हदीस : इस्लाम धर्माचा पाया म्हणून ⇨ कुराण (इस्लामचा धर्मग्रंथ), हदीस (प्रेषित ⇨ मुहंमद पैगंबर यांच्या वचनांचा संग्रह), इज्मा आणि कियास हे जे चार उगमस्रोत मानले जातात, त्यांपैकी सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कुराण आणि हदीस हे होत. प्रेषितांचा वचनसंग्रह म्हणजे हदीस आणि आपल्या महानिर्वाणापर्यंतच्या आयुष्यात प्रेषित महंमदांनी घेतलेले निर्णय, त्यांचे आचरण आणि त्यांची वचने यांना ‘सुन्ना’ असे म्हणतात. हदीसचा समावेश ‘सुन्ना ‘मध्येच केला जातो. प्रेषितांची वचने, प्रतिपादने आणि निर्णय हे त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांनी आणि अनुयायांनी संग्रहित करून लिहून काढले आणि प्रेषितांचे कोणते वचन बरोबर किंवा सत्य यांची पडताळणी करण्याचे शास्त्र विकसित केले.
धार्मिक किंवा कोणत्याही आचरणासंबंधी जेव्हा एखादी समस्या निर्माण होते, तेव्हा त्याची उकल करण्यासाठी कुराणा तील आयतांचा आधार घेतला जातो. कुराणा त त्याची उकल न सापडल्यास हदीसचा आधार घेतला जातो. प्रेषितांच्या वचनांचे सहा अधिकृत मानले जाणारे ‘हदीस संग्रह’ आहेत. ते म्हणजे अल् बुखारीप्रणीत हदीस, साहि मुस्लिम म्हणून प्रसिद्ध असलेले हदीस, तिरमीजीकृत हदीस, दाऊदप्रणीत हदीस, अल् नसाईप्रणीत हदीस व अल् काझमीप्रणीत हदीस. हेच संग्रह अधिकृत मानले जातात.
पहा : इस्लाम धर्म (धर्मशास्त्र आणि कायदा) मुसलमानी विधि (सुन्ना व अहादिस) शरीयत.
बेन्नूर, फकरूद्दीन