हर्षोत्तरकाल (मुसलमानपूर्व) :सम्राट हर्षवर्धनाच्या निधनानंतरचा काळ. हर्षवर्धन (कार. ६०६– सु. ६४७) याच्या कारकिर्दीत उत्तर भारताचा बराच मोठा भाग त्याच्या राज्यात अंतर्भूत होता, म्हणून त्याला त्याच्या शत्रूंच्याही लेखांत ‘सकलोत्तरापथेश्वर’ असे म्हटले आहे. तो निपुत्रिक वारल्यामुळे त्याच्या निधनानंतर त्याच्या अर्जुननामक मंत्र्याने गादी बळकाविली. त्याने एका चिनी यात्रिक समूहाचा छळ केल्यामुळे चिन्यांनी तिबेटी व नेपाळी सैन्यांच्या साहाय्याने भारतावर स्वारी करून काही प्रदेश काबीज केला होता, असे काही चिनी ग्रंथांत म्हटले आहे पण त्याला सबळ पुरावा उपलब्ध नाही.
हर्षाच्या निधनानंतर त्याचे साम्राज्य खिळखिळे होऊन उत्तर भारतात अनेक स्वतंत्र राज्ये निर्माण झाली. ईशान्येच्या कामरूप (आसाम) प्रदेशात नरकवंशीयांचे राज्य कित्येक पिढ्या टिकून होते. नरकवंशीय भास्कर- वर्म्याने हर्षाच्या साम्राज्याचा पूर्वेकडील बंगाल प्रदेश आक्रमिला. त्याचा एक ताम्रपट पूर्वीच्या शशांक राजाच्या कर्णसुवर्ण राजधानीत मिळाला आहे पण त्याच्यानंतर त्याच्या वंशाचा उच्छेद होऊन सालस्तंभनामक रानटी टोळ्यांच्या नायकाने कामरूपात आपले राज्य स्थापिले. तसेच माधव-गुप्ताने स्वातंत्र्य पुकारले. त्याचा पुत्र आदित्यसेन आणि त्याचे उत्तराधिकारी देवगुप्त, विष्णुगुप्त आणि जीवितगुप्त यांनी पूर्व भारतात आपल्या राज्याचा विस्तार करून साम्राज्यनिदर्शक पदव्या धारण केल्या.
कनौजच्या आरंभीच्या एक-दोन राजांविषयी फारशी माहिती मिळत नाही तथापि ⇨ यशोवर्मन हा बलाढ्य राजा कनौज येथे ७२६ मध्ये राज्य करीत होता, असे दिसते. हा जसा शूर तसाच साहित्यिक आणि विद्वानांचा उदार आश्रयदाता होता. भवभूती आणि वाक्पतिराज हे संस्कृत–प्राकृत कवी त्याच्या दरबारी होते. वाक्पतिराजाच्या गौडवध नामक प्राकृत काव्यात त्याचा दिग्विजय वर्णिला आहे. पुढे काश्मीरच्या ललितादित्यमुक्तापीड राजाने त्याचा पराभव करून त्याला आपले मांडलिक केले आणि त्याच्या निधनानंतर त्याचे राज्य खालसा केले.
काश्मीरच्या दुर्लभवर्धनाने सत्ता बळकावून कार्कोट वंशाची स्थापना केली. त्याने पंजाबचा वायव्य प्रांतही जिंकला होता, असे दिसते. या वंशात दुसरा प्रतापादित्य व ललितादित्य-मुक्तापीड हे न्यायी, धार्मिक आणि उदार राजे होऊन गेले. ललितादित्य हा या वंशातील सर्वश्रेष्ठ राजा होय. त्याने आपल्या राज्यात हिंदू देवतांची मंदिरे आणि बौद्धांचे चैत्य आणि विहार बांधून विद्वानांना आश्रय दिला पण याच्या नंतरच्या दुर्बल राजांच्या कारकिर्दीत काश्मीरची प्रतिष्ठा कमी होत गेली.
राजपुतान्यातील गुर्जर : हे परदेशी असून ते सहाव्या शतकात भारतात आले, असे अनेक विद्वानांचे मत आहे. पंजाबात गुजराणवालासारख्या अनेक प्रादेशिक नावांत त्यांच्या एतद्देशीय वास्तव्याच्या खुणा अद्यापि विद्यमान आहेत. पुढे त्यांनी राजपुतान्यातील जोधपूर येथे सत्ता प्रस्थापित केली. त्यांची राजधानी मांडव्यपूर (मंदोर) येथे होती. त्यांची एक शाखा गुजरातेत प्रथम नान्दीपुरी (भडोच जिल्ह्यातील नांदोद) आणि नंतर भडोच येथे होती.
राजपुतान्यातील शाखेलाच प्रतीहार म्हणतात कारण या शाखेतील राजे आपण भगवान रामचंद्राचा प्रतीहार (द्वारपाल) लक्ष्मण याच्या वंशात उत्पन्न झालो, असे मानीत असत. त्या शाखेत वत्सराज, द्वितीय नागभट्ट वगैरें राजे प्रसिद्धीस आले. त्यांनी बंगालच्या देवपाल व धर्मपाल या राजांशी काही काळ यशस्वी रीतीने सामना केला. त्यांचे दक्षिणच्या ध्रुव व तिसरा गोविंद या बलाढ्य राष्ट्रकूट राजांशीही संघर्ष झाले. त्यात त्यांचा पराभव झाला, तरी राष्ट्रकूट परत गेल्यावर त्यांनी उत्तर भारतात आपली सत्ता प्रबळ केली. गुर्जर, पाल आणि राष्ट्रकूट यांच्या या दीर्घकालीन युद्धाला त्रिपक्षीय संघर्ष असे म्हणतात. पुढे प्रतीहारांनी कनौज जिंकून तेथे आपली गादी स्थापिली. या वंशात भोज व महेन्द्रपाल हे बलाढ्य राजे झाले. त्यांनी सिंधच्या मुसलमानी सत्तेच्या पूर्वेकडील आक्रमणाला पायबंद घातला. त्यांचे साम्राज्य उत्तर भारताच्या बहुतेक भागावर पसरले होते. त्यांचा विद्वानांना व कलावंतांना उदार आश्रय होता. [→ प्रतीहार घराणे].
या काळात अरब लोकांनी भारतातील सिंधवर जल व स्थल मार्गांनी दोनदा अयशस्वी स्वाऱ्या केल्या. शेवटी इराकच्या राज्यपालाने आपला पुतण्या व जावई मुहम्मद इब्न कासीम याला प्रचंड सैन्य देऊन इ. स. ७१२ मध्ये सिंधवर पुन्हा पाठविले. सिंधचा राजा दाहर याने रावर येथे मोठ्या शर्थीने त्याचा प्रतिकार केला तथापि शत्रूला किल्ल्यात प्रवेश मिळाला. अरबांनी नंतर बहमनाबाद (ब्राह्मणाबाद), राजधानी अलोर व मुलतान ही ठाणीही काबीज केली.
