हरिवंश-३ : ओडिया भाषेतील एक ग्रंथ. तो ⇨ अच्युतानंद दास (१४८९– सु. १५६८) या प्रसिद्ध वैष्णव कवीने रचला आहे. ओडिशातील वैष्णव कविसंप्रदायात ⇨ पंचसखा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या कविपंचकातील अच्युतानंद हा वयाने कनिष्ठ कवी होय. त्याने या ग्रंथाची रचना भुवनेश्वरापासून ६० किमी.वर असलेल्या राणापूर येथे केली. मूळ संस्कृत साचा सोडला, तर हरिवंश ही त्याची जवळजवळ स्वतंत्र रचना म्हणता येईल. त्यात त्याने कृष्णचरित्र वर्णिले असून ओडिशातील गोप-जातीच्या सामाजिक जाणिवा प्रतिबिंबित केलेल्या आहेत. यात मुख्यत्वे हरी म्हणजे श्रीकृष्णाच्या पिढ्यांचे वर्णन असून कवी वंशानुचरितही सांगतो. हे सांगताना तो सृष्टितत्त्वाचे तपशील सांगतो. या ग्रंथाची रचना सात खंडांत केली आहे, म्हणून त्यास सतखंडिया हरिवंश म्हणतात मात्र असे विभाजन मूळ संस्कृत हरिवंश ग्रंथात नाही. त्यात तीन भाग असून महाभारताचे ते पुरवणी (खिल) काव्य आहे. अच्युतानंदाने मूळ हरिवंशा तील अनेक कथांना वगळले असून काही नवीन कथा त्यात घातल्या आहेत.उदा., गोपाली ही मूळ हरिवंशा नुसार अप्सरा असून गोपापूरची रहिवासीहोती. गार्गमुनी पुत्रेच्छेने गोपापुरास गेला. त्याने गोपालीशी समागमकरून तिच्याद्वारे मुलगा प्राप्त केला पण ओडिया हरिवंशा त गोपालीचा गोपापुराशी काहीच संबंध नाही. गोपाली ही दशदमन राजाची कन्या असून राजाला पुत्रसंतती नसल्यामुळे ती राज्यकर्ती झाली. तिला तारुण्य, सत्ता व संपत्ती हे सर्व लाभले असूनही कामसुख नव्हते, याची खंत वाटू लागली. म्हणून तिने शंकराची आराधना केली. त्याच्या वरानुसार ती गार्गमुनीचीभाऱ्या बनली आणि कालदमननामक मुलाला तिने जन्म दिला.
अच्युतानंद वारंवार आपण भागवता तून कथाभाग निवडल्याचे सांगतो तथापि भागवता त कृष्ण आणि गोपी यांच्या प्रेमकथा वर्णिल्या आहेत पण ओडिया हरिवंशा त राधा व कृष्ण यांचेच प्रेमप्रकरण असून त्याच्या सातव्या भागात कृष्णाचे राधेशी झालेले लग्न निर्दिष्ट केले आहे. त्याचे पौरोहित्य नारदाने केले आहे. भागवता व्यतिरिक्त कवीने अन्य साधनांतूनही माहिती घेतली आहे. उदा., शिवपुराणा तून त्रिपुर चंदल, दक्षयज्ञ, कार्तिकेयाचा जन्म, तर मत्स्यपुराणा तून कुबल्य आणि शुनस यांची कथा घेतली आहे आणि बृहन्नारदीयपुराणां तून नारदाचे स्त्रीरूप वर्णिले आहे. तो सातत्याने वशिष्ठपुराण आणि भविष्यपुराण यांच्या साधनसामग्रीचाही नामोल्लेख करतो. यांशिवाय अलंकारशास्त्र, कामशास्त्र, योगशास्त्र, ज्योतिषशास्त्र, जलधरी-विद्या, उलूकविद्या यांचाही तो उल्लेख करतो.
हरिवंशात भुवनेश्वर, पुरी, जयपूर, बनपूर, राणापूर या गावांचा खंडगिरी, कपिलास, महेंद्रगिरी, मलयगिरी या पर्वतांचा सुवर्णरेखा, वैरणी, ब्राह्मणी, आणि महानदी (चित्रोत्पला) या नद्यांचा जगन्नाथ, अनंत, वासुदेव, लिंगराज या देवांचा आणि शारदा, भगवती आदी देवतांचा उल्लेख आहे. ओडिशातील नदी, नाले, पर्वत, देवदेवता यांना कवीने विशेष महत्त्व दिले आहे. कवीच्या मते श्रीकृष्णाचे द्वारकेत निधन झाल्यानंतर तो पुरीत जगन्नाथम्हणून अवतीर्ण झाला.
हरिवंशात कवी कृष्णाचे आप्तेष्ट, गोपी यांच्या पूर्वजन्माची हकीकत सांगतो आणि त्यांचा संबंध वेताळ व सत्ययुगाशी लावतो. हे काव्य सामान्य लोकांसाठी रचलेले असल्यामुळे त्याची भाषाशैली साधी, नेहमीच्या व्यव-हारातील असून त्याने दंडीवृत्त वापरले आहे. त्याचा मूळ हेतू वैष्णव धर्माचा प्रसार-प्रचार करणे हा असल्यामुळे वृंदावनातील वृक्षवल्ली, पर्वत, नद्या यांना श्रीकृष्णाच्या भक्तगणांचे काल्पनिक रूप दिले आहे. श्रीकृष्णकथे-तील पात्रांनी चुका केलेल्या होत्या. त्यांतून त्यांची मुक्तता करण्यासाठी कवी ‘हरे कृष्ण ‘चा जप सांगतो. हा त्याचा अत्यंत महत्त्वाचा संदेश होय. माणसात देव पाहणारा आणि माणसातील देवत्वाचा पुरस्कार करणारा, तो एक महान द्रष्टा कवी होता. त्याने ओडिशातील सोळाव्या शतकातील सामाजिक व सांस्कृतिक स्थितीचे स्पष्ट चित्रण हरिवंशात केले आहे.
देशपांडे, सु. र.