हर्णै : महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील बंदर व पर्यटनस्थळ. लोकसंख्या ६,६६७ (२०११). हे दापोलीच्या वायव्येस १५ किमी.वर अरबी समुद्रकिनारी वसलेले आहे. हे रस्त्याने दापोली व इतर शहरांशी जोडलेले असून कोकण रेल्वे मार्गावरील खेड हे याचे नजीकचे रेल्वेस्थानक आहे. यास बंदर म्हणूनही महत्त्व आहे. मासेमारी व त्यांचा व्यापार यासाठी हे प्रसिद्ध आहे.
हर्णैच्या नजीक सुवर्णदुर्ग, कनकदुर्ग, फतेगड, गोवा हे किल्ले आहेत. सुवर्णदुर्ग हा सागरी किल्ला एका खडकाळ बेटावर बांधण्यात आलेला आहे. हा किल्ला विजापूरच्या सुलतानाने सोळाव्या शतकात बांधला असावा असे मानतात. शिवाजी महाराजांनी १६६९ मध्ये या किल्ल्याचे मजबुतीकरण केले. कान्होजी आंग्रे व त्याचा वारसदार तुळाजी आंग्रे यांच्या कारकीर्दीत या किल्ल्यास विशेष महत्त्व प्राप्त झालेले होते. १८१८ मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या अखत्यारित आला. ब्रिटिश सैन्याचे थांब्याचे ठिकाण म्हणून यास महत्त्व होते. कनकदुर्ग किल्ला किनाऱ्यावर असून याच्या तीन बाजूंस समुद्र आहे. कनकदुर्ग व फतेगड हे किल्ले सातारचे छ. शाहू महाराज यांनी बांधले. येथे दीपगृह आहे. मासेमारी, मासे वाळविणे, खारवणे व मासे डबाबंद करून त्यांची निऱ्यात करणे हे हर्णै येथील प्रमुख व्यवसाय आहेत. सप्टेंबर तेजून या कालावधीत येथे माशांचा व्यापार मोठ्या प्रमाणात चालतो. येथील सिद्धीविनायक मंदिर (अठरावे शतक) , नजीकच्या आंजर्ले येथील गणेश मंदिर, तसेच येथील पुळणी व सूऱ्यास्ताचे विलोभनीय दृश्य, निसर्गसौंदर्य इ. मुळे अनेक पर्यटक यास भेट देतात.
गाडे, ना. स.