नाक्षत्र काल ताऱ्यांच्या सापेक्ष मोजला जाणारा काळ. पृथ्वीच्या अक्षीय भ्रमणामुळे ताऱ्यांच्या भासमान होणाऱ्या गतीवरून नाक्षत्र काल मोजला जातो. दूरच्या स्थिर ताऱ्यांच्या लागोपाठ होणाऱ्या दोन याम्योत्तर संक्रमणांमधील (खगोलीय ध्रुवांतून जाणारे व निरीक्षकाच्या क्षितिजाला दक्षिण व उत्तर बिंदूंत छेदणारे तसेच निरीक्षकाच्या बरोबर डोक्यावरील खगोलावरील बिंदूतून जाणारे वर्तुळ म्हणजे याम्योत्तर वृत्त ओलांडण्यामधील) कालावधीला नाक्षत्र दिन म्हणतात. हा माध्य सौर दिनाच्या [→ कालमापन] मानाने लहान असतो (१ माध्य सौर दिन = नाक्षत्र दिनाचे २४ ता. ३ मि. ५६·५५५ से.). ताऱ्यांच्या ऐवजी वसंत संपातबिंदू हा संदर्भ घेतला, तरीही त्याला नाक्षत्र दिनच म्हणतात. संपातबिंदूला गती असल्याने [→ संपातचलन] असा नाक्षत्र दिन १/१२० सेकंदाने कमी असतो. हा सूक्ष्म फरक अधिक अचूक निरीक्षणासाठी वापरतात. वसंत संपातबिंदूच्या याम्योत्तर संक्रमणाच्या क्षणाला नाक्षत्र दुपार म्हणतात आणि अशा दुपारी नाक्षत्र दिन सुरु होतो. हा माध्य सौर दिन २४ तासांचा धरला, तर नाक्षत्र दिन हा २३ ता. ५६ मि. ४·०९१ से. इतका असतो. चंद्राच्या ताऱ्याशी दोन लागोपाठ होणाऱ्या युत्यांमधील कालावधी म्हणजे नाक्षत्र मास होय. विशिष्ट ताऱ्यांच्या संदर्भात सूर्याभोवती एक कक्षीय प्रदक्षिणा होण्यास जो काळ लागतो ते नाक्षत्र वर्ष होय. तारा दूर असल्याने त्याची निजगती (निरीक्षकाच्या दृष्टिरेषेशी लंब असलेल्या दिशेतील ताऱ्याच्या स्वतःच्या गतीचा घटक) लक्षात न घेण्याइतकी अत्यल्प असते. अक्षीय भ्रमणावर कक्षीय भ्रमणाचा होणारा परिणामही उपेक्षणीयच असतो. शिवाय उथळ समुद्रातील भरती-ओहोटीमुळे पृष्ठ भागाशी होणाऱ्या घर्षणाने नाक्षत्र दिनाचा कालावधी शंभर वर्षांत १/१००० सेकंदाने वाढतो. नाक्षत्र काल संक्रमण दूरदर्शकाच्या (याम्योत्तर वृत्ताच्या प्रतलातच फिरू शकेल अशा प्रकारे बसविलेल्या आणि ताऱ्याच्या याम्योत्तर संक्रमणाची नोंद करू शकणाऱ्या दुर्बिणीच्या) साहाय्याने मोजतात. ग्रहांचा ⇨ अमाप्रदक्षिणाकाल (सूर्य व पृथ्वी यांच्या सापेक्ष ग्रह परत त्याच स्थितीत येण्यास लागणारा काळ) माहित असेल, तर त्यावरून गणिताने ग्रहाचा नाक्षत्र काल काढता येतो.

नाक्षत्र काल ज्योतिषशास्त्र दृष्ट्या महत्त्वाचा आहे. वेधशाळांमधून नाक्षत्र काल दर्शविणारी घड्याळे असतात. धार्मिक कार्यासाठी हा काळ महत्त्वाचा नाही. व्यावहारिक दृष्ट्यासुद्धा हा काळ गैरसोयीचा आहे. नाक्षत्र कालाची घटिका-यंत्रे पूर्वी वापरात होती. त्यांच्या योगाने नक्षत्रस्थाने निश्चित केली जात. त्यामुळे नाक्षत्र कालमापन पद्धती प्राचीन असावी.

 

पहा : कालमापन. 

ठाकूर, अ. ना.