मुसलमानांनी नंतर कच्छ, राजपुतान्याचा काही भाग, काठेवाड आणि गुजरात या प्रदेशांतील राजांचा पराभव करून इ. स. ७३९ च्या सुमारास नवसारीपर्यंत धडक मारली पण बादामीचा चालुक्यांचा मांडलिक अवनिजनाश्रय पुलकेशी याने नवसारी येथे घनघोर लढाईत त्यांचा पुरा मोड केला. तसेच राजपुतान्यात गुर्जर नृपती नागभट्ट याने अरबांच्या आक्रमणास पायबंद घातला. त्यामुळे सिंध अरबांच्या ताब्यात राहिला, तरी त्यांना उत्तर व दक्षिण भारतात आक्रमण करता आले नाही.
बंगालच्या पालवंशातील गोपालाची आठव्या शतकात सुबुद्ध लोकांनी राजा म्हणून निवड केली. त्याने राज्य वाढविले. त्याचा पुत्र धर्मपाल (कार. ७८०–८१५) हा या वंशातील सर्वश्रेष्ठ राजा होय. त्याने हिमालयापासून नर्मदेपर्यंतचा प्रदेश पादाक्रान्त करून कनौजच्या गादीवर आपला हस्तक चक्रायुध यास बसविले पण त्याला प्रतीहार नागभट्ट आणि राष्ट्रकूट तिसरा गोविंद यांच्याशी सामना करावा लागल्यामुळे त्याचे साम्राज्य टिकले नाही. धर्मपाल बौद्ध धर्मीय होता. त्याने अनेक बौद्ध विहार बांधले आणि विक्रमशिला विद्यापीठाची स्थापना केली. धर्मपालाचा पुत्र देवपाल (कार. सु. ८१५–५५) याने द्रविड, गुर्जर आणि हूण राजांचा पराभव केला आणि उत्कल व कामरूप देश जिंकले, असे त्याच्या ताम्रपटात म्हटले आहे.
देवपालानंतर पालांच्या सत्तेला ओहोटी लागून त्यांची सत्ता खिळखिळी झाली. दुसऱ्या महीपालाच्या वेळी कैवर्त दिव्य याने बंड करून उत्तर बंगाल घेतला, तर पूर्व बंगालमध्ये वर्मराजवंश उदयास आला. शेवटी रामपाल (कार. १०७७–११२०) याने त्यांचा पाडाव केला आणि आपले वर्चस्व स्थापन करण्याचा प्रयत्न केला पण तो अल्पकाळ टिकला. त्याच्यानंतरचे पाल राजे दुर्बल निघाले. शेवटचा राजा मदनपाल याच्या कारकिर्दीत सेनवंशी राजे उदयास येऊन त्यांनी पालसत्तेचे उच्चाटन केले. [→ पालवंश].
उत्तरकालीन चालुक्य नृपती सहावा विक्रमादित्य याने बंगालवर आक्रमण केले. त्या काळी कर्णाटदेशीय सेनांनी पश्चिम बंगालात आपले पाय रोवले. विजयसेनाने मदनपालाचा पराभव करून बराच प्रदेश जिंकला. तसेच कामरूप व मिथिला देशांवर स्वाऱ्या केल्या. त्याचा मुलगा बल्लाळसेन हा बलाढ्य तसाच विद्वानही होता. त्याचे अनेक ग्रंथ ज्ञात आहेत. शेवटचा राजा लक्ष्मणसेन (राज्यारंभ ११७८) याने गाहडवालांचा पराभव करून आपली सत्ता पश्चिमेस प्रयागपर्यंत पसरविली होती. लक्ष्मणसेन स्वतः कवी असून त्याचा अनेक कवींना उदार आश्रय होता. त्यांमध्ये गीतगोविंद कर्ता जयदेव सुप्रसिद्ध आहे. त्याच्या काळी बख्त्यार खल्जीने नवद्वीपावर (नडियावर) अकस्मात छापा टाकून ते काबीज केले. तेव्हा लक्ष्मणसेन लखनावतीला पळून गेला. तेथे त्याने पुढे तीन-चार वर्षे राज्य केले. त्याच्यानंतर त्याचे पुत्र विश्वरूपसेन व केशवसेन यांनी पूर्व बंगालमध्ये सु. २५ वर्षे राज्य केले पण त्यांची राजकीय कारकीर्द नाममात्रच ठरली. [→सेन घराणे].
नवव्या शतकात कनौजच्या गुर्जर प्रतीहारांचे मांडलिक म्हणून जेजाकभुक्तीचे चंदेल्ल उदयास आले. त्यांची राजधानी महोत्सवपूर (विद्यमान महोबा) येथे होती. खर्जूरवाहक (सध्याचे खजुराहो) हे त्यांचे धर्मस्थान होते. त्या ठिकाणी त्यांनी अनेक उत्कृष्ट देवालये बांधली. राष्ट्रकूट राजा तिसरा इंद्र याने कनौजवर स्वारी करून ते उद्ध्वस्त केले, तेव्हा प्रतीहार नृपती महीपाल हा चंदेल्ल हर्षाच्या (कार. ९००–२५) आश्रयास गेला होता पण त्याचा पुत्र यशोवर्मा याने कालंजर हा दुर्भेद्य किल्ला हस्तगत करून प्रतीहारांचे वर्चस्व झुगारून दिले. त्याने दूरवर स्वाऱ्या करून उत्तर भारत पादाक्रान्त केला. त्याचा मुलगा धंग हाही तसाच प्रतापी होता. त्याने गोपगिरी (ग्वाल्हेर) जिंकून प्रतीहारांचे मांडलिकत्व झुगारून स्वातंत्र्य जाहीर केले. त्याचे राज्य यमुनेपासून दक्षिणेस विदिशेपर्यंत आणि पूर्वेस वाराणसीपर्यंत पसरले होते. तो शतायुषी होऊन निधन पावला (१००२). गझनीच्या महमुदाने चंदेल्लांच्या प्रदेशावर १०१९ व १०२२ मध्ये स्वाऱ्या केल्या पण विद्याधराने दग्धभूमी नीतीचा (स्कॉर्च्ड अर्थ पॉलिसी) अवलंब करून त्याला परत जाण्यास भाग पाडले. शेवटी त्याने विद्याधराशी सख्य केले.
विद्याधराचा नातू देववर्मा याला कलचुरी कर्णाने पदच्युत करून काही काळ चंदेल्लांचे राज्य खालसा केले पण देववर्म्याचा बंधू कीर्तिवर्मा याच्या गोपालनामक मंत्र्याने कर्णाचा पराभव करून ते परत मिळविले. परमर्दिदेवाच्या कारकिर्दीत (११६५–१२०१) मुहम्मद घोरीचा सेनापती कुतुबुद्दिन याने प्रथम कालंजरचा किल्ला आणि नंतर महोबा राजधानी १२०२ मध्ये काबीज केली पण परमर्दिदेवाचा पुत्र त्रैलोक्यवर्मा (कार. सु. १२०५–४१) याने मुसलमानांना हाकून देऊन आपले राज्य परत मिळविले. शेवटी १३०४ मध्ये अलाउद्दीन खल्जीने चंदेल्लांचा पराभव करून त्यांचे राज्य खालसा केले. भारतीय वास्तुशिल्प कलेच्या इतिहासात चंदेल्लांचे नाव खजुराहो येथील मंदिरे व त्यांवरील उत्कृष्ट कामशिल्पांमुळे जगप्रसिद्ध झाले आहे. [→ चंदेल्ल घराणे].
