हरणदोडी : [म. आंबरी हिं. नाकचिकणी सं. सुपर्णिका, मधुमालती गु. मोटीडोडी क. दुग्धिके लॅ. मार्सडेनिया व्हॉल्यूबिलिस (ड्रेजिया व्हॉल्यूबिलिस) कुल-ॲस्क्लेपीएडेसी]. ही मोठी ओषधी वेल असून ती सु. १० मी.पर्यंत वाढते. तिचा आढळ नेपाळ, बांगला देश, दक्षिण चीन, तैवान, थायलंड, मलेशिया व फिलिपीन्स येथे आहे. तसेच ती भारतात सामान्यतः सर्वत्र, जावा व श्रीलंका येथे रानटी अवस्थेत आढळते.

हरणदोडीहरणदोडी वनस्पतीची पाने मोठी ७.५–१५ सेंमी. लांब आणि ५–१० सेंमी. रुंद, अंडाकृती, हृदयाकृती, टोकदार वरच्या बाजूस गर्द हिरवी, परंतु खाली फिकट हिरवी असून देठाच्या तळाशी काही प्रपिंडे (ग्रंथी) असतात. फुलोरे लोंबते, चामरकल्प, कुंठित व पानांच्या बगलेत एप्रिल-मेमध्ये येतात. फुले लहान (सर्वसाधारणपणे १ सेंमी. आकाराची), हिरवट व संख्येने पुष्कळ असून पुष्पमुकुट चक्राकार असतो. तोरणाची प्रत्येक पाकळी मोठी, जाड, शेंड्याकडे फाटल्यासारखी असून आतील बाजूस एक टोकदार भाग असतो. पेटिकासम फळ ७.५–१० सेंमी. लांब, शेंडा बोथट व निमुळता असून त्यात अनेक बिया असतात. बी चपटे, मऊ, सु. ४.६ सेंमी. लांब व पिंगट रंगाचे असून टोकास केसांचा झुबका असतो. खोडावर राखी साल असून चीक पातळ असतो.

हरणदोडी वनस्पतीच्या पानांचा उपयोग केसतूट, गळू व जखमा पुवाळण्यासाठी करतात. केरळमध्ये पानांचा उपयोग दाह व वेदना यांवर करतात. मुळे व कोवळ्या फांद्या कफोत्सारक व वांतिकारक असून वनस्पतीचे सर्व भाग सर्दी आणि नेत्ररोगावर उपयुक्त आहेत. मुळांची पेस्ट (रबडी) सर्पदंशावर व मूल जन्मल्यावर बाळंतिणीस डोकेदुखीवर देतात. मुळे शोथकारक व मूत्रल आहेत.

पहा : ॲस्क्लेपीएडेसी.

हर्डीकर, कमला श्री.