हर्क्यूलॅनिअमचे प्राचीन अवशेषहर्क्यूलॅनिअम : दक्षिण इटलीतील कँपेन्या परगण्यातील एकप्राचीन प्रसिद्ध नगरी. ती ⇨ व्हीस्यूव्हिअस या ज्वालामुखी पर्वताच्या शेजारी नेपल्सच्या आग्नेयीस सु. आठ किमी.वर वसली होती. तिची वस्ती ५,००० होती. इ. स. ६२ च्या फेब्रुवारीत या नगरीला पाँपेईबरोबरच पहिला भूकंपाचा धक्का बसला. त्यानंतर २४ ऑगस्ट ७९ रोजी ज्वाला-मुखीच्या उद्रेकामुळे हर्क्यूलॅनियम व पाँपेई ही शहरे जमिनीत गाडलीगेली. या दोन्ही शहरांवर राख आणि लाव्हा यांनी पक्के आवरण घातले. गुदमरून गेलेले रहिवासी काही ठिकाणी १५ मी. जाडीच्या लाव्ह्याखाली गडप झाले. तिसऱ्या दिवशी सकाळी व्हीस्यूव्हिअसचा सर्व परिसर राखेच्या आवरणाखाली गेलेला होता.

हर्क्यूलॅनिअमचा प्राचीन इतिहास स्पष्ट नाही. नवाश्मयुगीन लोकांचे वंशज असलेल्या ऑस्कन लोकांनी हे नगर वसविले, असे इतिहास सांगतो. इ. स. पू. आठव्या शतकात यावर ग्रीकांचा प्रभाव वाढला. प्राचीन परंपरेनुसार हर्क्यूलीझ या ग्रीक नेत्यावरून यास हर्क्यूलॅनिअम हे नावमिळाले असावे. इ. स. पू. सहाव्या शतकापासून त्याचा अस्पष्ट इतिहास उपलब्ध आहे. काही वर्षे त्यावर सॅमनाइट या इटालियन लोकांचे वर्चस्व होते. इ. स. पू. ८९ मध्ये तेथे रोमन नगरपालिका होती. रोमबरोबर मित्र नगरराज्यांचा संघर्ष चालू होता. पुढे भूकंप आणि ज्वालामुखीत ते नष्टझाले. या घटनेचे वर्णन इतिहासकार धाकटा प्लिनी (इ. स. ६२–११४) याने कॉर्नीलिअस टॅसिटसला लिहिलेल्या पत्रात आढळते.

हर्क्यूलॅनिअमवर २० मी. लाव्ह्याचा थर असल्याने येथे उत्खननकरणे जिकिरीचे ठरले. १७०९ मध्ये अपघाताने येथे उत्खनन करताना एक नाट्यगृहाची भिंत आढळली. शिवाय उत्खननात तीन युवतींचे संगमरवरी पुतळेही सापडले. ते पाहून नेपल्सचा राजा चौथा चार्ल्स याने १७३८ मध्ये पुन्हा उत्खनन सुरू केले. त्यानंतर पुढे १७६५ पर्यंत तेथे विस्तृत उत्खनन सुरू होते. यातून उपलब्ध झालेल्या, विशेषतः बॅसिलिकातील आणि उपनगरातील, बंगल्यातून मिळालेली सुरेख चित्रे, पुतळे, ब्राँझ व संगमरवरी कलात्मक वस्तू पोटिसी संग्रहालयात ठेवण्यात आलेल्या आहेत. या बंगल्याला ‘पपायरी व्हीला’ असे संबोधण्यात आले. त्यात ग्रीक भाषेतील ग्रंथ होते. त्यानंतर कित्येक दशके येथे उत्खनन चालू राहिले. १८२८ मध्ये पुन्हा येथे विस्तृत प्रमाणावर उत्खनन करण्यात आले परंतु सध्या या प्राचीन नगरीच्या अवशेषांवरच रेझीना हे गाव वसलेले असल्याने उत्खनन करणे अडचणीचे झाले आहे.

आतापर्यंत उपलब्ध झालेल्या पुराव्यांवरून या शहराची आखणी, तेथील भव्य इमारती, स्नानगृहे, खेळांची मैदाने, मंदिरे, शिल्पे आणि प्रतिष्ठितांचे प्रासाद यांची उपलब्धी झालेली आहे. १७५३ मध्ये येथेलिखित ग्रंथाची पाने सापडली. हे लिखाण म्हणजे संगीतावर एपिक्यूरियन तत्त्वज्ञानाचा प्रख्यात विद्वान फिलडीमस याचा ग्रंथ होय. रोमनांनी बांधलेला हॉल, ‘हस्तलिखिताचा’ प्रासाद, दोन स्नानगृहे, ऑगस्टसचे मंदिर, त्याचप्रमाणे ‘हाउस ऑफ स्टॅग्ज’ व ‘हाउस ऑफ द मोझाइक ॲट्रियम’ ही प्रासादतुल्य घरे येथील उल्लेखनीय वास्तू होत. त्या वेळी शहराची आखणी योजनाबद्ध काटकोन चौकोनात केलेली होती.

सुरुवातीच्या काळात येथे केल्या गेलेल्या उत्खननात आणि जतनात अनेक अवशेषांची मोडतोड झाली. हस्तलिखिते कापण्यात आली. ब्राँझचे पुतळे मोडून वितळविण्यात आले, शिल्पे तोडण्यात आली. तरीदेखील उर्वरित अवशेषांतून या नगरीचे कलात्मक वैभव प्रत्ययास येते.

संदर्भ : 1. Brion, M. Pompeii and Herculaneum : The Glory and The Grief, New York, 1960.

           2. Grant, M. Cities of Vesuvius : Pompeii and Herculaneum, New York, 1978.

           3. Waldstein, C. Shoobridge, L. Herculaneum : Past, Present and Future, London, 1908.

देव, शां. भा.