इ. स. सहाव्या शतकात कलचुरी वंश मध्य भारतात उदयास आला. त्या काळी त्यांची राजधानी माहिष्मती (महेश्वर) येथे होती. उत्तर किंवा दक्षिण भारतातील कोणत्या ना कोणत्या प्रदेशावर ५५० पासून १७४० पर्यंत हा वंश राज्य करीत होता. चालुक्य राजा दुसऱ्या पुलकेशीने त्यांचा बराचसा प्रदेश पादाक्रान्त केल्यावर (६२०) त्यांनी चेदी देश जिंकून नर्मदाकाठी जबलपूरजवळची त्रिपुरी (सध्याचे तेवर) येथे आपली राजधानी केली आणि उत्तर भारतात आपल्या राज्याचा विस्तार केला. कलचुरी स्वतःस हैहय म्हणवीत व आपला वंश सहस्रार्जुन कार्तवीर्य याच्यापासून निर्माण झाला, असे मानीत असत. कलचुरी वंशात अनेक बलाढ्य राजे होऊन गेले. त्यांचे राष्ट्रकूट राजांशी विवाहसंबंध प्रस्थापित झाले होते. ते त्यांच्या उत्तर व दक्षिण भारतातील स्वाऱ्यां साहाय्य करीत असत.
अकराव्या शतकात या वंशात गांगेयदेव (कार. सु. १०२५–४१) हा बलाढ्य राजा होऊन गेला. त्याने उत्तरेत प्रयाग व वाराणसीपर्यंत राज्यविस्तार केला होता. त्याने विक्रमादित्य ही पदवी धारण केली होती. त्याचा पुत्र कर्ण (कार. १०४१–७३) हा शूर व महत्त्वाकांक्षी असून प्रतीहार, चंदेल्ल आणि परमार राजांचा पराभव करून त्यांची राज्ये त्याने खालसा केली. इतिहासकारांनी त्याला भारतीय नेपोलियन म्हटले आहे. त्याने आपला पुत्र यशःकर्ण याचा राज्याभिषेक केला आणि तो निवृत्त झाला. कर्णानंतर कलचुरी सत्तेला उतरती कळा लागली. शेवटचा राजा विजयसिंह याच्या कारकिर्दीत चंदेल्ल राजा त्रैलोक्यवर्मा याने स्वारी करून सु. १२१० मध्ये उत्तरेकडील कलचुरी राज्य खालसा केले. [→कलचुरी वंश].
माळव्याचे परमार घराणे राष्ट्रकूटांचे मांडलिक म्हणून उदयास आले. त्यांची राजधानी आरंभी उज्जयिनी व नंतर धार येथे होती. त्यांच्यात मुंज हा बलाढ्य राजा होऊन गेला. त्याने कलचुरी आणि गुहिलोतांच्या प्रदेशांवर आक्रमण करून त्यांच्या राजधान्या लुटल्या. तसेच चाहमान व चालुक्य यांचाही पराभव केला. नंतर त्याने चालुक्य तैलपावर स्वारी केली. त्यात त्याचा पराभव होऊन त्याला बंदिवान व्हावे लागले. पुढे तैलपाने त्याचा शिरच्छेद केला (९९३). मुंजानंतर त्याचा बंधू सिंधुराज गादीवर आला. त्याने चालुक्यांचा पराभव करून प्रदेश परत मिळविला आणि छत्तीसगडावर स्वारी करून तेथील राजाचा पराभव केला. सिंधुराजाने नवसाहसांक (नवीन विक्रमादित्य) पदवी धारण केली होती.
सिंधुराजाचा पुत्र भोज (कार. सु. १०००–५५) हा या वंशातील सर्वश्रेष्ठ राजा होय. शौर्यापेक्षा विद्वत्तेमुळे व विद्वानांना दिलेल्या उदार आश्रयामुळे त्याचे नाव इतिहासात प्रसिद्ध आहे. त्याने विविध विषयां-वर सु. २० ग्रंथ लिहिले वा लिहून घेतले. धनपाल, भट्ट गोविंद यांसारखे अनेक विद्वान त्याच्या आश्रयास होते. त्याने धार येथे सरस्वती मंदिर बांधून विद्यापीठ स्थापन केले. त्याने इतरत्रही अनेक मंदिरे निर्माण केली.
त्याचा पुत्र जयसिंह गादीवर आला पण चालुक्य दुसरा सोमेश्वर आणि कलचुरी कर्ण यांच्या स्वारीत तो मारला गेला. पुढे भोजाचा बंधू उदयादित्य याने चाहमानांच्या साहाय्याने आपल्या वंशाला वर काढले.
उदयादित्यानंतर अनेक राजे परमार वंशात होऊन गेले. त्यांनी शेजारच्या राजांशी युद्धे केली. दरम्यान मुसलमानांचे आक्रमण झाले आणि सुलतान अल्तमशने माळव्यावर आक्रमण करून उज्जयिनी लुटली (१२३५). देवपालचा पुत्र जैतुगीच्या वेळी यादव, वाघेल आणि मुसलमान यांनी माळव्यावर आक्रमणे केली. शेवटी अलाउद्दीन खल्जीने माळव्यावर स्वारी केली (१३०५). परमार राजा महलकदेव याचा पराभव होऊन अखेर तो अलाउद्दीनच्या सेनापतीकडून मारला गेला आणि माळव्यावर मुसलमानांची सत्ता प्रस्थापित झाली. [→ परमार घराणे].
गुजरातच्या चालुक्य मूलराजाने सरस्वती नदीच्या तीरावरील सारस्वत मंडलावर आपली सत्ता स्थापून अनहिलवाड (सध्याचे पाटण) येथे आपली राजधानी केली (९४०). महमूद गझनीने सोमनाथवर स्वारी करून तेथील मंदिर लुटले, तेव्हा भीम आपल्या राजधानीतून कच्छला पळून गेला. पुढे या वंशात सिद्धराज जयसिंह (कार. १०९४–११४३) हा बलाढ्य राजा होऊन गेला. त्याने चाहमान, चंदेल्ल, परमार इ. राजांशी युद्धे करून सर्वत्र आपला दरारा प्रस्थापित केला. हा जसा शूर तसा विद्वानांचा आश्रयदाता होता. सुप्रसिद्ध जैन ग्रंथकार हेमचंद्र त्याच्या दरबारी होता. जयसिंहानंतर कुमारपाल (कार. ११४३–७२) गादीवर आला. तोसुद्धा शूर व विद्येचा पुरस्कर्ता होता. आरंभी तो शिवोपासक होता. पुढे हेमचंद्राच्या प्रभावाने त्याने जैन धर्म स्वीकारला आणि स्वतःच्या तसेच आपल्या मांडलिकांच्या राज्यांतही त्याने प्राणिहिंसेवर बंदी घातली. त्याच्यानंतर दुसरा मूलराज हा बालराजा गादीवर होता त्याची माता राणी नाइकीदेवी हिने मुहम्मद घोरीचा लढाईत पराभव केला (११७८). पुढे राज्यात बेदिली माजली. अखेरीस अलाउद्दीनाने गुजरातवर स्वारी केली (१२९६), तेव्हा तेथील राजा कर्ण देवगिरीस पळून गेला पण त्याची राणी व राजकन्या अलाउद्दीनाच्या तावडीत सापडल्या. [→ सोळंकी घराणे].
