हटन, जॉन हेन्री : (२७ जून १८८५ – २३ मे १९६८ ). ब्रिटिश भारतातील एक सनदी अधिकारी व प्रसिद्ध मानवशास्त्रज्ञ. त्याचा जन्म यॉर्कशर (इंग्लंड) येथे मध्यमवर्गीय सुस्थितीतील कुटुंबात झाला. त्याने ऑक्सफर्ड विद्यापीठातील इसेक्स व वर्सेस्टर महाविद्यालयांत शिक्षण घेऊन पदवी मिळविली (१९०७). त्यानंतर त्याने भारतीय नागरी प्रशासकीय सेवेत सनदी अधिकाऱ्याची नोकरी पतकरली (१९०९). त्याने आपल्या प्रशासकीय सेवेतील बहुतांश कालावधी आसाममध्ये-प्रामुख्याने नागा टेकड्यांत-व्यतीत केला. त्या भागात त्याने प्रशासकीय अधिकारी आणि उपायुक्त म्हणून काम केले. पुढे त्याची आसामच्या मानवजातिवर्णन विभागाच्या सामान्य संचालकपदी नियुक्ती झाली (१९२०). तत्पूर्वी त्याने कामाच्या निमित्ताने ज्या नागा भागाला पूर्वी कुणीही भेट दिली नव्हती अशा दुर्गम, अपरिचित भागाला भेट दिली. त्यांच्यातील काही वाद मिटविले आणि त्यांच्या समस्या शासनाला कळविल्या. तत्संबंधीची माहिती पीट रिव्हर्स संग्रहालयात (ऑक्सफर्ड) जतन केलेल्या त्याच्या दैनंदिनीवरून मिळते. त्यावरून त्याच्या खडतर परिश्रमाची कल्पना येते. त्याने सेमा नागा, अंगामी नागा इ. नागांच्या उपजमातींच्या धार्मिक चालीरीती, विवाहपद्धती व शिकार यांचा अभ्यास नागा टेकड्यांत प्रदीर्घ काळ वास्तव्य करूनकेला. नागा टेकड्यांतील मोकोकचुंग व कोहिमा येथील सेमा नागांची भाषा तो शिकला. त्यामुळे त्यांच्या सर्वांगीण जीवनाची त्याला ओळख झाली. शिवाय त्यांना तो आपल्यापैकीच एक वाटू लागला. साहजिकच त्यांची संस्कृती, चालीरीती, जीवनपद्धती इत्यादींबद्दल त्यास जवळून अभ्यास करता आला. या संशोधनातून त्याने त्यांच्या समाजजीवनावर विस्तृत लेखन केले. त्याचे द सेमा नागाज (१९२१) आणि द अंगामी नागाज (१९२१) हे दोन साक्षेपी ग्रंथ होत. त्याच्या संशोधनात्मक लेखनामुळे त्यास ऑक्सफर्ड विद्यापीठाने डी. एस्सी. ही पदवी दिली. नंतर त्याची भारतीय जनगणनेच्या आयुक्तपदी नियुक्ती झाली (१९२९ ). हटनने प्रश्नावली बनवून भारतातील आदिवासींची माहिती गोळा करण्यास अन्य सहकाऱ्यांना साहाय्य केले आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना तत्संबंधीचे वृत्तान्त लिहिण्यास उत्तेजित केले. आयुक्तपदाचा राजीनामा देऊन (१९३६) तो केंब्रिज विद्यापीठात प्राध्यापक म्हणून रुजू झाला. तेथून तो १९५० मध्ये सेवानिवृत्त झाला. निवृत्तीनंतरही त्याचे लेखन-वाचन चालू होते. आग्नेय आशिया व ओशिॲनियातील पूर्वाश्म-संस्कृतीबद्दल त्याला कुतूहल होते. त्यावर त्याने स्फुटलेख लिहिले. त्याने जॉन फिलिप मिल्स व फ्यूरर–हायमेनडॉर्फ या तरुण मानवशास्त्रज्ञांना मार्गदर्शन केले. या तिघांनी मिळून अंगामी, सेमा, लोथा, आओ, रेंगमा व कोन्याक या नागा जमातींवर विस्तृत संशोधन केले. तसेच त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण वस्तू गोळा केल्या. हटनच्या वस्तू पीट रिव्हर्स संग्रहालयामध्ये ठेवल्या आहेत.

हटनला अनेक मानसन्मान लाभले. त्यांपैकी रॉयल ॲन्थ्रोपॉलॉजिकल इन्स्टिट्यूटचे रिव्हर्स मेमोरिअल मेडल (१९२९) व रॉयल सोसायटी ऑफ आर्ट्सचे रजत पदक (१९३२) हे महत्त्वाचे होत. यांशिवाय त्याने फ्रेझरच्या स्मरणार्थ केलेले भाषण (१९३८) आणि रॉयल ॲन्थ्रो-पॉलॉजिकल इन्स्टिट्यूटचे अध्यक्षपद (१९४४-४५) हे प्रतिष्ठेचे होत.

त्याचे ऑक्सफर्ड (इंग्लंड) येथे वृद्धापकाळाने निधन झाले.

गेडाम, आनंद