हल्डिया : हल्दिया. पश्चिम बंगाल राज्याच्या मेदिनीपूर (मिदनापूर) जिल्ह्यातील एक औद्योगिक शहर व हुगळी नदीवरील महत्त्वाचे बंदर. लोकसंख्या २,००,७६२ (२०११). हे कोलकात्याच्या (कलकत्ता) नैर्ऋत्येस सु. ५० किमी.वर हुगळी नदीमुखाजवळ वसलेले असून भारताच्या पूर्व किनारी भागातील सागरी तटरक्षक दलाचे (इंडियन कोस्ट गार्ड) एक महत्त्वाचे केंद्र म्हणूनही प्रसिद्ध आहे.
कोलकात्याचे व्यापारी बंदर म्हणून हल्डियाचा विकास करण्यात आला. सुरुवातीपासून बंगालच्या उपसागरामार्गे कोलकात्याकडे होणाऱ्या मालवाहतुकीचे चढउतार केंद्र म्हणून याचा वापर केला जात असे. त्या अनुषंगाने शहर व शहरपरिसरात वेगवेगळ्या उद्योगधंद्यांचा व कारखान्यांचा विकास होत गेला. सर्व प्रकारच्या जलवाहतूक सुविधा उपलब्ध झाल्याने हळूहळू अनेक निर्मितिउद्योगही येथे सुरू करण्यात आले. साउथ एशियन पेट्रोकेमिकल्स लि., इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि., टाटा केमिकल्स, हल्डिया पेट्रोकेमिकल्स, हिंदुस्थान लिव्हर, मित्सुबिशी केमिकल कॉर्पोरेशन इ. मोठ्या उद्योग-व्यवसायांबरोबर आनुषंगिक छोट्या उद्योगांचा विकास उत्तरेस हल्डी नदीपर्यंत झालेला असून, जिल्ह्यातील हे एक मोठे औद्योगिक क्षेत्र मानले जाते. शांत नदीकिनारा, भांगाच्या भरतीच्या वेळीही मर्यादित पाण्याची पातळी यांमुळे जहाजवाहतूक सोयीची असते. नदीकिनारी भागात निवासी घरांचीही मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे.
हल्डिया हे भारताच्या सागरी तटरक्षक दलाचे केंद्र असल्याने दलाच्या अखत्यारीत असणाऱ्या एकूण वाततल्पयानांपैकी (हॉवरक्राफ्ट) दोन याने येथे कायम सिद्ध ठेवण्यासाठी हॉवरपोर्टची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरात प्राथमिक शिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंतच्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत. यांशिवाय सागरी तटरक्षक दलविषयक अभ्यासकेंद्र, सागरविज्ञानविषयक संशोधनकेंद्र, विज्ञान व तंत्रविद्या शिक्षण संस्था, हॉटेल व्यवस्थापन, प्लॅस्टिक अभियांत्रिकी व तंत्रज्ञान शिक्षण संस्था, वैद्यक विज्ञान व संशोधन संस्था इ. विशेष शैक्षणिक सुविधा येथे उपलब्ध आहेत. प्रशासनाच्या सोयीसाठी शहराच्या औद्योगिक वसाहतीचे एकूण २४ प्रभाग करण्यात आलेले असून बहुतेक प्रभागांमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांच्या वसाहती उभारण्यात आल्या आहेत. शहराचा कारभार नगरपालिके मार्फत चालत असून राज्यातील अन्य शहरांशी हे रस्त्याने जोडलेले आहे.
चौंडे, मा. ल.
“