शाकंभरीचे (सांभर) चाहमान (चौहान) हे सातव्या-आठव्या शतकांत प्रतीहारांचे मांडलिक म्हणून सपादलक्ष देशात उदयास आले. त्यांची राजधानी शाकंभरी येथे होती. राष्ट्रकूटांच्या स्वारीमुळे प्रतीहारांची सत्ता खिळखिळी झाली, तेव्हा चाहमानांनी त्यांचे स्वामित्व झुगारून दिले. या वंशातील विग्रहराजाने (कार. ११५०–६३) ढिल्लिका (दिल्ली) तोमरां-पासून जिंकून घेऊन पंजाबातील गझनवीप्रांताधिपतीचा पराभव केला. त्याने म्लेच्छांचा नाश करून आर्यावर्तांचे नाव सार्थ केले, असे त्याच्या कोरीव लेखात म्हटले आहे. याची शिळेवर कोरलेली संस्कृत हरकेलि नाटिका अजमेर येथे सापडली आहे. तसेच याच्या दरबारच्या सोमदेव कवीने केलेल्या ललितविग्रहराज नाटकाचे काही भाग अजमेरच्या मशिदीत शिलाखंडांवर कोरलेले मिळाले आहेत.
या वंशातील तिसरा पृथ्वीराज याच्याविषयी अनेक आख्यायिका प्रचलित आहेत. काश्मीरी कवी जयानक याने पृथ्वीराजविजय या खंडित संस्कृत काव्यात त्याच्या पूर्वजांविषयी व त्याच्याविषयी बरीच माहिती दिली आहे. चंद बरदाईच्या पृथ्वीराज रासो या प्राचीन हिंदी काव्यात त्याची आणि गाहडवाल नृपती जयचंद याच्या संयोगितानामक कन्येची प्रणयकथा वर्णिली आहे.
मुहम्मद्द घोरीला तराईन येथे झालेल्या पहिल्या युद्धात पृथ्वीराजाने पराजित केले पण त्याचा पाठलाग केला नाही. त्यामुळे तो पळून गेला. पुढे वर्षभराने झालेल्या दुसऱ्या युद्धात मुहम्मद घोरीने आपले राखीव पथक पाठवून पृथ्वीराजाचा धुव्वा उडविला आणि त्याला बंदिवान करून नंतर त्याचा शिरच्छेद केला. [→चाहमान घराणे पृथ्वीराज चौहान].
कनौजच्या गाहडवालवंशी चंद्रदेवाने कनौज येथे आपली राजधानी करून (१०९०) ‘महाराजाधिराज’ पदवी धारण केली आणि प्रयाग व वाराणसीपर्यंत राज्याचा विस्तार केला. चंद्रदेवाचा नातू गोविंदचंद्र (कार. १११४–५५) हा मोठा शूर आणि महत्त्वाकांक्षी राजा होता. त्याने उत्तर प्रदेशाच्या बहुतेक भागांवर सत्ता स्थापून मगधापर्यंत राज्यविस्तार केला. त्याची पाल, चंदेल्ल आणि कलचुरी राजांशीही युद्धे झाली आणि त्याने मुसलमानांवर मोठा विजय मिळविला, असे कोरीव लेखांवरून समजते.
गोविंदचंद्रानंतर विजयचंद्र व जयचंद्र हे गादीवर आले. जयचंद्राने बंगालच्या सेन राजांशी दीर्घकाळ युद्ध केले. त्याचे शाकंभरीच्या तिसऱ्या पृथ्वीराजाशी वैमनस्य होते. मुहम्मद घोरीने दिल्ली आणि अजमेर घेतल्यावर जयचंद्रावर स्वारी केली (११९३). एटावा जिल्ह्यातील चंदावार येथे झालेल्या लढाईत जयचंद्र मारला गेला. पुढे अल्तमशने कनौज जिंकून घेतले.
इसवी सनाच्या नवव्या शतकापर्यंत काबूल व भारताचा वायव्य प्रांत या प्रदेशांवर तुर्कीशाही राजांचे राज्य होते. सुमारे ८५० च्या सुमारास तत्कालीन राजास कल्लारनामक त्याच्या ब्राह्मण मंत्र्याने पदच्युत करून गादी बळकावली. त्याच्या वंशाला ‘ब्राह्मणी शाही’ असे म्हणतात. या राजांचे काश्मीरच्या तत्कालीन राजांशी विवाहसंबंध झाले होते.
दहाव्या शतकाच्या अखेरीस या वंशातील जयपाल राजाने लाहोर जिंकून घेतले. त्याचे राज्य पश्चिम पंजाब, वायव्य प्रांत आणि पूर्व अफगाणिस्तान यांवर पसरले होते आणि त्याने ‘परमभट्टारक’ व ‘महाराजाधिराज’ या सम्राटपदनिदर्शक पदव्या धारण केल्या होत्या. त्याची राजधानी उदभांडपूर (सिंधू नदीच्या उजव्या तीरावरील ओहिंद) येथे होती.
गझनी येथे सबक्तगीनाने आपला अंमल दृढतर केल्यावर तुर्कीशाहींच्या राज्यावर स्वारी केली. अफगाणिस्तानात कुर्रम नदीच्या काठी हिंदी सैनिक शौर्याने लढले, तरी सबक्तगीनाचा जय होऊन त्याने सिंधू नदी-पर्यंतचा मुलूख बळकाविला. मुहम्मद गझनीच्या स्वाऱ्यांना पायबंद घालण्याकरिता जयपालाचा पुत्र अनंगपाल याने प्रतीहार, चंदेल्ल इ. राजांची मदत घेतली. त्याच वेळी हिंदू स्त्रियांनी आपले दागिने मोडून या पवित्र युद्धाला मदत केली तथापि पेशावर येथे झालेल्या या युद्धात महमूदाने विजय मिळविला. त्याने भारतावर अनेक स्वाऱ्या करून लोकांची कत्तल व लुटालूट केली आणि देवळांचा विध्वंस केला. त्याने कनौजवर दोनदा स्वारी करून त्या समृद्ध नगरीचा नाश केला. त्याची शेवटची महत्त्वाची स्वारी काठेवाडातील सोमनाथवर झाली. तेथील शिवलिंग फोडून त्याने अनन्वित अत्याचार केले आणि अगणित संपत्ती लुटून नेली.
हर्षोत्तरकाळात मेवाडचे गुहिलपुत्र (गुहिलोत), काठेवाडातील सैन्धव व चापोत्कट (चावडा), हरियाणाचे तोमर, राजस्थानातील कच्छपघात (कच्छवाह) ही घराणीही उदयास आली.
या काळात हिंदुस्थानात अनेक राजघराणी उदयास आली परंतु त्यांपैकी एकछत्री सत्ता स्थापन करू शकेल, असे एकही बलवत्तर राजघराणे नव्हते. उलट, ही घराणी आपापसांत संघर्ष करीत राहिल्याने मुसलमानांच्या स्वाऱ्यांपुढे टिकाव धरू शकली नाहीत तथापि प्रतीहार बलवत्तर असेपर्यंत मुसलमानांना सत्ता काबीज करणे जमले नाही. कालांतराने तेही दुर्बल झाल्यावर महमूदाला प्रतिकार करण्याचे सामर्थ्य कोणाही हिंदू राज्यकर्त्यात उरले नव्हते. परिणामतः हा प्रदेश मुसलमानांच्या अंकित गेला.
