स्व्हेडबॅरी, टेऑडॉर : (३० ऑगस्ट १८८४-२५ फेब्रुवारी १९७१). स्वीडिश रसायनशास्त्रज्ञ. ⇨ कलिल रसायनशास्त्रात संशोधन आणि अति-अपकेंद्रित्र या प्रयुक्तीचा लावलेला शोध या काऱ्यांसाठी त्यांना १९२६ सालचे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले.

स्व्हेडबॅरी यांचा जन्म स्वीडनमधील यव्हलजवळील फ्लेरांग गावी झाला. अप्साला विद्यापीठाच्या केमिकल इन्स्टिट्यूटमध्ये सहायक पदावर कार्यरत असतानाच त्यांनी बी.ए. (१९०५), एम्.ए. (१९०७) व पीएच्.डी. (१९०८) या पदव्या संपादन केल्या. याच विद्यापीठात ते रसायनशास्त्राचे व्याख्याते (१९०७ ), भौतिकीय रसायनशास्त्राचे व्याख्याते व निर्देशक (१९०९) आणि प्राध्यापक (१९१२) झाले होते. १९४९ मध्ये निवृत्तीनंतर ते गुणश्री प्राध्यापक, तसेच याच विद्यापीठातीलगुस्टाफ व्हेर्नर इन्स्टिट्यूट फॉर न्यूक्लिअर केमिस्ट्रीचे संचालकही होते (१९४९-६७).

स्व्हेडबॅरी यांनी कलिल आणि महारेणवीय संयुगे यांसंबंधी संशोधन केले. कलिल कणांचे आकारमान १-५०० मिलिमायक्रॉन या मऱ्यादेत असते (१ मिलिमायक्रॉन = १०⁷ सेंमी.). त्यांनी पहिले अति-अपकेंद्रित्र १९२४ मध्ये तयार केले. त्यात गुरुत्वाकर्षण प्रेरणेच्या ५,००० पटीं-पर्यंतची केंद्रोत्सारी प्रेरणा निर्माण होत असे. या प्रयुक्तीच्या नंतरच्यासुधारित प्रकारांमध्ये गुरुत्वाकर्षण प्रेरणेच्या लाखपटींपर्यंतची केंद्रोत्सारी प्रेरणा निर्माण करण्यात आली. ही प्रयुक्ती वापरून त्यांना हीमो-ग्लोबिनासारख्या अतिशय जटिल प्रथिनांचे रेणुभार अचूकपणे ठरविता आले. नंतरच्या काळात त्यांनी अणुकेंद्रीय रसायनशास्त्रात संशोधन केले. त्यांनी सायक्लोट्रॉन या ⇨ कणवेगवर्धकात सुधारणा करण्याचे कामकेले आणि आपले विद्यार्थी ⇨ आर्ने व्हिल्हेल्म काउरिन टिसेलियस यांना ⇨ विद्युत् संचारण विषयक प्रगत संशोधनात मदत केली.

आपल्या संशोधनकाऱ्याकरिता माहिती करून घेण्यासाठी स्व्हेडबॅरी यांनी परदेशांतील अनेक प्रयोगशाळांना भेटी दिल्या होत्या. उदा., जर्मनी (१९०८), हॉलंड आणि फ्रान्स (१९१२), बर्लिन (१९१३), व्हिएन्ना (१९१६), लंडन व पॅरिस (१९२०), इंग्लंड आणि डेन्मार्क (१९२२), अमेरिका व कॅनडा (१९२२-२३). नंतर स्व्हेडबॅरी यांनी अणुकेंद्रीय रसायनशास्त्र व प्रारण जीवविज्ञान यांतील समस्यांकडे लक्ष दिले. तसेच त्यांनी छायाचित्रण प्रक्रियेचा अभ्यास केला. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्यांनी कृत्रिम रबर तयार करण्याच्या पद्धतीवर काम केले. स्वीडिश व परदेशी ज्ञानपत्रिकांत त्यांनी अनेक संशोधनपर लेख लिहिले. तसेचत्यांनी सात पुस्तकेही लिहिली.

स्व्हेडबॅरी यांना नोबेल पारितोषिकाशिवाय इतर अनेक मानसन्मानही मिळाले आहेत. उदा., जॉन एरिकसन पदक (१९४२), बर्झीलियस पदक (१९४४) व फ्रँक्लिन इन्स्टिट्यूटचे पदक (१९४९) सन्माननीय डॉक्टरेट पदव्या, तसेच स्वीडिश ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस, हेल ॲकॅडेमी, केमिकल सोसायटी (लंडन), इंडियन ॲकॅडेमी ऑफ सायन्स, अमेरिकन फिलॉ- सॉफिकल सोसायटी (फिलाडेल्फिया ), न्यूयॉर्क ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस, रॉयल सोसायटी (लंडन), नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्स (वॉशिंग्टन) इ. संस्थांचे सदस्यत्व इत्यादी.

स्व्हेडबॅरी यांचे अरब्रू येथे निधन झाले.

जमदाडे, ज. वि ठाकूर, अ. ना.