पादभूषणे : पायात घालावयाचे अलंकार. पादभूषणांचा वापर प्रामुख्याने स्त्रियाच करतात. काही पादभूषणे पुरुषांची असल्याचेही दिसून येते. पादभूषणे सामान्यतः दोन प्रकारची असतात. एक म्हणजे जोडवी, विरोद्या (ल्या) यांसारखी पायाच्या बोटात घालावयाची आणि दुसरी म्हणजे पैंजण, वाळे, तोडे यांसारखी घोट्याच्या वर घालावयाची.

प्राचीन ईजिप्शियन पादभूषणे बहुधा वजनी असत. ती अर्धवर्तुळाकार चापासारखी असावीत, असे तत्कालीन भित्तिचित्रांवरून दिसते. त्यांवर वेगवेगळ्या रंगांचे मणी ओवून ते सुशोभित करीत. उत्तर काळात चित्रवेलिचे तसेच चित्रलिपीचे आकर्षक आकृतिबंध मण्यांच्या गुंफणीतून साधले जात.

भारतामध्ये अगदी प्राचीन काळापासूनच पादभूषणांचा वापर करण्यात येत असल्याचे उल्लेख आढळतात. भारतातील प्राचीन शिल्पाकृतींतून स्त्री-पुरुषांच्या पादभूषणांचे विविध प्रकार आढळतात. यांतील काही पादभूषणे आकाराने मोठी व वजनदार असून काही रत्नजडित असल्याचे दिसते. कहींना घंटिकाही लावलेल्या आढळतात. भारतीय पादभूषणांत बारीक नक्षीकाम अधिक आढळते. पादभूषणांचे विविध प्रकार रूढ असल्याचे दिसते, उदा., पादचूड हा रत्नजडित सुवर्णाचा वाळा असतो तर पादकंटक हा तीन चौकोनी शिरांचा तिकोनी वाळा असतो. त्याचप्रमाणे पादपद्म (चरणचाप वा चरमपद्म) हा तीन किंवा पाच सोनेरी साखळ्यांच्या जडावाचा असून मुद्रिका हा अलंकार सुवर्णावर तांबडा रंग दिलेला व घुंगराप्रमाणे वाजणारा असतो. किंकिणी हे केवळ सोन्याचे एक साधे पैंजण असते, तर नुपूर हे एक प्रकारचे चाळ असून ते प्राचीन काळी सोन्याचे करीत असत व ते घरंदाज स्त्रियाही वापरीत. चांदीचे वा पितळेचे नुपूरही आढळतात.

चरणचांद : बंगाल-बिहारमधील वैशिष्ट्यपूर्ण पादभूषण

यांखेरीज घागऱ्या लावलेले चांदीचे ‘पायेझ’, पावलावर रुंद साखळ्या पडणारा ‘चारा’, भौमितिक आकार असलेले तोडे, पायातील तोड्यांना जोडलेले गोल पदक, पावलाच्या मधोमध राहील असा साखळ्यांनी जोडलेला चंद्र व बदाम असलेले ‘चरणचांद’ अशी अनेक पादभूषणे प्राचीन काळापासून भारताच्या विविध भागांत प्रचलित आहेत. त्यांच्या बनावटीत आणि आकारप्रकारांत प्रादेशिक विविधतेचा ठसा उमटलेला असतो, तर कधी धार्मिक अथवा सांस्कृतिक प्रतीकात्मकताही आढळते. त्यामुळेच त्यांना सागकारा, चौदाना-की-निओरी, बालकत-तारा, हिरा-नुमाकारा, औनला भात, साखळ्या, तोरड्या, तोडे, पैंजण, वाळे, गोलमाल, गुजरी, बेंकी, बंकमाळ, जोरनमाळ, पंजर इ. विविध नावे दिलेली आढळतात. ती कधी केवळ गोलाकार वा लंबगोलाकार आणि वर नक्षीची असतात, तर कधी त्यांवर मीनाकामही केलेले असते.

सोन्याचांदीप्रमाणेच हस्तिदंत वा विविध प्रकारचे गवत यांचाही वापर पादभूषणांकडे करण्यात येतो. बुहधा दक्षिणेकडील आदिवासींमध्ये अशा पादभूषणांचा आढळ विशेषत्वाने होतो.

पायाच्या पाचही बोटांत घालावयाची पादभूषणे प्राचीन काळापासून प्रचारात होतीच. त्यांना अंगुष्ठे म्हणत. ती अष्टकोनी, षट्कोनी वा वर्तुळाकार असून कधी ती चपटी असत, तर कधी त्यांवर वर्तुळाकार रेषा असत. यांखेरीज त्यांवर फुले, वर्तुळे, उंचवटे, दाणे किंवा विविध प्रकारचे आकृतिबंधही उठविण्यात येत. मासळी (मासोळी), विंचु (बिच्छू) असे त्यांचे प्रकार असतात. शिवाय जोडवी, विरोद्या (इरोद्या), अंगुठ्या किंवा करंगळ्या असेही प्रकार प्रचलित आहेत. अलीकडे मात्र ही पादभूषणे मागे पडून तासाची वा घागऱ्या लावलेली जोडवी बरीच वापरात आहेत.

पहा : अलंकार.

  जोशी, चंद्रहास