सामाजिक परिस्थिती : या कालखंडाच्या आरंभी जातिबंधने कडक नव्हती. अनुलोम विवाह प्रचलित होता. अशा विवाहातील संतती मातेच्या वर्णाची मानली जात असे पण पुढे असे असवर्ण विवाह निषिद्ध झाले. कित्येक ब्राह्मण व क्षत्रिय कृषिकर्म करीत असत आणि या काळातल्या पाराशरादी स्मृतींमध्ये त्यांना ते करण्याची परवानगी दिली आहे. काही ब्राह्मण लष्करी पेशा पतकरून रणांगणावर मर्दुमकी गाजवीत. कलचुरी कर्णाच्या मगरमिठीतून चंदेल्लांचे राज्य आपल्या स्वामीकरिता सोडविणारा ब्राह्मण सेनापती गोपाल हा याचे ठळक उदाहरण होय.
परकी लोकांना आवश्यक ते संस्कार करून हिंदू धर्मात प्रवेश मिळविता येत होता. गुर्जर व हूण राजवंश ही याची सुप्रसिद्ध उदाहरणे होत. वाणिज्य हा वैश्यांचा व्यवसाय होता पण आपत्प्रसंगी ब्राह्मणही तो करीत. मात्र त्यांना मद्य, मांस वगैरे विकता येत नसे. आरंभी समुद्र-गमनाचा प्रतिषेध नव्हता. अनेक क्षत्रियांनी व ब्राह्मणांनी कंबोज, जावा, सुमात्रा वगैरे पूर्वेकडच्या बेटांत वसाहती करून राज्ये स्थापिली होती पण पुढे समुद्रगमनावर निर्बंध घालण्यात आला.
या काळात शूद्रांच्या सामाजिक दर्जात अवनती झाली, पोट-जातींची संख्या बेसुमार वाढली. वैजयंती त ६४ जातींचा उल्लेख आहे. विज्ञानेश्वराने मिताक्षरे त म्हटले आहे की, मिश्र विवाहाने उत्पन्न झालेल्या जातींची संख्या मोजता येत नाही.
परीट, चांभार, वेण, बुरुड, कैवर्त, मेद आणि भिल्ल अशा सात अंत्यज जातींचा उल्लेख वैजयंतीत आला आहे. यांपैकी काही धंद्यामुळे उत्पन्न झाल्या आहेत. चांडालांचा दर्जा तर इतका निकृष्ट मानण्यात आला की, त्यांच्या स्पर्शामुळेच नव्हे, तर सावलीमुळेही विटाळ होतो, असे काही स्मृतींत म्हटले आहे.
या काळात कायस्थ या नव्या जातीचा उदय झाला. कायस्थांची एक जात होऊन तिच्या उत्पत्तीसंबंधी विविध मते प्रचलित झाली. या काळाच्या आरंभी सहभोजनावर निर्बंध नव्हता पण पुढे जातिव्यवस्था कडक झाल्यावर जातिजातींना बेटीव्यवहाराप्रमाणे रोटीव्यवहारही बंद झाला. तसेच ब्राह्मणांच्या मांसाशनावरही काही निर्बंध घालण्यात आले.
यापूर्वीच्या काळी स्त्रियांचे विवाह त्या वयात आल्यावर होत असत पण पुढे पराशर, व्यास इ. स्मृतिकारांनी ‘विवाहयेदष्टवर्षामेवं धर्मां न हीयते’ असे म्हणून रजोदर्शनापूर्वी मुलींचा विवाह व्हावा, असा नियम घालून दिला. बालविवाहाबरोबर पुनर्विवाहावरही निर्बंध घालण्यात आले. सतीची चाल प्रचलित होती, हे अनेक सतीशिलांवरून स्पष्ट दिसते. कलचुरी गांगेयदेवाबरोबर त्याच्या शंभर स्त्रिया सती गेल्या, असे कोरीव लेखात म्हटले आहे. सिंधमध्ये मुसलमानांच्या आक्रमणाच्या वेळी स्त्रियांनी केलेला जोहार इतिहासप्रसिद्ध आहे. या काळात स्त्रियांचा मिळकतीवरील हक्क मात्र मान्य करण्यात आला.
या काळात हिंदुस्थानावर मुसलमानांची आक्रमणे झाल्यामुळे देशाचे सांस्कृतिक ऐक्य भंग पावले. यापूर्वीच्या आक्रमकांना भारतीय संस्कृतीने आपल्यात सामावून घेतले होते पण तसे मुसलमानांच्या बाबतीत झाले नाही. या काळातही भारतीयांनी आपल्या देशात आलेल्या सिरियन, ख्रिस्ती, ज्यू , पारशी इ. परकी लोकांप्रमाणे मुसलमानांशीही उदारपणाने वर्तन केले. राष्ट्रकूटांनी तर काही मुसलमानांना प्रदेशाधिपतीही नेमले होते. त्यांचे कोरीव लेख कोकणात सापडले आहेत. इस्लाम धर्म स्वीकारावा किंवा जिझिया कर द्यावा, असा पर्याय मुहम्मद इब्न कासीमने सिंधच्या लोकांपुढे मांडला आणि असंख्यांना इस्लाम धर्म स्वीकारावयास लावला.
आर्थिक परिस्थिती : भारतात उत्पन्न होणाऱ्या विविध प्रकारच्या धान्यांचा सुती, लोकरी व रेशमी वस्त्रांचा धातुकामांचा आणि रत्ने व मोती यांचा उल्लेख अनेक संस्कृत आणि प्राकृत ग्रंथांत तसेच मुसलमानी व्यापाऱ्यांच्या प्रवासवर्णनांत येतो. भारताचा परदेशांशी व्यापार जलमार्गाने तसेच स्थलमार्गानेही होत असे. भारतीय व्यापारी स्मृतींतील निर्बंध न जुमानता अरबस्तान, इराण, मध्य आशिया, पूर्वेकडील द्वीपकल्पे, चीन इ. देशांशी व्यापार करीत असत. भारतातून परदेशांना जाणाऱ्या वस्तूंत हस्तिदंत, चंदन, कापूर, लवंगा, नारळ, वस्त्रे इत्यादिकांचा समावेश असे. अत्यंत तलम वस्त्रांची निर्मिती भारतात होत होती. परदेशांतून भारतात उत्तम घोडे आयात होत. भारतातील त्रिगर्त, गुर्जर, अवंती, सौराष्ट्र व परियात्र (अबू) या प्रदेशांतील घोडे त्या मानाने निकृष्ट गणण्यात येत. यांशिवाय कपिश देशातून मद्य, बसऱ्यातून खजूर, चीनमधून रेशमी कापड, पूर्वेकडील द्वीपांतून मसाल्याचे पदार्थ आणि सोने, चांदी व तांबे इ. धातू हा माल भारतात आयात होई.
