हगिन्झ, सर विल्यम : (७ फेब्रुवारी १८२४-१२मे १९१०). इंग्रज ज्योतिर्विद. त्यांनी तारे व इतर खस्थ पदार्थांचेरासायनिक घटक ठरविण्यासाठी वर्णपटीय पद्धती वापरल्या. यामुळे निरी-क्षणात्मक ज्योतिषशास्त्रात क्रांतिकारक बदल घडून आले. ⇨ खगोलीय भौतिकी हा विषय त्यांच्या काऱ्यामुळे पुढे आला.
हगिन्झ यांचा जन्म न्यूइंग्टन (इंग्लंड) येथे झाला. त्यांचे शिक्षण सिटी ऑफ लंडन या विद्यालयात झाले. प्रथम त्यांना शारीरविज्ञानात रस होता व त्यांच्याजवळ भेट म्हणून मिळालेला सूक्ष्मदर्शकही होता. नंतरत्यांना ज्योतिषशास्त्रात रस निर्माण झाल्याने त्यांनी एक दूरदर्शक खरेदी केला. त्यांनी १८५६ मध्ये टूलसे हिल (लंडन) या टेकडीवर खासगी वेधशाळा उभारली. तेथील काही उपकरणे त्यांनी स्वतः खरेदी केली व काही उपकरणे त्यांना रॉयल सोसायटी (लंडन) या संस्थेने दिली होती. रोबर्ट व्हिल्हेल्म बन्सन व गुस्टाफ रोबेर्ट किरखोफ यांनी वर्णपटविश्लेषणात काही शोध लावले होते. या शोधांचा उपयोग ज्योतिषशास्त्रात करून घेण्यास अनेक ज्योतिर्विदांनी सुरुवात केली व त्यांपैकी हगिन्झ हे एक होते. सौर वर्णपटातील फ्राउनहोफर रेषांवरून सूऱ्याच्या वातावरणातील रासायनिक घटक कसे ओळखता येतात, हे किरखोफ यांनी दाखविलेहोते. १८६३ मध्ये हगिन्झ यांची पहिली वर्णपटीय निरीक्षणे प्रसिद्धझाली. त्यामध्ये त्यांनी सूर्य व पृथ्वी येथे आढळणाऱ्या मूलद्रव्यांचेचतारे बनलेले आहेत, असे दाखविले. ताऱ्यांची व त्यांच्या वर्णपटांची छायाचित्रण करण्याची आधीची पद्धत वेळ खाणारी व अडचणीची होती. म्हणून अनेक प्रयोग करून हगिन्झ यांनी वेगळ्या प्रकारची प्रकाशसंवेदी रसायने लावलेल्या कोरड्या काचेची पद्धत शोधून काढली. १८५८-६० या काळात त्यांनी ग्रह व तेजस्वी ताऱ्यांचे वेध घेतले.
हगिन्झ यांनी १८६४ मध्ये विविध ⇨ अभ्रिकांचे वर्णपट मिळविले. त्यांवरून अभ्रिका मुख्यत्वे प्रदीप्त वायूच्या (ताऱ्यांच्या समूहांच्या नव्हे) बनलेल्या असतात, हे म्हणणे प्रस्थापित झाले. अशा प्रकारे अभ्रिकांच्या संघटनाविषयीचा दीर्घकाळ चाललेला वाद मिटला. यानंतर थोड्याच काळाने त्यांनी अनेक धूमकेतूंचे वर्णपट मिळविले. यांवरून धूमकेतूंमध्ये हायड्रोकार्बने असल्याचे त्यांना दिसून आले. १८६६ मध्ये त्यांनानवताऱ्याच्या [→ स नवतारा व अतिदीप्त नवतारा] वर्णपटात हायड्रो-जनाच्या रेषा आढळल्या. त्यांनी ⇨ कालिय तारकासमूहातील बिंबाभ्रिका [→ अभ्रिका] पाहिली होती. वर्णपटीय अभ्यासाद्वारे चंद्रावर वातावरण नसल्याचे त्यांनी दाखविले. त्यांनी वर्णपटविज्ञानाच्या ज्योतिषशास्त्रातील उपयोगाचा सर्वांत महत्त्वाचा शोध १८६८ मध्ये लावला. एखाद्याताऱ्याच्या वर्णपटातील रेषांची डॉप्लर च्युती [→ डॉप्लर परिणाम] वापरून त्या ताऱ्याचा अरीय (त्रिज्यीय) वेग सर्वप्रथम मोजला. उदा., व्याध ताऱ्याच्या वर्णपटीय रेषांच्या डॉप्लर च्युतीवरून त्याचा सूऱ्यापासून दूर जाण्याचा वेग सेकंदाला ४६ किमी. असल्याचे त्यांनी दाखविले. नंतरच्या अधिक अचूक पद्धतींद्वारे काढलेला हा वेग सेकंदाला २८-३५ किमी. असल्याचे दिसून आले. तंत्रविद्येतील हा विशिष्ट शोध विश्वाची संरचनाव उत्क्रांती यांविषयीच्या अध्ययनात खूप महत्त्वाचा ठरला. सूऱ्यामध्ये होणाऱ्या रासायनिक विक्रियांसारखे प्रयोग करून त्यांनी प्रयोगशाळेत कॅल्शियम हे मूलद्रव्य तयार करून दाखविले. त्यांनी प्रातिनिधिक ताऱ्यांची सूची असलेला एक संदर्भग्रंथही लिहिला. १८७५ नंतर हगिन्झ यांनीआपले संशोधन व लेखन कार्य मुख्यत्वे पत्नी मार्गारेट हगिन्झयांच्या सहकाऱ्याने केले.
हगिन्झ यांना पुढीलप्रमाणे अनेक मानसन्मान मिळाले : रॉयल सोसायटीचे (लंडन) फेलो (१८६५), रॉयल पदक (१८६६), रम्फर्ड पदक (१८८०), रॉयल ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे सुवर्ण पदक (१८८५), वार्षिक १५० पौंड सेवानिवृत्तिवेतन (१८९०), कॉप्ली पदक (१८९८), रॉयल सोसायटीचे अध्यक्षपद (१९००) इत्यादी.
हगिन्झ यांचे टूलसे हिल येथे निधन झाले.
काजरेकर, स. ग.