अंगठी : हाताच्या कोणत्याही बोटात वापरण्याचा वळेवजा अलंकार. केवळ गोलाकार अंगठ्यांप्रमाणेच, पृष्ठभागी कोंदण करून त्यात खडा बसविलेल्या वा नुसत्या सपाट पृष्ठभागाच्याही अंगठ्या असतात. सामान्यत: सोने, चांदी, रुपे, प्लॅटिनम, ब्राँझ वगैरे धातूंपासून अंगठ्या करतात. प्राचीन काळी त्या माती, गवत, जनावरांची शिंगे वगैरेंपासून करीत. त्या जड व ओबडधोबड असत. कालांतराने त्यांचा आकार नाजूक व सुबक आणि घडण कलात्मक व नक्षीदार झाली. ईजिप्तमधील थडग्यांत सापडलेल्या, शेणकिडा (स्कॅरब) बसविलेल्या अंगठ्या सर्वांत जुन्या मानतात. सूर्याच्या अखंड गतीचा व शाश्वत मानवी जीवनाचा द्योतक समजला जाणारा हा किडा पवित्र मानीत. प्रथम प्रत्यक्ष किड्याला भोक पाडून त्यातून फिरती सोन्याची कडी ओवून अंगठी बनवीत. नंतर त्या आकाराच्या धातूच्या अंगठ्या बनविल्या जाऊ लागल्या. ओळखपत्र, मोहोर किंवा शिक्का म्हणून अंगठीचा वापर करीत. अशाच अंगठ्या फिनिशियन व इट्‌रुस्कन लोकही वापरीत. इट्‌रुस्कन अंगठ्या आकाराने मोठ्या असत. प्राचीन ग्रीक समाजात सुंदर नक्षीकाम केलेल्या सोन्याच्या अंगठ्या वापरण्याची प्रथा होती. रोममध्ये अंगठ्या वापरण्यासंबंधी असलेल्या कायद्यानुसार स्वतंत्र नागरिक सोन्याच्या, मुक्त गुलाम चांदीच्या व गुलाम फक्त लोखंडाच्याच अंगठ्या वापरीत. कालमानानुसार केवळ हस्तभूषणाखेरीज अंगठीचा अन्य उद्देशांनीही वापर झाल्याचे दिसून येते. अंगठीच्या सपाट पृष्ठभागावर वापरणाराचे नाव, पदवी, बोधपर वचने किंवा प्रेमदर्शक शब्द कोरण्याची प्रथा पुरातन कालापासून रूढ आहे. तसेच त्यावर अधिकारचिन्हे कोरून त्यांचा उपयोग शिक्क्यासारखा करीत. रोमन राज्यकर्ते हिरकणीच्या विषारी अंगठ्या शत्रुनाशासाठी वा आत्महत्येसाठी वापरीत. मंतरलेल्या अंगठ्या वापरल्यास भूतपिशाचबाधा होत नाही, असा समज अद्यापही रूढ आहे. मध्ययुगीन अंगठ्यांवर गूढ विद्येतील सामर्थ्यवान मंत्र खोदले जात. वाङ्‍‍निश्चयाच्या अंगठ्यांची प्रथा ईजिप्शियन, ग्रीक व रोमन लोकांनी पाडली. दुसऱ्या शतकापासून ख्रिस्ती लोकांनी ती अधिक रूढ केली. विवाहाच्या अंगठीचा उगमही यातच संभवतो. नवीन होणाऱ्या ख्रिस्ती धर्मगुरूला (बिशप) धर्मदंडाबरोबर मानचिन्हादाखल अंगठी देत. पंधराव्या शतकात हिऱ्याच्या अंगठीला महत्त्व आले. सोळाव्या शतकात हाताच्या प्रत्येक बोटात व निरनिराळ्या पेऱ्यांवर अंगठ्या वापरीत. भारतात ऋग्वेदकाली अंगठीला ‘खादि’ म्हणत. दुरितनिवारणार्थ, श्राद्धकर्माच्या अगर इतर धार्मिक कृत्यांच्या वेळी अंगठीवजा दर्भाची पवित्रके घालण्यासाठी प्रथा प्रचीन काळापासून अद्यापही रूढ आहे. नवग्रहांच्या पीडानिवारणार्थ प्रत्येक ग्रहाची विशिष्ट रंगाच्या खड्याची अंगठी वा नवग्रहांची एकच अंगठी वापरण्याची प्रथा आहे. मोहोरेची अंगठी प्रामुख्याने स्त्रियाच वापरताना दिसतात.रामायण,महाभारत,अभिज्ञान,शांकुतलव इतर संस्कृत साहित्यात अंगठीचा उपयोग पतिपत्नींनी परस्परांच्या संकेतासाठी केलेला दिसतो. भारतीय चित्र, शिल्प आदी कलांमध्ये (उदा., अजिंठा-वेरूळची लेणी वगैरेंमध्ये) हा अलंकार निदर्शनास येतो.

गोखले, कमल