातून लोकप्रिय झाली. स्वातंत्रपूर्व काळात देशभक्तीचे प्रतीक म्हणून खादीची गांधी टोपी प्रचारात आली. ती राष्ट्रीय कॉंग्रेसचे प्रतीक होती. पांढरी उभट भैय्या टोपी उत्तरेकडील काही भागात अद्यापही प्रचलित आहे. ‘उष्णीषा’ चा (पगडी) सर्वप्रथम उल्लेख अथर्ववेदात तसेच शतपथ ब्राह्मणात आला असून तिचा वापर यज्ञप्रसंगी राजा व व्रात्य (योग्य वयात मुंज न झालेला) करीत असल्याचे आढळते. सम्राज्ञी इंद्रायणीनेही ‘उष्णीषा’ चा वापर केल्याचा उल्लेख शतपथ ब्राह्मणात आढळतो. चक्करदार पगडी, हलकी पगडी, शीर्षपट्टयुक्त पगडी, शंखाकार पगडी इ. विविध पगड्या (इ. स. पू. दुसरे शतक) पुरुषांच्या वापरात असत. सामंतांच्या पोशाखात रत्नजडित मुकुटाचा अंतर्भाव असे.

भारतीय पेहरावावर अकराव्या शतकापासून ते अठराव्या शतकापर्यंत साधारणतः मुस्लीम पोशाखपद्धतीचा प्रभाव होता. त्यातून फैज टोप्यांचा प्रचार वाढला. पंजाब, राजस्थान, गुजरात व वायव्य प्रदेशांत मोगली तसेच राजस्थानी पद्धतीच्या पगडया विशेषत्वाने प्रचलित होत्या. या प्रदेशातील ब्राह्मण नडियादी गडद लाल रंगाचा फेटा बांधत. सर्वसामान्य पंजाबी स्त्रिया डोक्यावरून दुपट्टा घेत. संन्यासी लोक काशाच्या रंगाचा, आणि खानदानी मराठा लोक केशरी रंगाचा पटका बांधीत. ब्राह्मण पगडी घालीत, तर मराठा, माळी व इतर जातींचे पुरुष पागोटे वापरीत. पगडी गोलाकार, लाल रंगाची व बांधीव असून रचनेवरून तिचे विशिष्ट प्रकार पडत. पागोटे लांबट चौकोनी किंवा त्रिकोनाकृती व बांधीव असे. महाराष्ट्रीय पुरुष पागोटे, तिवट (पागोटयाचा प्रकार), पटका, मंदील, फेटा, बत्ती (उभे फाडलेले अर्धे पागोटे) यांपैकी काही ना काही शिरोवेष्टन वापरत. सरदार व श्रीमंत लोकांच्या पागोट्यावर तुरा, शिरपेच व कलगी असे.

मारवाडी पुरुषांमध्ये वेगवेगळ्या नमुन्यांची पागरी नामक पागोटी परंपरेने रूढ होती. एकोणिसाव्या शतकात सिंधमधील हैदराबादचे मीर लोक तलम व जाळीदार अशा सु. ७३ मी. लांबीच्या वस्त्राचा भला मोठा, सुंदर फेटा बांधत.

फेटा बांधण्याच्या दोन पद्धती रूढ होत्या. एक म्हणजे पटका बांधणे, पटका हा सामन्यतः एक फूट रुंद (सु. ०·३० मी.) व बावन्न फूट (सु. १५·८५ मी.) लांब असतो. यात एका बाजूच्या घड्या दुसऱ्या बाजूच्या घड्यांपेक्षा उंच झालेल्या असतात. सबंध फेट्याचा आकार एका बाजूला थोडा झुकलेला व दुसऱ्या बाजूला बसकट असून त्याने एक कान झाकला जातो. त्याचा एक शेव तुऱ्यासारखा वर ठेवतात किंवा आत खोचतात. दुसरा शेव नेहमी मानेवरून पाठीवर, लांब घडयांसह सोडतात. ही शेमलाची (शेव) पद्धत बहुतेक खानदानी मराठ्यांत किंवा राजपूत लोकांत रूढ आहे. दुसरी पद्धत म्हणजे रुमाल बांधणे. हा रुमाल १२ X १२ फूट (३·६५ X ३·६५ मी.) असा लांब-रुंद असतो. त्याच्या दोन्ही बाजूंच्या घड्या सारख्याच उंचीच्या असतात. दोन्ही शेव आत खोचले जातात. नेहमीच्या वापरात पांढरा, अबोली किंवा गुलाबी रंगाचा रुमाल असतो. विशेषप्रसंगी जरीकाठी पांढरा वा रंगीत रुमाल वापरला जातो.

एकोणिसाव्या-विसाव्या शतकांत ब्रिटिशांच्या प्रभावातून सुशिक्षित भारतीय पुरुषांच्या पोशाखांत पाश्चात्त्य पद्धतीचा सूट व डोक्यावर मात्र पुणेरी पगडी असा विचित्र संकरही दिसत असे. नंतरच्या काळात वेगवेगळ्या प्रकारच्या हॅट, हंगेरियन टोप्याही वापरात आल्या. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धानंतर शिरोवेष्टने वापरण्याचे प्रमाण भारतातही खूपच कमी होत गेल्याचे दिसून येते.

पहा : पोशाख व वेषभूषा शिरस्त्राण.

इनामदार, श्री. दे. मिसार, म. व्यं.

 

महाराष्ट्रातील शाही शिरोभूषणे, १७ वे - २० वे शतकमहाराष्ट्रातील शाही शिरोभूषणे, १७ वे - २० वे शतकशाही शिरोभूषणे :१ विवाहप्रसंगीचा मुकुट, रशिया. २. रत्नजडित सुवर्ण मुकुट, डेन्मार्क, १७ वे शतक, ३. राज्यभिषेकाचा ऐतिहासिक मुकुट, ग्रे. ब्रिटन. ४. ब्रिटिश राजमुकुट. अन्य शिरोभुषणे : ५. दक्षिण भारतातील पारंपारिक नृत्यातील मुकुट. ६. नववधूचे शिरोभूषण, एस्टोनिया.


शिरोवेष्टनांचे काही वैशिष्ट्यपूर्ण प्रकार