देशातील व परदेशातील व्यापार श्रेणी व संघ यांमार्फत होत असे. श्रेणी ह्या एकाच ठिकाणच्या व्यापारी, शिल्पकार, सावकार, माहूत वगैरेंच्या असत, तर संघांत अनेक देशांचे व जातींचे सभासद असत. यांच्या घटनेला राज्यांची मान्यता असे. ह्या श्रेणी ठेवी घेऊन त्यांवरील व्याजातून सर्वकाल विशिष्ट पुण्यकृत्याची तजवीज करीत. तसेच त्या स्वतःही उदार दराने देत असत. व्याजाचा दर दरमहा दरशेकडा सव्वा टक्क्यापासून पाच टक्क्यांपर्यंत घेण्यास स्मृतींची संमती असे पण व्याजाचा भारी दर काही विशिष्ट परिस्थितीतच घेण्यात यावा, असे मेधातिथीने म्हटले आहे.
देशातील जमिनीवरच्या महसुलापासून कर प्राप्त होई. फार प्राचीन काळापासून तो उत्पन्नाच्या एकषष्ठांश असे. त्यामुळे तो गोळा करणाऱ्या अधिकाऱ्याला ‘षष्ठाधिकृत’ अशी संज्ञा असे पण जमिनीच्या प्रतीनुसार आणि उत्पन्न केलेल्या पदार्थानुसार तो एकबारांशापासून एकद्वितीयांशा-पर्यंत कमी जास्त होई, हे कोरीव लेखांवरून दिसते. धान्याच्या रूपाने दिल्या जाणाऱ्या कराला ‘भाग’ आणि किरकोळ फळे, फुले, इंधन वगैरेंच्या कराला ‘भोग’ असे म्हणत. क्वचित पैशाच्या रूपाने कर भरला जाई, त्याला ‘हिरण्य’ असे म्हटले आहे. यांशिवाय ‘खलभिक्षा’ (धान्य मळणीच्या वेळी देण्याचा कर), ‘शुल्क’ (जकात), बाजारात विकलेल्या पदार्थांवरील व जनावरांवरील कर, तेलघाणीवरील कर, ‘अक्षपटलप्रस्थ’ (जमाबंदीच्या खात्याचा कर), ‘प्रतीहारप्रस्थ’ (रक्षक ठेवण्याकरिता कर), ‘लवण कर’ (मिठावरचा कर), ‘प्रवणिकर’ (व्यापाऱ्यांवरील कर), यांत्रिकांवरील कर, दंडाचे उत्पन्न वगैरेंचे उल्लेख कोरीव लेखांत येतात. गाहडवालांच्या लेखात ‘तुरुष्कदण्डा ङ्खचा उल्लेख आहे. त्याच्या अर्थाविषयी विविध मते आहेत. त्यांपैकी एक मत ‘देशात स्थायिक झालेल्या तुर्कांवरील कर’ असे आहे.
या काळात देशात एकंदरीत समृद्धी होती, असे दिसते. राजे लोकांच्या नऊमजली प्रासादांचे, त्यांतील रत्नदीपांनी प्रकाशित झालेल्या मार्गांचे, हस्तिदंती कुंपणांचे, चंदनी किंवा सोन्याच्या स्तंभांचे, स्फटिकाच्या भिंतींचे किंवा जमिनींचे वर्णन मानसोल्लासा सारख्या तत्कालीन ग्रंथांत येते. राजशेखराने नगरात राहणाऱ्या श्रीमंत नागरिकांच्या ऐषारामी जीवनाचे असेच लोभस वर्णन केले आहे.
मुहम्मद इब्न कासीमला एकट्या मुलतानच्या लुटीत एका देवळातच विपुल सोने मिळाले. गझनीच्या महमूदाने भीमनगर (कांगडा) काबीज केले, तेव्हा त्याला असंख्य सुवर्ण नाणी आणि भरपूर सोने व रुपे यांची लूट मिळाली, असे तत्कालीन लेखकाने म्हटले आहे. यावरून मुहम्मद इब्न कासीमने आपल्या अनेक स्वाऱ्यां हिंदुस्थानातून किती संपत्ती लुटून नेली, याची कल्पना करता येईल.
धार्मिक स्थिती : हर्षोत्तरकाळात बौद्ध धर्माचे उच्चाटन झाले होते मात्र पाल राजे त्याचे अनुयायी होते. त्यांच्या राजवटीत बुद्धगया, नालंदा, ओदन्तपुरी आणि विक्रमशिला येथील विद्यापीठांत बौद्ध धर्माचा अभ्यास होत होता. त्यांतील अतिश दीपंकरासारख्या बौद्ध भिक्षूंनी तिबेटात जाऊन त्याचा प्रसार केला. पुढे सेन राजांच्या राजवटीत हिंदू धर्माला राजाश्रय मिळून बौद्ध धर्म नाममात्र राहिला. शिवाय कुमारिल भट्ट आणि शंकराचार्य हे वैदिक धर्माचे आणि तत्त्वज्ञानाचे पुरस्कर्ते उदयास येऊन त्यांनी अनेक वादांत बौद्धांचा पराजय केला तथापि त्यांच्या अहिंसातत्त्वाची हिंदू धर्मावर छाप पडली. त्यामुळे अनेक उच्चवर्णीय हिंदूंनी मांसाशन सोडून दिले. बुद्धाला भगवान विष्णूच्या अवतारांमध्ये स्थान मिळाले.
गुजरातच्या चालुक्यांचा जैन धर्माला उदार आश्रय होता. त्या घराण्याचा मूळपुरुष मूलराज याने आपल्या राजधानीत ‘मूलबस्तिका ङ्ख- नामक जिनालय बांधले. नंतरच्या भीम, सिद्धराज आणि कुमारपाल राजांच्या कारकिर्दीत जैन धर्माची गुजरातेत भरभराट झाली. कुमारपालाने जैन आचार्य हेमचंद्र याच्या विद्वत्तेने प्रभावित होऊन जैन धर्म स्वीकारला होता. या काळात अबू पर्वतावरील अत्यंत सुंदर व बारीक संगमरवरी कोरीव काम असलेली आदिनाथ, नेमिनाथ वगैरें जैन तीर्थंकरांची देवळे बांधण्यात आली.
शैव व वैष्णव पंथांचा उत्तर भारतात सर्वत्र प्रसार झाला. शैवांचे शैव किंवा सैद्धांतिक, पाशुपत, कापाल आणि कालामुख असे चार मुख्य भेद होते. उत्तर भारतातले अनेक राजवंश शैवपंथी होते. पाशुपत पंथाचा प्रसार मुख्यत्वे गुजरात व राजपुताना येथे झाला होता. कापालिकांचे मुख्य स्थान मध्य भारतात विंध्यवासिनी देवीचे देवालय हे होते. कापालिकांचे अनेक आचार, विशेषतः नरकरोटीत भोजन करणे, मद्यपान करणे, मनुष्य बळी देणे इ. अत्यंत घृणोत्पादक होते. काश्मीरातही एक निराळाच शैव पंथ नवव्या शतकात उदयास आला होता. त्याचे तत्त्वज्ञान ‘प्रत्यभिज्ञादर्शन’ नावाने प्रसिद्ध आहे. ते शंकराचार्यांच्या तत्त्वज्ञानाने प्रभावित झालेले दिसते. शैव पंथाबरोबरच वैष्णव पंथाचा प्रसार झाला. पूर्वी विष्णूचे चार–पाच अवतार मानण्यात येत. त्यांची संख्या आता चोवीस (किंवा एकोणचाळीस) पर्यंत वाढली. तसेच त्यांत कृष्णावतारातील रासलीलेचा अंतर्भाव झाला आणि पुढे राधेलाही स्थान मिळाले.
