हदगा –१ : एक पर्जन्यविधी आणि व्रत. हस्तग म्हणजे सूर्य. तो हस्त नक्षत्रात जातो तो ह्या विधीचा काळ होय. हस्त नक्षत्रात हत्ती पाण्यात बुडेल इतके पाणी बरसावे, अशी समजूत आहे. हे व्रत त्या समजुतीशी निगडित आहे. आश्विन महिन्यात हस्त नक्षत्राचा आरंभ होतो. त्या दिवसापासून पुढचे सोळा दिवस किंवा नवरात्राच्या पहिल्या दिवसा-पासून पौर्णिमेपर्यंत हदग्याच्या निमित्ताने मुली एक खेळ खेळतात. ह्या खेळाला हदगा म्हणतात. तसेच यास भोंडला असेही नाव आहे.
हदग्याच्या खेळात जमिनीवर किंवा पाटावर रांगोळीने किंवा धान्याने हत्तीचे चित्र काढतात. रंगीबेरंगी फुलांच्या माळा घालून त्या चित्रातल्या हत्तीला सजवतात. कधी त्या हत्तीला रांगोळीच्या ठिपक्यांची झूलही घातलेली असते. नंतर त्या हत्तीच्या भोवती फेर धरून मुली काही विशिष्ट गाणी म्हणतात. त्यांना ‘हदग्याची गाणी’ असे म्हटले जाते. ‘ऐलमा पैलमा गणेशदेवा, माझा खेळ मांडू दे करीन तुझी सेवा’ हे हदग्याचे एक प्रसिद्ध गाणे. सोळा दिवसांच्या कालावधीत रोज एकेका गाण्याची भर पडते. म्हणजे पहिल्या दिवशी एक, दुसऱ्या दिवशी दोन, असे करत सोळाव्या दिवशी सोळा गाणी म्हटली जातात. ह्या सोळा दिवसांत मुली आळीपाळीने एकमेकींच्या घरी जमून हा गाणी गाण्याचा कार्यक्रम करतात. जिच्या घरी हदगा, तिच्या घरी खिरापत असते. गाणी जशी वाढतात, तशा खिरापतीही वाढतात. खिरापतीसाठी रोज वेगळा पदार्थ असल्यामुळे सोळाव्या दिवशी सोळा पदार्थांची खिरापत असते. खिरापत वाटण्यापूर्वी ती कोणती, हे ओळखण्याचा एक कार्यक्रम असतो. त्यावेळी मुलींची प्रश्नोत्तरे होतात आणि ती खूपच मनोरंजक असतात. हदग्याच्या गाण्यांतून पावसामुळे होणारा आनंद व्यक्त होतो.
हदगा हे एक व्रतही आहे. स्थलपरत्वे त्यात फरक आढळतो. काही ठिकाणी ह्या व्रतात केल्या जाणाऱ्या पूजेसाठी पाच गोटे घेऊन त्यांची पानाफुलांनी पूजा करतात, तर काही ठिकाणी हदग्याच्या म्हणजे अगस्त्याच्या झाडाची फांदी रोवून तिच्या भोवती फेर धरतात. काही ठिकाणी शंकर, पार्वती आणि गणेश ह्यांची स्थापना पूजेसाठी केली जाते. ह्यावेळी भुलाबाईची (पार्वतीची) गाणी गायिली जातात. गुजरातमधील गरब्याचे मूळ ह्या गाण्यांत आहे, असे एक मत आहे.
हदग्याची गाणी जुन्या मराठी लोकगीतांपैकी होत. मुळात ही गाणी सोळा असून काही ठिकाणी ती सोळांहून जास्त, तर काही ठिकाणी सोळांहून कमी आढळतात.
कुलकर्णी, अ. र.