हर्झबर्ग, गेरहार्ट : (२५ डिसेंबर १९०४–३ मार्च १९९९). कॅनेडियन भौतिकीविज्ञ. संपूर्ण नाव गेरहार्ट हाइन्रिक फ्रीडरिक ओटोयुलिउस हर्झबर्ग. त्यांनी रेणूंच्या इलेक्ट्रॉनीय संरचना व भूमिती निश्चित केल्याबद्दल त्यांना १९७१ सालचे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले. विशेषतः त्यांनी मुक्त मूलकांच्या (उदा., मिथिल व मिथिलीन) रेणू संरचना शोधून काढल्या, तसेच रेणवीय वर्णपटविज्ञानातही मूलभूत संशोधन केले.
हर्झबर्ग यांचा जन्म हॅम्बर्ग (जर्मनी) येथे झाला. तेथेच त्यांचे शालेय शिक्षण झाले. त्यांनी जर्मनीतील डर्मस्टाट इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीया विद्यापीठातून भौतिकी या विषयातील पीएच्.डी. पदवी संपादन केली (१९२८). त्यांनी गटिंगेन व ब्रिस्टॉल विद्यापीठातून संशोधनाचे कार्यकेले (१९२८–३०). त्यानंतर त्यांनी डर्मस्टाट विद्यापीठात अध्यापक(१९३०–३५) कॅनडातील सस्काचेचिवोन विद्यापीठात भौतिकीचे प्राध्यापक (१९३५–४५) व शिकागो येथील यार्क्स वेधशाळेमध्ये वर्णपटविज्ञानाचे प्राध्यापकपदी (१९४५–४८) काम केले. त्यानंतर ते कॅनडा येथील नॅशनल रिसर्च कौन्सिलमध्ये सामील झाले आणि तेथेच ते भौतिकी विभागाच्या संचालक पदावरून सेवानिवृत्त झाले (१९६९).
हर्झबर्ग यांच्या रेणवीय वर्णपटविज्ञानाच्या संशोधनामुळे भौतिकीय रसायनशास्त्र व पुंजयामिकी यांमध्ये महत्त्वाचे प्रायोगिक निष्कर्ष मिळाले. तसेच वायूच्या रासायनिक विक्रियांचे अन्वेषण करण्यास प्रोत्साहन मिळाले. त्यांनी प्रयोगशाळेमध्ये वायुरूप द्रव्ये असलेल्या नळ्यांच्या साहाय्याने उच्च दाबाला अनेक वर्णपटांचे पुनरुत्पादन केले. त्यांनी हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन व कार्बन मोनॉक्साइड यांसारख्या द्वि-आणवीय रेणूंवर संशोधन केले. काही मुक्त मूलके ही पुष्कळ रासायनिक विक्रियांचे मध्यस्थ आहेत, हे त्यांनी शोधून काढले. आंतरतारकीय वायूतील काही मूलकांचा वर्णपट शोधून बाह्य ग्रह व तारे यांच्या वातावरणातील वर्णपटविषयक माहिती मिळविण्यासाठी त्यांनी सहभाग घेतला.
हर्झबर्ग यांना पुढीलप्रमाणे अनेक मानसन्मान मिळाले आहेत : हंगेरियन ॲकॅडेमी ऑफ सायन्सचे सन्माननीय सदस्य (१९६४) अमेरिकन ॲकॅडेमी ऑफ आर्ट अँड सायन्सचे परराष्ट्रीय सन्माननीय सदस्य (१९६५) कॅनडा येथील नॅशनल रिसर्च कौन्सिलचे संशोधन शास्त्रज्ञ (१९६९)लिज विद्यापीठ पदक (१९५०) इंडियन ॲसोसिएशन फॉर कल्टिव्हेशन ऑफ सायन्सचे जय किसान मुखर्जी सुवर्ण पदक (१९५७) अमेरिकन केमिकल सोसायटीचे विलार्ड गिब्ज पदक (१९६९) रॉयल सोसायटी ऑफ लंडनचे रॉयल पदक (१९७१) इत्यादी.
हर्झबर्ग यांची पुढील काही पुस्तके प्रसिद्ध आहेत : ॲटॉमिक स्पेक्ट्रा अँड ॲटॉमिक स्ट्रक्चर (१९३७) मॉलिक्यूलर स्पेक्ट्रा अँड मॉलिक्यूलर स्ट्रक्चर स्पेक्ट्रा ऑफ डायॲटॉमिक मॉलिक्यूल्स, व्हॉल्यूम १, (१९३९) इंफ्रारेड अँड रामन स्पेक्ट्रा ऑफ पॉलिॲटॉमिक मॉलिक्यूल्स, व्हॉल्यूम ३, (१९६६) द स्पेक्ट्रा अँड स्ट्रक्चर्स ऑफ सिम्पल फ्री रॅडिकल्स :ॲन इंट्रोडक्शन ऑफ मॉलिक्यूलर स्पेक्ट्रोस्कोपी (१९७१).
हर्झबर्ग यांचे ओटावा (कॅनडा) येथे निधन झाले.
फाळके, धै. शं. मगर, सुरेखा अ.