या काळात सूर्यदेवतेचीही अनेक मंदिरे उत्तर भारतात बांधली गेली. त्यांपैकी मुलतान, कोणार्क, मोढेरा येथील मंदिरे प्रसिद्ध असून मुहम्मद इब्न कासीमने ही सौरपंथीय देवालये भग्न केली पण यात्रेकरूंकडून येणाऱ्या उदार देणग्यांच्या लोभाने त्याने मुलतानचे मंदिर तोडले नाही. काल्पीतील कालप्रियनाथाच्या मंदिराच्या आवारात भवभूतीच्या नाटकांचे पहिले प्रयोग झाले होते.
शैव पंथाबरोबरच शक्त्युपासना प्रचलित झाली. मार्कण्डेयपुराणा तील ‘देवीमाहात्म्या ङ्खत शक्तीच्या किंवा चण्डिकेच्या विविध पराक्रमांचे वर्णन आहे. चण्डिकेला असुरांबरोबरच्या युद्धात ब्रह्मादी देवांच्या शक्तींनी किंवा सप्तमातृकांनी साहाय्य केले. त्यांचीही पूजा प्रचलित झाली. या शक्तींची संख्या वाढत वाढत चौसष्टपर्यंत गेली. यांना योगिनी म्हणत. चौसष्ट योगिनींची देवालये खजुराहो, त्रिपुरीजवळ भेडाघाट, राणीपूर-झरियल आणि कोईमतूर येथे आहेत आणि ती बहुतेक वर्तुळाकार आहेत.
या काळात गणपतीच्या पूजेचा सार्वत्रिक प्रसार झाला. सप्तमातृकांबरोबर कार्तिकेयाची आणि गणपतीचीही मूर्ती सप्तमातृक पट्टात खोदण्यात येऊ लागली. शैव-शाक्त पंथांतूनच पुढे तांत्रिक धर्माचा उदय झाला. तंत्र धर्मामध्ये मंत्र किंवा प्रार्थना, बीज किंवा पवित्र अक्षरे, यंत्र किंवा विशिष्ट आकृती, मुद्रा किंवा हस्तचिन्ह आणि न्यास किंवा देवतेची शरीरावयवांच्या ठिकाणी स्थापना यांना विशेष महत्त्व आहे. तंत्राचाही उद्देश मोक्षप्राप्ती हाच आहे पण कित्येकदा त्याचा उपयोग अभिचाराकरिता केला जाई. तंत्राच्या योगे प्राप्त झालेल्या अतिमानुष शक्तीचा मालतीमाधव, कर्पूरमंजरी यांसारख्या संस्कृत व प्राकृत नाटकांत उल्लेख आहे. पुढे तंत्रात वामाचार शिरून त्याची नैतिक अवनती झाली.
या काळात कुमारिल भट्ट, शंकराचार्य, रामानुजाचार्य व निंबार्काचार्य हे थोर तत्त्वज्ञ होऊन गेले. कुमारिल भट्टांनी प्रवृत्तिमार्गाचा पुरस्कार करून यज्ञयागांचे महत्त्व प्रतिपादिले. शंकराचार्यांनी केवलाद्वैताचा आणि रामा-नुजाचार्यांनी विशिष्टाद्वैताचा पुरस्कार केला. निंबार्काचार्यांनी भक्तिमार्गाचे श्रेष्ठत्व प्रतिपादिले.
सांस्कृतिक प्रगती व कला : या काळात स्थापत्य कलेत विशेष प्रगती झाली. उत्तर तसेच दक्षिण भारतात विशिष्ट स्थापत्य पद्धती प्रचलित झाली. उत्तर भारतीय स्थापत्य पद्धतीत देवालयाच्या गर्भगृहावर उंच, उभ्या वक्ररेषांनी युक्त, अरुंद होत गेलेले शिखर असते. त्याच्या शीर्षभागी आमलक (आवळ्यासारखा भाग) असतो. उत्तर भारतातील देवळांच्या शिखरांना मधून मधून लहान आकाराच्या शिखरांनी विभूषित केलेले असते.
उत्तर भारतीय देवळांचे मुख्यतः दोन भाग – गर्भगृह आणि त्यासमोरील मंडप – असतात. अनेक देवळांत द्वारमंडपही असतो. नंतरच्या देवळांत विविध कार्यांसाठी अधिक मंडप उभारलेले आढळतात.
उत्तर भारतीय पद्धतीची उत्कृष्ट देवालये ओडिशात भुवनेश्वर येथे आणि मध्य भारतात खजुराहो येथे अद्यापि अवशिष्ट आहेत. ओडिशात मुक्तेश्वर, राजाराणी व लिंगराज ही देवालये वास्तुशिल्पादींनी नटलेली आहेत. ओडिशातील कोणार्क देवळाला सूर्याच्या रथाचा आकार दिला होता. ते आता बरेचसे भग्न झाले असून त्याचा द्वारमंडप मात्र अद्यापि सुस्थितीत आहे. खजुराहो येथील उंच पीठावर पंचाऐंशी सुंदर देवालये चंदेल्ल नृपतींनी ९००–११०० या दरम्यान बांधली होती. त्या मंदिरांपैकी वीस–पंचवीस मंदिरे अवशिष्ट असून कामशिल्पांसाठी ती प्रसिद्ध आहेत. अबू पर्वतावरील सुंदर कोरीव काम केलेली संगमरवरी देवालये प्रसिद्ध असून या सर्वांवरील शिल्पांकन लक्षणीय आहे.
