पीत समुद्र :  (ह‌्वांग हाई). ईशान्य चीन व कोरियन द्वीपकल्प यांदरम्यानचा पॅसिफिक महासागराचा फाटा. त्याचा विस्तार स्थूलमानाने ३२ उ.ते ३८ उ. व १२० पू. ते १२६ पू. यांदरम्यान आहे. पूर्व-पश्चिम आणि दक्षिणोत्तर विस्तार अनुक्रमे ९६६ व ७०० किमी., क्षेत्रफळ ४,०४,००० चौ. किमी., चिहली  (बो हाई) आखात वगळता सरासरी खोली ४४ मी. व कमाल खोली १०३ मी. याच्या पूर्वेस कोरियन द्वीपकल्प, पश्चिमेस चीन, दक्षिणेस पूर्व चिनी समुद्र व उत्तरेस कोरिया उपसागर आहे. उत्तरेकडील क्वांटुंग व दक्षिणेकडील शँटुंग द्वीपकल्प यांदरम्यान चिहली सामुद्रधुनी आहे. तिच्यामुळे वायव्येकडील चिहली आखात पीत समुद्राशी जोडसे गेले आहे.

पीत समुद्र साधारणतः हिमनद-पश्च कल्पात निर्माण झाला असावा. चीनच्या मुख्य भूमीवरून वाहत येऊन पीत समुद्राला मिळणाऱ्या नद्यांच्या गाळमिश्रित पाण्यामुळे या समुद्राचे पाणी पिवळसर दिसते व त्यामुळेच या समुद्रास पीत समुद्र हे नाव पडले. चीनमधील ह‌्वांग हो, ह‌्वाई, लिआओ हो, बाय व यालू आणि कोरियातील हान व तॅदाँग या प्रमुख नद्या पीत समद्रात पाणी व गाळ आणून टाकतात. चिहलीचे आखात व कोरिया उपसागर यांसह पसरलेला पीत समुद्र हा अर्धभूवेष्टीत व उथळ आहे. या सागरी द्रोणीचा आकार अंडाकृती आहे. पूर्व आणि पश्चिम किनारपट्ट्यांवर निर्माण होणाऱ्या जोरदार लाटांमुळे त्या ठिकाणी वाळू मोठ्या प्रमाणावर साठते. समुद्राच्या मध्यवर्ती भागात चिखलमिश्रित वाळूचे प्रमाण अधिक आहे. दगडगोटे व माती यांच्या संचयनाचे असेच प्रमाण चीनच्या भूभागालगतच्या समुद्रात आढळते.

या सागरावरील हवामान हिवाळ्यात थंड व कोरडे, तर उन्हाळ्यात आर्द्र व उबदार असते. उन्हाळ्यात वादळे निर्माण होतात. येथील तपमानात १०० से. पासून २८० से. पर्यंत चढउतार आढळतो. याच्या उत्तरेस ५० सेंमी., तर दक्षिणेत २०० सेंमी. पर्जन्यवृष्टी होते. किनारी भागात सामुद्रीक धुके वारंवार तयार होते.

पीत समुद्रातील उष्ण प्रवाह हा जपानी प्रवाहाचाच एक भाग होय. क्यूशू बेटाच्या पश्चिम बाजूस हा प्रवाह मूळ जपानी प्रवाहापासून वेगळा होतो व सु. ०·५ नॉट इतक्या वेगाने पीत समुद्राच्या मध्यवर्ती भागात शिरतो. किनारी भागातील पाण्याच्या कमी क्षारतेमुळे या प्रवाहाची क्षारता थोडी कमी होते. पीत समुद्राच्या क्षारतेचे प्रमाण ३१ % ० ते ३३ % ०  असून, बो हाई आखातात ते ३० % ० ते ३१ % ० पर्यंत आढळते.

या समुद्रावरील भरतीचे प्रमाणही जास्त असून, चीनच्या किनारपट्टीवर १ ते ३ मी., तर कोरियन द्विपकल्पाच्या पश्चिम किनाऱ्यावर ते ३–८ मी. पर्यंत आढळते. उत्तरेकडे समुद्राची रुंदी कमी असल्याने अशी  तफावत आढळते.

चिहली आखात हिवाळ्यात गोठते. हिवाळ्यात समुद्रातील पृष्ठभागाच्या व तळभागाच्या पाण्याचे तपमान व क्षारता एकसारखीच असते. उन्हाळ्यात मात्र भूमिखंडावरून वाहत येणाऱ्या नद्यांमुळे समद्रपृष्ठाचे तपमान व क्षारता कमी होते परंतु खोल भागातील तपमान व क्षारता कमी होत नाही.

उत्तम प्रतीचे मासेमारी क्षेत्र म्हणून पीत समुद्र प्रसिध्द आहे. येथे प्रामुख्याने सी-ब्रीम, क्रोकर, झिंगे, कटलस, स्क्विड, काळा बांगडा प्लाउंडर इ. प्रकारचे मासे सापडतात. अनिर्बंध मासेमारीमुळे उत्पादन खूपच कमी झाले होते. त्यामुळे मासेमारीवर नियंत्रण घालण्यात आले आहे.

चीनमधील चिंगडाऊ, चीफू, डायरेन व कोरियातील इंचॉन, हॅजू, कूनसान व मॉकपॉ ही प्रमुख शहरे आणि बंदरे या समुद्रकिनाऱ्यावर आहेत. चिनी, जपानी व कोरियन बंदरांतून चालणाऱ्या व्यापारात वाढ होत असल्याने पीत समुद्राचे व्यापारी महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे.

वाघ, दि. मु.