हडसन, हेन्री : (१५५० ? -१६११ ? ). आर्क्टिक व उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्याचे समन्वेषण करणारा इंग्लिश मार्गनिर्देशक.याच्या जन्माबाबत काहीच माहिती उपलब्ध नाही. बालवयापासूनच तो जहाजांवर शिपबॉय म्हणून काम करीत असे. हे काम करता करताच तो जहाजाच्या मुख्य नाविक पदापर्यंत पोहोचला. त्याने यूरोप व आशिया यांदरम्यानचा उत्तर सागरी मार्ग शोधण्यासाठी प्रमुख चार सफरी केल्या. मस्कोव्ही कंपनीतर्फे १६०७ मध्ये चीनला जाणारा मार्ग शोधून काढण्यासाठी त्याला पाठविण्यात आले होते. ग्रीनलंडच्या पूर्वेकडे जात असताना ८०° उत्तर अक्षांशावरील स्पिट्स्बर्गेन बेटापर्यंत तो पोहोचला. या बेटावरील अज्ञात असलेल्या भागाचा त्याने शोध लावला. तेथून इंग्लंडला येत असताना आइसलँडच्या ईशान्योत्तर असलेल्या यान मायेन या बेटाचा शोध त्याने लावला. त्याच्या प्रवासवृत्तान्तावरून इंग्लिश व्यापाऱ्यांनी स्पिट्स्बर्गेन येथे देवमाशांना पकडण्यासाठी केंद्र स्थापन केले होते.

मस्कोव्ही कंपनीने २२ एप्रिल १६०८ रोजी हडसनला पुन्हा त्याच कामगिरीवर पाठविले. या वेळी तो नॉव्हायाझीमल्या बेटापर्यंत जाऊ शकला. त्याच वर्षी डच ईस्ट इंडिया कंपनीने हडसनशी त्याच सम-न्वेषणाविषयी करार केला. ६ एप्रिल १६०९ रोजी ‘हॅव्ह मेन’ (हाफमून) या गलबतातून काही इंग्लिश व डच लोक बरोबर घेऊन हडसननेहॉलंड (नेदर्लंड्स) सोडले. महिनाभरात तो नॉव्हायाझीमल्याजवळ आला परंतु त्याच्याबरोबरच्या लोकांनी या धाडसाला घाबरून बंड पुकारले. त्यांच्या इच्छेला मान देऊन हडसनने आपले जहाज पश्चिमेकडे वळविलेव तो थेट ग्रीनलंडच्या पश्चिमेकडील डेव्हिस सामुद्रधुनीपर्यंत आला. तेथून दक्षिणेकडे वळून हडसन नदीमुखात शिरला. या नदीत सु. २४५ किमी. आत जाऊन त्याने तेथील प्रदेशाची पाहणी केली परंतु पुढे परतीचामार्ग निघू शकणार नाही असे वाटल्यावर तो परत फिरला व ७ नोव्हेंबर १६०९ रोजी तो इंग्लंडमध्ये डार्टमथ बंदरात आला. हडसनने दिलेल्या प्रवासवृत्तान्तावरून उत्तर अमेरिका खंडाच्या ४०° उत्तर अक्षांशाजवळ पनामासारखीच छोटी भूपट्टी असून तेथून पॅसिफिकमध्ये जाता येईलअसा समज झाला. इंग्लंडमध्ये काही लोकांनी एक कंपनी उभारून व्हर्जिनिया आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया या कंपन्यांच्या आर्थिक साहाय्याने हडसनला या कामगिरीवर नेमले. एप्रिल १६१० ला ‘डिस्कव्हरी’ या गलबतात निवडक माणसे घेऊन हडसनने लंडन सोडले. जूनमध्ये अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील एका सामुद्रधुनीतून तो उपसागरात शिरला (ही सामुद्रधुनी व उपसागर आज त्याच्याच नावाने ओळखली जातात). त्याने या उपसागरातच हिवाळा काढण्याचा बेत केला परंतु अन्नाचातुटवडा पडला व गलबतावरील लोकांनी बंड पुकारले. २२ जून १६११ रोजी हडसन, त्याचा आठ वर्षाचा मुलगा व त्याला साथ देणारी सातमाणसे या सर्वांना एका लहान होडक्यात बसवून गलबतावरील लोकांनी त्यांना ढकलून दिले व ते इंग्लंडला परतले. यानंतर हडसनबाबत काहीचमाहिती मिळू शकली नाही. तेथेच त्याचा मृत्यू झाला असावा, असेमानले जाते. हडसन उपसागर, हडसन सामुद्रधुनी व हडसन नदी हीत्याची स्मारके आहेतच परंतु त्याच्याच धाडसामुळे इंग्रजांचा स्पिट्स्-बर्गेनमधील देवमाशांचा व्यापार व हडसन उपसागराजवळील एस्किमोंशीफरचा व्यापार सुरू झाला.

ओक, द. ह.