वाङ्मय : या काळात संस्कृत व प्राकृत वाङ्मयांत अभूतपूर्व लेखन झाले पण त्यांपैकी बरेच टीकात्मक आहे. देवलस्मृती सारख्या अनेक लहान लहान स्मृती या काळात रचण्यात आल्या. त्यांत त्या काळी उत्पन्न झालेल्या धार्मिक प्रश्नांचा विचार केला आहे. या काळात मनुस्मृती वरील मेधातिथीची आणि याज्ञवल्क्यस्मृती वरील विज्ञानेश्वराची टीका तसेच लक्ष्मीधराचा कृत्यकल्पतरू, जीमूतवाहनाचा दायभाग यांसारखे निबंधग्रंथ प्रसिद्ध झाले. शिवाय शंकराचार्य, रामानुजाचार्य, निंबार्काचार्य यांची भाष्ये, कुमारिल भट्टाचे पूर्वमीमांसेवरील ग्रंथ, वाचस्पतिमिश्रांच्या विविध दर्शनांवरील टीका, उदयनाच्या टीका, श्रीहर्षाचे खंडनखंडखाद्य इ. महत्त्वाचे तत्त्वज्ञानविषयक ग्रंथ होत. शाक्टायन, दुर्गसिंह, हेमचंद्र व बोपदेव यांनी संस्कृत भाषेची नवीन व्याकरणे या काळात रचली. हलायुधाची अभिधानरत्नमाला, यादव प्रकाशाची वैजयंती, महेश्वराचा विश्वप्रकाश, मेदिनीकराचा अनेकार्थशब्दकोश हे कोशग्रंथ या काळात निर्माण झाले. साहित्यशास्त्रावर तर अनेक ग्रंथ निर्माण होऊन ध्वनी, रस, रीती, अलंकार, वक्रोक्ती इत्यादिकांना काव्याचा आत्मा मानणारे अनेक संप्रदाय उत्पन्न झाले. आनंदवर्धनाचा ध्वन्यालोक व अभिनवगुप्ताची त्यावरील टीका, वामनाची काव्यालंकारसूत्रवृत्ति, राजशेखराची काव्य-मीमांसा, भोजाचा शृंगारप्रकाश, कुंतकाचे वक्रोक्तिजीवित, मम्मटाचा काव्यप्रकाश, हेमचंद्राचे काव्यानुशासन इ. साहित्यशास्त्रविषयक ग्रंथांत विविध प्रश्नांचा खल केला आहे. अभिनवगुप्ताने भरताच्या नाट्यशास्त्रा वर अभिनवभारती ही सुप्रसिद्ध टीका लिहिली होती. धनंजयाचे दशरूपकही याच काळातील होय. छंदशास्त्रावर क्षेमेंद्राचे सुवृत्ततिलक आणि हेमचंद्राचे छंदोनुशासन ही प्रसिद्ध आहेत. आयुर्वेद, गणित, ज्योतिषशास्त्र इ. शास्त्रांवरही ग्रंथनिष्पत्ती झाली होती. या काळात काव्य-नाटक या ललित वाङ्मयाला चांगलाच बहर आला. त्यात जैन कवींनीही भाग घेतला. जिनसेनाच्या पार्श्वाभ्युदयकाव्या त मेघदूता चा समस्यापूर्तिरूपाने उपयोग केला आहे. रत्नाकराचा हरविजय पन्नास सर्गांचा आहे. कविराजकृत व धनंजयकृत राघवपांडवीर्यां त रामाची आणि पांडवांची कथा त्याच श्लोकांत वर्णिली आहे. श्रीहर्षाचे नैषधीयचरित श्लेष, यमक इ. अलंकारांच्या प्राचुर्यामुळे सर्व संस्कृत काव्यांत श्रेष्ठ गणले जाते. पद्मगुप्ताचे नवसा-हसांकचरित, संध्याकरनंदीचे रामचरित आणि जयानकाचे पृथ्वीराजविजय ही या काळातील ऐतिहासिक काव्ये सुप्रसिद्ध आहेत. या काळात अमरु कवीचे अमरुशतक, बिल्हणाचे चौरपंचाशिका हे प्रसिद्ध प्रेमकाव्य, जयदेवाचे गीतगोविंद , धोयीचे पवनदूत ही गीतिकाव्ये, तसेच विद्याकराच्या सुभाषितरत्नकोशा सारखे सुभाषितसंग्रहही निर्माण झाले.
नाट्यवाङ्मयात भवभूतीची महावीरचरित, मालतीमाधव व उत्तररामचरित, विशाखदत्ताचे मुद्राराक्षस, राजशेखराची बालभारत (प्रचंडपांडव), बालरामायण आणि विद्धशालभंजिका, क्षेमीश्वराचे चण्डकौशिक, जयदेवाचे प्रसन्नराघव इ. नाटके प्रसिद्ध आहेत. मदन बालसरस्वतीचे पारिजातमंजरी आणि सोमदेवाचे ललितविग्रहराजनाटक ही शिलांवर कोरलेली नाटके उपलब्ध झालेली आहेत.
या काळात धनपालाच्या तिलकमंजरीसारखी काही गद्यकाव्ये आणि रामायणचम्पूसारखी गद्यपद्यमिश्रित चम्पूकाव्येही निर्माण झाली. तसेच गुणाढ्याच्या बृहत्कथेची (बड्डकहा) तीन संस्कृत रूपांतरे – बुधस्वामीचा बृहत्कथा-श्लोकसंग्रह, क्षेमेंद्राची बृहत्कथामंजरी आणि सोमदेवाचा कथासरित्सागर – याच काळातील होत. कथावाङ्मयात वेतालपंचविंशतिका (वेतालपंचशति), शुकसप्तति आणि सिंहासनद्वाचिंशिका यांचा निर्देश केला पाहिजे.
प्राकृत वाङ्मय : या काळात प्राकृत वाङ्मयाची अभिवृद्धी झाली. वाक्पतिराजाच्या गउडवहो (गौडवध) मध्ये कनौज नृपती यशोवर्म्याचा दिग्विजय वर्णिला आहे. जैन कवींनी प्राकृतात पुष्कळ ग्रंथरचना केली. हरिभद्रसूरीची समराइच्चकहा (समरादित्यकथा), उद्योतनसूरीची कुवलयमाला, हेमचंद्राचे कुमारपालचरित इ. प्राकृत ग्रंथ सुप्रसिद्ध आहेत.
अपभ्रंश वाङ्मय : या काळात प्राकृत भाषेतून अपभ्रंश भाषा निर्माण होऊन त्यांतही पुष्कळ ग्रंथरचना झाली. त्यांतील अनेक ग्रंथ दक्षिण भारतातील कवींनी रचले होते. अपभ्रंश वाङ्मयात स्वयंभूरचित पउमचरिउ (पद्मचरित) आणि हरिवंशपुराण, कनकामराचे करकंडचरिउ, धनपालाची भविसयत्तकहा, विद्यापतीची कीर्तिलता, श्रीचंद्राचा कथाकोश हे प्रसिद्ध आहेत. अपभ्रंशांतून पुढे भारतातील देशी भाषा उत्पन्न झाल्या.
शिक्षण : या काळात नालंदा विद्यापीठाव्यतिरिक्त विक्रमशिला, सोमपूर, जगद्दल आणि उदंडपूर येथे नवीन विद्यापीठे स्थापन झाली. याशिवाय देशात अनेक ठिकाणी देवालये, मठ इत्यादिकांत शिक्षणाची सोय करण्यात येत असे. दक्षिण भारतातील काही कोरीव लेखांत राजे लोकांनी विशाल अग्रहार स्थापून त्यात वेद, न्याय, व्याकरण, आगम इत्यादिकांच्या अध्यापनाकरिता अध्यापक, विद्यार्थ्यांच्या आरोग्याकरिता वैद्य व रुग्णालये, भोजनाकरिता अन्नसत्रे, औषधी आणण्याकरिता नोकर, शुश्रूषेकरिता दाई वगैरेंच्या सोयी केल्याचा उल्लेख आहे. यांशिवाय अनेक लहानमोठ्या गावांत गुरूच्या घरी राहून आणि भिक्षार्जन करून शिक्षण घेता येत असे. पूर्वी गुरूला गुरुदक्षिणा अध्ययन संपल्यानंतर देण्याचा प्रघात होता. काही स्मृतींत गुरूला अध्ययनशुल्क अगोदर घेण्याची परवानगी दिली आहे. या काळात बालविवाह प्रचलित झाल्यामुळे स्त्री शिक्षणाची पीछेहाट झाली होती.
संदर्भ : Majumdar, R. C. Ed. The History and Culture of the Indian People, Vols. 4 and 5, Bombay , 1998.
मिराशी, वा. वि.
“