हर्ट्झस्प्रंग, आयनार : (८ ऑक्टोबर १८७३–२१ ऑक्टोबर १९६७). डॅनिश ज्योतिर्विद. ताऱ्यांच्या रंगाशी त्याच्या निरपेक्ष तेजस्वितेचा परस्परसंबंध जोडून त्यांनी ताऱ्यांच्या प्रकारांचे वर्गीकरण केले असून त्यांचे हे कार्य आधुनिक ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने मूलभूत कामगिरी आहे. ⇨ हेन्री नॉरीस रसेल यांच्या सहकाऱ्याने त्यांनी तारकीयउत्क्रांतीवर सं शो ध न केले. यासं शो ध ना तू न ‘हर्ट्झस्प्रंग – रसेलआकृती’ (ह. र. आकृती) नावाने ओळखण्यात येणारे आलेख तयार करण्यात आले. ताऱ्यांच्या संशोधनाच्या दृष्टीने हे आलेख मोलाचे आहेत [→ खगोल भौतिकी]. १९१३ मध्ये हर्ट्झस्प्रंग यांनी सेफीड चल ताऱ्यांचा तेजस्वितेविषयीचा मापक्रम प्रस्थापित केला [→ तारा ]. आंतरदीर्घिकीय अंतरे मोजण्यासाठी हा मापक्रम वापरतात.
हर्ट्झस्प्रंग यांचा जन्म कोपनहेगनजवळील फ्रेडरिक्सबर्ग या गावी झाला. त्यांनी ज्योतिषशास्त्राचे औपचारिक शिक्षण घेतले नव्हते. तथापि, डेन्मार्कमधील तंत्रविद्याविषयक महाविद्यालयांत शिक्षण घेऊन ते रासा-यनिक अभियंते झाले. त्यांना छायाचित्रणविषयक रसायनशास्त्रात खूप रस असल्याने १९०२ मध्ये ते ज्योतिषशास्त्राच्या अध्ययनाकडे वळले. त्यासाठी त्यांनी तेथील लहान वेधशाळांत काम केले. तेथे त्यांनी ताऱ्यांच्या प्रकाशाच्या मापनासाठी छायाचित्रणाचा उपयोग करून घेतला. १९०५ व १९०७ मध्ये त्यांचे दोन संशोधनपर निबंध प्रसिद्ध झाले. ताऱ्यांचे रंग आणि त्यांची खरी तेजस्विता यांच्यामध्ये परस्परसंबंध असल्याचे, तसेचमहातारे व लघुतारे अस्तित्वात असल्याचे त्यांनी या निबंधांत दाखविले होते. रंगाचा खऱ्या तेजस्वीपणाशी असलेला परस्परसंबंध हा ताऱ्यांच्या पृथ्वीपासूनच्या अंतराचे आगणन (अंदाज) करण्याच्या पद्धतीचा आधार ठरला असून ही पद्धती व्यापकपणे वापरली जाते. ताऱ्याचा वर्णपट हा त्याच्या निरपेक्ष ⇨ प्रतीचा विश्वासार्ह निदर्शक असल्याने त्याच्या भासमान व निरपेक्ष प्रतींमधील ज्ञात परस्परसंबंधावरून त्याचे अंतर काढता येते.
हर्ट्झस्प्रंग यांच्या संशोधनामुळे पॉट्सडॅम येथील वेधशाळेचे संचालक कार्ल श्वार्त्झशिल्ड इतके प्रभावित झाले की त्यांनी गटिंगेन वेधशाळेत त्यांच्यासाठी एक खास पद निर्माण केले आणि तेथेच ते वरिष्ठ ज्योतिर्विद झाले (१९०९). त्यांची नेदर्लंड्समधील लायडन येथील विद्यापीठीय वेधशाळेचे सहसंचालक म्हणून १९१९ मध्ये नेमणूक झाली. त्यानंतर ते या वेधशाळेचे संचालक झाले होते (१९३५–४५). निवृत्त झाल्यावर ते १९४५ मध्ये डेन्मार्कला परत गेले.
हर्ट्झस्प्रंग यांना त्यांच्या काऱ्याबद्दल रॉयल ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे सुवर्ण पदक (१९२९), ब्रूस पदक (१९३७) इ. मानसन्मान मिळाले होते. तारकीय उत्क्रांतीवर त्यांनी लिहिलेले जायंट अँड ड्वार्फ (१९११) हे पुस्तक प्रसिद्ध आहे.
हर्ट्झस्प्रंग यांचे रॉसकिल (डेन्मार्क) येथे निधन झाले.
ठाकूर, अ. ना. मगर, सुरेखा अ.
“