हरिदास स्वामी : (१४८० ?–१५७५ ?). उत्तर भारतातील प्रख्यात कवी, कृष्णभक्त आणि संगीत रचनाकार. त्यांच्या जन्ममृत्यूच्या तारखा तसेच पूर्वजीवनाविषयी निश्चित माहिती ज्ञात नाही. त्याबद्दल दोन मतप्रवाह आहेत. त्यांचा जन्म वृंदावनजवळील रायपूर येथे गंगाधर व चित्रादेवी या दांपत्यापोटी झाल्याचे एक मत आहे तर अन्य संशो-धकांच्या मते त्यांचा जन्म मुलतानात मुलासंत व गंगादेवी या दांपत्या-पोटी झाला. पुढे हे कुटुंब उत्तर प्रदेशातील अलिगढजवळील खिरावली सरक या गावी स्थलांतरित झाले.
गुरू अशुधर यांच्याकडून हरिदास स्वामी यांनी विद्या प्राप्त केली. वयाच्या पंचविसाव्या वर्षीच त्यांनी संन्यास घेतला आणि ते कृष्णभक्तीत रममाण झाले. वृंदावन येथे त्यांनी स्वतःच्या आश्रमाची स्थापना केली आणि तेथून त्यांनी भक्तिमार्गाचा आणि संगीताचा प्रसार केला. काही काळ ग्वाल्हेरचे महाराजा मानसिंग तोमर यांच्या दरबारात व्यतीत केला. महाराज धृपद संगीताचे चाहते आणि जाणकारही होते. ग्वाल्हेरच्या दरबारात त्यांचा परिचय तत्कालीन दरबारगायक बक्षु, भानु आणि बैजू बावरा यांच्याशी झाला. त्यांच्याशी झालेल्या सांगीतिक देवाणघेवाणीमुळे स्वामीजींचे संगीत अधिकच समृद्ध झाले.
वृंदावन येथे परतल्यानंतर त्यांनी स्वतः अनेक रचना केल्या. त्यांत विविध रागांतील धृपदे व इतर भक्तिपूर्ण कवने होती. त्यांच्या सांगीतिक आणि काव्यविषयक रचना साध्या, सरळ आणि अतिशय रसपूर्ण आहेत. त्यामुळेच त्यांना रसांचा राजा असे म्हटले जाते. ते अत्यंत विरक्त व श्रेष्ठ कृष्णभक्त होते. त्यांच्या बहुतेक रचना राधा आणि कृष्ण यांच्या प्रेमावर आधारित आहेत आणि त्यातून त्यांनी आध्यात्मिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रेम, भक्ती यांचा पुरस्कार करणाऱ्या तत्कालीन संतांमध्ये त्यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. त्यांचे गायन अतिशय मोहक होते. त्यांच्या रचना साधेपणा आणि सौंदर्य यांनी परिपूर्ण होत्या.
स्वामीजींच्या रचना मुख्यत्वे धृपद प्रकारात बांधलेल्या आहेत. त्यांत काव्य आणि अध्यात्म यांचा सुरेख मिलाफ आढळतो. त्यांनी निर्मिलेल्या अनोख्या संगीतशैलीला ‘हरिदासी संगीत’ म्हणून ओळखले जाते, तर त्यांच्या पदांना ‘विष्णूपदे’ असे म्हटले जाते.
हरिदास स्वामी यांनी सु. १२८ रचना केल्या असे मानले जाते. त्यांपैकी ११० रचना या भक्तिप्रधान आहेत, तर उर्वरित १८ रचना पूर्णपणे तत्त्वज्ञानविषयक आहेत. त्यांना ‘सिद्धान्त पदे’ असे म्हणतात. त्यांच्या सांगीतिक योगदानात प्रामुख्याने भगवान विष्णू आणि श्रीकृष्ण यांची स्तुतिपर वर्णने आढळतात. त्यांनी आपल्या रचना ब्रज भाषेत रचल्या असून त्या मधुर आणि प्रासादिक आहेत. यांव्यतिरिक्त त्यांनी अनेक रागमाला आणि त्रिवट (तिरवट) या प्रकारातील रचना रचल्या.
किन्नरी आणि अघौती या तंतुवाद्यांची तसेच मृदंग आणि डफ या तालवाद्यांची निर्मितीही हरिदास स्वामी यांनी केली असावी, असे एकदृढमत आहे. अकबराच्या (कार. १५५६–१६०५) दरबारातील नव-रत्नांपैकी ⇨ तानसेन (१४९३ ?–२६ एप्रिल १५८९) हा त्यांना गुरुस्थानी मानीत असे.
हरिदास स्वामी यांच्या संगीत आणि काव्य या दोन्ही क्षेत्रांतील कर्तृत्वाचा प्रभाव तत्कालीन सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनावर ठळकपणे आढळतो. त्यांच्या शिष्यपरिवारात कृष्णदास आणि विठ्ठल यांची नावेप्रामुख्याने आढळतात. या दोघांनी स्वामीजींच्या भक्तिमार्गाचा आणिसंगीताचा प्रसार भारतभर, विशेषतः उत्तर भारतात, केला.
स्वामींच्या स्मरणार्थ मथुरा-वृंदावन येथे प्रतिवर्षी एक भव्य संगीत सोहळा आयोजित केला जातो. देश-विदेशांतील अनेक कलाकार यात सहभागी होतात. वृंदावन येथेच त्यांनी समाधी घेतल्याची वदंता आहे.
मंगरूळकर, अरविंद कुलकर्णी, रागेश्री अ.