हबाब : [वेलिबी हिं. कोधब गु. खोरडु क. चेगावीच्छे इं. इंडियन कडाबा लॅ. कडाबा इंडिका (कडाबा फॅरिनोसा) कुल-कॅपॅरिडेसी ]. हे अनेक फांद्या असलेले व वर चढणारे क्षुप असून सु. ३ मी. उंचीपर्यंत वाढते. या ओषधी क्षुपाचा प्रसार मुख्यतः उष्ण व उपोष्ण प्रदेशांत असून पाकिस्तानातील सिंध व बलुचिस्तान येथील शुष्क प्रदेशांत सामान्य आहे. त्याचा आढळ अंगोला, कॅमेरून, काँगो प्रजासत्ताक, ईजिप्त, इथिओपिया, भारत, केन्या, नायजर, सौदी अरेबिया, सेनेगल व सोमालिया तसेच आफ्रिका, आशिया व ऑस्ट्रेलियातील उष्ण व उपोष्ण प्रदेशांत आहे. भारतात पंजाब, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, इ. भागांत त्याचा प्रसार आहे. त्याचा आढळ सस.पासून सु. १,६०० मी.पर्यंत आहे. विशेषेकरून हे क्षुप कुंपणाच्या कडेला आढळते.
हबाब वनस्पतीचे खोड गोलाकार असून जून खोड जांभळट आणि कोवळे खोड पिवळसर तपकिरी व गुळगुळीत असते. पाने साधी, लहान, १२ – ३५ × ८ – १२ मिमी., अखंड लंबगोल व लवहीन असून रंग रुपेरी करडा असतो. फुले साधारणपणे चतुर्भागी, सच्छद, नियमित, द्विलिंगी, हिरवट पांढरी वा पिवळसर व सु. १.५ सेंमी. असून नोव्हेंबर – मार्च यांदरम्यान टोकाकडे मंजरीवर अथवा गुलुच्छावर येतात. संदले विषम प्रकारची व अंडाकृती प्रदले चमसाकृती व संवृत केसरदले बहिरागत किंजपुटात एक कप्पा व खाली किंजधर किंजल नसते बिंब लांबट व नसराळ्यासारखे दातेरी फळ (शिंबा) तडकणारे, लांबट (२.५–५ सेंमी. × ३ मिमी.) असून त्यात अनेक मूत्रपिंडाकृती, रेषांकित, शेंदरी व अध्यावरणयुक्त बिया असतात.
हबाब वनस्पतीचे सर्व भाग उपयोगी आहेत. त्यांचा वापर ताप, कफ व हगवणीवर करतात. पानांमध्ये अल्कलॉइड असते. पानांचा काढा अनार्तव व गर्भाशय शूल यांवर तसेच धान्याच्या पिठात मिसळून कफावर उपयोगी आहे. पानांचे पोटीस जखमांवर लावतात. पाने व मुळे दोन्ही रेचक, कृमिघ्न, जंतुनाशक, स्कर्व्हीरोधक, आर्तवजनक व विरेचक असतात. मुळांचा काढा सांसर्गिक काळपुळीवर उपयोगी असून फळे खाद्य आहेत.
पहा : कॅपॅरिडेसी.
परांडेकर, शं. आ. कुलकर्णी, सतीश वि.
“